top of page

ओशोंच्या गोष्टी : आरसा फोडून काय उपयोग?

  • Mar 30
  • 3 min read

एक अत्यंत कुरूप स्त्री होती. तिच्याकडे कोणी पाहिले तरी ती तशीच दिसायची. तिलाही आपण कुरूप आहोत याचा फार राग यायचा. तिच्या आसापास असणारी मंडळी तिला तिच्या कुरूपतेबद्दल काहीच म्हणत नसायचे मात्र ती आरशासमोर उभी राहिली की अत्यंत कुरूप दिसायची. तिला आरशाचा फार राग यायचा. तिने आरसा पाहिला की, तळपायाची आग मस्तकात जायची. त्यामुळे तिने अनेकदा अनेक आरसे फोडले आहेत. ती अनेकांना सांगायची, “हे आरसे फार वाईट आहेत. मी नेहमीच माझा चेहरा त्यांच्यामध्ये पाहते तेव्हा माझा चेहरा नेहमीच कुरूपच दाखवतात. मला त्यांचा फार राग येतो.”

हे ऐकल्यावर अनेकांना धक्का बसायचा. आरसा जे आहे तेच दाखवणार. तो दुसरे तरी काय दाखवणार? आरसा जे खरे आहे तेच दाखवतो. त्यामुळे अशा रीतीने कितीही आरसे फोडले तरी चित्र बदलणार नाही. तिच्या या भावना ऐकल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेले. तेव्हा त्या तज्ज्ञाने तिला विचारले की, “तू आरसा का फोडतेस?” तेव्हा ती म्हणाली, “तसे नाही. मी सुंदर आहे पण या आरशांनी मला कुरूप बनवले आहे. हा जेव्हा माझ्या समोर नसतो तेव्हा मी सुंदर असते आणि हा समोर आला की मी कुरूप दिसते.”


खरं तर आरसा आणि कुरूप दिसणे याचा काय संबंध आहे? तुम्ही जसे असता तेच आरसा दाखवतो. त्यात आरशाचा काय दोष असतो? पण आपले वास्तव दाखवणारा आरसा आपल्याला नको असतो. हे ऐकल्यावर मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्या परीने उपचार सुरू केले पण आपण देखील आपल्या जीवनात असाच आरसा दाखवणाऱ्या माणसांबद्दलचा व्यवहार करत असतो. आपल्या संबंधातही तसेच घडते कारण संबंध म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे.



आपल्या संबंधात आपल्याला कोणी खरा आरसा दाखवला की, आपण संबंध तोडून टाकतो. सन्याशी जे असतात ते प्रपंचापासून दूर जातात. त्यांना प्रपंच, पत्नी नको असते कारण या सर्व गोष्टी म्हणजे मोह, माया, विनाशाला कारणीभूत असलेल्या गोष्टी आहेत असे मानत असतात. आपल्या धर्मातही तसाच विचार पेरलेला असतो. खरं तर एका अर्थाने या गोष्टी म्हणजे मोहाचा आरसा असतो. आपण त्या महिलेसारखे जीवन जगत असतो. ती महिला आरसा फोडत होती आणि आपण संबंध तोडून टाकत असतो. त्यामुळे आपण प्रपंचापासून, स्त्रीपासून पळून जाऊन काय उपयोग? कारण वासना, मोहाचा विचार तर आपल्यासोबत असतो. मुळात कुरूप आहोत म्हणून आरसा ती कुरूपता दाखवतो. त्याप्रमाणे आपल्या मनात वासना आहे, म्हणून ती मनात प्रतिबिबींत होते पण ती मनातील वासना नष्ट करण्याऐवजी दुसऱ्यावर प्रत्योराप करत, तिचा त्याग केला आहे असे आपण समजतो. तेथील नातेसंबंध तोडतो.


उलट आपण जेव्हा जंगलात, हिमालयात जातो तेव्हा आपल्याला खूप छान वाटत असते कारण तेथे आरसा नाही. प्रपंचात आरसा आहे. तेथे तुम्ही कसे आहात ते प्रतिबिंबीत होत असते. आरसा फोडल्यावर जशी स्वतःची कुरूपता नष्ट होत नाही, त्याप्रमाणे आपण प्रपंच सोडला, हिमालयात गेलो म्हणजे मोह, वासना सुटते असं घडत नाही. त्यामुळे आपण हिमालयात गेलो आणि पुन्हा दोन-तीन तपानंतर परत आलो तरी तुमच्या सोबत वासना येतेच कारण तुम्हाला हिमालयात आरसा नव्हता. समाजात आला की, तुम्हाला तुमच्या आरशाचे दर्शन घडते. त्यामुळे ज्याला खरोखर सन्याशी व्हायचे आहे, तो हिमालयात पळून जात नाही. तो प्रपंचाचा त्याग करत नाही. समर्थांनी म्हटले आहे की, आधी प्रपंच करावा नेटका / मग घ्यावे ते परमार्थ विवेका कारण प्रपंचातच तुम्हाला तुमच्या खऱ्या चेहऱ्याचे दर्शन घडणार असते. खरा सन्याशी हा आपल्या जीवनातील आरशाकडे निरखून पाहत असतो. उलट तो आरशाला धन्यवाद देत असतो. याचे कारण तू माझे खरे रूप दाखवले, माझे मला वास्तवाचे दर्शन घडवले. खोटा सन्याशी अशा प्रकारे आरशाचा त्याग करत असतो. अशी त्याग करणारी माणसं समाजाला मोठी वाटत असतात पण ही खरी तर मोठी नाहीत कारण ते वास्तवापासून दूर पळून गेलेली असतात.

विनोबांची शिक्षणछाया | Vinobanchi Shikshanchhaya
₹250.00₹187.50
Buy Now

खरा सन्याशी हा नेहमी जागा असतो. पळून गेल्याने जागृतीचा भाव नाही. त्यातून लपण्याचा भाग आहे. कोणत्याही गोष्टींपासून पळून जाणे म्हणजे स्वतःला सुरक्षित करणे असे वाटेल पण ते काही खरे नाही. उलट प्रपंच किंवा अगदी संबंध माणसाला वास्तवाचे दर्शन घडवतात. आपण कोण आहोत? याची जाणीव करून देत असतात. त्यामुळे समाजातील हे आरसे आपल्याला जे काही दाखवतात, त्यापासून पळून जाण्याऐवजी आपण बदलणे हा महत्त्वाचा घटक आहे. आपण जेव्हा बदलू तेव्हा आपल्याला आरशाची मुळीच भीती वाटणार नाही. आपण आतूनच सुंदर झालो की, संबंधाचा आरसा आपल्याला आपली प्रतिमा अगदी स्वच्छ आणि सुंदरतेचे दर्शन घडवेल. कोणताही आरसा हा निस्वार्थ असतो. त्याला नको असलेला प्रतिमेचा भाव पुन्हा दाखवला तरी त्याला फायदा नाही. खोटी प्रतिमा दाखवून लाभ नाही, त्याप्रमाणे खरी प्रतिमा दाखवूनही फायदा नसतो. जे आहे ते दाखवण्याचे काम आरसा करत असतो. आपण आपल्या जीवनात आरशाच्या भीतीने पलायन करून जगण्याऐवजी आरशाला सोबत ठेवून मार्गक्रमण करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यातून आपल्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे, म्हणून आरसा फोडू नका तर त्याला जपून ठेवायला हवे.


- संदीप वाकचौरे

(शिक्षणतज्ज्ञ)

9405404500

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६



पत्रास कारण की | Patras Karan Ki
₹250.00₹187.50
Buy Now

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page