top of page

आधुनिक हुंडा: जेव्हा 'सेटअप' आणि 'सपोर्ट'च्या नावाखाली प्रतिष्ठा विकली जाते!  | Article on Dowry in Marathi

  • Apr 20
  • 3 min read


Article on Dowry in Marathi
Article on Dowry in Marathi

पुण्याजवळच्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरात नेहा आणि तिचं कुटुंब राहत होतं. उंच इमारती, आयटी कंपन्यांची ऑफिसेस, मॉल्स, कॅफे सगळं आधुनिक होतं; पण या आधुनिकतेच्या आड काही जुन्या सावल्या अजूनही जगत होत्या. नेहा एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती. स्वतःच्या मेहनतीवर तिने शिक्षण पूर्ण केलं होतं. तिचे वडील अनिल बँकेतून निवृत्त झाले होते आणि आई मीनल गृहिणी होती. घरात अभिमानाचं वातावरण होतं कारण मुलगी स्वतःच्या पायावर उभी होती.


एक दिवस नेहाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. नातेवाईकांनी एका मुलाची माहिती दिली. आकाश, तोही आयटी क्षेत्रात नोकरी करत होता. चांगला पगार, चांगलं कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‌‘सुयोग्य‌’ मुलगा. पहिली भेट एका कॅफेमध्ये झाली. दोघेही करिअर, स्वप्नं, प्रवास, आयुष्याबद्दल बोलले. नेहाला वाटलं हा मुलगा समजूतदार आहे. आकाशही तिच्या आत्मविश्वासाने प्रभावित झाला. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांची औपचारिक भेट झाली. सुरुवातीला वातावरण छान होतं. चहा, गप्पा, हशा सगळं अगदी स्वाभाविक! पण थोड्याच वेळात आकाशचे वडील शांतपणे म्हणाले, “आमचे काही मागणं नाहीये. फक्त आजकाल लग्नात मुलीच्या घरून काही ‌‘सेटअप‌’ दिलं तर पुढचं आयुष्य सोपं होतं.”


नेहाच्या आईने विचारलं, “म्हणजे?”


“फ्लॅटसाठी डाउनपेमेंट आणि एक कार दिलीत तर मुलांचं आयुष्य नीट सुरू होईल.”


हे शब्द इतके सहजपणे बोलले गेले की जणू काही ते नैसर्गिकच होतं. कोणीही ‌‘हुंडा‌’ हा शब्द वापरला नव्हता पण त्याचा अर्थ सगळ्यांना समजला. त्या रात्री नेहाच्या घरात शांतता होती. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता होती. “आजकाल असंच असतं,” एका नातेवाईकाने फोनवर सांगितलं. “हुंडा नाही म्हणत पण ‌‘गिफ्ट्स‌’ म्हणतात!”


वडिलांनी शांतपणे विचारलं, “आपण करू शकतो का?”


आईने उत्तर दिलं, “नाही!” कारण दोघांनाही माहीत होतं फ्लॅटसाठी पैसे म्हणजे आयुष्यभराची बचत संपवणं. नेहाने सगळं ऐकलं. ती काही वेळ शांत राहिली.


“बाबा, तुम्ही माझं शिक्षण कर्ज काढून केलं होतं ना?” तिने विचारलं.


“हो.”


“मग आता माझ्या लग्नासाठी पुन्हा कर्ज का?”


कोणी उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी नेहाने आकाशला भेटायचं ठरवलं. “तुला माहीत आहे का, तुझ्या घरी काय बोललं गेलं?” तिने विचारलं.


आकाश थोडा अस्वस्थ झाला. “हो! पण तो हुंडा नाहीये. फक्त सुरुवातीची मदत आहे.”


नेहा शांतपणे म्हणाली, “मदत कोणाला? तुला की तुमच्या प्रतिष्ठेला?”


आकाशकडे उत्तर नव्हतं. ती पुढे म्हणाली, “आजकाल हुंडा ‌‘डिमांड‌’ म्हणून येत नाही. तो ‌‘अपेक्षा‌’ म्हणून येतो.”


काही दिवस गेले. कुटुंबांमध्ये तणाव वाढला. नातेवाईकांचे सल्ले येऊ लागले. इतका चांगला मुलगा पुन्हा मिळणार नाही. थोडं देण्यात काय जातं? तुमची मुलगी तर कमावते ना! पण नेहाच्या मनात एकच प्रश्न होता जर मी कमावते तर माझ्या लग्नासाठी माझ्या घराने पैसे का द्यावेत? एक दिवस तिने आई-वडिलांसमोर स्पष्ट सांगितलं, “माझं लग्न जर व्यवहारावर उभं राहणार असेल, तर मला ते नको.”


आईच्या डोळ्यात पाणी आलं. “समाज काय म्हणेल?” तिने विचारलं.


नेहा हसली. “आई, समाज आपलं आयुष्य जगत नाही.”


काही दिवसांनी आकाशचा फोन आला. त्याने सांगितलं की त्याने घरी विरोध केला आहे. ‌‘मी लग्न करणार असेल तर कोणत्याही अटींशिवाय,‌’ तो म्हणाला पण त्याच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, “ही परंपरा आहे” आणि लग्न मोडलं. घरात शांतता पसरली! पण यावेळी ती भीतीची नव्हती; ती स्वाभिमानाची होती.


काही महिन्यांनी नेहाने तिच्या कंपनीतल्या सहकाऱ्यांसोबत “No Dowry” या विषयावर एक छोटा उपक्रम सुरू केला. तिने सोशल मीडियावर लिहिलं, “हुंडा आज थेट मागितला जात नाही. तो गिफ्ट्स, सेटअप, स्टेटस या नावाने येतो पण नाव बदललं म्हणून अन्याय बदलत नाही.”


त्या पोस्टला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला. काहींनी स्वतःच्या कथा सांगितल्या. काहींनी लग्नात हुंडा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. नेहाचे वडील एके दिवशी म्हणाले, “आपण लग्न मोडलं पण काहीतरी जिंकलो.”


नेहा हसली. आज समाज बदलतोय असं आपण म्हणतो. मुली शिकतात, नोकरी करतात, स्वप्नं पाहतात! पण लग्नाच्या वेळी अजूनही त्यांची किंमत ठरवली जाते. फक्त शब्द बदलले आहेत. हुंडा आता उघडपणे मागितला जात नाही. तो ‌‘स्टेटस‌’ म्हणून येतो. ‌‘सपोर्ट‌’ म्हणून येतो. ‌‘सेटअप‌’ म्हणून येतो! पण सत्य एकच आहे, जोपर्यंत लग्नाला व्यवहाराची छटा आहे, तोपर्यंत आधुनिक समाजही पूर्णपणे मुक्त नाही. नेहाची कथा संपली नाही; कारण आजच्या समाजात अशा अनेक नेहा अजूनही उभ्या आहेत ज्या किंमत नाही, सन्मान मागतात!!


- मयूर बागुल

+91 90962 10669

प्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक २० ते २६ एप्रिल २०२६


सर्जक | Sarjak
₹250.00₹187.50
Buy Now

Article on Dowry in Marathi

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page