top of page

मधाळ आठवणींची आमराई

  • 20 hours ago
  • 2 min read

उन्हाच्या झळा अंगाला झोंबू लागल्या की आजही मन गावच्या त्या धुळीने माखलेल्या पायवाटेवर जाऊन पोहोचतं. कोकिळेची ती पहिली आर्त साद कानावर पडली की डोळ्यांसमोर उभी राहते ती गर्द आमराई. रणरणत्या उन्हात अचानक आभाळ काळवंडून यायचं, वळवाचा वारा सुटायचा आणि काळजाचा ठोका क्षणभर चुकायचा. “पळा रे पाऊस आला!”


आईची ती हाक म्हणजे आमराईतल्या गोड महायुद्धाची नांदीच असायची.


आभाळ भरून आलं की आम्हा पोरांची झुंबड थेट आमराईकडे वळायची. वाऱ्याच्या वेगाने झाडांच्या फांद्या शहारल्या की टप-टप असा मधुर नाद करत पाडाचे आंबे गवतात पडू लागायचे. त्या आवाजासरशी आमची पावलं अधिकच वेगवान व्हायची.


“ए, हा माझा बरं का मी आधी पाहिलाय!” त्या चिखलात लोळणाऱ्या शेंदरी, रसाळ पाडासाठी चाललेली ती धडपड आणि तो हाती लागल्यावर मिळणारा अफाट आनंद! अहाहा! चिखलाने माखलेल्या हातांनी तो आंबा एखाद्या मौल्यवान रत्नासारखा शर्टाला पुसून फस्त करताना मिळणारा स्वर्गीय आनंद शब्दांच्या पलीकडचा असायचा.


घरातल्या माळ्यावर सुक्या गवताच्या गंजीत आंबे पिकत घालणं हा तर एक कौटुंबिक सोहळाच असायचा. त्या गवताचा उबदार स्पर्श, त्यातून दरवळणारा कैऱ्यांचा मंद सुगंध आणि दिवसागणिक वाढत जाणारी आतुरता  हे सगळं मनात खोलवर साठून आहे. हळूहळू तो अख्खा माळा पिकलेल्या आंब्यांच्या सुवासाने मोहरून जायचा आणि घर जणू अमृतात न्हाऊन निघायचं. ती गावरान चव म्हणजे निसर्गाचं मुक्तहस्त वरदानच होतं.


त्या काळात आमरसाचं आमंत्रण म्हणजे नात्यांची वीण घट्ट करण्याची पर्वणीच असायची. माहेरवाशिणी लेकराबाळांसह कौतुकानं यायच्या. गप्पांच्या मैफिली आणि आठवणींच्या कारंज्यात दिवस कसा निघून जायचा, ते कळायचंही नाही. साधनं कमी होती पण मनांची ओढ मात्र अथांग होती. नात्यांमध्येही त्या गावरान आंब्यासारखाच एक नैसर्गिक गोडवा जपलेला होता.


आज शहरात लखलखीत पेट्यांमधून आंबे घरपोच मिळतात; पण त्या गावरान मातीची ओढ आणि माळ्यावरच्या गवताचा सुगंध कुठेतरी हरवून गेला आहे. तरीही स्मृतींच्या माळ्यावर त्या आठवणींच्या गंजी अजूनही तशाच रचलेल्या आहेत.


ते सोनेरी  दिवस दूर गेले असले, तरी आमराईतला तो वारा, तो पाऊस आणि तो मधाळ गंध आजही मनाला उभारी देतो. जोपर्यंत या आठवणींचा गावरान सुगंध दरवळत राहील, तोपर्यंत ते निरागस बालपण काळजात कायम जिवंत राहील.


- मंगेश मुरलीधर दौंडकर

9890619354

साप्ताहिक चपराक १८ ते २४ मे २०२६


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page