गड्या आपला गावच बरा! - सदानंद भणगे
- 4 hours ago
- 10 min read
नुकतेच आम्ही उभयता अमेरिकेला जाऊन आलो. थांबा घाबरू नका. तुम्हाला वाटेल झालं आता ह्याचं प्रवासवर्णन आणि स्वत:च कौतुक सुरु! पण मी ते लिहिणार नाही. अमेरिकेला जाऊन आले की सगळेच लिहायला सुरुवात करतात, “मध्यरात्री विमान निघणार होतं. विमानतळावर खूप नातेवाईक, मित्र जमा झाले होते. खाड खाड इंग्रजी बोलत मी पासपोर्ट दाखवला. पत्नी थोडीशी घाबरली. तिला म्हटलं डोन्ट वरी, सिक्युरिटीमधून जाताना आपण नवीन आहोत हे दाखवू नकोस. विमानतळ एअर कंडीशन्ड होतं...” वगैरे वगैरे! पण मी तसं काही लिहिणार नाही. तेव्हा तुम्ही पान उलटू नका. तसेच मॅनहॅटनमध्ये लेखक, स्वातंत्रदेवीच्या पुतळ्याखाली लेखक पत्नीसह, नायगऱ्याजवळ अस्मादिक, असे फोटो सुद्धा मी दाखवणार नाही. प्रवास चालू असतानाच मी (मराठीतून) शपथ घेतली होती, की मी माझे ‘प्रवास वर्णन’ अजिबात लिहिणार नाही. तेव्हा वाचक हो, तुम्हाला हा लेख वाचायला काहीच हरकत नाही.
खरं तर आजच्या जमान्यात इंग्लंड, अमेरिकेला जाणं फारसं कौतुकास्पद राहिलेलंच नाही. तुमच्या घराच्या आसपासच बघा. कुणाचा मुलगा, मुलगी, सून, जावई, भाचा, पुतण्या कोणीतरी परदेशात असतोच. एवढंच काय पण अगदी जपान, सायप्रस, जर्मनीमध्येही मुलं गेली आहेत. मग आईबाप, सासू सासरे, नातेवाईक जातात तिकडे चार सहा महिने मजा करायला. तिथलं रंगीबेरंगी, शिस्तीचं वातावरण पाहून चाट होतात. आपलं वय, नोकरी विसरून हाफ पॅन्ट, रंगीत टी शर्ट, टोप्या, बूट घालून हिंडतात. भारतात आले की लेखक नसलेलेही दणादण प्रवास वर्णन लिहितात. त्यात स्वतःचं, पोराबाळांचं कौतुक, तिथले फोटो वाचकांच्या माथी मारतात. एवढेच नाही तर स्वखर्चाने पुस्तकही छापतात आणि वाटत बसतात सगळ्यांना. त्यामुळे जाणाऱ्यापेक्षाही न जाणाऱ्यानाच जास्त माहिती असते परदेशाची. अशी पुस्तके म्हणजे लग्नाच्या फोटो अल्बमसारखी वाटतात. ज्याचं असतं त्याला कौतुक, बाकीच्यांना कंटाळवाणं. उलट बाकीच्यांना ती शिक्षाच! म्हणूनच मी प्रवासवर्णन लिहायचं नाही, फोटो दाखवायचे नाहीत आणि वाचकांना अजिबात त्रास द्यायचा नाही असं ठरवलं. तात्पर्य हा लेख तुम्हाला वाचायला काहीच हरकत नाही.
न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, वॉशिंगटन, बोस्टन, नायगारा फॉल्स हे अमेरिकेच्या इस्ट कोस्टला येतात. तेथे अटलांटिक महासागर आहे तर सानफ्रान्सिस्को, लास वेगास, लोसेन्जोलीस हे वेस्ट कोस्टला येतात. तेथे पॅसिफिक महासागर आहे. एका कोस्टकडून दुसऱ्या कोस्टला जायला सुद्धा विमानाने सहा सात तास लागतात. विमान प्रवास खरोखरीच अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. प्रचंड महाग आणि तिकीटही सिझनप्रमाणे वाढत जाणारं. आपलं नगर-पुणे कसं एकदा तिकीट दर ठरला म्हणजे भाडेवाढ होईपर्यंत तोच. अमेरिकेचा प्रवास तर बोअर. कल्पना करा वीस-बावीस तास नुसतं सीटवर बसून राहायचं. दारं बंद, खिडकीतून ढगांशिवाय काहीच दिसत नाही. भीतीच वाटते. मध्ये ना स्टॉप, ना स्टेशन. विमान बदलायचं म्हणजे टेन्शन. काय एन्जॉय करणार सांगा. त्यांचं इंग्रजीसुद्धा आपल्याला समजत नाही. विमानतळावरच्या त्या कडक तपासण्यात कधी बॅगा उघडायला लावतील नेम नाही. एकदा आमच्या शेजारच्या प्रवाश्याचे डिंकाचे लाडू काढून टाकायला लावले. बिचाऱ्याने बकाबका चार-पाच खाल्ले. एवढ्या महागामोलाचे लाडू फेकून द्यावे लागले. एवढ्या तपासण्या झाल्या की तास-दोन तास नुसतं बसून राहायचं. सगळे अति सुशिक्षित असल्याने कुणाशी बोलायची पंचाईत. तिथेच कंटाळ्याला सुरुवात होते. त्यापेक्षा आपल्या तांबड्या ‘यष्टी’चा प्रवास काय मस्त! चार-दोन टाळके येतात, टवाळ गप्पा सुरु होतात, विड्यांचे धूर निघतात. कुणी पचकन तंबाखूची पिंक टाकतो, कुणी वडे खाऊन कागद टाकतो. एसटी आली की दारापाशी तुडुंब गर्दी, रेटारेटी, धक्के खात खात कंडक्टरचं खेकसणं सहन करीत आत घुसायचं. मग त्याच टपावर चिमटा आपटणं, सुटे पैसे परत न देणं, लहान पोरांचं केकाटणं, मग जागेवरून भांडणं, कुणी पायावर पाय देत, कुणाची ट्रंक खसदिशी लागणं, सॉरी वगैरे म्हणण्याची आपल्या देशात पद्धतच नसल्याने प्रश्नच येत नाही. तर अशी मजा विमान प्रवासात अजिबात नाही. तिथे सगळी शांतता. जो तो आपला लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेला. कुणी कुणाशी बोलणं लांबच, बघत पण नाही. कॉफी, चहा घ्यायला जावं तर किंमत ऐकून तलफच जाते. साधा पांचट चहा तीनशे रुपयाला. आपला एसटी कॅन्टीनमधला चहा कसा जीभ टाळूला चिकटेल एवढा गोड अन घट्ट तोही दहा रुपयात. मस्तपैकी माशा उडवीत प्यायचा. तो आनंद पण मिळत नाही. भूक लागली तर पाववड्याची आठवण करीत बसायचं, एसीमधल्या खुर्चीवर.

तसं आम्हाला विमान प्रवासाचं लहानपणापासून फार अप्रूप. सिनेमात पाहिल्यावर तर वाटायचं ह्याला म्हणतात श्रीमंती प्रवास. नायक विमान तळावर येतो, पाच पन्नास लोक त्याला सोडवायला येतात, हार तुरे घालतात, मिठ्या मारतात, रडतात. नायिका लांबून हात हलवीत बाय करीत असते. आपणही तसेच जाऊ, विमानाच्या शिड्या चढताना अभिमानाने खाली पाहू, टाटा-बायबाय करू, मग हवाई सुंदरी आपल्याला सीटपर्यंत हसतमुखाने घेऊन जाईल. प्रत्यक्षात तसं घडतच नाही. गेटचा दरवाजा वेळेवर उघडतो. अति श्रीमंत बिझिनेस क्लासवाले अगोदर जातात. आपण मागून गर्दीत जायचं. न समजणाऱ्या सूचना चालू असतात. मग शांततेत लाल गालीच्यावरून चालत राहायचं. एखाद्या लग्न मंडपात गेल्यासारखे लांबलचक बोळीतून थेट विमानातच खुर्चीपाशी जावं लागतं. विमानात कधी प्रवेश केला तेच समजत नाही. खूप जवळजवळ असणाऱ्या खुर्च्यामध्ये जाऊन बसायचं. अनेक लोक अनेक भाषेत बोलत असतात. शेजारी कोणीतरी मक्ख सूटवाला असता. “काय पावणं कुणीकडं निगाला?” असं पण कुणी विचारत नाही. मग हवाईसुंदरी खडखडा वरच्या सामानाच्या कपाटाची दारं लावते. सीटबेल्ट व इतर सुचना चालू असतातच. आपल्याला कसं मोकळंढाकळं बसायची सवय. कुणी सामानावरून पाय देऊन जातोय, कुणाची बॅग डोक्याला लागतेय, कुणी म्हणतो, जरा सरकून घ्या की राव. विमानात तसलं काही नाही. गुबगुबीत खुर्चीवर बसून राहायचं. एसी इतका चालू असतो की थोड्या वेळातच गारठून जातो आपण. काही जण हात वर करून एसी ॲड्जस्ट करतात. आपल्याला तेही जमत नाही. तो एकदम बंद तरी होतो नाही तर बर्फ अंगावर आल्याइतक गार वारं तरी सुरु होतं. मग गोड हसत एअर होस्टेस येतात. अंगावर टॉवेल टाकून जातात. काही अनुभवी प्रवासी लगेच तो पांघरूण झोपीही जातात. आपण इकडे तिकडे बघत बसायचं.
प्रत्येकाच्या खुर्चीसमोर टीव्ही स्क्रीन असतो. त्यावर तुमचं स्वागत, मग सीट बेल्ट कसा लावायचा, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर कसं पडायचं ते दाखवतात. ते पाहूनच भीती वाटायला लागते. एकदम वॉशिंग मशीन बंद होताना आवाज करते तसा आवाज सुरु होतो आणि विमान हलायला सुरुवात होते. थोड्याच वेळात कानाला दडे बसायला सुरुवात होते. सूचनाच ऐकू येत नाहीत. विमान प्रचंड वेग घेते पण आत काहीच जाणवत नाही. स्क्रीनवर आपण किती वेगाने चाललो आहोत, किती उंचीवर आहोत ते दिसते. त्यामुळे आणखीनच भीती वाटते. मध्येच विमान हेलकावे खाते. शेजारचा मजेत कुठला तरी सिनेमा पाहत असतो. आपल्याला काहीच लावता येत नाही. कधी बटन सापडत नाही तर कधी वायर अडकते. कधी ऐकूच काही येत नाही. बरं शेजारच्याला विचारावं तर शेजारचा वेगळ्याच देशातला असतो. कुठल्या भाषेत विचारायचे, शिवाय आपण भारतीय, अज्ञान कसे दाखवणार? आता मला सांगा ह्या कटकटीपेक्षा आपला एसटीचा प्रवास मस्त. खडखडाट, अनेक खड्डे असले तरी भीती वाटत नाही. शेजाऱ्याशी बिनधास्त बोलायचे, “काय पावन, पाउस झाला का गावाकड?”
रेल्वेत तर अजून मजा. फेरीवाले हिंडत असतात. किचेन, कंगवे विकणारे पार नाकापर्यंत वस्तू आणतात. भिकारी तर मित्र असल्यासारखे अंगाला हात लावतात. गरम पदार्थांचे खमंग वास येत असतात. गाडी थांबली की कलकलाट, बाटल्याचे आवाज, हिंदी, मराठी शिव्यातली भांडणे. शेजारच्या प्रवाशाच्या रडकथा ऐकण्यात वेळ कसा जातो समजत नाही. विमान प्रवासात सगळे स्तिथप्रज्ञ, समाधी लागल्यासारखे. आवाज फक्त विमानाचा. ते देतील ते खायचे, प्यायचे. त्यात देखील शेजारचा काहीतरी चांगलं खातपीत असतो. आपल्या हातात ब्रेड आणि अँपल जूस! बरं मागायचे तरी कसं... एअरहोस्टेस काय विचारते ते आपल्याला समजत नाही आणि आपली भाषा तिला समजत नाही. सगळाच आनंद. एसटीत कसं गाडी थांबली की पाववडेवाले एकदम तोंडाशी ताट आणतात.
दुबई किंवा फ्रॅन्कफ्रूटला विमान बदलायचं असेल तर पोटात गोळाच येतो कारण ती विमानतळे प्रचंड मोठी. मुंबईत निदान काही जण हिंदी, मराठी बोलत असतात. इथे सगळेच वेगवेगळ्या भाषेत बोलत असतात. त्याची भाषा, उच्चार पण समजत नाहीत. विमान आपल्याला न घेताच सुटलं तर करायचं काय? म्हणून नुसतं पळत सुटायचं. आसपास भरलेली दुकाने दिसतात. ती न बघताच धावायचं. पुन्हा सुरक्षा तपासणी, घड्याळ, पाकीट, बेल्ट, मोबाईल काढा, पासपोर्ट दाखवा, एखादी वस्तू राहिली की संपलंच सगळं. काउंटरवरची स्त्री अगम्य इंगजीत बोलत असते. सगळंच अवघड. सहज चहा विचारावा तर दहा डॉलर म्हटल्यावर रुपये किती हिशेब करीत माघार. परत रटाळ विमान प्रवास... न्यूयॉर्क यायला लागलं की गडबड सुरु होते. लोक उभे राहतात. बाहेर पडायलाच अर्धा तास लागतो. पुन्हा सिक्युरिटी, पासपोर्ट पाहणार, अमेरिकन इंग्रजीमध्ये काहीतरी विचारणार. मग सोडणार. मराठी जशी दहा मैलावर बदलते तशी इंग्रजीही बदलते. ती समजून घेता घेताच जायचे दिवस येतात.
प्रवास संपला तरी ताण संपत नाही. लगेज मिळण्यासाठी बोर्ड बघत कोणत्या बेल्टवर सामान येणार ते वाचावे लागते. चार-पाच बेल्ट फिरत असतात, तिथेही गर्दी. सगळ्या बॅगा सारख्याच दिसतात. एक एक बॅग येत राहते, ती घ्यायची आणि बाहेर पडायचे. त्यावेळी भारतात रात्र तर अमेरिकेतली सकाळ सुरु झालेली असते. त्यामुळे सवयीने झोप येत असते. घरी पोहोचल्यावर जेटलॅगमधेच दोन दिवस जातात. अमेरिकेतले ते आरशासारखे स्वच्छ रस्ते पाहून चक्कर येते. एसटीत शेंगा खाऊन टरफले खाली फेकणारे, केळीच्या साली, वेफर्सच्या पिशव्या रस्त्यावर फेकण्याच्या सवयी असणारे आम्ही अमेरिकेचे कौतुक करू लागतो पण स्वत: सुधारत नाही. विनोदाचा भाग सोडा पण अनुभवातूनच माणूस शहाणा होतो. आपल्या माणसाची किंमत समजते. टॅक्सीने घरी जाताना स्वच्छ, प्रशस्त रस्ते, वाहतुकीची शिस्त पाळणारे नागरिक पाहूनच आश्चर्य वाटते. दुतर्फा टुमदार छोटे बंगले आणि शांतता. कुठल्याही रस्त्यावर एकही फ्लेक्स बोर्ड, नेत्यांचे वाढदिवस वा शुभचिंतकांचे फोटो दिसत नाहीत. रस्त्यावर मिरवणूक, नाच दिसत नाहीत. कोठेही लाउडस्पीकर नसतो. किती सुखी आहेत ना नागरिक. न्यूयॉर्क सिटी कमालीची स्वच्छ आहे, आकाशाला भिडणाऱ्या इमारतीचे फोटो काढण्यासाठी लोक चक्क रस्त्यावर पाठीवर झोपतात, तरीही शर्ट मळत नाही. स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्या आसपास कचरा टाकल्यास एक हजार डॉलर दंड आहे. डॉलरचा दर नव्वद रुपये धरून तुम्हीच गणित करा. मला भारतातली स्मारके आठवली. गंगा नदी आठवली. विवेकानंद स्मारक आठवलं. ताजमहाल आणि आसपासचा कचरा आठवला. वाहतुकीचे नियम तोडूनही कोणाची ओळख सांगितली की आम्ही सुटतो. अमेरिकेत लायसन्स रद्द होते.
रेल्वे, बसमधून सायकली, व्हील चेअर्स नेता येतात. अपंगांसाठी खास पार्किंग असते. तिथे गाडी लावल्यास बाकीच्यांना दंड होतो मात्र अमेरिकन माणूस खूप खात, पीत असतो. रस्त्याने सुद्धा त्याच्या हातात मोठा ब्रेड वा कॉफीचा भला मोठा मग असतो. हॉटेलमध्ये वेटरच्या हातून ग्लास फुटला तर सगळे जण टाळ्या वाजवतात, हसतात, त्याला चिअरअप करतात. आपल्याकडे वेटरलाच वाजवतात, पगार कापतात. तिथे हॉटेलमध्ये एक-दोन डॉलर्समध्ये वाईन वा बिअर टेस्ट करता येते, मग आवडेल ती विकत घेता येते. वाशरुम्स तर जागोजागी असतात. अतिशय स्वच्छ, सुवासिक, भरपूर पाणी असणारी. तेव्हा आठवतात आपल्या एसटी बस स्थानकावरील टॉयलेट्स आणि त्यांची अवस्था!
न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरवर श्रीमंती वाहत असते. चोवीस तास लाईट्सचा झगमगाट, रॉकफेलर टॉवरच्या एकशे पस्तीसाव्या मजल्यावर एका मिनिटात जाता येते. ही सिटी झोपतच नाही. प्रचंड गर्दी पण कुणी कोणाकडे पाहतही नाही. अगदी दोन भारतीय दिसले तरी ओळख देत नाहीत. सकाळी फिरायला बाहेर पडलो की समोर येणारा प्रत्येक अमेरिकन गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय आणि हसल्याशिवाय पुढे जात नाही.
नायगरा पाहणं एक अनोखा अनुभव आहे. न्यूयॉर्कपासून पाच सहा तासांच्या अंतरावर एकही खड्डा नसलेल्या सुरेख दुतर्फा झाडी असणाऱ्या रस्त्यावरून बस जाते. लांबूनच धबधब्याचा आवाज ऐकू येतो. प्रचंड मोठा प्रपात, उरात धडकीच भरवतो. त्याचा इतिहास व इतर माहिती एका फिल्मद्वारे दाखवली जाते. रात्रीच्या वेळी लाल, निळा, हिरवा रंग त्या प्रपातावर सोडला जातो. तो देखावा डोळ्यात साठवून ठेवावासा वाटतो. मोठ्या मोटर बोटने धबधब्यापर्यंत जाता येते. ते तुषार अंगावर घेणे म्हणजे निम्मी अमेरिका पाहिल्याचे समाधान आहे.
इथे प्रत्येक सिटी वेगळी आहे. न्यूयॉर्क असे तर सिलिकॉन व्हॅली हिरवी गार, एकदम शांत, रस्त्याने बदके गेली तर गाडीवाले थांबतात. सॅनफ्रान्सिस्को पाहायला आठ दिवस हवेत. तिथला गोल्डनगेट ब्रिज लांबूनच दिसतो. हाफ बे मूनला अर्धवर्तुळाकार समुद्र आहे. तिथे थंडगार वारं वाहत असतं. कुठलीही वस्तू दहा डॉलरच्या खाली नाही. लॉस एंजलीसच्या कोडॅक थेटरमध्ये ऑस्करची बक्षिसे वाटली जातात. तीन मजली या झगमगत्या इमारतीवर सर्व ऑस्कर विनर्सची नावे कोरली आहेत आणि खाली जमिनीवर त्या सर्व श्रेष्ठ नटांच्या पायांचे, बुटांचे ठसे घेतलेले आहेत. जवळच बेव्हरली हिल्सवर अमेरिकन कलावंतांचे झाडीत लपलेले बंगले आहेत. अक्षरशः ही मंडळी जणू स्वर्गातच राहतात, असे त्यांचे बंगले आहेत.
युनिवर्सल स्टुडीओ हा जगातला सर्वात श्रीमंत स्टुडीओ पाहून डोळ्याचे पारणे फिटते. अंगावर येणारे डायनोसॉर, समोर जळणाऱ्या गाड्या, भूकंप, पुराची दृश्ये पाहून तंत्रज्ञानाची त्यांची झेप पाहून डोळे विस्फारतात. ट्रीक सिन्स कसे घेतले जातात तेही दाखवले जाते तर मादाम तुसाचे पुतळे पाहून ते जिवंत असल्याचा भास आपल्याला होतो. इतके हुबेहूब की एकाने आमच्या देखत एका पुतळ्यालाच विचारले, ‘आमचा फोटो काढता का?’ म्हणून! लास वेगासला प्रचंड मोठे कॅसिनोज आहेत. तिथे श्रीमंती वाहत असते. एका मोठ्या मॉलमध्ये तर प्रती व्हेनिस शहरच उभं केलं आहे. निळ्याशार आकाशाखाली वाहणारी नदी आणि त्यात गाणी गात जाणारे नावाडी. बघतच बसावंसं वाटतं. रस्त्यात ड्रिंक्सची दुकाने आहेत पण कोणी रस्त्यावर पिऊन पडलेला वा शिवीगाळ करणारा दिसत नाही.
सॅनदिआगो सिटी म्हणजे तरुणांचा जल्लोष. रस्त्यावरच खाण्यापियाची हॉटेल्स, मेक्सिकन, थाई, अमेरिकन सर्व प्रकारचं खाणं मिळतं. इथे जगातले सर्वात मोठे जलचर संग्रहालय आहे. 4 डी सिनेमाग्रह आहे. चक्क अंगावर पाणी उडते. खुर्च्या हलतात. प्रेक्षक घाबरून ओरडतात. सोमवार ते शुक्रवार प्रचंड काम करणारा अमेरिकन शनिवार रविवार मौजमजा करतो, पैसे उडवतो. कधी शुक्रवारी कारच्या मागे छोटी नाव अडकवून बायको पोरं घेऊन समुद्रकिनारी जातात, तंबू टाकतात आणि दोन दिवस राहतात. कामाचं कल्चर खूप वेगळे आहे. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये भरपूर चांगले पदार्थ खायला, प्यायला असतात. खा, प्या, वाटल्यास खेळा पण खूप काम करा. घरूनही काम करण्याची परवानगी असते, त्यामुळे सगळेच मन लाऊन काम करतात.
झगमगतं लासवेगास पासून पुढे गेले की रणरणत वाळवंट लागतं. रखरखीत उन असत सगळीकडे. एकही झाड नसणारे अनेक डोंगर दिसू लागतात आणि आपण पोहोचतो जगप्रसिद्ध ग्रँड कॅनिअनला. साडेचार हजार फूट खोल असलेली दरी पाहून धडकीच भरते. मुख्य म्हणजे इथे कुठेही संरक्षक कठडे नाहीत. पुढे जाऊ नका म्हणून सांगणारे असतात पण अपघात घडत नाहीत आणि आपल्याकडे संरक्षक कठडे तोडून नशेत लोक जीव गमावतात. वाईट वाटतं.
अमेरिकेत श्रीमंतीच आहे असं नाही, गरिबीही आहे. रस्त्यावर बसून मदत मागणारे गिटार वाजवतात. येणारे जाणारे त्याच्या समोरच्या बरणीत पैसे टाकतात. काही म्हातारी मंडळी, हेल्प, होमलेस असा बोर्ड लाऊन मदतीची अपेक्षा करतात. डोनेशन नावाच्या संस्थेत नागरिक न लागणाऱ्या वस्तू देऊन टाकतात. त्या चांगल्या असतात, कमी किमतीत मिळतात. काही रस्त्यांवर मोठी कपाटे ठेवलेली असतात. त्यात लोक न लागणारे बूट, कपडे ठेवतात. गरीब लोक ते घेऊन जातात. कधी यार्ड सेल असतो. म्हणजे अनेक जण आपापल्या घरातल्या वस्तू विकायला ठेवतात. मोठ मोठे शॉपिंग मॉल्स असतात. चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळतात मात्र इथे हमाल, नोकर नाहीत. पेपर टाकणारा नसतो, दुधवाला येत नाही. रस्त्यावर फेरीवाले, रद्दीवाले नसतात. सगळी कामे स्वत: करावी लागतात. अगदी फर्निचरचे सुटे भाग सुद्धा उचलून आणावे लागतात. स्वत:च जोडावे लागतात. घरातही कामवाली नसते मात्र सुविधा सगळ्या असतात. चोवीस तास गरम पाणी आणि लाईट गॅस, डिशवॉशर कॉमन धुण्याचे मशीन. भारतीयांना सगळ्याचेच अप्रूप वाटते.
लोक चक्क समोरच्या व्यक्तिला जाऊ देतात, सॉरी म्हणतात. रात्री-अपरात्री सुद्धा सिग्नलला थांबतात. वाहनांचा वेग रस्त्यावरच्या बोर्ड प्रमाणेच ठेवावा लागतो. केरकचरा कोणीही रस्त्यावर टाकत नाही तर काळ्या पिशवीत भरून ठेवतात, सकाळीच एक गाडी येऊन त्या पिशव्या घेऊन जाते. मशीनने रस्ते झाडले जातात. कुत्र्यांनी काही केले तर मालकांना ते उचलावे लागते आणि लोक ते करतात. अंधाराचा फायदा घेऊन कोणी तसे जात नाही. भल्या मोठ्या मॉल्समधून सगळ्या वस्तू मिळतात. काउंटरवर कोणीही गर्दी करीत नाही. मागे लांब उभे राहतात. किती लिहिणार, आपल्याला सगळंच नवल वाटतं. या गोष्टी शिकायला पैसा लागत नाही.
तरीही आम्हाला भारताची ओढ लागते. दिवाळीचे दिवस आठवतात. श्रावणातले सण दिसू लागतात. मंगळागौरीची गाणी कानात घुमू लागतात. भारतीय पदार्थांची आठवण व्हायला लागते. मित्रांचे गळ्यात गळे घालून हिंडणे आठवते. मॉर्निंग वॉकला भेटणारी मंडळी आठवू लागतात. रात्री पानाच्या टपरीवर सिगारेटचा धूर काढीत क्रिकेट आणि राजकारणावर गप्पा मारणारे दोस्त लोक आठवतात. महमद रफी, हेमंतकुमार, किशोरकुमारची गाणी ऐकू येतात, अमिताभचे सिनेमे, सचिनची मॅच आठवते. कधी एकदा भारतात येतोय असं होतं. आल्यावर किराणा दुकानात जातो, मालक तंबाकू खाऊन पिंक रस्त्यावर टाकतो, कागदाचे बोळे रस्त्यावर फेकतो. तळमळून सांगावंसं वाटतं, नको टाकू पण धीर होत नाही. वाहनाचे हॉर्न्स त्रास देतात कारण नसता वाहनांची झालेली कोंडी बघवत नाही. शेवटी भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे महत्त्वाचे आणि अमेरिकेतही दारिद्र्य, गुन्हेगारी, इतर समस्या आहेतच, असो...
याहीपेक्षा खूप काही बघण्यासारखं आहे, लिहिण्यासारखं आहे. हॉलीवूडची ट्रेन सफर, मिस्ट्री हाउसमधल्या गमती जमती, येशोमीटी हिल्सचा सूर्यास्त, लेक टाहोची बर्फातली हॉटेल्स, लास वेगासची कारंजी, ट्रम्प टॉवरची सोनेरी उंच इमारत, हूवर डॅमचा अतिभव्य प्रकल्प, गुगल, फेसबुक, याहूच्या इमारती, नासा आणि परिसर याबद्दल लिहायचं म्हटलं तर दोनशे पानी पुस्तक होईल. तेव्हा तूर्तास थांबतो कारण सगळं जग पाहिल्यावरही वाटतं, गड्या आपला गावच बरा. आमच्याकडे वृंदावन गार्डन आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, काश्मीर आहे, कन्याकुमारी आहे, संपन्न आहे आपला देश.
बघा मित्रांनो, मी शपथ पाळलीय, प्रवास वर्णन नाही लिहीलं. शनिवारी “भल्या पहाटे सहा वाजता निळा टी शर्ट अन लाल बर्मुडा घालून मी तयार झालो, बायकोने बदामी पंजाबी ड्रेस घातला होता. आम्ही निघालो लास वेगासला. मी आज कॅसिनोत जाऊन खेळणार होतो. फोटो क्रमांक चार पाहा. लेखक वर्ल्ड ट्रेंड सेंटरचा इतिहास वाचताना. डावीकडून पाचवा मी वगैरे वगैरे!” मी असं काही लिहिले नाही. विनोदाचा भाग सोडा पण आपण अमेरिकन लोकांपासून चांगलं घ्यायला काय हरकत आहे? निदान शिस्त, स्वच्छता आणि शिष्टाचार जरी अंमलात आणले तरी हा लेख सत्कारणी लागला म्हणायचा!
-सदानंद भणगे
+91 9890625880
.jpg)



Comments