ओशोंच्या कथा
- Apr 11
- 4 min read
आपले जग विविधतेने नटलेले आहे. येथे अनेक जाती, धर्म, पंथांची माणसे आहेत. प्रत्येक धर्माची माणसे धर्माने एक असली तरी काही विचार, वृत्ती, प्रवृत्तीने समान नाहीत. जगातील कोणत्याही एकाच धर्मात असलेली माणसे समान असण्याची शक्यता नसते. धर्म भिन्न असतात त्याप्रमाणे माणसे आणि त्यांची वृत्ती देखील भिन्न असते. प्रत्येक माणसांची विचारधारा देखील भिन्न असते. आपल्या अवतीभोवती असलेल्या माणसांच्या तऱ्हा देखील भिन्न असतात. ओशो म्हणतात की, जगामध्ये दोन तऱ्हेची माणसे असतात. आपले जग जणू वेड्यांनीच बनलेले आहे. आपल्या भोवती जी माणसे आहेत, त्यातील एकाची तऱ्हा असते की, जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्येच जीवन व्यर्थ घालवणे. आता या वाटेने जे जातात त्यांनाही त्यांचे जीवन जगण्याचा नंतर कंटाळा येतो. तो त्याला वैतागून जातो. मग तो दुसरा वेडेपणा सुरू करतो.
जीवनभर तेच तेच काम करून कंटाळा येत असतो. मुळात एकच काम सातत्याने केले की, माणसे कंटाळतातच. प्रत्येकांना जगण्यासाठी रोज नवा विचार, दृष्टी हवी असते. अर्थात त्यासाठी शहाणपणाची वाट महत्त्वाची असते मात्र एका तऱ्हेची वाट चालणारी माणसे कंटाळली की, ती पुन्हा नव्या तऱ्हेच्या वाटेचा प्रवास सुरू करतात. एका अर्थाने ते बदलतात पण त्यांचे ते बदलणे म्हणजे पुन्हा नव्या तऱ्हेची वाट चालणे असते. माणसे बदलली तर ऐलतीरावरून ते पैलतीरावरच पोहचताच. हे बदल समजून उमजून होत नाहीत तर केवळ एका टोकावरून दुसऱ्या टोकावर चालण्याचा प्रवास आहे.
पहिल्या तऱ्हेचा माणूस फक्त स्वतःच्या जीवनासाठी वाट चालून चालून कंटाळत असतो आणि मग तो नव्या वाटांचा प्रवास करू लागतो. त्याला तेथेही जी वाट सापडते ती दुसऱ्या तऱ्हेचीच असते. आता तो नव्या वाटेचा प्रवास करताना सर्वच गरजांचा त्याग करणे पसंत करतो. अगदीच झाले तर शीर्षासन करण्यासारखी उलट क्रिया करून बसतो. जसे आपल्या अवतीभोवती आपण पाहतो की, माणसे एक तर प्रचंड खातात. अनेकदा किती तरी वेळा दिवसात सतत खात असतात. आता ही वाट चालून ज्यांना कंटाळा येतो, ती माणसे फक्त दुसऱ्या टोकाला उभी राहिलेली आपणास अनुभवास येतात. मग ते आता भोजनाचा त्याग करणे पसंत करतात. कधी कधी महिना महिना उपवास करतात. काही माणसे मात्र आठवड्याच्या निम्मे वार उपवास करत असतात. त्यांचे हे वर्तन म्हणजे एक तर सारखे खात राहायचे नाही तर एकदम उपासच करत राहायचा. मधली अवस्था नाहीच. संतुलन कुठे नाहीच. माणसांचे वर्तन जेव्हा असे दिसते तेव्हा हे त्यांचे वागणे माणूस म्हणून नाहीच. त्यांची ही तऱ्हा वेगळीच म्हणायला हवी.
मुल्ला नसरुद्दीन एकदा आजारी पडला. त्याला त्या दरम्यान खोकला, दम्याचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर म्हणाले, “आजार काहीच नाही; परंतु तुझ्या कपड्यांना, तोंडाला वास येतो आहे. तो सिगारेटचा आहे. तू दिवसातून किती सिगारेट ओढतोस?”
तो म्हणाला, “फार काही नाही. दिवसातून फार तर दहा-बारा सिगारेट पीत असेल.”
हे ऐकल्यावर डॉक्टर पाहत राहिले मात्र मुल्लावर हे सांगताना कोणताच परिणाम दिसला नाही. मग डॉक्टरांनी त्याला सांगितलं, “तुझ्या दोन्ही फुप्फुसामध्ये सातत्याने सिगारेटच्या अतिरेकी सेवनामुळे निकोटीन साचत चालले आहे. त्याचा हा तुला त्रास आहे. तुला बरे व्हायचे असेल तर हळूहळू सिगारेट पिणं कमी करावे लागेल मात्र एकदम पिणं कमी करू नको. तुला सिगारेट प्यायची असेल तर रोजच्या जेवणानंतर एक सिगारेट प्यायची असं प्रमाण ठेव. तसे तू करशील तर तुझा आजार लवकर बरा होईल. आता तुला जे सांगितले त्याप्रमाणे तू कर आणि एक महिन्यानंतर भेटायला पुन्हा ये, मग तेव्हा काय उपचार करायचे ते ठरवूया.”
मध्ये एक महिना गेला. त्या महिन्यातनंतर मुल्ला नसरुद्दीन डॉक्टरांकडे गेला तर त्याला डॉक्टरांनी अजिबातच ओळखले नाही. त्याच्या सगळ्या अंगावर सूज आली होती. त्याला पाहिल्यावर डॉक्टर काहीसे चिंतेत पडले. डॉक्टर मुल्ला नसरूद्दीनला म्हणाले, “अरे, तुला पाहिल्यावर तर ओळखायलाही येत नाही. किती बदललास? सिगारेट पिण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे असे झाले आहे का?”
डॉक्टरांचा प्रश्न ऐकल्यावर नसरुद्दीन म्हणाला, “जे काही झाले आहे, ते तर सिगारेटमुळेच झाले आहे.”
डॉक्टरांनी विचारले, “मी जसे सांगितले तसेच तू केले आहेस ना?”
नसरुद्दीन उत्तरला, “अहो डॉक्टर साहेब, तुम्ही जसे सांगितले, त्याप्रमाणेच मी सारे काही केले आहे! पण आता दिवसातून चार-पाच वेळा भोजन करावे लागते आहे.”
म्हणजे थोडक्यात काय? तर एका वेडेपणातून सुटका झाली की, दुसरा वेडेपणा सुरू होतो. वेड्या माणसांचाही एक तर्क असतो. तो त्या तर्काशी अगदी सुसंगत असतो आणि मनानं निर्माण केलेले तर्क जर का अंमलात आणत असाल तर मग वेडेपणाची मालिकाच चालू राहते. आता हे ऐकल्यावर मात्र डॉक्टर चिंतेत पडले होते; कारण एक वेडेपना कमी व्हावा म्हणून, त्याला जे करायला सांगितले, ते त्याने केले पण त्यांना आता जेवणाचे प्रमाण वाढवले होते. उपचार करताना माणूस दिवसातून फार तर दोन ते तीन वेळा जेवण करतो. म्हणजे हा दोन-तीन सिगारेट ओढेल असे डॉक्टरांना वाटले पण त्याने सिगारेट पिण्याची आपली हौस भागवली जावी म्हणून तसे न करता, त्या उलट जेवणाच्या वेळा वाढवल्या. माणसे एक मूर्खपणा कमी करण्यासाठी मार्ग स्वीकारण्याऐवजी दुसरा मूर्खपणाचाच मार्ग निवडतात.
आपल्या जीवनाच्या वाटेचा प्रवास असाच असतो. तऱ्हे-तऱ्हेची माणसे आपल्याला भेटतात. आपल्याला स्वतःत सुधारणा करण्याची खरेच गरज वाटते का? तसे वाटत असेल तर आपण स्वतःच परिवर्तन केले असते मात्र आपल्या परिवर्तनाच्या वाटांचा प्रवास नकोच असतो. आपल्याला सारे परिवर्तन हवे असते, ते स्वहिताचेच. स्वहिताशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता आपण बदलण्याच्या रेषेवर उभे असतो. बदल केले जातात पण तो प्रवास परिवर्तनाच्या दिशेने घडत नाही कारण न जाणो परिवर्तन झाले तर आपल्या जीवनातील हा सिगारेट पिण्यासारखा आनंद हरवून तर जाणार नाही ना? याची अधिक चिंता असते. आपल्याला ही चिंताच, खऱ्या परिवर्तनाच्या दिशेचा प्रवास करू देत नाही. मग क्षेत्र जीवनाचे असू दे नाही तर आध्यात्माचे. सर्वच ठिकाणी आपल्याच वाटा आपण निर्माण करत असतो. शेवटी आपल्याला सत्याच्या शोधात चालण्याऐवजी, असत्याचाच प्रवास अधिक प्रेममय वाटत असतो. शेवटी काय तर आपल्याला जगण्याच्या तऱ्हा हव्याच असतात.
संदीप वाकचौरे
+91 832 932 8470
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)
.jpg)



Comments