हृदयस्पर्शी कथासागर
- 4 days ago
- 4 min read
चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला, महेश सोवनी यांनी लिहिलेला ‘कडेवर आणि इतर कथा’ हा संग्रह वाचण्यात आला. कथा वाचताना प्रकर्षाने जाणवले की, यातील कथाबीजं, कथांचा बाज, कथांची मांडणी नि संवाद, कथांचे विषय नि आशय या सर्वांचे वेगळे असे सादरीकरण आहे, जे थेट हृदयात घर करते.

‘कडेवर’ ही कथा अत्यंत वेगळ्या ढंगात वाचकांसमोर येते. दोन पिढ्यातील विचारशैली, राहणीमान यासह जनरेशन गॅप ह्या बाबी ठळकपणे मांडल्या आहेत. कडेवर हा शब्द साधारणपणे बालकाशी संबंधित असा, या कथेत मात्र लेखकाने या शब्दाचा जो अर्थ समोर ठेवला आहे तो वाचताक्षणी काही क्षण वाचक थांबतो. या कथेत एका प्रथेचा लेखकाने उल्लेख केला आहे, ती म्हणजे ‘द आर्ट ऑफ डेथ फोटोग्राफी’ ह्या प्रथेचे नि कलेचे वाचन करताना वाचक चक्रावून जातो.
‘चार्ली परत येतो’ ही कथा रम्य आठवणींचा जागर करणारी आहे. भूतकाळात जवळच्या व्यक्तिला भेटायला जाताना काढलेले रेल्वेचे तिकीट सापडताच त्यावरील दिनांक, वेळ पाहून त्या भेटीत घालवलेल्या क्षणांची तत्काळ सय येणं ही बाब स्मरणशक्तिला दाद द्यावी अशीच! याच कथेत सांगितलेले अंधाराचे प्रकार वाचून ज्ञानात भर पडते. आठवणींसाठी केलेली अप्रतिम शब्दरचना... ‘मग माझेही लग्न झाले, मुलेबाळे झाली नि तुझी आठवण हळूहळू फिकट होत गेली. जसा कपड्यावरील डाग जात नाही पण फिकट फिकट होत जातो ना अगदी तसे.’
‘अनुक्रमणिका नंबर अकरा’ ही कथा जिल्हा परिषदेच्या शाळांतील समस्यांचा पाढा वाचणारी आहे. मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील हळूवार, कुठलाही त्रागा, राग व्यक्त न करता होणाऱ्या चर्चेतून रंगलेला संवाद शिक्षण क्षेत्रातील धगधगते वास्तव उलगडून दाखवते. काही आशादायक घटनाही समोर येतात.
‘आमची भास’ ह्या कथेच्या नायिका सविताआजीचं थेट सानेगुरूजींच्या कुटुंबाशी नातं! आमची भास याचा सरळसरळ अर्थ आमची भाषा! आजीची भाषा चित्पावनी अर्थात कोकणी! आजीचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी बेंगलोरला स्थायिक होताच आमची भासची आस कमीकमी होत गेली. उलट बेंगलुरची कानडी भाषा सररास वापरली जाऊ लागली. आजीला हे फार मोठे दुःख होते. तिचे पती होते तोपर्यंत दोघे आमची भास बोलत परंतु ते या जगातून गेले, जणू कुटुंबाची आमची भास घेऊन गेले. लहानपणापासूनच ज्या बोलीभाषेची गोडी लागली होती, जी जीवाभावाची भाषा होती त्या भाषेचा एकही शब्द घरात वापरला जाऊ नये याचे शल्य सविताआजीला बोचत होते. तिला वाटे, शाळेचे मार्क महत्त्वाचे. बोली भाषेला कोण विचारतंय? ती विसरली तरी चालतंय... बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना लेखक सोवनी जळजळीत वास्तव उजागर करतात, एक भाषा जेव्हा मरते ना तेव्हा ती एकटी मरत नाही. अख्खी संस्कृती घेऊन मरते.
‘सोबती’ ही कथा वेगळा बाज घेऊन आली आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या आईवडिलांची सुलभा नावाची मुलगी मराठी भाषेची आवड असल्यामुळे भारतात येते. भारतात अचानक तिची भेट एका सर्विस प्रोव्हायडर अर्थात सेवा देणाऱ्या व्यक्तिशी होते. सुलभा त्याला सतत सोबत ठेवू लागली, अगदी सिनेमा, पार्टीतही! एकदा एका रिचर्ससाठी सुलभा एका आडगावी जाते, सोबत तो सोबती असतोच! तिथे त्यांना एका हॉटेलमध्ये एकच खोली मिळते. अशा एकांतस्थळी त्या सोबत्याच्या संयमाची परीक्षा असते. तो त्या परीक्षेत उत्तीर्ण होतो का? सुलभाची अवस्था काय होते? तीन वर्षांनंतर सुलभा ऑस्ट्रेलियाला परतताना तिची आणि सोबत्याची काय अवस्था होते ते लेखकाच्या लेखणीने अत्यंत संयमाने लिहिले आहे. लेखकाने कथेचा केलेला शेवट जणू कथेचा सार आहे, इतके दिवस त्याने त्रयस्तपणे तिची सोबत केली होती. संततधार पडत राहिली तरी दगडसुद्धा मऊ होतो. सोबती तर हाडामासाचा माणूस होता.
लेखकाची भाषाशैली, शब्दसंपत्ती खूप श्रीमंत आहे. ‘रीती’ या कथेच्या सुरुवातीला लेखक एक तुलनात्मक वाक्य पेरतात ज्यामुळे कथा वाचण्याची ऊर्मी दाटून येते. ‘आपल्या दुखणाऱ्या गुढघ्यावर हात ठेवत रशिदा उठली. ती जिना उतरू लागली तेव्हा तिला समजेना की तिच्या शरीरातील हाडे जास्त खुळखुळत आहेत की जीर्ण झालेला जिना?’
रशिदा ही म्हातारी बाई राहत असलेले घर मोडकळीस आल्यामुळे नियमानुसार ते घर खाली करावे म्हणून एक कर्मचारी नोटीस घेऊन नेहमीच तिच्या भेटीला येतो. त्या दोघांचा नेहमी होणारा संवाद, कधी कर्मचाऱ्याचे स्वगत यामुळे ही कथा एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. दोघांमध्ये जी नात्याची, मैत्रीची शुद्ध, घट्ट वीण गुंफली जाते त्यातून होणारी हृदयस्पर्शी बोलचाल मन हेलावून टाकते.
‘सी सॉ’ ही कथा वाचताना मन सुन्न होऊन जाते. दोन वेगवेगळ्या, हृदयस्पर्शी घटनांची सांगड घालताना लेखक सोवनी यांच्या लेखनकौशल्याला दाद द्यावीच लागते. किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची तीस वर्षांनंतरही येणारी आठवण कथानायकास जशी कासावीस करते, तशीच शालेय जीवनातील वर्गमैत्रिणीची होणारी ससेहोलपट वाचतानाही मन उद्विग्न होते. शिक्षित असूनही शबानाचा होणारा कोंडमारा मन अस्वस्थ करतो.
प्रभा! नकळत झालेल्या एका चुकीमुळे सतत आईवडिलांची टोचणी, वडिलांचा नशेच्या आहारी जाऊन झालेला मृत्यू, दोन लहान भावांचा तुरुंगवास हे काय कमी म्हणून लग्न होताच नवऱ्याला आधीच पत्नी असल्यामुळे घेतलेला घटस्फोट अशा दुष्टचक्रातून बाहेर पडणाऱ्या प्रभाचा मूक आक्रांत महेश सोवनी यांनी ‘ती सत्कर्माला लागली’ या कथेत मांडला आहे, तो बेचैन करणारा आहे.
‘पुन्हा कधी भेटशील’ या कथेची सुरुवात लेखक एका छानशा वाक्याने करतात. ‘अपघाताने माणसे हिरावली जातात, दुरावली जातात तसेच अपघाताने काही माणसे भेटतात...’ हे वाक्य लेखकाने का लिहिले असावे ह्याचे उत्तर कथा जशी पुढे जाते तसे मिळत जाते. रेल्वेने प्रवास करत असणाऱ्या लेखकाची रेल्वे एका निर्जन स्थळी थांबताच तिथे होणारे संवाद, चर्चा सुरू असताना एक व्यक्ती लेखकाला भेटताच उसळून येतो आठवणींचा महासागर! त्या चर्चेतला एक मुद्दा एखाद्या बाणाप्रमाणे हृदयाला भेदून जातो. अपघातात मेलेल्यांना सरकारकडून मदत मिळते. म्हणून मग एक मृतदेह मागायला तीन वेगवेगळे लोक येतात. मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांची कमी नाही... लेखकाचा भूतकाळ जागृत करणारी ती व्यक्ती कोण होती? कथेचा शेवट कसा होतो? हे वाचताना डोळे पाणावतात.
‘अधलं मधलं’ ही कथा वडील आणि मुलगी यांच्यातील प्रेमावर आधारित, वेगळीच गुंफण असलेली आहे. या शीर्षकाविषयी विषयाच्या ओघाने लेखक लिहितात, ‘सुख आणि दुःख यांच्या अधलं मधलं काही तरी असतेच की! बहुतांश लोकांचे प्रारब्ध असेच अधलं मधलंच असते की!’ प्रारब्धाच्या खेळात अडकलेल्या आई, बाबा, मुलगी आणि मावशी नात्यांचा हा चौकोन खूप रेखीव चितारण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
‘ती’ ही कथा संगीत क्षेत्रातील नामांकित रुद्र वीणाकार आणि त्यांचा मुलगा यांच्यातील संबंधाची आहे. काही प्रमाणात मुलाने करून घेतलेल्या गैरसमजाची आहे. इतर कथेप्रमाणे सोवनी यांनी ही कथाही अप्रतिम अशी रंगवली आहे. शेवट अत्यंत महत्त्वाचा आहे, वाचनीय आहे.
हसत्या-खेळत्या घराचं, कुटुंबातील कुणाचीही चूक नसताना कसं वाळवंट होतं ते ‘वाळवंट’ कथेत वाचताना मनाची अवस्था केविलवाणी होती. शेत गहाण टाकून आईबाप मुलाला त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी युक्रेनला पाठवतात. जेमतेम एक वर्ष होत असताना युक्रेनचे रशियासोबत युद्ध सुरू होते. ती सारी परिस्थिती आणि भारतात परत आल्यावर मुलाची झालेली मानसिक अवस्था, त्यातून त्याची सुटका हे वाचताना मन सैरभैर होते.
संग्रहातील एकूणएक कथा आगळावेगळा, नावीन्यपूर्ण विषय घेऊन लिहिलेल्या आहेत. सुख, दुःख, भीती, नवल, हसू, आक्रोश इत्यादी भावभावनांचे मिश्रण असलेल्या आहेत. लेखक महेश सोवनी यांचं अनुभवविश्व जसं विस्तृत आहे तसाच त्यांच्याकडे विपुल शब्दभांडार आहे. योग्य ठिकाणी योग्य शब्दांची मांडणी करण्याचं अलौकिक कसब त्यांच्याकडे असल्यामुळे कथा केवळ वाचनीय नसून हृदयाला भिडणाऱ्या आहेत, वेगळी अनुभूती देणाऱ्या आहेत.
कडेवर आणि इतर कथा
लेखक : महेश सोवनी
प्रकाशक : चपराक प्रकाशन
नागेश शेवाळकर
9423139071
प्रसिद्धी - मासिक साहित्य चपराक एप्रिल २०२६
.jpg)