top of page

व्हिएतनामध्ये झालो लखपती!

  • Aug 4
  • 4 min read

व्हिएतनाम सफर : भाग-दोन


थोड्याशा विश्रांतीनंतर नाश्ता करून आम्ही हो ची मिन्ह सिटी बघायला बाहेर पडलो. गाईड ‌‘ग्रीन‌’ आम्हाला मोडक्या तोडक्या इंग्रजीत माहिती देत होता. व्हिएतनाममध्ये खूप कमी लोक इंग्लिश बोलतात. त्यांची भाषा आपल्याला मुळीच कळत नाही. आपल्या प्रश्नावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा उत्तर ऐकून आपण अजूनच घोटाळ्यात पडतो. गुगल ट्रान्सलेटर हा सर्वोत्तम पर्याय. मोबाईलमधील गुगल ट्रान्स्लेटरचा माईक ओपन करून आपण आपल्या भाषेत बोलायचे. ट्रान्सलेटर व्हिएतनामीमधून किंवा आपल्याला हव्या त्या भाषेतून टाईप करून देतो. ते समोरच्याला दाखवले की त्याची ट्यूब लगेच पेटते.



व्हिएतनामी भाषेची मुळाक्षरे इंग्लिशसारखी वाटत असली तरी त्यांचा अर्थ इंग्लिशसारखाच असेल असे नाही. त्यामुळे व्हिएतनामीमध्ये लिहिलेल्या कोणत्याही शब्दाचा किंवा वाक्याचा आपण काढलेला अर्थ त्याच्या जवळपासही नसतो. ट्रान्सलेटर हाच उत्तम पर्याय. हो ची मिन्ह सिटी तशी बऱ्यापैकी टुमदार आहे. तीन-चार मजलीच इमारती. काही भागात हायरायझर बिल्डिंग आहेत पण प्रमाण कमी. रस्ते ऐसपैस, फुटपाथ वेगळा (आणि पूर्ण मोकळा) सायकलिंगसाठी वेगळे ट्रॅक. स्वातंत्र्यापूर्वी नॉर्थ आणि साऊथ व्हिएतनाम असे दोन भाग होते. नॉर्थ चायनाच्या ताब्यात आणि साऊथ फ्रेंच आणि अमेरिकेच्या ताब्यात होता. त्यावेळी हे हो ची मिन्ह मूळचे सायगाव होते आणि ती या साऊथ व्हिएतनामची राजधानी होती. 1975 ला व्हिएतनाम स्वतंत्र झाला, एकसंध झाला आणि उत्तरेकडील हनोई हे शहर राजधानी झाले. रस्त्यात अनेक ठिकाणी पिवळ्या रंगाला पांढरी किनार असलेली घरे दिसत होती. त्या पूर्वी फ्रेंच कॉलनीज होत्या.


आम्ही शहराच्या मुख्य भागात पोहोचलो. इथे सेंट नॉत्र डॅम कॅथॉलिक चर्च आहे. त्याचे आता रेस्टोरेशन चालू आहे. त्यामुळे आत जाता आले नाही. या चर्चच्या समोरच्या बागेत एक व्हर्जिन मेरीचा उंच पुतळा आहे. 2005 साली या पुतळ्याच्या डोळ्यातून आठवडाभर अश्रू येत होते असं म्हणतात. चर्चच्या बिशपनी ऑफिशिअली याला एक मिरॅकल म्हटले होते. व्हिएतनामची सर्व जनता या काळात इथे येऊन गेली. हा गाईडने सांगितलेला इतिहास झाला पण पूर्वीच्या काळी हे चर्च आपला दरारा टिकवण्यासाठी आणि लोकांच्या मनावर येशूच्या अस्तित्त्वाबद्दल श्रद्धा टिकून राहावी म्हणून अशा चमत्काराच्या बातम्या पसरवायची. काही ठिकाणी तर मेकॅनिकल करामती करून असे चमत्कार केले जायचे, असे लिओनार्दो दा विंची या शास्त्रज्ञाने लिहून ठेवले आहे. ओघाने नाव आले म्हणून सांगतो हे लिओनार्डो दा विंची बहुतांशी जणांना मोनालिसा या चित्राचे चित्रकार म्हणून माहिती आहेत पण प्रत्यक्षात ते शास्त्रज्ञ, सिविल इंजिनीअर, मेकॅनिकल इंजिनीअर, डॉक्टर, फिलॉसॉफर, स्कल्पचर आर्टिस्ट असे बरेच काही होते. अत्यंत हुशार माणूस चुकून त्या काळी जन्माला आला, म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला म्हणावा असा वाव मिळाला नाही. असो! आपल्याला काय या चमत्कारांचा उहापोह करत बसायचा नाही. या बागेसमोरच एक तीन मजली फ्रेंच वास्तुशास्त्रात केलेली पिवळ्या रंगाची इमारत आहे. हे आहे इथले पोस्ट ऑफिस. पूर्वीच्या काळी इथून फार मोठा पत्रव्यवहार चालायचा. आताही ते पोस्ट ऑफिस चालू आहे पण पर्यटक आतून फिरून येऊ शकतात. आलेले पर्यटक तिथून जगाच्या कोणत्याही ठिकाणी पत्रं पाठवू शकतात. अनेक जण अशी पत्रे लिहित होते. चेअरमन संतोषकुमार यांनीही घरच्या पत्त्यावर एक पत्र लिहून टाकले आहे. बघू ते कधी येतंय.


हे पोस्ट ऑफिस आणि व्हर्जिन मेरीचा पुतळा बघून आम्ही पुढे स्ट्रीट मार्केटमध्ये गेलो. सगळीकडे पिवळ्या फुलांची आरास केलेली होती. चमेलीसारखी फुले प्लास्टिक टबमध्ये वाढवून त्यांची सजावट केली जाते. पिवळ्या झेंडुचीही फुले काही ठिकाणी दिसली. नंतरच्या सर्व प्रवासात अशा फुलांची खूप दुकाने, आरास/ सजावट सगळीकडे दिसली. त्याचे कारण म्हणजे 17 फेब्रुवारीला त्यांचे नवीन वर्ष सुरु होते. आपला जसा गुढीपाडवा तसे हे लुनार वर्ष म्हणजे चंद्राचा पहिला दिवस असे समजतात. हा वर्षातला मोठा सण असतो. सर्व ऑफिसला आठवडाभराची सुट्टी असते. लुनार हा सण चायना, व्हिएतनाम, सिंगापुर, साऊथ कोरिया आणि मलेशिया असे पाच देश साजरा करतात. या मार्केटमध्ये अनेक वस्तू विक्रीला होत्या पण कोणाकडेच स्थानिक पैसे नव्हते. मग आम्ही एका मनी एक्सचेंजमध्ये जाऊन पैसे बदलून घेतले आणि आम्ही एकदम लखपती/ करोडपती झालो. आपला एक रुपया म्हणजे 285 व्हिएतनामी डोंग. मला 200 अमेरिकन डॉलरचे 51,80,000/- डोंग मिळाले. सोप्या भाषेत सांगायचे तर आपले 350 रुपये म्हणजे त्यांचे एक लाख डोंग.


यानंतर आम्ही कु-ची टनेल या ऐतेहासिक ठिकाणाला भेट द्यायला निघालो. ते शहरापासून दोन-अडीच तासाच्या अंतरावर होते. आमची जेवणाची व्यवस्था त्याच परिसरातल्या एका इंडियन रेसोरेन्टमध्ये केली होती. जेवण करून आम्ही या कु ची टनेल परिसरात आलो. मागे उल्लेख केल्याप्रमाण्ो गुरिल्ला युद्ध (गनिमी कावा) जिथे लढले गेले तो हा भाग. जमिनीखाली या व्हिएतनामी क्रांतिकारकांनी अनेक बोगदे खणून ठेवले आहेत. काही ठिकाणी तर दोन-तीन मजले जमिनीखाली हे बोगदे आहेत. शिवाय या बोगद्यांना हवा येण्यासाठीही छुपे झरोके केलेले असायचे. या सर्व जमिनीखालील बोगद्यांची एकूण लांबी अडीचशे किलोमीटर आहे. अनेक ठिकाणी छुपे सापळे आहेत, छुपे शस्त्र निर्मितीचे कारखाने आहेत. एके ठिकाणी झाडाच्या पालापाचोळ्याखाली लपलेला फक्त एक फूट बाय एक फूट असा चौकोन आहे. ते लाकडी झाकण उचलून डोक्यावर धरून आत अंधाऱ्या बोगद्यात उतरायचे हा एक तसा थरारक अनुभव होता. माझ्यासह अनेक जणांनी हा प्रयोग अनुभवला. झाकण ठेवल्यावर तो चौकोन इतका बेमालूम गायब होतो की ज्याला माहिती आहे तोच शोधू शकतो. व्हिएतनामी लोक काटक आणि चपळ होते. ते हल्ला करून या बोगद्यांमधून आरामात पसार व्हायचे. अमेरिकी सैनिकांना ते सापडायचे नाहीत आणि असा एखादा खड्डा सापडला तरी जाडीमुळे त्यांना आत उतरता येत नसे. पंचवीस वर्ष चाललेल्या अमेरिकन-व्हिएतनाम युद्धात हजारो लाखो बॉम्ब वापरले गेले. इथेच असलेल्या वॉर मेमोरियलमध्ये त्याकाळचे रिकामे बॉम्ब, शस्त्रे आणि इतर युद्धसाहित्त्य जतन करून ठेवले आहे. इथे एक चालू स्थितीतील शूटिंग रेंज होती. जिथे पैसे भरून रायफलीतून खऱ्या गोळ्या मारण्याचा अनुभव घेता येत होता. काहींनी तोही घेतला.


जंगलात अनेक छुपे रस्ते होते, चालून चालून सर्वच थकले होते. संध्याकाळ होत होती. आम्ही सर्वांनी काढता पाय घेत बस गाठली आणि शहरात आलो. जरा फ्रेश होऊन जेवणासाठी बाहेर पडलो. आपले भारतीय रेस्टॉरंट जगभरात प्रत्त्येक शहरात आहेत. फक्त ते शोधावे लागतात. जेवण करून आम्ही सर्वांनी तिथल्या फॅशन स्ट्रीटवरून एक चक्कर मारली. लुनार फेस्टिवल असल्याने सगळीकडे धुमधाम होती. लायटिंग होते, लाऊड म्युझिक होते, आकर्षक दुकाने, रेस्टॉरट्स होती, बिअर बार होते आणि तुंबळ गर्दीही होती. काही स्थानिक लोक त्यांच्या पारंपरिक पोशाखात फिरत होते. हॅपनिंग प्लेस होती. तास-दीड तिथे वेळ घालवून आम्ही परत हॉटेलवर आलो. उद्या दुसऱ्या शहरात जायचे होते. सकाळी लवकर उठून, बॅगा पॅक करून, नाश्ता करून 10.30 पर्यंत एअरपोर्ट गाठायचे होते. मग आता इथेच थांबतो, पुढच्या भागात भेटूच एअरपोर्टवर!


अनिल दातीर

94204 87410


परदेशातल्या पाऊलखुणा | Pardeshatlya Paulkhuna
₹350.00₹262.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page