top of page

मनक्षितिजाच्या पल्याड

  • 21 hours ago
  • 2 min read

सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांत लपलेलं क्षितिज दुर्गप्रेमींना नेहमीच साद घालतं. क्षितिज म्हणजे केवळ साहस नव्हे तर ते एक ध्येय असतं, एक ओढ असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते एक आव्हान असतं - जे मनाच्या अगदी खोलवर स्पर्श करतं! पण माझ्या आयुष्यातील हे क्षितिज काहीसं वेगळं आहे. ते केवळ गडकोट सर करण्यापुरतं मर्यादित नाही तर माझ्या मुलामध्ये खोलवर रुजलेल्या निसर्गप्रेमातून जन्मलेलं आहे.

काही गोष्टी या माणसाकडे निसर्गतः आलेल्या असतात. सह्याद्रीच्या रानवाटांची भुरळ त्या कोवळ्या जीवालाही पडली, ही निसर्गाची एक अनोखी शिदोरीच म्हणावी लागेल. सह्याद्रीच्या मातीतून फुटलेला हा नवांकुर आमच्यातल्या पालकत्वाला जणू आव्हान देत असतो.

वर्षाऋतूमध्ये रानवाटांचं एक आगळंवेगळं सौंदर्य असतं. जसं मानवी आयुष्य क्षणभंगुर, तसंच निसर्गसौंदर्यही - क्षणात उमलणारं, क्षणात हरवून जाणारं. निसर्गाने आज दाखविलेला आविष्कार उद्या पाहायला मिळेलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी शहरी पिंजऱ्यात अडकलेलं आमचं मन सह्याद्रीच्या दिशेने झेपावू लागतं.

त्या दिवशीही अशाच एका ओढीने आम्ही बाहेर पडलो. मनात उत्साहाची वादळं उठली होती. वाटलं होतं, आज काहीतरी नवं अनुभवायला मिळेल. निसर्गाची गुपितं उलगडतील, एखादा झरा गाणं गाईल, पानांमधून सोनकिरणं झिरपतील आणि कदाचित एखादा क्षण कायमचा आठवणीत कोरला जाईल.

परंतु निसर्गाच्या मनात त्या दिवशी काहीसं वेगळंच असावं. गडाच्या पायथ्याशी पोहोचताच सारं काही क्षणात विरघळून गेल्यासारखं वाटलं. धुकं एवढं दाट होतं की दोन पावलं पुढे काय, हेही कळेनासं झालं. निसर्गानं स्वतःभोवती जणू गूढ चादर पांघरली होती. आमच्या सगळ्या अपेक्षांना, उत्साहाला धुक्याने कवेत घेतलं होतं.

आमची घोर निराशा झाली. माघारी फिरावं म्हणून गाडीकडे वळलो. तोच दाट धुक्यातून दूरवर एक अस्पष्ट हालचाल दिसू लागली. मदतीच्या आशेनं आरोळी ठोकताच साधारण त्रिकोणी आकाराची ती अबोल काळसर सावली आमच्या दिशेनं सरकू लागली. जसं ते गूढ आमच्या जवळ येऊ लागलं तसं माझ्या बोटाची ती छोटीशी पकड घट्ट झाल्याचं मला जाणवलं. त्याच्या डोळ्यांत भीती होती पण त्याहून अधिक होतं ते कुतूहल. काय असेल? कोण असेल? या प्रश्नांनी मलाही क्षणभर गोंधळून टाकलं.

हळूहळू ती सावली स्पष्ट होऊ लागली आणि धुक्याच्या आडून एक हाडकुळं पण ठाम अस्तित्व समोर आलं. क्षणभर हसू आलं! साधारण सत्तर ते ऐंशी वर्षांची एक आजीबाई डोक्यावर सरपणाची मोळी घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. दाट धुक्यात ती आजी आम्हाला लवकर दिसली नाही परंतु तिच्या डोईवरची वाळलेल्या सरपणाची ती मोळी आधी दिसली. हवेतून वरच्या वर ती आकृती आपल्या दिशेने तरंगत येत आहे हे पाहून तो भांबावला असावा.

धुक्याची चादर हळूहळू विरू लागली. आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या. त्या क्षणी, हरवलेल्या वाटेवर आशेचा एक किरण चमकून गेला. आदिवासींच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या म्हणजे जणू रानवाटांची गुंतागुंतच! काळजीनं उमटलेल्या रेषा, अनुभवांतून मिळालेली वळणं आणि धैर्यानं कोरलेली शांतता. त्या सुरकुत्यांमध्ये आदिवासींच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास दडलेला असतो. आजीने दाखवलेली गडाची वाट, आयुष्याच्या प्रवासात अविस्मरणीय ठसा उमटवून गेली.

तो प्रसंग आठवला की आजही ओठांवर हसू उमटतं. त्या दिवशी आमच्याकडून गड सर झाला की नाही याला विशेष अर्थ नव्हता; कारण त्या क्षणी समोर उभ्या असलेल्या आजीच्या डोळ्यांतच आम्हाला क्षितिजाची एक झलक दिसली होती. सांगण्याचं तात्पर्य, खरं क्षितिज कुठे बाहेर नसतं, ते आपल्या मनाच्या गाभ्यात असतं. ते शोधावं लागतं, अनुभवावं लागतं! आणि मग एक दिवस, अशाच एखाद्या धुक्याच्या पडद्यामागून ते आपल्यासमोर स्पष्ट होतं.


- मंगेश मुरलीधर दौंडकर

+91 98906 19354

भोसरी, पुणे - 411039

प्रसिद्धी - 'साप्ताहिक चपराक' ६ ते १२ एप्रिल २०२६



Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page