पुण्यकर्म | PunyaKarma
- 2 days ago
- 4 min read
निवृत्त होण्यापूर्वी शेवटचे दीड वर्ष मी आमच्या कंपनीच्या जिल्हा प्रशासन विभागाचा अधिकारी म्हणून काम पाहत होतो. इथे काम करताना बरेच आगळे वेगळे अनुभव येत. अशीच एक मनोरंजक पण तेवढीच गंभीरपणे विचार करायला लावणारी एक केस माझ्यासमोर आली होती. इथे काम करत असताना शक्यतो नियमांची नीटपणे माहिती नसलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असायचा.
कधी कधी मात्र अशी काही बिलींदर माणसे समोर यायची की ज्याचे नाव ते! निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशनसंबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही एक मोहीम राबवत होतो. अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले. सर्व नोंदी त्याला समजावून सांगितल्या.
सर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला. त्या दिवशी तो निघून गेला; पण सात-आठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा माझ्याकडे आला. येताना त्याने एक अर्ज आणला होता. अर्जात त्याने लिहिले होते...
“माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव, हिचे दिनांक 20मे 2000 रोजी निधन झाले. (सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) त्यानंतर 2 जाने. 2001 रोजी मी मुलांची आबाळ होत असल्याने उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि या दुसऱ्या पत्नीचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे! (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे.) माझ्याकडून माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल नियमाप्रमाणे कार्यालयाला कळवणे आवश्यक होते पण नजरचुकीने तसे करणे राहून गेले होते. या चुकीबद्दल मी दिलगीर आहे.
आता याद्वारे मी विनंती करतो की, माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नामनिर्देशन बदलुन नवीन दिल्याप्रमाणे नोंद करावी...”
त्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो. त्याचा अर्ज दाखल करून घेतला आणि त्याला दोन-तीन दिवसात फोन करून कळवतो असे मी सांगितले.
तो अर्ज वाचून मी खूप गोंधळून गेलो होतो. सदर व्यक्तिचे नाव केशव, त्याच्या नव्या पत्नीच्या वडिलांचे नाव केशव, त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव राजश्री, शिवाय दुसऱ्या पत्नीचे बदललेले नावही राजश्री होते!
त्याची केस मी तपशीलवार वाचायला घेतली...
आता तुम्ही म्हणाल यात विशेष असे काय आहे? सांगतो...
या महाशयांनी दुसरे लग्न 2001 साली केले असे म्हटले; पण त्याची कार्यालयीन नोंदणी मात्र तो सतरा वर्षांनी करत होता! स्वतःच्या ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले! विशेष म्हणजे आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले!
आहे का नाही योगायोग? सगळी केस वाचून डोक्याचा गोविंदा झाला होता. त्याचे तो बदलू पाहत असलेले नामनिर्देशन वाचले आणि मी गंभीर झालो.
आधीच्या नामनिर्देशनात त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर एक मुलगा आणि एका मुलीचेही नाव होते. नवीन नॉमिनेशन पत्रामध्ये मात्र त्याने फक्त दुसऱ्या बायकोचेच नाव लिहिले होते! मुलांची नावे तो काढून टाकत होता!
माझ्या मनात विचार आला, ‘काय दोष त्या मुलांचा?’
माझ्या अधिकारात नसूनही मी ती केस पेंडीग ठेवली. विचार करत राहिलो, काय करता येईल? आठवडाभरानंतर तो कर्मचारी पुन्हा आला.
त्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने आपले नामनिर्देशन बदलावे म्हणून दिलेले कागद अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते. या केसमध्ये आपण नियमात बसवून काही तरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण शेवटी तो त्याचा निर्णय होता आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होता!
तरीही, ‘कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो...’ यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.
त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.
“सर माझ्या अर्जाचे काय झाले?”
“ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशनबद्दल ना...” मी उगीचच अज्ञान पाजळले.
“हो सर...”
“त्याचे काय आहे की तुमची बायको गेली 2000 ला, पुढे 2001 सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना?”
“हो...”
“मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले?”
मी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...
“हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं...”
“मग आता कसं काय समजलं?”
“मी या वर्षी रिटायर होणार आहे. त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय...”
“आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का?”
“हो, त्यानेच सांगितलं!”
“तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना?”
मी असाच हवेत बाण सोडला.
त्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.
आता माझा आवाज वाढला...
“अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोडं स्वतः डोकं चालवावं वाटलं नाही तुम्हाला? फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय? त्या दोन पोरांनी काय केलंय? त्यांची नावे वगळायची?”
खरं तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं; पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली. माझा तो बदललेला पवित्रा घून तो बराच गंभीर झाला होता. त्याने काढता पाय घेतला.
“मी दुपारनंतर परत येतो सर...”
माझा निरोप घेऊन तो निघून गेला.
लंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.
“सर, ते आधीचे पेपर परत द्या आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या...”
मी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी नकळत माझ्यावर खूश झालो.
ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते!
नव्या नॉमिनेशन फॉर्ममध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला 50 टक्के आणि दोन्ही मुलांना 25 टक्के प्रत्येकी असे वाटप केले होते.
“धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले...”
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते. नकळत माझ्या हातून एक पुण्यकर्म होणार होते.
- प्रल्हाद दुधाळ
423012020
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६
.jpg)



Comments