top of page

शनिवारवाड्यावरील आठवणीतल्या सभा

  • Feb 2
  • 3 min read

Updated: Mar 17

पुण्यातील शनिवारवाडा पटांगण आणि राजकीय सभा यांचं कित्येक वर्षे अगदी अतूट नातं होतं. माझ्या जन्मापासूनची तीस वर्षे कसबा पेठेत गेल्याने शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूशी निकटचे भावबंध निर्माण झाले होते. वाड्यासमोरील पटांगणात होणाऱ्या विविध सभा हा आमच्या पिढीसाठी सुरेख श्रवणानंद होता. दूरदर्शनचा काळ यायच्या आधीचा जमाना असल्यामुळे संध्याकाळी भाषणे / व्याख्याने कुठे आहेत याचाच शोध घेतला जायचा. धूळभरल्या पटांगणात बसून किती तरी दिग्गज वक्त्यांची आजही स्मृतित असलेली भाषणे ऐकली. आचार्य अत्रे, अटलजी, जगन्नाथराव जोशी, एसेम जोशी, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, मधू लिमये, नाथ पै... किती नावे घ्यावीत... यादी न संपणारीच.


आचार्य अत्रेंना प्रथम ऐकले ते 1967 मध्ये एसेम जोशींच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रचाराचा नारळ फोडताना. प्रतिस्पर्धी उमेदवार विठ्ठलराव गाडगीळ यांच्यावर घराणेशाहीवरून निशाणा साधत असतानाच कृश शरीरयष्टीच्या एसेम यांचा उल्लेख ‌‘संपूर्ण महाराष्ट्र समितीचे भरभक्कम आधार‌’ असा करून आपल्या स्वभावातला खट्याळपणा अजून गेला नाही याची जाणीवच त्यांनी करून दिली.


बाळासाहेबांच्या अनेक विराट सभा या वास्तूने पाहिल्या! पण त्यातही अतिविराट म्हणावी अशी सभा झाली ती वामनराव महाडिकांच्या रूपाने शिवसेनेला पहिला आमदार मिळाला त्यावेळच्या सत्काराची. आजूबाजूचे सर्व रस्ते पूर्ण भरून समोर नव्या पुलावर सुद्धा पाय ठेवायला जागा नव्हती. अशी गर्दी त्यानंतर कधीच पाहायला मिळाली नाही. बाळासाहेबांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते भाषण करत आहेत असे कधीच वाटले नाही. समोरच्या श्रोत्यांशी जणू संभाषण करावे अशी त्यांची शैली होती. परिणामी त्यांचे बोल अगदी हृदयाला भिडत असत.


अटलजी आणि जगन्नाथराव जोशी म्हणजे वक्तृत्वकलेची दोन टोकेच. अमोघ वाणी अन्‌‍ संस्कृतप्रचुर अशी मधुर हिंदी भाषा ही अटलजींची बलस्थाने तर धडधडणारी मुलुखमैदान तोफ ही जगन्नाथरावांची ओळख. या दोघांना अनेक वेळा तिथे ऐकण्याचे भाग्य लाभले.


यशवंतरावांची अनेक भाषणे या स्थळी ऐकायला मिळाली. श्रोत्यांच्या हृदयाला हात घालण्याचे अद्भूत कसब त्यांच्याकडे होते. यशवंतरावांचे भाषण ऐकताना ‌‘मत द्यावे तर काँग्रेसलाच‌’ असे कट्टर विरोधकालाही वाटावे अशी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाची ताकत होती. या बाबतीत त्यांच्या जवळपास जाईल असा वक्ता त्यानंतर काँग्रेस पक्षात माझ्या तरी ऐकण्यात नाही.


रूढ अर्थाने ज्यांना राजकारणी म्हणता येणार नाही अशा एका दिग्गज व्यक्तिची या पटांगणातील एकमेव राजकीय सभा पाहण्याचे भाग्यही मला लाभले. ही व्यक्ती म्हणजे पु. ल. देशपांडे. अणिबाणीचा काळा अध्याय संपल्यावर झालेल्या निवडणुकीच्या वेळी पुलंनी जनता पक्षाच्या वतीने काही निवडक प्रचारसभात भाषणे केली. त्यातील शनिवारवाड्यासमोरची सभा प्रचंड गर्दीची होती. या सभेत ज्या हिरीरीने पुलं काँग्रेस सरकारवर तुटून पडले तो जोश पुलंचे अनोखे रूप दाखवून गेला. अर्थात कुठे थांबायचे याची जाण असल्याने यानंतर त्यांनी कुठल्याही राजकीय सभेत उपस्थिती लावली नाही. अगदी जनता पक्षाच्या विजय सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली.

कुठल्याही अर्थाने राजकीय म्हणता येणार नाही अशी एक सभा आजही स्मृतिआड झालेली नाही. गोवा मुक्ती संग्रामातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहन रानडे यांची जानेवारी 1969 मध्ये पोर्तुगीजांच्या बंदिवासातून सुटका झाली. त्यानंतर काही दिवसातच शनिवारवाड्यावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिल्ली दरवाज्यासमोर मैदानाच्या पलीकडील बाजूस हुतात्मा स्तंभ होता. (जो नंतर सारसबागेत हलवला गेला) सत्कार समारंभ सुरु होण्याआधी त्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून रानडे यांनी श्रद्धांजली वाहिली. चौदा वर्षे एकांतवासाची शिक्षा भोगल्याने रानडे यांच्या मराठी बोलण्यावर परिणाम झाल्याचे जाणवत होते. तुरुंगवासातील त्यांचे अनुभव ऐकताना अंगावर काटा उभा राहत होता. “आज माझ्या सत्कार सभेत शहीद भगतसिंह, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांचा उल्लेख झालेला ऐकून आनंद वाटला. असा त्यांचा उल्लेख सतत होत राहावा म्हणून माझ्या सत्कार सभा होत राहोत” असे रानडे यांचे मिश्किल उद्गार आजही आठवतात. असो.


‌‘शनिवारवाड्यावरील सभा‌’ हा विषय ज्यांच्या उल्लेखशिवाय पुरा होऊच शकत नाही अशी एक अवलिया व्यक्ती होऊन गेली ती म्हणजे प्र. बा. जोग. वसंत व्याख्यानमालेत आपल्याला संधी मिळत नाही म्हणून त्यांनी स्वतःची ‌‘पसंत व्याख्यानमाला‌’ काढली होती. या व्याख्यानमालेतून त्यांची असंख्य भाषणे शनिवारवाड्यावर झाली. बाकी जोगांचे भाषण म्हणजे फुल टाइमपास अशीच आमची धारणा होती. आडनाव जोग आणि वास्तव्य सदाशिव पेठेत असले तरी सभ्यतेच्या सीमा ओलांडून असे काही बोलत की पुरुषांनीसुद्धा लाजेने मान खाली घालावी! पण हा मुद्दा बाजूला ठेवला तर जोगांची बुद्धिमत्ता अचाट होती. त्यांची राजकीय भाकीते बऱ्याच वेळा अचूक असत. वाणीवर नियंत्रण ठेवले असते तर जोगांची राजकीय कारकिर्द अधिक उज्ज्वल झाली असती असे आजही वाटत राहते.

शनिवारवाड्यावरील सभांचे हे थोडक्यात स्मरणरंजन म्हणा ना! आज मात्र हे सारेच इतिहासजमा झालंय. पुढील पिढ्यांना या ‌‘दिल्ली दरवाजा‌’समोर वक्तृत्वाचा असा महोत्सव चालत असेल अशी कल्पना सुद्धा करता येणार नाही. शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे!


- अरूण कमळापूरकर


7972573894

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page