top of page

अनुभूती

  • 2 days ago
  • 2 min read

सन 1991, विवाहापश्चात बहूप्रतीक्षेनंतर मातृत्वाची चाहूल लागली होती. खरं तर विश्वासच बसत नव्हता की आपल्या उदरात अंकुर बहरतोय. मन प्रफुल्लित झालं होतं. दिवसागणिक उत्सुकता वाढत होती. गर्भारपणाचं तेज चेहऱ्यावर विलसत होतं. बाळाची हालचाल जाणवू लागली होती.


हळूहळू सातवा महिना संपला. डोहाळे जेवणाचा शानदार कार्यक्रम झोकात पार पडला. आई तर दुसऱ्या महिन्यापासून सेवेसाठी हजर होत्याच. शेजारच्या शितोळेकाकी दररोज सकाळी 8 वाजता येऊन गरमागरम बाजरीची भाकरी तूप लावून आणि काऱ्हळाची चटणी समोर बसवून खाऊ घातल्याशिवाय समोरून हलत नव्हत्या. सकाळी सकाळी खाणे जीवावर यायचे पण त्यांचा आग्रह मोडता येत नव्हता. वाटायचं हा कसला नाश्ता? काळी भाकरी आणि काळी चटणी खाऊन बाळ काळे तर होणार नाही ना? अशीही शंका यायची पण त्यांचा प्रेमाचा ‌‘घास भरवणे‌’ तितकेच मनाला आल्हाददायक वाटायचे. मातृत्व न लाभलेल्या त्या माउलीची ही माया कुठेतरी सुखावून जायची. आमच्या घाडगेमावशी सातत्याने डोहाळे पुरावायच्या. इतकेच काय तर गावाकडील आमचे शेजारी, आमचे सरकती आक्काना हे आवडते, ते आवडते म्हणून कधी मासवडी तर कधी शेंगोळे करून त्यांना जसे जमेल तसे शिदोरी पाठवायच्या. आमच्या लहानपणी डेक्कन जिमखान्यावर असलेल्या आमच्या घरी काम करणाऱ्या शारदाबाईंना बातमी कळल्यावर त्या देखील दररोज खाऊ घेऊन यायच्या. ओम शंकर टी हाऊसच्या मालकीण गंगुबाई मैंदर्गी बातमी कळताच दडपे पोहे, बटाटे वडे, सामोसे घेऊन येऊन प्रेमाने खाऊ घालायच्या. ह्या लोकांचे प्रेम, जिव्हाळा पाहून आत्मसंतुष्टी व्हायची.


आता गरोदरपणाचे ओझे पेलवेनासे झाले होते. अवघडलेपण जाणवत होते. लवकरात लवकर आता हे दोन महिने संपावेत आणि बाळाने जन्म घ्यावा, असे वाटू लागले होते.


नवव्या महिन्यात मात्र माझी मनोवृत्ती बदलू लागली. आता हा महिना संपूच नये असे वाटू लागले कारण... कारण त्यानंतर माझ्या बाळाचे माझ्या उदरातील वास्तव्य संपणार होते. ते माझ्यापासून विलग होणार होते, नव्या जगात प्रवेशणार होते आणि नेमके मला ते नको होते. माझं बाळ असंच माझ्या उदरात राहावे, माझ्यापासून विलग होऊ नये असे वाटू लागले होते. आमचं एकमेकांशी असलेले बाँडिंग संपणार होते, एकमेकांशी जुळलेली नाळ तुटणार होती. माझं रक्त, माझी जीवनद्रव्ये आता मला त्याला देता येणार नव्हती. म्हणून बाळाने उदरातून बाहेर येऊच नये, असे मला वाटू लागले होते. ही एका आईची उत्कट इच्छा होती. त्याची अनुभूती फक्त एक आईच घेऊ शकत होती. आपल्या निर्मितीला आपल्यापासून दूर न होऊ देण्याची ही आसक्ती विलक्षण होती. बाळाची उदरातील उपस्थिती मला सुरक्षितता प्रदान करीत होती. त्याची चुळबूळ सुखावत होती. कधी वाटायचं अशी अवस्था सर्वच आयांची होत असावी का? उत्तर मिळत नव्हते पण माझी अवस्था मात्र अशी झाली होती. माहीत नाही माझी ही मनीषा योग्य होती का अयोग्य? पण झाली होती खरी!


एका आईच्या मनःस्थितीची ही कथा ह्या जागतिक मातृदिनाच्या दिवशी नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच! निसर्ग नियमाप्रमाणे मात्र ठरलेल्या वेळेवर बाळाचे आगमन झाले, आपलीच निर्मिती, प्रतिकृती पाहून मन मोहरले, मातृत्व लाभले आणि जीवन परिपूर्ण झाले पण त्या दोन महिन्यातील अंतरद्वंद्व मात्र आगळे-वेगळे होते, याची अनुभूती आजही विसरता येत नाही.


- चंद्रलेखा बेलसरे, पुणे

+91 98508 95051

प्रसिद्धी साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६




Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page