गोष्ट न वाचणाऱ्यांची आणि न वाचलेल्या पुस्तकांची
- 2 days ago
- 5 min read

माणसं वाचत का नाहीत? आणि वाचणाऱ्या माणसांच्या घरातही न वाचलेल्या पुस्तकांचा गठ्ठा का असतो? वाचन संस्कृती वाढली पाहिजे हे जेवढे खरे आहे तेवढेच हेही खरे आहे की सगळे जण वाचत नाहीत आणि जे वाचतात त्यांच्या घरातही घेतलेल्या पण न वाचलेल्या पुस्तकांची थप्पी असते. असे का होते याचा उहापोह करणारा हा लेख.
मी जेव्हापासून पाहत आहे तेव्हापासून माझ्या घरात सगळेच वाचायचे. मी अगदी लहान असताना बाबा माझ्यासाठी शिशु वाचन, बाल वाचन ही पुस्तके आणायचे. आजी पोळ्या करत असायची. मी तिथे बसून वाचत असे. जोडाक्षरे आली की मी अडत असे. मी वाचून दाखवत असे जसे की फ अर्ध्या क ला जोडलेले. म्हणजे? मी आजीला विचारायचो. मग ती मला तो शब्द काय, त्याचा उच्चार सांगायची. त्यामुळे इंग्रजी माध्यमात शिकूनही माझं मराठी चांगलंच होतं. घरातील मोठी माणसे मनातल्या मनात कसे वाचतात याचे मला नेहमीच आश्चर्य वाटायचे. मी त्यांना नेहमी मनातल्या मनात कसे वाचता तुम्ही असा प्रश्न मी विचारायचो. आता माझी चौथीतली मुलगी मला हाच प्रश्न विचारते. तीही वाचते. लिहिते! पण कधी? जेव्हा मी वाचत असतो, तेव्हा ती माझ्या शेजारी येऊन बसून वाचते. मी लिहित असतो तेव्हा तीही शेजारी बसून लिहू लागते. मी मोबाईल घेऊन बसलो की तीही दुसरा मोबाईल घेऊन बसते.
लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. लहान मुलांशी वागता बोलताना नेहमी माकड आणि टोपीवाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. जर का पुढची पिढी वाचत नाही असे वाटत असेल तर मागच्या पिढीने आपण किती वाचतो हा विचार केला पाहिजे. आपली संस्कृती ही सगळ्यांनी एकत्र येऊन सणवार साजरे करणारी. आपण एकत्र पूजा करतो, आरत्या करतो, भजनं करतो, सहली काढतो, हॉटेलात जातो, त्याचे फोटो काढतो, शेअर करतो... मग आपण सगळे आठवड्यातून एकदा एकत्र बसून तासभर वाचू का शकत नाही? एकत्र एकच पुस्तक वाचू किंवा प्रत्येक जण आपल्या आवडीचे पुस्तक घेऊन एकत्र बसून वाचू. कसेही वाचू पण सगळे वाचू. हे चित्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक.
जरा मोठा झाल्यावर वडिलांनी मला टारझन, हातिमताई अशी पुस्तके आणली. तशीच सुट्टीतल्या गोष्टी, तीर्थक्षेत्राच्या गोष्टी अशी पुस्तके आणली. कितीही प्रयत्न केले तरीही मी टारझन, हातिमताई ही पुस्तके वाचून पूर्ण करू शकलो नाही. त्याच वेळी तीर्थक्षेत्राच्या गोष्टीसारखी पुस्तके मला आवडत होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते पण मला तेव्हा ते समजले नाही.
मला फार गिल्टी वाटायचे की मी टारझन, हातिमताई ही पुस्तके पूर्ण केली नाहीत. हा अपराधगंड नंतरही अनेक पुस्तकांबाबत आला. चांदोबा लहान मुलांचे मासिक समजला जायचा पण तो भावला नाही. जरा कळायला लागल्यावर चांदोबातील पौराणिक कथात ते बराच वेळ रती क्रीडा करून झोपी गेले, असली वाक्ये समजायला लागली नि लहानपणी चांदोबा का भावला नाही त्याचे उत्तर सुद्धा मिळाले. या उलट ‘चंपक’मधील बोलणाऱ्या, छान छान कपडे घालणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या नि आमच्यासारखं बोलणाऱ्या-वागणाऱ्या प्राण्यांच्या गोष्टी फारच आवडायच्या. मुख्य म्हणजे त्या यातून तुम्ही काय शिकलात, असल्या बोध देणाऱ्या, उपदेशाचे डोस पाजणाऱ्या नसायच्या.
माझी आजी, पणजी, माझे वडील सगळेच वाचायचे आणि सगळ्यांची आवड वेगवेगळी होती. माझी पणजी डिटेक्टीव्ह पुस्तके फार आवडीने वाचायची. तिच्या हातात इतर कोणत्याही प्रकारचे पुस्तक मी कधीही पाहिले नाही. लोक म्हणायचे, ‘काय पण म्हातारी आहे. या वयात देवाधर्माचे वाचायचे सोडून खून खटल्यांची पुस्तके वाचते आहे.’
यावर ती म्हणायची, ‘देवाधर्माचे मी सगळे वाचलेले आहे. वेद, अठरा पुराणे, गीता, ज्ञानेश्वरी सगळं एकदा वाचले आहे परंतु ते पुन्हा वाचण्यात मला कसलाही रस नाही.’
मला वाटते की हे सगळ्या वाचनसंस्कृतीचे सार आहे. माणूस त्याला रस असलेलीच पुस्तके फक्त वाचतो आणि प्रत्येकाला सर्वच विषयात रस नसल्याने, कोणीही माणूस आयुष्यात काही पुस्तके कितीही हौसेने विकत घेतली असली तरीही त्यात त्याला रस नसल्याने कधीही वाचणार नाहीच.
मोठ्या हौसेने विकत घेतलेली पुस्तके, लोकांनी छान म्हटलेली पुस्तके मला वाचवत नव्हती. म्हणजे मी फार काही मोठा अपराध करत आहे असे मला वाटत होते पण आता मला कळते आहे सगळी पुस्तके ही सगळ्यांसाठी असतात असे नाही.
अशा प्रकारे न रुचल्याने विकत घेऊनही न वाचलेल्या पुस्तकांची यादी बनवायची झाल्यास एक स्वतंत्र लेख तयार होईल. त्याच वेळी वाचलेल्या नि खूप भावलेल्या पुस्तकांबद्दल लिहायचे झाल्यास एखादा महा ग्रंथ नक्कीच तयार होईल. म्हणजेच न आवडलेल्या पुस्तकांपेक्षा आवडलेल्या पुस्तकांची संख्या खूप जास्त आहे. हे पुन्हा आयुष्यासारखेच. चार-दोन माणसांना आपण आवडत नाही, आपल्याला चार-दोन माणसे आवडत नाहीत पण हा अपवाद सोडून दिला तरी आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेले बहुसंख्य लोक आपल्याला आवडतात, आपणही त्यांना आवडतो, जमते आपले त्यांच्याशी असेच काहीसे.
शिवाय साहित्य म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मोठाले (आणि बऱ्याच वेळा न समजणारे) ग्रंथ. या कारणामुळे वाचक आणि लेखक यांच्यात दुरावा निर्माण होत आहे.
नवजात बालकाची फार लवकर साहित्याशी ओळख होते. चिऊ काऊची गोष्ट असो की इथे इथे बैस रे मोरा, हे सगळे साहित्यच की, असे मी माझ्या एका मित्राला म्हणालो.
तर तो मला काय म्हणाला माहिती आहे! तो म्हणाला, ‘काय साहित्य, हे इतके साधे सोपे असते?’
साहित्य म्हणजे केवळ मोठाले (आणि बऱ्याच वेळा न समजणारे) ग्रंथ, असा समज झाला आहे. वाचकांचाही आणि लेखकांचाही. अर्थात मोठाले आणि क्लिष्ट वाटणाऱ्या कलाकृती त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेतच पण त्याचवेळी एवढे मोठे ग्रंथ पाहून सर्वसामान्य वाचक त्यांच्या वाट्याला जात नाही हेही तितकेच खरे. हे म्हणजे बऱ्याच जणांना गणित आणि इंग्लिश विषय क्लिष्ट वाटतो आणि त्यापासून लवकरात लवकर सुटका व्हावी असे वाटते तसेच काहीसे. मग कॉलेजला हे विषय सोडून दिले जातात. असेच अवघड, न समजणाऱ्या साहित्याचे बोट माणूस सोडून देतोच.
साहित्य किती आवडत असते लहानपणी. मग त्या आजीने सांगितलेल्या गोष्टी असोत की आईने गायलेली अंगाई. मग मोठे झाल्यावर मात्र खूप जणांना कशाला वाचायची पुस्तके, डोळ्यासमोर पुस्तक धरले की झोप येते, असे का व्हायला लागते? माझी एक मावशी होती. तिला झोपताना पुस्तक लागायचेच. डोळ्यासमोर पुस्तक धरल्याशिवाय झोपच येत नाही म्हणायची. आठ-दहा ओळी वाचते न वाचते तो डोळा लागतोच, असे म्हणायची. काहीच न वाचणाऱ्यापेक्षा माझी मावशी बरी, असे म्हणायची आता वेळ आली आहे. ती किमान पुस्तक तरी हातात घ्यायची.
तर मुद्दा हा होता की लहानपणी इतक्या आवडीचे असणारे साहित्य आपल्यापासून लांब का जाते? हे म्हणजे लहानपणी हिरो असलेले वडील आपण मोठे झालो की हिटलर वाटायला लागतात, त्यांचा जाच वाटायला लागतो तसेच काही. लहानपणी वडील म्हणजे जग असते. मोठे झालो की आपलेही एक जग निर्माण होते आणि आपले आणि वडिलांचे जग पूर्णपणे वेगळे असते.
वाचन कमी होण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. एखाद्या पुस्तकाचा फार गाजावाजा होतो. कोणीतरी हे पुस्तक फारच भारी आहे म्हणून सुचवतो. आपण ते पुस्तक फार हौसेने (आणि अपेक्षेने) आणतो आणि पहिल्या पाच-सहा पानातच आपला पुरता भ्रमनिरास होतो. हे असे अनेक वेळा होते. याचे कारण म्हणजे प्रत्येक पुस्तक हे प्रत्येकाला आवडलेच पाहिजे, आवडेलच असे नाही. हा मुद्दा मला वाटते हर एक प्रकारे प्रत्येकापर्यंत पोचवला पाहिजे. आता तुमचे जग चिऊ काऊपेक्षा नि लिंबोणीच्या झाडामागे लपलेल्या चंद्रापेक्षाही मोठे झाले आहे. तुमच्या जगात बसणारी, तुमच्या आवडीच्या विषयांची पुस्तके तुम्ही वाचली पाहिजेत. प्रत्येक पुस्तक तुम्ही वाचालच असे नाही. होतं असं, एखादं कोणी तरी सुचवलेले, फार गाजावाजा झालेले पुस्तक वाचून भ्रमनिरास झालेला वाचक बऱ्याचवेळा पुस्तकांपासून दूर जातो. पुन्हा तो कोणत्याच पुस्तकाच्या वाट्याला जात नाही. त्यामुळे प्रत्येक पुस्तक हा प्रत्येक जण वाचणार नाही, कारण आपल्या सगळ्यांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत, याचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
काही वेळा आवडीच्या विषयाचे पुस्तक वाचत असतानाही त्यात व्याकरणाच्या इतक्या चुका असतात की ते पुस्तक वाचवतच नाही. काही वेळा छपाई सदोष असते. काही अनुक्रमणिका आणि पान नंबरही नसलेली पुस्तके वाचनात आली आहेत. काहींचे फॉन्ट इतके विचित्र असतात की ती पुस्तके पुढे वाचली जात नाहीत. यामुळेही काही वेळेला वाचक कायमचा दुरावतो. याची काळजी लेखक, प्रकाशक यांनी घेतली पाहिजे.
मोबाईल, इंटरनेटमुळे वाचन कमी झाले आहे हे खरे असले तरीही या नव्या माध्यमांमुळे पुस्तके खूप ठिकाणी पोचू लागली हेही तितकेच खरे. आता कोणतेही पुस्तक कुठेही बसल्या बसल्या मागवता येणे सहज, सुलभ झाले आहे. पूर्वी ते पुस्तक मिळवणे, मागवणे किती अवघड होते? शिवाय आता या फोटो आणि एकंदरच समाजमाध्यमांवर काढल्या जाणाऱ्या मिरवणुकींच्या काळात, पुस्तक जत्रांना एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे.
शिवाय, मोबाईलमुळे केवळ पुस्तकांचीच विक्री नाही तर थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. थेटर बंद पडत आहेत, नवीन पिढीत कोणीही सुपर स्टार्स निर्माण झालेले नाहीत. त्याच वेळी ओटीटी माध्यमाचा उदय होऊन लेखकांना कधी नव्हे एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे या नव्या माध्यमात.
पूर्वीपेक्षा आता साक्षरतेचे प्रमाणही बरेच वाढले आहे. बऱ्याच घरात शाळेत गेलेली आणि पुस्तके हातात धरणारी ही पहिलीच पिढी आहे. हे वाचकच आहेत. त्यांची त्यांच्या आवडीच्या पुस्तकांशी गाठ घालून देणे आवश्यक आहे. ही मंडळी पुस्तके वाचतातच की! पण केवळ अमुक एक पुस्तक ग्रेट म्हणत जो आग्रह केला जातो त्यामुळे कदाचित ती दुरावत आहेत.
जगातील प्रत्येक श्वास घेणाऱ्या माणसासाठी अनेक पुस्तके आहेत. ती पुस्तके त्याच्या आवडीची आहेत. तो त्यांच्या प्रेमात पडेल अशी पुस्तके आहेत. साहित्य संमेलने, पुस्तक परिचय, अभिवाचन, समीक्षा, मुलाखती हे सर्वच प्रकार ह्या दोघांची भेट घडवून आणण्यासाठीच तर आहेत.
- महेश सोवनी, भिवंडी
प्रसिद्धी - मासिक 'साहित्य चपराक' एप्रिल २०२६
.jpg)



Comments