ओशोंच्या गोष्टी - सत्य धर्माचे पालन | Stories of Osho
- 1 day ago
- 4 min read
आपल्याकडे देव, धर्म, अध्यात्म याविषयी खूपच अंधानुकरण केले जाते. अनेकदा एखादी गोष्ट करताना आपण ती का करायची हा विचार करत नाही. परंपरेने आली आहे आणि आपले पूर्वज ती गोष्ट करत होते, त्यामुळे आपण ती केली पाहिजे असा हट्ट असतो! पण आपल्या पूर्वजांनी ते करताना त्यामागे नेमके कारण काय बरे असावे असा प्रश्न पडत नाही. मार्क्स म्हणाले होते की, धर्म ही अफूची गोळी आहे. धर्मामुळे माणसांच्या मनात श्रद्धा निर्माण होण्यास हरकत नाही; मात्र त्यातून अंधश्रद्धा निर्माण झाली आणि विवेक गमावणे झाले तर धर्मामुळे जीवनात जे परिवर्तन घडायला हवे असते, ते घडत नाही.

धर्म हा माणसांचा जीवन उन्नती आणि आनंद निर्माण करण्यासाठी आहे. धर्मामुळे मानवी जीवनात शांतता निर्माण होण्याची गरज आहे. धर्माचा हेतूच समाजाला एकसंघ ठेवणे आणि समाजाचा विकास घडवून आणणे हा आहे. असे असताना जगात जितकी म्हणून युद्धे झाली त्यातील सर्वाधिक युद्धे केवळ धर्माच्या नावाखालीच झाली. धर्मामुळे युद्ध होऊन माणसं मारली जात असतील, समाज अशांत होत असेल तर धर्म चुकीचा आहे. किंबहुना धर्माचा जो विचार मनात धरला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे धर्म स्वीकारताना विवेकाचा विचार असायला हवा. धर्माचा विचार स्वीकारताना चिकित्सा व्हायला हवी. बुद्ध म्हणाले होते की, “मी सांगतो आहे म्हणून विचार स्वीकारू नका तर तुम्ही त्या संदर्भाने विचार करा. विचारानंतर पटले तर त्या वाटेने चला!” पण आपल्या मनात धर्माच्या परंपरेची भीती आहे. त्या भीतीने आपल्या जीवनात अधर्म निर्माण केला आहे. खरा धर्म समजून न घेता आपण धर्माच्या परंपरा डोळे बंद करून स्वीकारतो आहोत. त्यामुळे काही लोक स्वहिताच्या अनुषंगाने जे सांगतात तेच स्वीकारले जाते.
या संदर्भात ओशोंनी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की, एक छोटेसे गाव होते. त्या गावातील लोक खूप भोळेभाबडे होते. त्यांना जे कोणी येऊन सांगायचे तसेच ते ऐकत आणि तसेच करत असत. त्यांच्या गावाच्या बाहेर एक देवाची मूर्ती होती. बिचारे सारे गाव काबाडकष्ट करत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. कष्ट करणे आणि शक्य होईल तशी पूजाअर्चा करणे सुरू होते. तो देव तर उघड्यावर होता. त्या मूर्तीवर छत नव्हते कारण गावातील लोकांची घरे सुद्धा गरिबांसारखीच होती. एक दिवस त्यांच्या गावात एक महात्मा आले. त्यांनी गावातील देवाची मूर्ती पाहिली आणि म्हणाले, “अनर्थ! अनर्थ!” तेव्हा गावातील काही लोक तेथे होते. त्यांनी ते ऐकले आणि चिंताक्रांत झाले.
मग त्या गावकऱ्यांनी सर्वच ग्रामस्थांना बोलावले. ते म्हणाले, “अरे गावकऱ्यांनो, तुम्ही सारे सावलीत राहता आणि देवाला मात्र उन्हात ठेवता. देवाच्या मस्तकावर सावली करा. देव तुमच्यावर खूप रागावला आहे, ते तुम्हाला माहीत नाही.”
गावचे लोक खूपच गरीब होते. अनेकांनी आपल्या घरांची छप्परं सुद्धा अगदी लहान केली होती. आता हे महात्मा सांगत आहेत की, देव रागावले आहेत तर आपण छत उभारले पाहिजे. मग न राहवून त्यांनी परिस्थिती नसताना देखील देवळावर शिखर उभारले. शिखर उभारल्यानंतर महात्मा दुसऱ्या गावी निघून गेले. त्यांना काय एकच गाव नव्हते, अनेक गावे होती. अनेक देव होते. साऱ्या मंदिरांवर शिखर चढविण्याची जबाबदारी त्यांचीच होती. आता देवाचा राग गेला असे त्यांना वाटले आणि आपली कामे पुन्हा सुरू झाली.
मग पुन्हा काही दिवस गेले. थोड्या दिवसानंतर गावात दुसरा एक महात्मा अवतरला. देवळाचे शिखर पाहून तो दुःखी झाला. गावकऱ्यांना एकत्र जमवून त्याने आपली नाराजी बोलून दाखविली. म्हणाला, “सीताराम, सीताराम! अनर्थ झाला. देवळावर शिखर बांधले! अरे ईश्वराला काय तुमच्या या शिखराची आवश्यकता आहे का? कुठे आग लागली तर सगळं स्वाहा होऊन जाईल. देव जळून जाईल. आत्ताच्या आत्ता शिखर उतरवून फेकून द्या!”
गावकरी वैतागले पण ते करणार तरी काय? महात्मा तर खरंच सांगत होता कारण तो महात्मा होता. त्याच्यावर त्यांची श्रद्धा होती. महात्म्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर जन्मजन्मांतरीचे पाप आपल्या मस्तकी लागेल. त्याने शाप दिला तर त्यांचे शाप आपल्याला भोगावे लागतील. आपल्याला नरकवास घडेल. लोकांनी या महात्म्याने सांगितले तसे केले.
अरे देव तर या महात्म्यांच्याच हातातले बाहुले बनतो आहे. महात्मे त्यांना हवे तसे देवाच्या नावाने करून घेतात. बिचाऱ्या गावकऱ्यांनी मुकाट्याने मंदिराचे शिखर उतरवले. कित्येक दिवसांचे श्रम, शक्ती आणि गरिबांचा पैसा असा वाया गेला. अर्थात पैसा गेला तरी त्यांना त्याचे काही वाटले नाही कारण आपली किमान होणाऱ्या पापापासून मुक्तता तरी झाली ही त्यांची धारण झाली. निदान मंदिराचे शिखर चढवण्याच्या पापापासून गावकरी मुक्त झाले हे काय कमी आहे का? शिखर उतरविल्यानंतर महात्मा दुसऱ्या गावी चालते झाले. त्यांना काय हे एकच गाव थोडेच असते? अनेक गावे होती. अनेक देवे होते! या देवदेवतांना मंदिराच्या शिखरापासून मुक्त करण्याची जबाबदारी या महात्म्यांवरच पडलेली होती!
काही दिवस निघून गेले. अवधी लोटल्यानंतरच एक तिसरे महात्मा गावात आले परंतु यावेळी गावकरी मंडळी बरीच सावध झाली होती. ती चुकूनसुद्धा देवाच्या मूर्तीकडे फिरकली नाही. महात्मा आला तरी त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष केले कारण त्याला भेटलो आणि त्यांनी पुन्हा तिसरीच काही भानगड निर्माण केली तर? त्यामुळे गावकऱ्यांनी मंदिराच्या रस्त्यावर जाणे-येणेच सोडून दिले होते. खरे तर त्या गावात जे घडले तेच जवळजवळ साऱ्या जगात घडते आहे. धर्माच्या नावाखाली या महात्म्यांनी अशा अनेक अयोग्य गोष्टी करायला लावल्या आहेत. लोकमानसात भीतीचे असे गंड निर्माण केले आहेत. लोकांनी देवाच्या, मंदिराच्या मार्गाकडे जाणे सोडून दिले, उद्या सर्वत्र असे घडले तर त्यात काही आश्चर्य नाही.
धर्माची होणारी उपेक्षा ही तथाकथित महात्म्यांनी देवाबद्दल निर्माण केलेल्या अंधविश्वासाचा परिणाम आहे. धर्माची उपेक्षा, धर्माच्या नावाखाली चाललेले सोंग-ढोंग, शोषण आणि जडता या सर्वांबद्दलची उपेक्षा आहे. धर्माची उपेक्षा, धर्माचे खोटेपणास पूरक बनणारे संप्रदाय आणि त्यापासून पसरलेला तिरस्कार, हेवेदावे, शत्रुत्व याबद्दलची उपेक्षा आहे. धर्माची उपेक्षा, धर्माची उपेक्षा नसून, वास्तविक त्या घुसडलेल्या असत्याची उपेक्षा आहे. खोट्या धर्माची उपेक्षा आहे. जो धर्म सत्य असतो तो लोकांना सांगितला तर लोक त्याचा स्वीकार करतील पण भीतीतून निर्माण केला जाणाऱ्या धर्माबद्दल केव्हा ना केव्हा खरे कळणारच आहे. त्यामुळे सत्य धर्माचे पालन करणे लोकमाणसांना आवडते. त्यात कोणताही खोटेपणा असत नाही आणि ती वाट जीवन उन्नतीची असते. म्हणून धर्माच्या संदर्भाने जेव्हा काही उभे राहते तेव्हा आरंभी लोक खोट्या बाजूने उभे राहतील पण भविष्यात ती वाट नाकारतील हेही खरे!
- संदीप वाकचौरे
प्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक २० ते २६ एप्रिल २०२६
Stories of Osho in Marathi
.jpg)



Comments