top of page

खाली दुकान, वर मकान!

Aug 12
3 min read

व्हिएतनाम सफर : भाग-तीन


हॉटेल सोडून आम्ही एअरपोर्ट वेळेत गाठलं पण सेक्युरिटी चेक झाल्यावर फु-कॉकला जाणारी फ्लाईट लेट आहे असं कळलं. एअरपोर्टवर स्थानिकांची गर्दी होती. लुनार फेस्टिवलच्या सुट्ट्या असल्याने बरीचशी मंडळी फॅमिलीसह आपापल्या गावी किंवा पर्यटनस्थळी निघाली होती. बहुतांशी लोकांकडे लहान मुलं होती, ती फारच गोंडस दिसत होती. कदाचित वय वाढतं तसा चेहरा बदलतो पण नाक मात्र लहानच राहत असावं! पण ही लहान मुलं मात्र नाकी-डोळी नीटस दिसत होती. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त वयाची मुलं-मुली क्वचितच दिसली. कदाचित या वयात आईवडिलांबरोबर फिरायला जाण्याची प्रथा नसावी तिथे.



एअरपोर्टवर भरपूर गर्दी असल्याने अनेक जण निवांत खाली मांड्या घालून बसले होते. आमच्या शेजारी एक पोलंडचा व्यक्ती बाकड्यावर अडवातिडवा झोपला होता. फुल्ल टाइट होता. राजेशने त्याला जागे करायचा प्रयत्न करत मदत केली. त्याचे अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून त्याला दिले. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की आपल्या विमानाचा बोर्डिंग गेट बदलला आहे. सगळे जण घाई गडबडीत उठले. राजेशने जबाबदारी म्हणून त्या गोऱ्यालाही हात धरून उठवले. मीही उठलो आणि चेअरवर ठेवलेला मोबाईल तिथेच विसरलो. नशीब निलेशचे लक्ष पाठीमागे गेले आणि त्याला मोबाईल दिसला. मैत्रीला जागत त्याने तो लगेच लपवून ठेवला. थोडे पुढे जाताच गेट बदलले नसल्याचे कळले आणि आम्ही परत फिरलो. मला अचानक मोबाईल आठवला आणि तो सापडेना. चर्चेच्या काही फेऱ्यानंतर बियर पाजायच्या बदल्यात मोबाईल परत मिळाला. (जस्ट फॉर फन) तो फॉरेनर आता चांगला शुद्धीत आला होता आणि गप्पा मारू लागला होता. नंतर परत त्याने पेग मारलाच. मग मात्र त्याला सर्वांनी दूर ठेवलं.


12.50 च्या फ्लाईटचं बोर्डिंग दोनला सुरु झालं पण प्रत्यक्षात टेकऑफ झाला तेव्हा 3 वाजले होते. फ्लाईट एक तासाची होती. आमचे दुपारचे जेवण फु-कॉक आयलँड्सलाच होणार होते. एअरपोर्टवर उतरलो तेव्हा आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात एअरपोर्टचे विस्तारीकरण चालू आहे. मुळात हे फु-कॉक आयलँड्स टुरिझमसाठीच डेव्हलप केलेले आहेत. याठिकाणी 2027 साली एक आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होणार आहे, त्यासाठी आणि नंतर पर्यटनासाठी या विमानतळाचा विस्तार केला जातोय. आम्ही हॉटेल इंडिया गेटला जेवणासाठी पोहोचलो. यांच्या व्हिएतनाममध्ये आठ ब्रँचेस आहेत. नंतरही जे इंडियन हॉटेल्स भेटले त्यांच्या सुद्धा अनेक ब्रँचेस होत्या. जेवण करून आम्ही हॉटेलकडे निघालो. ते बरेच दूर होते. पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. या VIN FIESTA HOLIDAY   ला आत जाताच त्याच्या भव्य लॉबीने एकदम खूश झालो. हॉटेल खूपच भव्य होते. साडेतीनशे रूम्स असलेल्या या हॉटेलमध्ये आम्हाला आठच रूम मिळाल्या होत्या. दोघांना दुसऱ्या हॉटेलमध्ये राहावे लागले. सर्व हॉटेल फुल्ल होते. आम्ही रूम ताब्यात घेऊन, आवरून बाहेर पडलो. बसने आम्हाला जवळच्याच एका स्पॉटवर सोडले. ते होते ग्रँड वर्ल्ड. फक्त बांबूचा वापर करून शंभर फूट उंच असं अवाढव्य स्ट्रक्चर उभे केलेले होते. त्याचा आतला डोम प्रचंड मोठा होता आणि या इमारतीचा वापर फक्त टुरिस्ट ऍट्रॅक्शन एवढाच होता. बाहेरच्या गार्डनमध्येही अनेक स्टॅच्यू उभे केलेले होते. हे सर्व बीचला लागून होते.


रस्ता ओलांडला की पुढे समुद्र होता. नंतर आम्ही बसने अजून थोडे अंतर गेलो आणि एका मोठ्या चौकात पोहोचलो. इथेच आमचे अजून एक इंडियन रेस्टॉरेंट होते. समोर मोठा ऐसपैस रस्ता, त्याच्या पलीकडे मोठा तलाव. त्यात म्युझिकल लायटिंग. सर्व रस्त्यांना वेगवेगळी सजलेली दुकाने. रस्त्यावरून घोडागाडी किंवा इलेक्ट्रिक टमटम, लहान मुलांसाठी रोबोट कार असे विविध प्रकार उपलब्ध होते. हॉटेलवाल्यांनी बाहेर टेबल टाकलेले होते आणि डीजे लावलेला होता. आमची ग्रुप व्यवस्था आतल्या हॉलमध्ये केलेली होती पण तो माहोल बघून आम्ही सर्व जण वेटरची  किरकिर न जुमानता बाहेर ओपन लॉनमध्ये बसलो. जब मिल बैठेंगे चार यार, तो एंटरटेनमेंट अपरंपार! मस्त माहोल तयार झाला होता. बरेचसे ग्राहक इंडियन होते, काही फॉरेनरही होते. डीजेवाल्याने आमच्यासाठी हिंदी-पंजाबी गाणी लावली होती. थोड्या वेळाने त्या डीजेवाल्याचा आम्हीच ताबा घेतला आणि आम्हाला हवी तशी गाणी वाजू लागली. आम्ही सर्वांनीच त्या ठेक्यावर ताल धरत नृत्याविष्कार (?) सुरु केले. रस्त्याने जाणारी येणारीही आमचे फोटो काढत होती. एक फॉरेनर तर आमच्यातच घुसला अन्‌‍ मुक्त नाचू लागला. त्याची बायको कौतुकाने त्याचे आणि आमचे फोटो काढत होती. काही वेळाने काही इंडियन सुद्धा आमच्यासोबत नाचू लागले. अनेक लावण्या, मराठी गाणी आणि प्रथेप्रमाण्ो शेवट झिंगाटनेच झाला.


काही वेळाने समोरच्या तलावात कारंजे उडू लागले. त्यावर लाईट आणि म्युझिकचा एक दहा मिनिटाचा शो झाला. फु-कॉक आयलँड 24 तास चालू असते असे म्हणतात. जेवण करून आम्ही रोडवर आलो आणि एकाने इलेक्ट्रिक टमटम थांबवली. तिच्यात दहा जण आणि अजून दुसरीत आठ जण बसलो. नुसताच एक चक्कर मारून आण असे त्याला सांगितले पण त्याला काय वाटले कोणास ठाऊक! त्याने आम्हाला खूप दूरपर्यंत नेले. रस्त्याने त्या गाड्यांमधून जाताना आमचा आरडाओरडा चालू होता. शाळकरी मुलं असल्यासारखी सर्व जण एकमेकाला चिडवत एन्जॉय करत होते. ऐसपैस रस्ता. दोन्ही बाजूला तीन मजली एकसारख्या डिझानच्या इमारती. अल्टरनेट कलर फक्त वेगळा. खाली दुकान आणि वर राहण्याची सोय! पण सगळे बंद. त्या इमारतींमधून कोणी राहत असल्याची काहीही चिन्ह दिसत नव्हती. एकाही खोलीत लाईट लागल्याचे दिसत नव्हते. त्यावेळी आश्चर्य वाटले पण नंतरही अनेक ठिकाणी अशा भरपूर इमारती दिसल्या. हे होते फ्युचर प्लॅनिंग. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आत्ताच उभारून ठेवले आहे. बाहेरच्या लोकांनी इथे यायचं, खाली दुकान, वर मकान विकत घ्यायचं आणि टुरिस्टच्या जीवावर आरामात जगायचं. या टमटममधून चांगली अर्ध्या-पाऊण तासाची सफर करून आम्ही सर्व जण आपापल्या हॉटेलवर परतलो. उद्या फु-कॉक आयलँडच्या सन वर्ल्डला जायचे आहे. तो प्रवास पुढील भागात.


अनिल दातीर, सातारा

+91 94204 87410


परदेशातल्या पाऊलखुणा | Pardeshatlya Paulkhuna
₹350.00₹262.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page