'व्हिएतनाम सफर' : भाग-एक
- Aug 4
- 4 min read
सालाबादप्रमाणे बिल्डर्स असोसिएशनच्या यावर्षीच्या ट्रीपच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सुरुवात 'फॅमिली ट्रिप करूया' पासून झाली. फॅमिली ट्रिप म्हटलं की मीटर गुणिले दोन किंवा मुलंबाळं न्यायची असतील, तर तीनने चारने आकडा वाढत जाणार. त्यामुळे हा मुद्दा लवकरच निकाली निघाला. पुढे परत बजेटचा मुद्दा आला. सर्वांना परवडेल असे ठिकाण पाहूयात, त्यामुळे अडीच-तीन लाखाच्या वर जाणारे युरोप मागे पडले (युरोपच्या अगोदरच चार ट्रिप झाल्यात). व्हिएतनाम फायनल होत होते; पण येऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच जणांचे व्हिएतनाम अगोदर पाहून झालेय (मीही दुसऱ्या एखाद्या ग्रुपबरोबर विथ फॅमिली नियोजन करण्याच्या प्रयत्नात होतो).

टर्की किंवा जॉर्जिया-अझरबैजान असे अजून दोन ऑप्शन्स होते; पण जॉर्जियात एंट्री देताना भारतीय पर्यटकांना विनाकारण अडकवून ठेवल्याच्या, किंवा एकाच ग्रुपमधील काही जणांना एंट्री न देता परत पाठवल्याच्या काही घटना गेल्या वर्षभरात घडल्याचे ऐकल्यावर 'उगाच रिस्क नको' या मतावर बरेच जण आले. त्यातही टर्की आणि अझरबैजान यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी पाकिस्तानला मदत केल्याने अनेक भारतीय पर्यटकांनी या देशांना जाणे बंद केले आहे. आम्हीही या मुद्द्यावरच टर्की-अझरबैजानवर फुली मारली आणि 'येतील ते येतील' या तत्त्वावर व्हिएतनाम फायनल झाला. अक्षरशः पंधरा दिवसांत ट्रिपचे नियोजन झाले. अगोदर बारा विमान तिकिटे काढली, नंतर अजून दोन, अजून एक, अजून एक करत करत सतरा जण झाले. उशिरामुळे काहींना एक्स्ट्रा चार्जेस भरावे लागले. दोन-तीन जणांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. मग अर्जंट अपॉइंटमेंट घेऊन, अतितातडीने चक्रे फिरवून जुगाड झाले. ट्रीपच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो व्हिसाचा. युरोपवाल्यांना पंधरा-वीस दिवस वाट पाहावी लागते; अमेरिकेसाठी तर लोक देव पाण्यात बुडवून वाट पाहत बसतात. पण हा व्हिएतनाम तसा भारताचा पर्यटनातला चांगला मित्र आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांत व्हिसा हमखास येतोच; तोही कोणतीही अपॉइंटमेंट न घेता. पासपोर्ट आणि पॅनकार्ड सोडून दुसरी कुठलीही कागदपत्रे न जोडता फक्त ऑनलाइन अर्ज करून व्हिसाचा प्रश्न मार्गी लागतो. तरीपण उशिरा ॲप्लिकेशन केल्यामुळे आमच्यातील एकाचा व्हिसा ट्रीपच्या आदल्या दिवशी आला आणि दुसऱ्याचा तर मुंबईच्या वाटेवर असताना लोणावळ्याजवळ आला; आणि बिचाऱ्याचा जीव भांड्यात (की विमानात) पडला.
आमचे पॅकेज अगोदर सेव्हन नाईट्स एट डेज असे होते; पण मला फुकॉक आयलँड्सचा शोध लागला होता. आणि ते झालेच पाहिजे या आग्रहाखातर अजून दोन नाईट्स आणि पंचवीस हजार वाढले. व्हिएतनामला आतापर्यंत बरेच जण जाऊन आले असतील; पण या फुकॉक आयलँड्सला फार कमी जण गेले असतील. हे आयलँड्स पर्यटनासाठीच डेव्हलप केलेत आणि ते जरा महागडे असल्याने बरेचसे स्टँडर्ड टूरवाले बजेटचा विचार करून हे सजेस्ट करत नाहीत; कारण यामुळे २५-३० हजार वाढले की लोकांना पॅकेज महाग वाटते. आमचे पॅकेज एक लाख पासष्ठ हजार झाले होते. ते ऐकून अनेक जण 'ह्या, असं असतंय व्हय! आम्ही लेका एक दहात जाऊन आलोय' असे म्हणत होते. पण आम्हाला माहीत होते की किंमत का वाढतेय. कंपल्सरी फाईव्ह स्टार हॉटेल्स, लक्झरी ट्रॅव्हल्स, डोमेस्टिक एअरलाईन ट्रान्सफर आणि सातारा ते सातारा असं म्हटल्यावर पॅकेज वाढणारच. ग्लोबल हॉलिडेजच्या अल्ताफ पठाण यांनी नेहमीप्रमाणे आमची टूर आमच्या सोयीनुसार अरेंज करून दिली. तेही सोबत असलेच पाहिजे हीही आमची अट असते.
मुंबई एअरपोर्टला वेळेत पोहोचणे हा एक काळजीचा मुद्दा होऊ लागलाय. आमची फ्लाईट रात्री अकराची असल्याने आठपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. गेल्या महिन्यातला अनुभव पाहता 'रिस्क नको' म्हणत आम्ही सकाळी साडेदहालाच सातारा सोडले. जेवायला पार पनवेल गाठले. इथे एक 'मावशीची खानावळ' आहे. त्यासाठी हायवे सोडून पनवेल गावात उतरावे लागते; पण अतिशय सुंदर असे पापलेट-सुरमई माशांचे जेवण इथे मिळाले. आवर्जून वाकडी वाट करून इथे जेवायला जावे अशी ही खानावळ आहे. पुढच्या प्रवासात नंतर बरेच ट्रॅफिक लागले आणि सकाळी निघालेलो आम्ही मुंबई एअरपोर्टला आठ वाजता पोहोचलो. दुपारी जेवण करून निघायच्या प्लॅनने नक्कीच घोळ केला असता. हा ट्रॅफिक जॅमचा मुद्दा लवकरच निकाली निघेल असे वाटतेय. लोणावळा घाट स्किप करणाऱ्या 'अंडरग्राउंड मिसिंग लिंक'चे काम अंतिम टप्प्यात आहे; आणि नवी मुंबईच्या नवीन एअरपोर्टवरून इंटरनॅशनल फ्लाईट्स रेग्युलर येऊ-जाऊ लागल्या की आपल्याला ते सोयीचे होईल. सुदैवाने मुंबई एअरपोर्टला गर्दी जरा कमी होती, त्यामुळे सिक्युरिटी चेक-बॅगेज ड्रॉप-इमिग्रेशन चेक लवकर पार पडले. मुंबई एअरपोर्टला गेल्यावर नक्कीच आपल्या भारताचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही, इतके ते सुंदर आहे. रात्री अकराला 'व्हिएतनाम एअरलाइन्सच्या' विमानाने टेक ऑफ घेतला आणि थोड्या वेळातच एकसुरी विमानप्रवास सुरू झाला. विमानात बऱ्याच सीट रिकाम्या होत्या; काही जण तर सरळ तीन सीटवर आडवे झाले होते.

सकाळी साडेसहाला आम्ही 'हो ची मिन्ह सिटी'च्या TAN SON NHAT एअरपोर्टला उतरलो. हो-ची-मिन्ह सिटीमधील हा 'सिटी' शब्द आपल्याकडच्या 'नगर' या अर्थाने वापरला जातो; कारण 'हो ची मिन्ह' हे व्हिएतनाममधील एका प्रसिद्ध व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या नावावरून या शहराचे 'सायगाव' हे जुने नाव बदलून 'हो ची मिन्ह सिटी' असे नामकरण करण्यात आले. आपल्याकडे जसे आंबेडकर नगर, कल्याणी नगर, विकास नगर असते, तसे हे 'हो ची मिन्ह नगर'. हो-ची-मिन्ह (कालखंड: १८९०-१९६९) हे व्हिएतनाममधील एक आद्य क्रांतिकारक, कम्युनिस्ट नेते आणि स्वतंत्र व्हिएतनामचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी तीस वर्षे फ्रान्स आणि अमेरिकासारख्या बलाढ्य देशांशी आपल्या तुटपुंज्या शिपायांच्या जोरावर निर्णायक लढा दिला. यासाठी त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'गनिमी कावा' म्हणजेच त्यांच्या भाषेत 'गुरिल्ला वॉर' या युद्धनीतीचा वापर केला. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्हिएतनामी लोकांना विशेष आदर आहे. जेव्हा समोरचा शत्रू ताकदवर असेल आणि आपण कमजोर असू, तेव्हा सरळ न भिडता छुपे हल्ले करून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे आणि त्याला जेरीस आणणे, अशा महाराजांच्या रणनीतीचा या हो ची मिन्ह साहेबांनी चांगला अभ्यास केला होता असे म्हणतात. याला तसा काही लेखी पुरावा मात्र मला सापडला नाही; त्यामुळे ही माहिती चुकीचीही असू शकेल. विशेष म्हणजे हे हो ची मिन्ह गांधीजींचा अहिंसा मार्गही मानत होते; पण त्याच वेळी 'स्वातंत्र्य हवे असेल तर शस्त्र हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही' असा लेनिनच्या विचारांचा क्रांतिकारी मार्गही वापरत होते. पंडित नेहरूंची आणि हो ची मिन्ह यांचीही चांगली मैत्री होती. व्हिएतनामच्या स्वातंत्र्यानंतर तिथे भेट देणारे पहिले परदेशी पंतप्रधान म्हणून नेहरूंची नोंद आहे.
सकाळी साडेसहाला आम्ही पोहोचलो होतो. जनरली हॉटेल रूम दुपारी दोनला ताब्यात मिळतात; पण एक्स्ट्रा चार्जेस भरून 'अर्ली चेक-इन'ची व्यवस्था केलेली असल्याने आम्हाला रूम लगेच मिळाल्या. थोडासा आराम आणि नाश्ता उरकून साडेदहाला लॉबीत यायचे हे ठरवून आम्ही 'MUONG THANH LUXURY HOTEL'च्या आरामदायक खोल्यांमध्ये गडप झालो. (पुढचा प्रवास पुढच्या भागात)
-अनिल दातीर
9420487410
.jpg)



Comments