top of page

स्वयंसेवकांची संघर्षमय गाथा

  • Mar 5
  • 2 min read

नुकतेच अनंत घोगलेलिखित, ‌‘चपराक प्रकाशन‌’ प्रकाशित ‌‘मोहरे इरेला पडले‌’ हे पुस्तक वाचण्यात आले. संघाविषयी उत्सुकता असणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. ‌‘संघ चुलीपर्यंत गेला पाहिजे‌’ हा संघस्वयंसेवकांसाठी मोठा संदेश आहे. त्या मागची संघाची भूमिका अशी की घरातील महिलांना संघाची चांगली ओळख झाली पाहिजे. त्यांच्याही अंगी घरातील संघस्वयंसेवका इतकाच संघ मुरला पाहिजे.

 निष्ठावान स्वयंसेवक कै. श्री. बाळासाहेब गोहाड या लेखात त्यांचे गुणविशेष वर्णन करून लेखक एक आठवण सांगतात. एकदा एक स्वयंसेवक एका प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बाळासाहेबांनी आयोजकाला सुनावले, जो दैनंदिन शाखेत उपस्थित राहत नाही त्याला दैनंदिन शाखा या विषयावर बौद्धिक द्यायला बोलावता...? किती विरोधाभास आहे ना!


श्री. मोहनराव देशपांडे यांच्याबद्दल लेखक लिहितात, देशपांडे यांचे घर सर्वांसाठी सदैव खुले असे. दादा नावाने सर्वदूर परिचित असलेले देशपांडे घरी असले-नसले तरीही कार्यकर्ते कायम त्यांच्या बैठकीत असत. दादांचे घर म्हणजे जणू संघाचे कार्यालय आणि निवडणुकीच्या काळात निवडणूक कार्यालय! सौ. देशपांडे यांच्या आदरातिथ्य गुणाचा लेखक आवर्जून उल्लेख करतात. श्री. एकनाथ हरी उत्पात हे स्वयंसेवक दाही दिशांना जाऊ फिरू मेघासम तसेच भारत हिंदुस्थान है, भगवान का वरदान है! ह्या गीतांचा उत्पात नेहमी सराव करून घेत. लेखकाच्या भेटीत उत्पात त्यांना संघाचे अनुभव, डॉ. हेडगेवार, श्री गुरुजी यांनी संघासाठी घेतलेल्या कष्टाची माहिती देत. उत्पात यांच्याबद्दल लेखक आदराने लिहितात, दवाखान्यातील बाकड्यावर बसून या श्रीकृष्णाने या अर्जुनाला (मला) संघगीता सांगून संघाचे विराट दर्शन घडवले.


अनंतरावांचा अभ्यास, निवेदन शैली पाहून श्री. ज्ञानेश्वर कणसे महाराज घोगलेंना प्रवचन करण्यासाठी प्रवृत्त करतात. कणसे महाराजही कीर्तन-प्रवचन करत. महाराजांच्या आई म्हणत, “माझ्या मुलाचे बालपण कष्टात गेले. वडील लहानपणीच वारले. आता तो कीर्तन-प्रवचन करायला लागला की, मला ज्ञानोबा माउलीच बोलल्यासारखे वाटते.”


श्री. राजाभाऊ खळदकर यांचा एक मनोरंजक किस्सा वाचायला मिळता. एकदा संघाच्या शाखेत सूर्यनमस्काराची स्पर्धा होती.


स्पर्धेत इतरही स्पर्धक होते. राजाभाऊ 1,111 सूर्यनमस्कार घालूनही थांबायला तयार नव्हते.


मार्गदर्शक व्यक्ती आपल्या शिष्याची भक्तिभावाने पूजा करते... ही घटनाच हृदयस्पर्शी आहे! सुरुवातीला घोगले यांना संघकार्यात मदत केलेली व्यक्ती मधुसूदन तथा बाळासाहेब अत्रे हे एका अर्थाने घोगले यांचे गुरू! परंतु अत्रे दर गुरुपौर्णिमेला लेखकाला घरी बोलावून घोगले यांच्या पावलांची पूजा करीत. बंडू तीसगावकर यांच्याकडे


निमगाव केतकी या गावात आठवड्यातून दोन दिवस शाखा लावण्याची जबाबदारी होती. तीसगावकर लेखकाच्या घरी येऊन शाखेसाठी आवश्यक ते साहित्य घेऊन जात. शाखा झाली की पुन्हा सारे साहित्य परत करून गावी जात. त्यांची धावपळ पाहून लेखक म्हणाले, “उशीर झाला तर साहित्य तुझ्या घरी घेऊन जा, उद्या आणून दे.”


“एकदा का सवलतीची सवय लागली की ती शिस्त बिघडवते. आपण नियमातच राहिलेले बरे,” तीसगावकर म्हणाले. प्रसंग छोटा पण संदेश किती महान आहे! अतुल तेरखेडकर यांच्या पत्रकारितेबाबत लेखक त्यांना ‌‘बॉर्न टिचर‌’ किंवा ‌‘बॉर्न लीडर‌’ याप्रमाणे ‌‘जन्मजात पत्रकार‌’ अशी पदवी देतात. जागृत पत्रकार या नात्याने अतुल तेरखेडकरांचे निर्भीड वार्तांकन इत्यादी बाबींचा उल्लेख वाचनीय आहे. या पुस्तकात स्वयंसेवकांच्या कार्याची नि संघाच्या कार्यशैलीची


उत्तमरित्या वाचकांना सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. पुस्तक वाचनीय आहे.


मोहरे इरेला पडले : व्यक्तिचित्रण

लेखक : अनंत घोगले

प्रकाशक : चपराक प्रकाशन

पाने : 48

मूल्य ः 80

नागेश शेवाळकर

942313907


मोहरे इरेला पडले | Mohre Irela Padle
₹80.00₹60.00
Buy Now

1

सोनचाफा (देवनागरी आणि मोडी लिपीतील कवितासंग्रह) | Sonchafa
₹150.00₹112.50
Buy Now


1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

धन्यवाद, मा संपादक महोदय!

Like
bottom of page