top of page

शांतता... पुढे युद्ध चालू आहे!

  • 1 day ago
  • 5 min read

इस्राईल+अमेरिका आणि इराण युद्ध सुरु होऊन पाहता पाहता महिना उलटून गेलाय. अजून किती दिवस हे युद्ध चालेल, कोणाचे किती नुकसान होईल, कोण जिंकेल, कोण हरेल याबद्दल भल्या भल्या धुरिणांची मती कुंठित झालीय. कोणत्याही जागतिक घडामोडीवर रिॲक्ट होणारे जगातले शेअर बाजार सुद्धा गोंधळलेत. अनेकदा धाडकन कोसळत आहेत तर एखादे वेळी कधी सर्रकन वर जात आहेत. रोज हजारो-लाखो-कोट्यवधी रुपये क्षणात उलटेपालटे होत आहेत. हमखास आतल्या गोटातल्या बातम्यांवर पैसे कमावणारा, कमावून देणारा सट्टा बाजार देखील दिशाहीन झाला आहे.



या सगळ्याची सुरुवात इस्राईलकडून झाली खरी पण अमेरिकेने त्यात पडून आगीत तेलच ओतले. खरे तर इस्राईल हा आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढतोय. व. पु. काळेंच्या भाषेत सांगायचं तर आम्हाला शांततेची आवड आहे हे देखील युद्ध करून सांगावे लागते हे मानवाचे दुर्दैव आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हमासने केलेल्या अमानुष हल्ल्यात इस्राईलमध्ये झालेला नरसंहार, इस्रायली नागरिकांना बंदी बनवून त्यांच्यावर केलेले अत्याचार हे सर्व याच्या मुळाशी आहेच पण तरीही इस्राईलच्या आत्ताच्या विध्वंसाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. इस्राईलने आता क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. गेल्या वर्षभरात इस्राईलने गाझापट्टीचे पार वाळवंट करून टाकलेय. तिथला इमारतींचा ढिगारा हटवून पुन्हा शहर उभारायला प्रचंड वेळ आणि पैसा लागणार आहे, तो हमास कधीच मिळवू शकणार नाही. सध्या इराणच्या अनेक शहरांवर बॉम्ब आणि मिसाईल टाकून तिथली मानवी वस्ती उद्ध्वस्त केली जात आहे. गाझासारखेच लेबेनॉनमधील कित्येक किलोमीटरमधील रहिवाशी इमारती उद्ध्वस्त करून काँक्रीटचे ढिगारे बनवायचे काम जोरात सुरु आहे.


यालाही कारण आहे ते इराणची वाढत असलेली शस्त्रसज्जता. इराणने अणुबॉम्ब तयार केला तर तो त्याचा पहिला वापर इस्राईलवर करणार आणि इस्राईलला कायमचा संपवणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. अमेरिकासुद्धा याच मुद्द्यावर इस्राईलच्या बाजूने युद्धात उतरली आहे पण इस्राईलची मोसाद+आयडीएफ आणि अमेरिकेची सीआयए या दोघांचाही इराणचा अभ्यास अत्यंत तोकडा ठरला आहे. मुळात धर्मावर अवलंबित्व असलेले कट्टर मुस्लिम प्रशासन युद्धाची इतकी आधुनिक आणि बारीक तपशीलवार तयारी करत असेल आणि त्यात त्यांनी एवढा मोठा पल्ला गाठला असेल याचा कोणालाच अंदाज आला नसावा. मला तर शंका आहे की याची थोडी फार कल्पना इस्रायलला असूही शकेल पण त्यांनी ती माहिती अमेरिकेला दिली नसावी कारण एकटा इस्राईल इराणला संपवू शकला नसता आणि तशी क्षमता असती तरी एकट्या इस्राईलने केलेल्या हल्ल्याचा सर्व जगाने धिक्कार केला असता. परिणामी इस्रायलला युद्ध थांबवावे लागले असते.


इस्राईलचे मनसुबे मात्र इराण-इराक-येमेन-लेबेनॉन-सीरिया बरोबरच हमास, हुती, हेजबोल्लाह अशा दहशतवादी संघटनांचे कायमचे कंबरडे मोडायचे आहे. यासाठी इस्राईलने अमेरिकेला इमोशनली ब्लॅकमेल करून इराण अमेरिकेसाठी सुद्धा कसा धोकादायक ठरू शकतो हे पटवून देऊन आपल्याबरोबर युद्धात उतरणे भाग पाडले आहे. अमेरिका युद्धात उतरल्यामुळे या युद्धाचे परिणाम आणि परिमाण सुद्धा बदलून गेले. जगातले अनेक देश इकडे जावे की तिकडे जावे या पेचात पडले आहेत. भारतासारख्या शांतीचा संदेश देणाऱ्या देशांना आपली तटस्थ भूमिका वठवायला तारेवरची कसरत करावी लागत आहे. भारत आतापर्यंत तरी यात सफल झाला आहे. इस्रायलची दोस्ती सांभाळून सुद्धा इराणशीही मैत्री टिकवून आहे. होर्मूझ खाडीतून आपली जहाजे सुरक्षित आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न भारत सरकार करत आहे. असे करणारे मोजके दोन-तीन देशच आहेत हे विशेष.


आपण इराणला चार-दोन दिवसात वठणीवर आणू हा इस्राईल-अमेरिकेचा अति आत्मविश्वास इराणने पहिल्या आठवड्यातच धुळीला मिळवला. एखाद्या राष्ट्राचा अध्यक्ष किंवा हुकूमशहा किंवा सर्वोच्च नेता संपवला की तो देश लगेच लोटांगण घालतो हा आतापर्यंतचा इतिहास होता. काही महिन्यापूर्वी अमेरिकेने अगदी सहज मोजक्या सैनिकांच्या मदतीने व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून नेले आणि तो पूर्ण देश आपला अंकित करून घेतला. युद्ध सुरु होताच दुसऱ्याच दिवशी इस्राईल-अमेरिकेने संयुक्तपणे इराणचे शहेनशहा अयातुल्लाह खामेनेई यांच्यासह त्यांच्या पन्नास उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना संपवले. सर्वांना वाटले की आता इराण लगेच शरण येईल. इराण नमत नाही म्हटल्यावर सत्तेत येईल त्या प्रत्येकाला यांनी संपवले, नवा सर्वोच्च नेता झालेला मोजतबा खामेनेईला सुद्धा जखमी केले पण इराण बधला नाही. सध्या हे मोजतबा खामेनेई रशियाच्या संरक्षणाखाली आहेत अशी गुप्त वार्ता आहे.


माझ्या मते इराण माघार न घेण्याची अनेक कारणे आहेत. पहिलं म्हणजे 1979 ला इराणमधील राजसत्ता उलथवून टाकून इस्लामिक प्रशासन अस्तित्वात आल्यापासून त्यांचे पहिले टार्गेट होते ते इस्राईलला समूळ संपविणे. आजूबाजूच्या इस्लामी कंट्रीजमध्ये शिरकाव केलेल्या इस्राईलचे अस्तित्त्वच त्यांना मान्य नव्हते. या तिरस्काराचे मूळ आहे ते जेरुसलेम हे शहर. जेरुसलेम हे शहर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन प्रमुख धर्मांसाठी जगातील सर्वात पवित्र शहर मानले जाते आणि त्यावर सध्या इस्राईलचा ताबा आहे. मुस्लिम देशांना म्हणूनच इस्रायलला संपवून आपलं पवित्र धर्मस्थळ ताब्यात घ्यायचं आहे. इस्राईलला अमेरिका मदत करतो म्हणून एक ना एक दिवस आपल्याला अमेरिकेबरोबरही निर्णायक लढाई करायची आहे हे इराणी सत्ताधीश पहिल्यापासून जाणून आहेत आणि त्या दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न चालू होते. इराणला अण्वस्त्रधारी व्हायचं होतं हेही याचसाठी.


इस्राईल अमेरिका वेळोवेळी त्यांच्या प्रयत्नांमध्ये खीळ घालण्याचा प्रयत्न करत होते. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त केल्याचा दावाही केला होता पण इराण नेटाने प्रयत्न करत राहिला आणि त्यांचे प्रयत्न किती खोलवर होते याची प्रचिती आत्ता येतेय. जमिनीखाली अडीचशे फुटावर त्यांनी अख्खे अंडर ग्राउंड शहर उभे केले आणि तिथे अनेक क्षेपणास्त्र, ड्रोन, बॉम्बचा प्रचंड साठा करून ठेवलाय. काही विमाने, रॉकेट लाँचर्स, सुद्धा त्यांनी जमीनीखाली सुरक्षित करून ठेवलीत आणि आज त्याच्याच जोरावर एकटा इराण हा इस्राईल आणि अमेरिकेच्या बलाढ्य ताकदीला अपुरी ठरवत आहे.


दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे इराणकडे तीन प्रकारचे सैन्य आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आर्मी (थोडक्यात शासकीय सैन्य) इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि बासिज रेजिस्टन्स फोर्स. यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या सैन्याचे पूर्ण नियंत्रण हे सुप्रीम लीडरकडे असते. इराणियन सर्वोच्च नेत्यांनी अत्यंत धूर्त विचार करून या तीनही सैन्यांना युद्धजन्य परिस्थितीत स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. तुमचे बलिदान हे इस्लामसाठी किती पवित्र आहे हे या सैनिकांच्या मनावर बिंबवल्यामुळे त्यांना मरणाची भीती नाही. केवळ याचमुळे सर्वोच्च नेता मारला जाऊन, इतर पन्नासपेक्षा जास्त नेते मारले जाऊनही इराणचे हल्ले अजिबात थांबलेले नाहीत. उलट आपल्या नेत्यांच्या मृत्युचा बदला घ्यायचाच या ध्येयाने प्रेरित होऊन त्यातली धार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.


इराण आणि अरब राष्ट्रे सामान्य लोकांच्या मते दोनीही मुस्लिम राष्ट्रे आहेत हे खरं असलं तरी त्यांच्यातही शिया आणि सुन्नी अशी अस्तित्त्वाची लढाई आहेच. अनेक अरब राष्ट्रांनी अमेरिकन सैन्याला आपल्या देशात सैन्यतळ उभारायला परवानगी दिली त्यामागे इराणला कधी ना कधी संपवणे हाच उद्देश होता. त्यांचे हे संरक्षण छत्रही इराणने कमकुवत ठरवले आहे. सर्वात सुरक्षित असलेले दुबई (युएई) सारखे देश मेटाकुटीला आलेत. अमेरिका आपले संरक्षण  करू शकत नाही हेही त्यांना कळून चुकले आहे. युएई, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहारीन, कुवेत, जॉर्डन हे सगळेच देश इराणच्या हल्ल्यांनी बेजार झाले आहेत. अमेरिकी सैन्य तळ म्हणत म्हणत इराण रहिवाशी हॉटेल्स, अमिराती यांनाही लक्ष करत आहेत आणि काल तर त्यांनी मायक्रोसॉफ्ट ऍमेझॉन, वॉलमार्ट, अँपल, गुगल अशा नामांकित अमेरिकन कंपन्यांवर हल्ले केले जातील असे जाहीर केले आहे. मार्चच्या पहिल्याच दिवशी दुबई आणि बहारीनमधील अमेझॉन कंपनीवर इराणने ड्रोन हल्ले केले सुद्धा. याचा परिणाम म्हणून सगळ्याच कंपन्या घाबरल्यात.


इराणला आवरणे अमेरिकेला आणि इसराईलला अवघड झाले आहे. त्यामुळे ते चिडून इराणवर अजून जबरदस्त हल्ले करत आहेत. त्यात आता तर ऑइल, गॅस, पॉवर सप्लाय, वॉटर सप्लाय अशा बेसिक सुविधांचाही समावेश होऊ लागलाय. तिकडे जमिनीखाली बसलेल्या इराणी सैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे नसल्यासारखे ते मिसाईल आणि ड्रोनचा मारा करत आहेत. इस्राईल-अमेरिका आम्ही इराणचा खात्मा केला, त्यांची मिसाईल्स नष्ट केली त्यांचे ड्रोन्स संपवले, त्यांची जहाजे, लढाऊ विमाने संपवली असे सांगत आहेत पण प्रत्यक्षात मात्र इराणच्या हल्ल्यांमध्ये थोडीशीही शिथिलता आलेली नाही. नशीब अमेरिकेच्या दबावाला बळी पडून नाटो देश, फ्रांस, जर्मनी, इंग्लंड, तुर्की अजून प्रत्यक्ष युद्धात उतरलेले नाहीत. त्यांना आजच अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. दुसऱ्या बाजूला रशिया-चीन-उत्तर कोरिया आतून इराणला मदत करत असतीलही पण प्रत्यक्षात युद्धात नाही.


तात्पर्य एकच, हा कठीण काळ कधी संपेल हे देवाला-अल्लाला-येशूला कोणालाच सांगता येत नाही. आपण भारतीय तसे बऱ्यापैकी सुखात आणि सुरक्षित आहोत. काही विरोधी पक्षांना मात्र ही शांतता बघवत नाही. काहीही करून भारतातही अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी त्यांचे सारखे प्रयत्न चालू आहेत. अफवा, शाब्दिक हेटाळणी, डिवचणे चालूच आहे. जेव्हा प्रश्न देशहिताचा असतो तेव्हा राजकारण सोडून, आपसातील वैर तात्पुरते बाजूला ठेवून सरकारला पाठिंबा देणे ही नैतिकता असते. इतर अनेक देशांमध्ये महागाई वाढली आहे, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, काहींनी तर अणीबाणी लागू केली आहे. सगळं जगच या युद्धाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झळा सोसत आहे. या मुख्य युद्धाच्या बातम्यांमध्ये रशिया-युक्रेन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, सुदान-येमेन आणि अजूनही छोटी-मोठी युद्धे चालू आहेत. त्यांना कोणीच महत्त्व देत नाही. असो! नुकताच सुरु झालेला एप्रिल वसंत ऋतुत झाडांना फुलणाऱ्या नव्या पालवीसारख्या काही चांगल्या बातम्या घेऊन येवो हीच सदिच्छा!


अनिल दातीर

+91 94204 87410

सातारा

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल


Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page