एकी हेच बळ? गावात झालेत कचऱ्याचे तळ
- 1 day ago
- 3 min read
गाव करील तो राव काय करणार?
लोणी काळभोर, (सचिन सुंबे) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील टाकल्या जाणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना 26 फेब्रुवारी 2026 रोजी भीषण आग लागली होती. या आगीमुळे चार ते पाच किलोमीटरचा परिसर धुराने व्यापला होता. आग तब्बल चार दिवस धुमसत राहिली होती. त्यामुळे परिसरात धूर पसरला होता. या धुरामुळे एमआयटी एडीटीमधील विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत नदीपात्रात थेट कचरा टाकणे बंद करण्यासाठी कचरा बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील कचऱ्याच्या गाड्या एमआयटीमधुन सोडण्यास बंदी घातली आहे आणि इथेच सुरु झाली पूर्व हवेलीतील कचऱ्याची धगधग. कचरा बंद आंदोलनामुळे लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या गावात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर ग्रामपंचायतीत चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र कमी उपस्थितीमुळे सभा तहकूब करण्यात आली. त्यासंदर्भात एमआयटी शिक्षण संस्थेला कायदेशीर भाषेत उत्तर देऊ, असा खणखणीत इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिला आहे. यावेळी बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले, एमआयटी संस्थेने विद्यार्थ्यांचा वापर करून आंदोलन घडवून आणले. गावकऱ्यांनी विरोध केला असता तर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असते, म्हणून आम्ही संयम बाळगला. मात्र आमच्या संयमाला कमजोरी समजू नये. तसेच त्यांनी आरोप केला की, एमआयटीकडे स्वतःचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही आणि त्यांचा कचरा नदीपात्रात टाकला जातो. गट क्रमांक 39 मधील रस्ता गायब करण्यात आल्याचा व ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान या विषयावर आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली.
‘एकी हेच बळ? गावात झालेत कचऱ्याचे तळ’ अशी अवस्था झाली आहे. जर ग्रामसभा बोलावली होती तर गण संख्येअभावी ती तहकूब करण्याची नामुष्की का आली? कारण गावात एकी नसल्याचे दिसून येत आहे. एरवी पालखी तळाला नाव देण्यासाठी व पालखीचा मान घेण्यासाठी पुढे येणारे पुढारी गावाच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एकत्र येत नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे. प्रशांत काळभोर व त्यांचे सहकारी कचरा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजकारण जरूर करावे पण गावाचा एखादा मोठा प्रश्न पुढे आला की गावकी, भावकी व पुढारपण बाजूला ठेवून गावातील नागरिकांसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी एकत्र येणे कधीपण फायद्याचेच आहे.
राजकारण करत असताना त्यात समाजकारण सुद्धा महत्त्वाचे आहे. विरोधासाठी विरोध न करता समाजासाठी एकीकरण हे महत्त्वाचे आहे. फक्त निवडणुकीसाठी राजकारण करुन इतर वेळी गावाच्या विकासासाठी एकत्रीकरण महत्त्वाचे आहे. एखादा मोठा प्रकल्प गावात होत असेल तर तो दुसऱ्या गटाने हाणून न पाडता तो पूर्ण होणे गरजेचे आहे. तुम्ही राजकारण करा, एकमेकांशी बोलू नका पण प्रकल्प हाणून पाडू नका, असे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील नागरिक बोलून दाखवीत आहेत. एखाद्या गटाच्या पुढाऱ्याने चांगला प्रकल्प गावात आणला तर त्याचे श्रेय जरुर त्या पुढाऱ्याला मिळाले पाहिजे व गावाच्या सुधारणेसाठी विरोध होता कामा नये . दुसऱ्या गटाने दुसरा चांगला प्रकल्प आणावा. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील अनेक प्रकल्प गावातील राजकारणामुळे बंद आहेत. यात गावकऱ्यांचेच नुकसान होत असून पुढारी फक्त आम्ही प्रकल्प बंद पाडला म्हणून खूश आहेत. त्यामुळे पुढाऱ्यांच्या डोक्यातील विरोधाचा कचरा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील कचरा प्रकल्प मार्गी लागणार नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
गाव करील तो राव काय करणार?
गाव करील तो राव काय करणार? ही मराठीत म्हण आहे जी गावकऱ्यांच्या एकजूटीच्या सामूहिक शक्तिला अधोरेखित करते. ‘गाव करील ते राव काय करील?’ याचा अर्थ असा होतो की एका गटाने जे करू शकत नाही, ते संपूर्ण गाव एकत्र यऊन सहज साध्य करू शकते. सामूहिक एकतेचे बळ वैयक्तिक सामर्थ्यापेक्षा मोठे असते. त्यामुळे आपल्याच गावातील कचरा आपल्यालाच टाकण्यासाठी बंदी असावी अशी नामुष्की येणे खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे. कचरा नदीत न टाकता प्रकल्प उभा करुन त्याची विल्हेवाट लावली जावी. त्यामुळे एमआयटीच्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार नाही. याची दखल दोन्ही गावातील पुढारी व नागरिकांनी घेऊन ‘एकी हेच बळ’ दाखवावे अशी अपेक्षा दोन्ही गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २३ ते २९ मे २०२६
.jpg)



Comments