top of page

दोन रुपयांचा धडा | Moral Stories on Honesty in Marathi

  • Apr 20
  • 2 min read

सकाळची शाळा असल्याने फ्रेश मूडमध्ये भाषेचा पाठ शिकवत होतो. नीरव शांतता होती. वर्गातील सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते; पण दुर्वाच्या चेहऱ्यावर काही तरी वेगळंच दिसत होतं. तिचा चेहरा उतरलेला, मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. मी तिला हळूच विचारलं, “दुर्वा, काय झालं गं? तब्येत बरी नाही का?”


ती थोडा वेळ गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, “सर आज मी दुकानातून खोडरबर घेतलं ते 3 रुपयांचं होतं पण दुकानदाराने 5 रुपये घेतले।”

मी शांतपणे विचारलं, “तू त्यांना विचारलं नाहीस का?”

ती मला खोडरबरची किंमत दाखवत म्हणाली, “विचारलं सर पण ते म्हणाले, ‌‘तीच किंमत आहे.‌’ नंतर मी परत करायला गेले; पण त्यांनी ना पैसे परत दिले, ना खोडरबर घेतलं.”

हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, राग आणि थोडी भीतीही स्पष्ट दिसत होती. ती पुढे म्हणाली, “मला खूप वाईट वाटलं सर. मला फसवल्यासारखं वाटतंय.”

मी तिच्या जवळ जाऊन प्रेमाने म्हणालो, “असं कधी कधी होतं; पण तू चुकीची नाहीस. तू धाडस करून विचारायला गेलीस, हे खूप मोठं आहे।”

ती शांतपणे ऐकत होती. मग मी तिला समजावलं, “पुढच्या वेळी काही घ्यायचं असेल तर आधीच किंमत विचार आणि जिथे प्रामाणिकपणा नाही, अशा दुकानात पुन्हा जाऊ नकोस।”

ती हलकंसं हसली आणि म्हणाली, “हो सर, आता मी काळजी घेईन.”

मला त्या क्षणी जाणवलं की, ही छोटीशी घटना दुर्वासाठी फक्त पैशांची नव्हतीच; तिच्यासाठी विश्वास, आत्मसन्मान आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास यांचा प्रश्न होता. तिच्या डोळ्यांतून आलेल्या भावनांनी जाणवलं की, मुलांसाठी छोटीशी गोष्टही मोठा धडा असू शकतो.

मुलांसाठी दोन रुपयांची गोष्टही खूप मोठी असते. ती फक्त पैशांची नसते, तर विश्वासाची असते. दुर्वासाठी हा प्रसंग एक छोटासा धक्का होता; पण त्यातून तिला प्रामाणिकपणा, धाडस आणि जागरूकता यांचा महत्त्वाचा धडा मिळाला.

शाळा म्हणजे अशा छोट्या प्रसंगांतून मोठं शिकवण्याची जागा. शिक्षक म्हणून आपली भूमिका फक्त पाठ शिकवण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या मनातील भावना समजून घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची आहे. प्रत्येक अनुभवातून काही शिकायला मिळतं. फसवणूक, चुकीचे वागणे किंवा गैरसमज ही आपल्याला योग्य निर्णय घेण्याचा आणि स्वतःच्या हक्कासाठी उभं राहण्याचा संधी देतात.

या प्रसंगानंतर मी संपूर्ण वर्गाशी थोडी चर्चा केली. मी मुलांना विचारलं, “आपल्याला या प्रसंगातून काय शिकायला मिळालं?”

काही मुलं म्हणाली, “खरेदी करताना आधीच किंमत विचारायला हवी, नाही तर वस्तूवर किंमत पाहावी.”

काहींनी सांगितलं, “चूक झाली तर घाबरून न जाता परत जाऊन विचारायला हवं.”

मी त्यांना समजावलं, “बरोबर आहे. आपण नेहमी जागरूक राहायला हवं. कोणतीही वस्तू घेताना तिची योग्य किंमत विचारणं, बिल घेणं आणि शंका असल्यास मोठ्यांची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. फसवणूक झाली तर गप्प बसायचं नाही तर धाडसाने योग्य प्रश्न विचारायचे; पण त्याच वेळी संयम आणि नम्रता राखणंही तितकंच गरजेचं आहे.”

अशा प्रसंगातून मुलांना समजावायला हवं की, जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला शहाणं बनवतो. चूक झाली तरी धाडसाने निर्णय घेणं, संयम राखणं आणि प्रामाणिक राहणं ही खरी शिकवण आहे.

मुलांशी बोलताना पुढे म्हणालो, “हे छोटे-छोटे अनुभवच तुम्हाला भविष्यात शहाणं बनवतील. योग्य निर्णय घेणं, स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आणि प्रामाणिकपणाची कदर करणं हेच खरे जीवनातील धडे आहेत.”

मुलांनीही मान डोलावत हे मनापासून स्वीकारलं. त्या क्षणी वर्गात केवळ एक प्रसंग नव्हे तर जीवनाची एक महत्त्वाची शिकवण रुजत होती.

दोन रुपयांची ती छोटीशी घटना दुर्वासाठी जरी वेदनादायक होती तरी संपूर्ण वर्गासाठी ती जागरूकतेची आणि धाडसाची शिकवण ठरली. एक मात्र खरं आहे की, शाळा फक्त पुस्तकं शिकवत नाही तर आयुष्य जगायला शिकवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनात घर करून राहते.


- भरत पाटील

9665911657

प्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक २० ते २६ एप्रिल २०२६


Moral Stories on Honesty in Marathi


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page