साहित्य परिषदेत ‘भाजप’ विजयी
- 3 days ago
- 4 min read
Updated: 2 days ago

पुणे - साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करत साहित्य संस्था ताब्यात घ्यायच्याच या इर्षेने पेटलेल्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र साहित्य परिषदेवर विजय मिळवला आहे. राजकारण्यांचे साहित्य क्षेत्रात काय काम?, असा प्रश्न सातत्याने विचारणाऱ्यांकडून आता साहित्यातील आद्य संस्थाही ताब्यात घेण्यात आली आहे. भाजपचे अनेक नगरसेवक, आमदार आणि खासदारही साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय झालेले पहिल्यांदाच दिसून आले असून ‘साहित्य हरले आणि राजकारण जिंकले,’ अशीच भावना साहित्यरसिकांत आहे.
प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी आणि सुनीताराजे पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या विरुद्ध जंग जंग पछाडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची यंत्रणा कार्यान्वित केली होती. एकेक मतपत्रिका मिळावी म्हणून स्थानिक नगरसेवक मतदारांकडे सातत्याने चकरा मारत होते. विविध संस्थांत कार्यरत असलेल्या मतदारांना ‘तुला इथे नोकरी करायची आहे तर मतपत्रिका दे,’ असे धमकावले जात होते. साहित्य परिषदेच्या विविध शाखांना सांगितले जाते होते की, ‘आम्हाला
मतदान दिले तर आम्ही तुमच्या शाखेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ! मतपत्रिका दिल्या नाहीत तर आम्ही निवडून आल्यावर तुमच्या शाखेची मान्यता रद्द करू!’ काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे पैशांचेही वाटप करण्यात आले.
मतमोजणीसाठी ज्या मतपत्रिका आल्या होत्या त्या फाडून त्यातील ओळखपत्रे वेगळी करायची होती. त्यानंतर मतमोजणी करायची असल्याने या पत्रिका बाहेर नेऊन खाजगी प्रेसवाल्याकडून कापून आणायच्या ठरल्या. हे अतिशय धोकादायक असल्याने ‘आम्ही साहित्य परिषदेतच कटिंग मशिन आणून देतो,’ अशी भूमिका प्रा. मिलिंद जोशी यांच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीने घेतली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना न जुमानता या पत्रिका बाहेर नेल्या. कटिंग मशिनवर ‘छाट’ मारून त्या फोडलेल्या मतपत्रिका परिषदेत आणल्या गेल्या.
मतमोजणीच्या वेळी उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी अशा एकाला मतमोजणी कक्षात बसता येणार होते. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमलेले प्रतिनिधी पत्रिका त्यांच्या समोर धरून ज्यांना मते मिळाली आहेत, त्यांची नावे वाचून दाखवत होते. सलगपणे 103, 105 मते साहित्य संवर्धन पॅनेलला मिळाल्याचे ते जाहीर करत होते. त्यानंतर काही मते परिवर्तन उत्कर्ष आघाडीला मिळाल्याचे सांगत होते. ओळखपत्रे बाजूला काढल्याने ‘या पत्रिकेवर ज्यांची नावे आहेत, त्या पत्रिका आम्हाला दाखवा’ असा आग्रह परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांनी धरला मात्र त्यांना न जुमानता ‘आमचे काम आम्हाला करू द्या’ म्हणत ते फक्त साहित्य संवर्धनच्या उमेदवारांची नावे वाचत होते. नैतिकतेच्या, प्रामाणिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खिशात टाकले होते, हे सगळे उघडपणे दिसत होते.
महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि लेखक प्रा. मिलिंद जोशी यांचा अवघ्या 45 मतांनी पराभव झाल्यानंतर साहित्य परिषदेत भाजपच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांचे आगमन झाल्यानंतर ‘राजेश पांडे आगे बडो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांच्या पक्षनेत्यांना त्याचे श्रेय दिले जाते त्याप्रमाणेच हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना ‘समर्पित’ करण्यात आला. पुढील पाच वर्षात साहित्य परिषदेचे स्वरूप काय असेल याची प्रचिती येत होती.
मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आलेली असताना अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण बाहेर आले. तिथे बसलेल्या शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी आदींना ते म्हणाले की, ‘पेशंट आयसीयूमध्ये शेवटच्या घटका मोजतोय आणि तुम्ही त्याला न्यायची तयारी करताय, असे मला वाटतेय. पुढच्या दोन वर्षात मी आमदार झालेलो असेल. तोपर्यंत काय होतेय ते बघूया!’
त्यानंतर मतमोजणी पूर्ण झाल्याने सगळे जण खाली आहे. माधवराव पटवर्धन सभागृहाचा दरवाजा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आतून लावून घेतला होता. त्यांची पुढील औपचारिकता सुरू होती. रात्रीचे दहा वाजत आल्याने पत्रकार अधिकृत निकाल घेण्यासाठी मसापच्या दारात थांबले होते. त्यावेळी पुन्हा योगेश सोमण तिथे आले आणि म्हणाले, ‘घरात मयत झालीय आणि तुम्ही सगळे प्रेत न्यायला आलाय, असे मला वाटतेय.’ संघ आणि भाजपच्या बळावर निवडून आलेल्या उमेदवाराची ही विकृत भाषा बघून उपस्थित अचंबित झाले.
दरम्यान, प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार यांनी या निवडणुकीवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"भाजपने (म्हणजेच संघाने) हिरीरीने सर्व राजकीय फंडे वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ‘साहित्यात राजकारण नको’ म्हणणारे राजकारण्यांच्या नादी लागून स्वत:च राजकारणी कधी झाले हेही कळाले नाही. हे सारे घडत होते तेव्हा सारेच मतदार साहित्यिक हे पाहत होतेच पण एकानेही या गैरप्रकारांबाबत साधी नापसंतीही व्यक्त केली नाही. यावरूनच साहित्य आणि साहित्यिकांचा दर्जा किती खालावलेला आहे हे लक्षात यावे आणि हे लोक जगाला ज्ञान पाजण्याचे ढोंगे करणार! या सर्वात बळी जातोय तो साहित्याचा, साहित्य-विचारांचा याचे भानही कोणाला नसावे? तिकडे भाजपच्या पाठिंब्याने विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत गिरीश गांधी निवडून आले. साहित्य संस्था राजकारण्याचे अड्डे बनण्याची ही सरकारी हमी आहे. मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे."
- संजय सोनवणी, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
"निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रताप परदेशी हे सरकारला विकले गेलेले गद्दार निघाले. स्वतः दत्तगुरुचे भक्त असल्याचा आव आणत त्यांनी न्यायप्रकियेला काळिमा फासला आहे. आमच्या मतपत्रिका आम्हाला दाखवण्यात आल्या नाहीत. संजीव खडके यांनी दहा मिनिटांत चारशे मते विरोधकांना मिळाल्याचे वाचून दाखवले. त्या मतपत्रिकांवर नेमके कुणाची मते होती हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार डावलण्यात आला."
- विनोद कुलकर्णी
"एकूण किती मतदान झाले हे शेवटपर्यंत जाहीर केले नाही. मतमोजणीत अनेक गैरप्रकार करण्यात आले. आमच्या आघाडीने 6200 मतपत्रिकांचे गठ्ठा मतदान केले होते. त्याचे तपशीलही आमच्याकडे आहेत. मग ती मते आम्हाला कशी मिळाली नाहीत?"
- सुनीताराजे पवार
1. परिवर्तन उत्कृर्ष आघाडीच्या उमदेवार मृणालिनी कानिटकर-जोशी यांना 816 मते मिळाली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र त्यांना 777 मते मिळाल्याचे सांगून पराभूत घोषित केले.
2. वास्तू विभागाचे कार्यवाह प्रमोद आडकर हे पाचव्यांदा निवडणुकीसाठी उभे होते. त्यांचाही आश्चर्यकारक पराभव झाला.
3. परिवर्तन उत्कृर्ष आघाडीचे उमेदवार शिरीष चिटणीस हे असंख्य मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोचले होते. त्यांना 756 मते मिळाल्याचे सांगून पराभूत घोषित करण्यात आले. आपल्याला मिळालेली मते वाचलीच गेली नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६
.jpg)


Comments