महाराष्ट्र नागवा झाला!
- Mar 30
- 4 min read
देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी ‘राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची’ अशा आशयाचे एक विधान केले होते. त्यावरून बरेच वादळ निर्माण झाले होते. आता अशोक खरात याच्यासारख्या एका भोंदूचे कारनामे पुढे आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्याचे श्रेयही हेच फडणवीस आपल्याकडे घेत आहेत. एकीकडे ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशी संकल्पना सातत्याने मांडत असताना दुसरीकडे सर्वाधिक अंधश्रद्धाही आपल्याच राज्यात पोसल्या जात आहेत. मनाने खचलेले, कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेले, क्षमतेपेक्षा खूप काही मिळवण्याचा हव्यास असलेले, भीतीच्या सावटाखाली असलेले, व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक जण अशा बुवा-बाबांच्या फसवणुकीला बळी पडतात. त्यातून आजचा महाराष्ट्र शब्दशः नागवा झाला आहे.
अशोक खरातचे उघड झालेले आणि होत असलेले कारनामे पाहता हे इथल्या चळवळीचेही धडधडीत अपयश आहे, हे मान्य करावे लागेल. खरातपाठोपाठ चर्चेत आलेले नरहरी झिरवळ प्रकरण, वसईचा स्वयंघोषित धर्मगुरु हृषिकेश वैद्य याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवर केलेले अत्याचार ही प्रकरणे कशाचे द्योतक म्हणावीत? खरातच्या एकापाठोपाठ एक ज्या चित्रफिती समाजमाध्यमावर येत होत्या त्यानंतर यातील पिडित महिलांच्या चारित्र्यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यात काही अधिकारी, एक खासदार, आमदाराची बायको अशा अनेक जणी असल्याने या सर्वांना त्याने कसे संमोहित केले याबाबत चर्चा सुरू झाली. ‘या स्वतःहून माझ्याकडे आल्या, मी कुणावरही अत्याचार केले नाहीत,’ असा दावा खरातने केलाय. त्या चित्रफितीतील महिलांनी घेतलेला पुढाकार पाहता हा खराच बलात्कार होता की, महिलांनी मोहाला बळी पडून केलेले वासनांध कृत्य होते याचीही चर्चा सुरू आहे.
रूपाली चाकणकरांना या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. आता मुख्यमंत्री त्यांची हकालपट्टी करतील, असे वाटत असतानाच चाकणकरांनी ‘मी माझ्या स्वेच्छेने राजीनामा देत आहे,’ अशी दर्पेाक्ती करत ‘गिरे तो भी नाक उपर’ अशी किळसवाणी वृत्ती दाखवून दिली. खरातच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्या, त्याच्यापुढे नतमस्तक होणाऱ्या, त्याची पाद्यपूजा करणाऱ्या चाकणकर या आजच्या बरबटलेल्या व्यवस्थेच्या प्रतीक आहेत. ‘त्या सेक्स रॅकेट चालवतात, त्यांच्या आयोगाकडे आलेल्या प्रकरणातील पुरूषांकडून पैसे काढतात’ असे अनेक आरोप त्यांच्याच पक्षातील काही महिला नेत्यांनी केले आहेत. यात तथ्य असेल तर हे अतिशय लाजीरवाणे आहे.
इथल्या संतपरंपरेने जो विचार दिला, जो संस्कार दिला, जी शिकवण दिली ती खरातसारख्या भोंदूंनी धुळीला मिळवली. त्याच्याकडून मिळणाऱ्या लाभाचा विचार करत त्याला साथ देणाऱ्या राजकारण्यांनी त्याला खतपाणी घातले. धर्म, उपासना, अंधश्रद्धा, कर्मकांडं, परंपरा याच्या विरूद्ध ज्या समाजसुधारकांनी आणि गाडगेबाबांसारख्या संतांनी जो संघर्ष केला त्याचा पराभव या मंडळींनी केला आहे. अशोक खरातसारखे भोंदू बाजूला ठेवा पण महाराष्ट्रात किंवा देशात आजच्या घडीला जे कोणी साधू असतील, तथाकथित दुकाने थाटून बसलेले संत असतील त्यांच्यापैकी किती जणांनी गाडगेबाबासारखा स्वच्छतेसाठी खराटा हातात घेतला? कुणी भक्त पाया पडत असतील तर तोच खराटा त्याच्या पाठीवर मारणारे गाडगेबाबा कुठं आणि लैंगिक उत्तेजक गोळ्या पाण्यात मिसळून ते ‘ओशनोजल’ त्यांना प्यायला देणारा अशोक खरात कुठं...? बाबांच्या ‘खराट्या’तला आणि सध्याच्या ‘खराता’तला हा फरक समजून घेतला पाहिजे. गाडगेबाबांनी अस्पृश्यांसाठी मोफत धर्मशाळा बांधली, ती बांधताना त्या गवंड्याच्या हाताखाली बाबा स्वतः मजूर म्हणून काम करत होते, गाव स्वच्छ केल्यावर एखाद्या मायमाउलीने दिलेली शिळीपाकी भाकरी प्रसाद म्हणून खात होते. खरातसारखे ऑफिस थाटून त्यांनी पैसा गोळा केला नाही की तिथल्या टेबलवर काही गैरकृत्य केले नाही. पन्नास वर्षात गाडगेबाबांनी एक गोड पदार्थ खाल्ला नाही, हे आज कुणाला तरी पटेल का? अनाथांना आधार देणारे, महारोग्याला साबन लावून आंघोळ घालणारे गाडगेबाबा याच भूमित होऊन गेलेत!
आजच्या महाराष्ट्राचे चित्र काय आहे? कुणी म्हणतं, ‘मी दिलेले आंबे खाल्ल्यानं मुलं होतात’, कोणी म्हणतं, ‘मी कृष्ण तू राधा...’ महाराष्ट्राची ही इतकी घसरण होत असताना आपले नेते काय करतात? थोडेथोडके नव्हे तर तब्बल 39 आमदार खरातच्या दर्शनासाठी आले होते. महाराष्ट्राचा शिक्षणमंत्री राहिलेला दीपक केसरकरसारखा ज्येष्ठ आमदार याचे निर्लज्ज समर्थन करताना काय म्हणतो, “जर खरातकडे 39 आमदार गेले होते तर मग माझेच नाव का घेता...?” म्हणजे इतरांनी शेण खाल्ले तर मी खाल्लेली विष्ठाही पंचपक्वान्न होते, असे त्यांना सांगायचे असावे. लाज काढलीय या मंडळींनी महाराष्ट्राची! थू यांच्या जिंदगानीवर!!
ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भारदे एके ठिकाणी लिहितात, “या देशात अनेक ज्ञानी झाले. अनेक भक्त झाले. योगी, संत आणि तत्त्वज्ञ झाले. त्यांनी केवळ आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कदाचित त्यांना ब्रह्मानंद मिळाला असेलही! पण सामान्य माणसाच्या उद्धाराचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यांना आनंद झाला असला तरी लोकांना मात्र झाला नाही. हा संगम गाडबेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या ठायी होता.”
आहेत का कोणी असे महात्मे आजच्या महाराष्ट्रात? की इथली आदर्शांची, संस्कारांची परंपरा मेलेली आहे? मुर्दाड मानसिकता असल्याशिवाय आपण असे उद्योग सहन करूच शकत नाही. जगात आपलेच दुःख मोठे आहे, असा समज असणारे अशा भोंदूंना शरण जातात आणि त्यातून असे कांड घडतात. नापिकी, भूकंप, त्सूनामी, महापूर या आणि अशा नैसर्गिक संकटांमुळे जे दुःख वाट्याला येते त्यापेक्षा कितीतरी पट दुःख अशा प्रकरणांमुळे सहन करावे लागते. आपली कुणी आर्थिक फसवणूक केली तर ती भरून काढता येते पण आपली भावनिक फसवणूक झाली तर त्या वेदना चिरकाल टिकतात. आज एक अशोक खरात सापडलाय. समाजात असे किती तरी खरात जागोजागी असतील. त्यांच्या नादी लागून आपण फक्त आपलेच नुकसान करून घेत नाही तर इथल्या मातीचा आदर्श इतिहासही आपल्याच हाताने पुसून टाकतोय. त्याचे पापक्षालन कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही.
शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी आपल्या गुरूंचीही परीक्षा घेणाऱ्या युगपुरूष स्वामी विवेकानंदांचे आपण उदाहरण सांगतो. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि दुसरीकडे अशोक खरातसारख्या भोंदूंच्या फसवणुकीला बळी पडतो. त्याला पाठिशी घालणाऱ्या राजकारण्यांना मोठ्या मनाने स्वीकारतो. ही आपण स्वतःचीच केलेली प्रतारणा आहे. या सगळ्यांपासून आपल्याला जाणीवपूर्वक दूर राहता आले पाहिजे. ते जमले तर आणि तरच उद्याची पिढी आपल्याला माफ करू शकेल. अन्यथा एका मोठ्या अरिष्ठांपासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही.
घनश्याम पाटील
लेखक, संपादक, प्रकाशक
७०५७२९२०९२
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६
.jpg)
Comments