मुलगी जन्माला येण्याची भीती
गावाच्या कडेला असलेल्या त्या छोट्याशा घरात शांतता होती पण ती सुखाची नव्हती तर भीतीची होती. सीमा सातव्या महिन्यात होती. तिच्या पोटातलं बाळ हललं की तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं पण लगेच ते काळजीच्या सावलीत हरवून जायचं! कारण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, जर मुलगी झाली तर? तिला मुलगी नको होती असं नव्हतं. उलट, तिला लहानपणापासूनच बाहुल्यांशी खेळताना स्वतःची मुलगी हवी असं वाटायचं. आता परिस्थिती वेगळी होती. सासू रोज देवासमोर दिवा लावताना एकच मागणं करायची, “देवा, यावेळी नातूच दे.”
घरात आधीच दोन मुली होत्या. त्या गोड, निरागस, घरभर हसू पसरवणाऱ्या! पण समाजाच्या नजरेत त्या जणू ओझंच होत्या. शेजारच्या काकूंचे टोमणे, नातेवाईकांचे कुजबुजणे आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणारी न बोललेली अपेक्षा हे सगळं सीमाला रोज जाणवत होतं.
एकदा रात्री ती नवऱ्याशी हळूच बोलली, “आपल्याला मुलगी झाली तर चालेल ना?”
तो काही बोलला नाही. फक्त दुसऱ्या बाजूला वळून झोपल्यासारखा झाला. त्या शांततेने सीमाचं मन आणखी घाबरलं. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. मुलगी झाली तर तिचं शिक्षण? लग्न? हुंडा? तिचं सुरक्षित आयुष्य? समाजाच्या प्रश्नांना तोंड देण्याची ताकद आपल्यात आहे का? एके दिवशी तिची मोठी मुलगी तिच्या मांडीवर येऊन बसली आणि म्हणाली, “आई, मला एक बहीण हवी आहे. आपण दोघी तिची काळजी घेऊ.” त्या निरागस शब्दांनी सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं भीती मुलीच्या जन्माची नव्हती; भीती होती समाजाच्या विचारांची! त्या रात्री तिने पहिल्यांदाच देवाजवळ वेगळी प्रार्थना केली. ‘मला मुलगा किंवा मुलगी नको. मला फक्त धैर्य दे. जे येईल त्याला स्वीकारण्याचं.’
पोटातलं बाळ पुन्हा हललं. यावेळी सीमाने पोटावर हात ठेवला आणि हसली; कारण तिला जाणवलं जन्माला येणाऱ्या जीवाला भीती नसते, भीती आपण तयार करतो. त्या रात्रीनंतर सीमाच्या मनात काहीतरी बदललं होतं. भीती अजून पूर्णपणे गेली नव्हती पण तिच्या जागी एक शांत निर्धार उगवायला लागला होता. दिवस पुढे सरकत गेले. घरात पूर्वीसारखंच वातावरण होतं. सासूच्या अपेक्षा, शेजाऱ्यांच्या चर्चा आणि नवऱ्याची शांतता! पण सीमा आता त्या सगळ्यांकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली होती. एके दिवशी दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, “काळजी करू नका. आई स्वस्थ असेल तर बाळही स्वस्थ असतं.”
त्या साध्या वाक्याने सीमाच्या मनाला धीर मिळाला. घरी परतल्यावर तिच्या लहान मुलींनी तिच्याभोवती फेर धरला. “आई, बाळ कधी येणार? आपण त्याचं नाव काय ठेवणार?” त्यांच्या डोळ्यांत उत्सुकता होती, भीती नव्हती. सीमा विचारात पडली या छोट्या जिवांना अजून समाजाची भीती शिकवली गेली नव्हती. त्यांच्या जगात मुलगा-मुलगी असा फरक नव्हता. फक्त आपलं बाळ होतं. महिने पूर्ण झाले आणि तो दिवस उजाडला. वेदनेच्या लाटांमध्ये तिला फक्त एकच विचार होता. जे येईल, त्याचं स्वागत करायचं. काही तासांनी बाळाच्या रडण्याचा आवाज दवाखान्यात घुमला. नर्सने हसत सांगितलं, “अभिनंदन! मुलगी झाली आहे.”
क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. सीमाच्या डोळ्यात पाणी आलं पण ते दुःखाचं नव्हतं, ते दिलाश्याचं होतं. तिने बाळाला हातात घेतलं. ती अगदी नाजूक, उबदार आणि शांत होती. बाहेर सासूच्या चेहऱ्यावर निराशा उमटली, नवरा गप्प उभा राहिला पण जेव्हा त्याने त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यांतलं कडकपणं हळूहळू विरघळलं. मोठ्या मुलींनी आनंदाने टाळ्या वाजवल्या, आपली बहीण आली! त्या क्षणी सीमाला जाणवलं भीती संपली नव्हती पण ती आता एकटी नव्हती. तीन छोट्या हातांनी तिचं जग घट्ट पकडलं होतं. त्या रात्री घरी परतल्यावर नवरा तिच्या जवळ बसला आणि हळूच म्हणाला, “आपण तिला शिकवू! मजबूत बनवू!”
सीमा हसली! कारण तिला उमगलं होतं मुलगी जन्माला येण्याची भीती संपवण्याचं पहिलं पाऊल म्हणजे तिचं स्वागत करणं!
-मयूर बागुल
9096210669
'साप्ताहिक चपराक' २ ते ८ मार्च २०२६
.jpg)



Comments