top of page

ओशोच्या कथा - एक पाऊल पुढे

  • 5 days ago
  • 3 min read

आयुष्यात जेव्हा कोणी पराभूत होते तेव्हा प्रथम तो पराभव स्वतःच्या आत झालेला असतो. अशावेळी  बाह्य परिस्थितीत कितीही लढण्याचा प्रयत्न केला तरी आतून पराभव झाला असेल तर जिंकणे कठीण असते. अनेकदा पराभूत मानसिकतेने प्रवास केला जातो. एखादी गोष्ट मनापासून करायची नसेल तर त्यासाठी विविध कारणांचा शोध सुरू होतो आणि पुढे तीच कारणे सांगितली जातात. खरं तर त्या कारणांमुळेच आपला पराभव होत असतो. मुळात कारणांचा शोध घेण्याऐवजी प्रवास सुरूच ठेवला तर बरेच काही साध्य होण्याची शक्यता आहे. जीवनात कितीही पुढे जायचे असले तरी त्यासाठी त्या अंतराचा विचार करू नका. गरज असते फक्त एक पाऊल चालण्याची. ते एक पाऊल पुढे टाकले की, पुढचा प्रवास आपोआप सुरू होतो. त्यासंदर्भात ओशो एक गोष्ट सांगतात.


एक शेतकरी होता. त्याला खूप दिवसापासून राहत्या घरापासून दहा एक किलमीटरवर असलेल्या एका गिरीपर्वतावर जाण्याची मनापासून इच्छा होती. अंतरही तसे खूप होते. डोक्यावर सूर्य आग ओकत होता मात्र त्या डोंगरावरील निसर्ग खूपच छान होता. वेली, फुलांची झाडे बहरली होती. तेथे झरे वाहत होते. भोवताल अत्यंत देखणा आणि  सुंदर होता. कोणालाही मोहीत करेल असेच ते ठिकाण होते. शेतकऱ्याला जायचे होते. त्याच्या आसपासच्या गावची अनेक माणसं त्या गिरीपर्वतावर जात होती. त्या पर्वताची मोहिनी अनेकांना होत होती. त्याप्रमाणे याही शेतकऱ्याला जाण्याची मनीषा होती पण जाणे होत नव्हते. आपण जावे असे त्याला वाटत होते. प्रत्येक वेळी जायची इच्छा झाली की, उन्ह आडवे यायचे आणि रात्री जावे म्हटले तर साराच काळाकुट्ट अंधार. जाणेच कठीण होते. त्याकाळी कोणत्याही प्रकारची विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे वाटेवर वीज असण्याची शक्यता नव्हती. शेतकऱ्याला मात्र गिरीपर्वतावर जायची इच्छा होती. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा कंदील, दिवा नव्हता. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणे शक्य नव्हते. आता आपण कसे जायचे? असा त्याला प्रश्न पडायचा. दिवसा जाणे जसे होत नव्हते तसे रात्रीही जाणे होत नव्हते. मुळात खरंच शेतकऱ्याला त्या गिरीपर्वतावर जायचे होते की फक्त तो कारणे शोधत होता? पण अचानक त्याला एक कंदील मिळाला. आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटू लागले. मनात जाण्याच्या दिशेने विचार सुरू केला होता.


एक दिवस आपण त्या गिरीपर्वतावर जाऊ असे त्याला वाटले. त्याने जाण्याचा निर्धार केला. जाण्यासाठी सर्व तयारी केली. अर्थात दिवसा जाण्याचे टाळले जात होते. रात्री त्याने कंदील पेटवला. निघण्यासाठी आता मध्यरात्र झाली होती. अवतीभोवती सर्वत्र निरव शांतता होती. त्या दिवशी अमावस्या होती. त्यामुळे आकाशात कोणत्याच प्रकारचा प्रकाश असण्याची शक्यता नव्हती. गिरीपर्वताच्या दिशेने त्याने हाती कंदील घेऊन प्रवास सुरू केला. त्या अंधाऱ्या रात्री इतरत्र कोठेही प्रकाशाचा दिवा नव्हता. अशावेळी हा शेतकरी हातात कंदील घेऊन निघाला. हातातील कंदीलाचा प्रकाश सात-दहा फूट त्याच्या प्रत्येक पावलाच्या पुढे पडत होता. खरं तर अमावस्येच्या रात्री मनात भीतीचे काहूर निर्माण झाले होते. तरी तो मनात विचार करून चालू लागला मात्र पुन्हा थांबला. आपल्याला त्या गिरीपर्वतावर जाता येणार नाही, असे त्याला वाटले. तो गिरीपर्वत त्याच्या पासून बऱ्याच अंतरावर होता. तेथेपर्यंत जाण्यासाठी प्रकाशाची वाट नव्हती. त्याच्या कंदिलाचा प्रकाशही फारसा दूरवर पडत नव्हता. त्यामुळे आपण जायला नको, असे त्याने ठरवले आणि तो जिथपर्यंत पोहोचला होता तिथेच त्याने थांबणे पसंत केले. आपल्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार नाही हे आता जणू पक्के झाले होते. तो निराश झाला होता. पुन्हा काही काळ थांबला. रात्र असल्याने व घरापासून बरेच अंतर पुढे चालत आल्याने त्याने परत  न जाता येथेच थांबणे पसंत केले. सकाळी सूर्य उगवला की पुन्हा घरी जाता येईल असे त्याने ठरवले. त्यासाठी काही वेळ तेथेच त्याला थांबावे लागणार होते. त्यामुळे तो शेतकरी थांबला. काही वेळ गेल्यानंतर त्याच्या मागून दुसरा एक शेतकरी आला होता. त्यालाही गिरीपर्वतावर जायचे होते. त्याच्या हाती छोटासा दिवा होता. त्याचा प्रकाश फारसा मोठा नव्हता मात्र तरी तो गिरीपर्वताच्या दिशेने निघाला होता. तो पुढे जात असताना, जेथे शेतकरी बसलेला दिसला. तेथे हा शेतकरी आपला दिवा घेऊन पोहोचला होता.


त्या बसलेल्या शेतकऱ्याने त्याला विचारले की, “तुला कोठे जायचे आहे?” तेव्हा तो दिवा हातात घेऊन निघालेला शेतकरी म्हणाला की, “मला गिरीपर्वतावर जायचे आहे.”


हे ऐकल्यावर कंदील घेऊन बसलेला शेतकरी हसला आणि म्हणाला, “अरे बाबा, तुझ्या हाती हा छोटासा दिवा आहे. त्याचा प्रकाश तीन-चार फूट देखील पडत नाही, तू कसा पुढे जाणार? कारण तुला येथून ज्या गिरीपर्वतावर जायचे आहे तो गिरीपर्वत तर कितीतरी मैल अंतरावर आहे. तुझ्या हाती असलेला दिव्याचा प्रकाश फारसा पुढे पडत नाही. त्यापेक्षा माझ्या जवळ असलेल्या कंदिलाचा प्रकाश अधिक पडतो आहे पण गिरीपर्वताचे अंतर अधिक असल्याने तेथपर्यंत प्रकाश कसा पडणार?”


हा प्रश्न ऐकल्यावर तो दिवा घेऊन निघालेला शेतकरी हसला. तो म्हणाला “अरे बाबा, तुला गिरीपर्वतावर जायचे आहे. तुझ्या हाती जो कंदिल आहे, त्याचा प्रकाश तुझ्यापुढे सात-आठ फूट पडतो आहे. अरे तुला जायचे अंतर कितीही असले, तरी तू फक्त एक पाऊल पुढे टाक. तुझ्यापुढे तुझ्या हातातील कंदिलाचा प्रकाश पाच-सात फूट पडणार आहे. तुला तर फक्त एकच पाऊल पुढे टाकायचे आहे. कंदील तुझ्या पुढे प्रकाश घेऊन चालणार आहे. तू फक्त पाऊल टाक पण आपले मन पुढे पडत नसेल तर आपला प्रवास कधीच पुढच्या दिशेने घडणार नाही.”


जीवनातही पुढे जायचे असेल तर फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे मात्र ते पाऊल टाकण्याऐवजी आपण मनातच नकारात्मक विचार करू लागलो तर तेच पाऊल पुढे पडत नाही. म्हणून जीवनात प्रगतीची वाट सापडत नाही. पुढचा अंधार नष्ट करायचा असेल तर हाती असलेला दिवा कितीही छोटासा प्रकाश देवो, तुम्हाला तो दिवा जीवनाचे ध्येय निश्चित साध्य करण्यास मदत करेल यात शंका नाही.


संदीप वाकचौरे

+91 8329328470

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल



1 Comment


सकारात्मक आणि नकारात्मक विचार सरणीचे खूप छान उदाहरण दिले आहे. अभिनंदन!

Like

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page