top of page

अक्षय्य तृतीया : पावन दिन! | Akshay Tritiya

  • 1 day ago
  • 4 min read

       आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक रीतीरिवाज, परंपरा, सण-उत्सव आहेत. प्रत्येक सणाचे महत्त्व वेगळे असले तरीही मानवाच्या जीवनात आनंद पेरणारे आहेत. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्ताला अनन्य साधारण महत्त्व आहे. ते साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा हे पूर्ण मुहूर्त तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त! या तीन मुहूर्तावर कोणतेही कार्य करीत असताना पंचांग पाहण्याची गरज नसते. अशा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या मुहूर्ताबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. 



    पांडव वनवासात असताना त्यांना वेळेवर अन्न मिळेल अशी शाश्वती नसे. कधीकधी उपवासही घडत असे. तेव्हा भगवान कृष्णाने त्यांना एक पात्र दिले. त्या पात्रातील अन्न‌ कधीच संपत नव्हते म्हणून त्या पात्राला अक्षय पात्र असे म्हणतात. अक्षय्य याचा शब्दशः अर्थ म्हणजे कधीच क्षय होणार नाही, कधीच संपणार नाही असे. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता. म्हणून त्याला अक्षय्य तृतीया म्हणतात. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय. त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय्य होते.

 अक्षय पात्र देताना‌ श्रीकृष्ण म्हणाले,

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।

उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न

       युधिष्ठिरा, आजच्या दिवशी केलेले दान आणि धार्मिक कार्य क्षयाला जात नाही; म्हणून मुनींनी या तिथीला ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते, त्याचा नाश होत नाही. 

    या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे पूर्वी कळत नकळत केलेल्या पापाचा क्षय होतो. एखाद्या मानवाने पूर्वी केलेले कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. 

    अक्षय्य तृतीयेच्या संदर्भात काही कथा/आख्यायिका प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतात. त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत:- 

     पूर्वीच्या काळात एक व्यापारी होता. तो अत्यंत धार्मिक होता. व्यापार म्हटलं की चढ उतार हे ठरलेलेच. या व्यापाऱ्यालाही मोठा आर्थिक फटका बसला. त्याचे सारे वैभव‌ नष्ट झाले. त्यावर्षी अक्षय्य तृतीया बुधवारी होती. विशेष म्हणजे त्यादिवशी रोहिणी नक्षत्र होते. असा त्रिवेणी योगायोग आलेला दिवस अत्यंत पवित्र असतो. व्यापाऱ्याचे आचरण धर्मनिष्ठ असल्यामुळे तो या दिवसाचे महत्त्व जाणून होता. त्याप्रमाणे त्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर व्रताचे सारे विधी यथासांग नि श्रद्धापूर्वक अंतःकरणाने केले. काही गोष्टींचे, विधींचे पुण्य त्या युगात न मिळता पुढील जन्मात मिळते. त्यानुसार पुढील जन्मी तो व्यापारी कुशावर्ती नगरीचा राजा झाला. त्याने त्या जन्मात स्वतःही अनंत सुख उपभोगताना जनतेलाही सुखी केले.

    पौराणिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम यांचा जन्म झाला. परशुराम हा श्रीविष्णुचा सहावा अवतार होता. त्यादिवशी परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जयंतीही साजरी केली जाते. अक्षय्य तृतीया भारताच्या दक्षिण भागात साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच वृंदावन येथे असलेल्या श्री बांके बिहारीजींच्या मंदिरात श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं.

     देवांचे खजिनदार कुबेर यांनी शिवपुरम येथे महादेवाची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेराने लक्ष्मीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वर मागितला. तेव्हा शंकराने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. कुबेराने लक्ष्मीची पूजा केली. तो दिवस अक्षय्य तृतीया असल्याने तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच भगवान विष्णूंसह कुबेराचीही पूजा केली.

  अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच महाभारताच्या सभेत दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. त्याने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. सभेत पांडव होते, कौरव होते,‌इतरही महायोद्धे होते परंतु आक्रोश‌ करणाऱ्या द्रौपदीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. तेव्हा श्रीकृष्णाने कधीही न संपणारी अशी एक साडी दौपदीला दान केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 अक्षय्य तृतीया हा दिवस सुदामासाठी अत्यंत आनंददायी ठरला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्णाचा अतिशय गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला गेला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त पोहे होते.  ती भेट कृष्णाला द्यावी की नाही या विचारात सुदामा असताना श्रीकृष्णाने ती पुडी हिसकावून घेतली. ते पोहे श्रीकृष्णाने मिटक्या मारत खाल्ले. सुदामाने श्रीकृष्णाकडे कोणतीही मागणी केली नाही. परंतु श्रीकृष्णाने त्याच्या हृदयातील भाव जाणले. सुदामा घरी पोहचेपर्यंत त्याच्या मोडक्या घराचे महालात रूपांतर झाले होते. त्याला सर्व सुविधा प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला दान करण्याचे महत्त्व वाढले.

  धरमदास नावाचा एक गरीब गृहस्थ एका छोट्या गावात राहत होता. त्याच्या कुटुंबात भरपूर सदस्य होते. धर्मदास धार्मिक वृत्तीचा होता. कुटुंबाचे चरितार्थ नीट चालावे, खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून एकदा धरमदास यांनी अक्षय्य तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. त्याप्रमाणे धरमदास अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठला. गंगेवर जाऊन आंघोळ करून घरी आला. क्षमतेप्रमाणे भगवान विष्णूची पूजा, आरती केली. घरात असलेल्या अनेक वस्तू त्याने देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ते पाहून धर्मदासाला त्याच्या पत्नीसह कुटुंबीयांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. धरमदासाने कुणाचेही ऐकले नाही. त्याने ब्राह्मणांना सर्व काही दान केले. या दानाचे पुण्य धरमदासाला पुढील जन्मात मिळाले तो एका राज्याचा राजा झाला.

 एका उल्लेखानुसार त्रेतायुगाच्या सुरुवातीला भगीरथाने पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तिची पापे नष्ट होतात, असे मानले जाते.

    अक्षय्य तृतीयेला तन, मन नि धनही अर्पण करावे. ते कसे? तनाचे अर्थात शरीराचे दान म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद मिळवावा. मनाचे दान‌ म्हणजे यादिवशी सातत्याने धार्मिक विधी करावेत. पूजा, जप,‌ धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. धनाचे दान म्हणजे आपल्याला योग्य वाटेल असे धन, वस्तू, पुस्तके इत्यादी गोष्टींचे दान करावे. गोष्टी छोट्या असतात परंतु त्यांचे महत्त्व अपरंपार असते. 

   अक्षय्य तृतीया हा दिवस आपल्या पूर्वजांना मनोमन नमस्कार करून पिंडदान‌ करण्यासाठी महत्त्वाचा मानल्या जातो. या दिवशी अपिंडक श्राद्ध किंवा‌ तीळ अर्पण करावेत. त्यामुळे पूर्वजांची कृपा मला कुटुंबावर राहते. या दिवशी ब्राह्मणाला उदकुंभाचे (पाण्याने भरलेले मातीचे पात्र) दान देतांना पुढील मंत्र म्हणावा...

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।

अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।

गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।

पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।। 

  (ब्रह्मा, विष्णू आणि शिव सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान करीत आहे. अशा दानामुळे माझे पित्र आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, फळांसह युक्त असा हा कुंभ मी माझ्या पितरांना अर्पण करीत आहे. हा कुंभ माझ्या माझ्यासाठी सतत अक्षय ठरावा.)

    अनेक ठिकाणी असेही वाचण्यात आले की, अक्षय्य तृतीयेचा हा दिवस माफीचा दिवस म्हणून मानला जातो. यादिवशी जर एखाद्या व्यक्तिने स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबीयांकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुकांना क्षमा मिळते, त्याला देवांचा आशीर्वाद मिळतो.  

    अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती साजरी केली जाते. 

      अशारीतीने अक्षय्य तृतीया हा दिवस सर्वच तीर्थ दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. यादिवशी केलेले दान,‌ केलेली कामे आशीर्वाद मिळवून देतात. आपणही एक संकल्प करूया... दानाचा! पुस्तकं दान करणे हेही एक पवित्र दानच आहे. तेव्हा सुरुवात तर करुया...

     

  नागेश शेवाळकर, पुणे

      {९४२३१३९०७१}

प्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक २० ते २६ एप्रिल २०२६

Akshay Tritiya information in Marathi


पवनपुत्र हनुमान | Pavanputra Hanuman
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page