ओशोंच्या गोष्टी : अंहकाराच्या शिखरावर | Osho Bodh Katha Marathi
- 2 days ago
- 4 min read
माणसाची मूळ प्रवृत्ती कोणती? माणसाला जीवनात नेमके काय हवे आहे? माणसं जीवनभर जी धावाधाव करतात ती नेमकी कशासाठी? मुळात आपल्याला कोणीतरी चांगले म्हणावे, या चांगुलपणाच्या भावनेत देखील अहंकाराचा वारा आहे. आपण जे काही चांगले वागतो ते चांगले वर्तन हे माणसांचे बाह्य आणि अंतर्वर्तन आहे का? मुळात ते नाहीच. मानसशास्त्रज्ञ देखील तेच सांगत आले आहेत. मुळची प्रवृत्ती काही असली तरी त्या चांगुलपणात अनेकदा अहंकाराचा वारा असतो. प्रत्येकालाच आपण चांगले वागावे असे वाटत नाही पण कोणी तरी चांगले म्हणावे म्हणून माणसं चांगली वागत असतात हे मात्र खरे... त्या चांगले म्हणण्याच्या वृत्तीतही अहंकाराचेच पोषण असते. आपल्या अहंकाराचे भरण चांगले व्हावे याकरिता माणसं आपला मुळचा स्वभाव बदलतात हे खरे.
ओशो एक गोष्ट सांगतात. एका गावात एक धनिक राहत होता. त्याला एक दिवस असे वाटले की, आपण आपल्या माणसांना छानशी भोजनाची मेजवानी द्यावी. त्यासाठी त्यांनी एक कारणही शोधले आणि त्या विशेष कारणानिमित्त आपल्या अगदी जवळच्या मित्रमंडळींना अत्यंत सुंदर मेजवानी दिली. आपल्या राज्यातील एक धनिक आता मेजवानी देतो आहे म्हटल्यावर सर्वच निमंत्रीत आले होते. धनिकाने आपल्या राज्याचा जो राजा होता, त्यालाही मेजवानीचे निमंत्रण दिले होते. मुळात राजाला निमंत्रण देणे हा जसा अहंकार होता, त्याप्रमाणे आपल्या मेजवानीला राजाने येणे यातही त्याची प्रतिष्ठा उंचावणार होती. त्या उंचावणाऱ्या प्रतिष्ठेत अहंकाराचे पोषण होणार होते. राजाला निमंत्रण गेले असल्याने राजा देखील मेजवानीसाठी उपस्थित राहिला होता. त्यामुळे धनिक अगदी बेहद्द खूश होता. इतकी सारी मंडळी आपल्या निमंत्रणाला मान देऊन आली याचा त्याला आनंद होता.
मेजवानीला सुरूवात झाली होती. धनिक येणाऱ्या जाणाऱ्याचे स्वागत करत होते. हास्यवदनाने हे घडत होते. सहभागी लोक मेजवानीसाठी बसले होते. पंगती उठत होत्या. सेवेकरी पंगतीत वाढत होते. गरमागरम आणि चविष्ठ मेनूवर निमंत्रित ताव मारत होते. धनिक जेवणाच्या पंक्तित फिरत होते परंतु पाहुणे मंडळी भोजनाला बसले असताना त्या धनिकाच्या आनंदाचे रूपांतर क्रोधात झाले. अचानक झालेल्या या बदलाचे आश्चर्य वाटत होते. खरं तर धनिकाचे सारे सेवक सेवा करण्यात गुंतलेले होते मात्र धनिकाचा पारा चढला होता. अनेकांना कळेना काय झाले आहे. येथे एक घटना अचानक घडली होती आणि सारा माहोल बदलून गेला होता. एक सेवक भोजन पंक्तित वाढत असताना, एका नोकराच्या हातून धनिकाच्या पायावर गरम भोजनाची थाळी पडली. धनिकाचा पाय भाजला होता. त्यामुळे धनिकाच्या संतापाच्या लाटा उसळल्या होत्या. त्याच्या डोळ्यातून आग उसळावी असेच चित्र होते. हा अवतार पाहिल्यावर नोकराचे काही खरे नाही असेच अनेकांना वाटू लागले. ज्याच्याकडून चूक घडली होती, तो नोकर तर घाबरला होताच पण इतर नोकही भयभीत झाले होते.
धनिकाचा पारा चढल्याने ज्याच्याकडून चूक झाली त्याला सारे ब्रह्मांड आठवले होते. आपला जीव वाचायला हवा म्हणून त्या नोकराने धर्मग्रंथातील एक वचन धनिकाला सांगितले. तो म्हणाला, ‘जो क्रोधावर संयम ठेवतो तो स्वर्गाचा मालक बनतो!’ मालकानं हे वाक्य ऐकलं. त्याच्या डोळ्यात क्रोधाग्नी उसळत होता. तरी त्यानं राग आवरला आणि तो म्हणाला, “छे, मी काही रागावलो नव्हतो.”
धर्म ग्रंथाचे वाक्य होते... आणि मेजवानीला इतके लोक निमंत्रित होते. त्यामुळे अति राग करून चालणार नव्हता. त्याचवेळी धर्मग्रंथातील एक सुवचनही मदतीला आले होते. हे सुवचन ऐकून तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजविल्या. खुद्द राजाने देखील धनिकाचे कौतुक केले. धनिकाच्या डोळ्यातल्या क्रोधाची जागा अभिमानाने घेतली होती. तो गौरवला गेला होता. एका धर्मवाक्याने त्याच्या जीवनाची वाट बदलली होती. आता वातावरण बदलले होते. त्यामुळे ज्याच्याकडून चूक घडली होती तो नोकर पुन्हा उद्गारला, “जो क्षमा करतो तो स्वर्गाचा मालक बनतो.”
ते ऐकताच मालक त्याला म्हणाला, “मी तुला क्षमा केली आहे” कारण धनिकालाही स्वर्गाचा मालक बनायचे होते. खरं तर हे सुवचन ऐकून त्याला काय वाटले माहीत नव्हते कारण अहंकाराने भरलेल्या धनिकाच्या डोळ्यात क्षमेला जागा कुठली? पण क्षमा केल्यामुळे देखील अहंकाराचे भरण होते हे लक्षात घ्यायला हवे. अहंकाराचा मार्ग खूप सूक्ष्म असतो. छोट्या छोट्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात अहंकाराचे भरण करत असतात. आता पाहुण्यांच्या दृष्टीला धनिक एक अत्यंत धार्मिक माणूस दिसू लागला होता. आतापर्यंत एक क्रूर शोषक असेच सारे जण त्याला ओळखत होते परंतु धनिकाचं हे नवे रूप पाहून सारी मंडळी चकित झाली. समोर बसलेल्या राजाने देखील धनिकाकडे असे पाहिले, की जणू कोणी आपल्यापेक्षाही श्रेष्ठ व्यक्तिकडे पाहत असावा. राजाच्या कौतुकाच्या दृष्टीने धनपती आता जणू पृथ्वीतलावर नव्हताच. त्याच्या अंहकाराने आकाशाला गवसणी घातली होती. त्याचा हा चांगुलपणाचा अहंकार अधिकाधिक बलिष्ठ होत चालला होता. त्यामुळे नोकर अधिक खूश होता. ते पाहून नोकरानं धर्मग्रंथातलं अर्ध सुभाषित पुरे केले. तो पुढ जाऊन धनिकाला म्हणाला, “दयाळू माणसावर परमात्मा प्रेम करतो.”
हे ऐकल्यावर धनिकाने नजर चारी दिशांना फिरविली. लौकिक, ऐहिक लोभ सदाच त्याच्या दृष्टीत भरलेला असायचा. आता तोच ऐहिक लोभ पारलौकिक बनला होता. धनिक नोकराला म्हणाला, “जा, आजपर्यंत तू माझा गुलाम होतास पण आता या गुलामगिरीतून तुला कायमचे मुक्त केले आहे.”
त्याच वेळी नोकराच्या तोंडून निघालेल्या धर्म-सुवचनाने धनिकाच्या अहंकाराचे भरण झाल्यामुळे सुवर्ण-मुद्रांनी भरलेली एक थैली त्याने नोकराला दिली. धनिकाच्या मनातील क्रोधाचे रूपांतर आता अहंकारात झाले होते. आता त्या क्रोधाचे रूपांतर लोभात झाले होते. क्रोध, लोभ, घृणा, भय हे सर्व म्हणजे एकाच शक्तीच्या अभिव्यक्तित सामावलेले नव्हेत काय? धर्म जर इतका स्वस्त असेल तर कोणता धनिक तो खरेदी केल्याशिवाय राहील? भय आणि लोभ या दोन खांबांच्या आधारावर धर्म उभा नाही काय? मी म्हणतो मग अधर्माचे आधारस्तंभ कोणते असतात? धर्ममंदिराच्या शिखरावर देखील अहंकार असतो ना? मी विचारतो, मग धर्म-मंदिराचे शिखर कोणते आहे? ओशोच्या या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी यात शंका नाही मात्र या प्रश्नांचा शोध घेताना एक गोष्ट निश्चित लक्षात येते की, माणसाच्या अहंकाराचे भरण होण्यासाठी माणूस चांगले वागू शकतो. चांगले वर्तन हे मुळचे वर्तन नाही, तर जे काही वर्तन चांगले दिसते आहे, ते स्वतःच्या सुप्त अहंकाराचे भरण व्हावे याकरिताचे असते.
आपल्या आयुष्यात जेव्हा वर्तन अहंकारशून्य होते तेव्हा आपली माणूस बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असे समजावे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा जो भाव आहे, तो प्रतिबिंबीत होण्यासाठी अहंकाराचा कोणताच वारा लागता कामा नये याची काळजी घेतली जायला हवी. अर्थात ही वाट वाटते तितकी सोपी नाही हे खरेच... कारण या वाटेचा प्रवास घडवण्यासाठी अहंकारच आडवा येत असतो पण प्रयत्न करून पाहण्यास काय हरकत आह
संदीप वाकचौरे
+91 9405404500
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६
.jpg)



Comments