सिनेमा शिकवताना...
ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढते असं लहानपणी वडीलधारी सांगत. त्यावेळी नाही पण प्रत्यक्ष शिकवायला लागल्यावर मला या सुभाषिताचा अर्थ समजला. मी वर्गात शिकवत असताना विद्यार्थी प्रश्न विचारत आणि त्यांच्या उत्तरांनी माझी उजळणी होत असे! पण त्यांच्या प्रश्नावर माझाकडं उत्तर नसेल तर ते शोधल्यावर आपोआपच माझ्या ज्ञानात भर पडत असे. हेच धोरण समोर ठेवून मी चित्रपट शिकवत राहिलो.

एफटीआयआय आणि देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवांतून वीस-पंचवीस वर्षे जागतिक अभिजात चित्रपट पाहून पाहून तो जसा कळायला लागला तसा चित्रपट खूप प्रेमानं निरखला आणि तितक्याच उत्कटपण्ो शिकवला... आणि ते करताना एक गोष्ट निश्चितपण्ो केली, ती म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रपटसंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न केले; कारण चांगला प्रेक्षक तयार झाला तरच दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षक मिळतील या विचारसरणीवर माझी खूप निष्ठा आहे.
चित्रपट पत्रकारिता, चित्रपट समीक्षा, चित्रपट संशोधन अशा प्रकारे चित्रपट केंद्रस्थानी ठेवून या अद्वितीय माध्यमाशी जोडलो गेलो होतो म्हणून “तू आता चित्रपट शिकवायला पाहिजेस” असं मित्र आणि हितचिंतक सल्ला देत पण मला नेहमी वाटायचं की आपण त्यासाठी अजून तयार नाही आहोत कारण आपण अजून शिकतो आहोत. थोड्या कालावधीनंतर ऋतू नावाच्या माझ्या मैत्रिणीनं “ते काही सांगू नकोस, माझ्या नवऱ्याचं मीडिया स्कूल आहे, तिथुन चित्रपट शिकवायला सुरुवात कर,” म्हणून हट्ट धरला. “ही सुवर्णसंधी घे” म्हणून मन मागं लागलं आणि शेवटी दिल की बात मान कर मी शिकण्यापासून एक पाऊल पुढं टाकत शिकवण्याचा श्रीगण्ोशा केला. ते वर्ष होतं 2004. मीडिया स्कूलमधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तसेच तेथे येणाऱ्या शिक्षकांनी माझं सत्र पाहून इतरत्र केलेल्या शिफारशी यातून एक सिलसिला सुरु झाला आणि मग एक नवं आकाश खुलं झालं असं जाणवलं. त्यानंतर मी कधी मागं वळुन पाहिलं नाही. अशा रीतिनं पत्रकार जोशीचा जोशी सर झाला.
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स अर्थात बिट्स (पिलानी), राजस्थान. भारतातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था. इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणं हा एक बहुमान होता आणि तो मला मिळाला. येथील मानव्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी लघुपटासाठी पटकथालेखन अशी तीन दिवसांची कार्यशाळा घेण्याची संधी मला मिळाली. ही कार्यशाळा घेताना विद्यार्थी ज्या प्रकारचे प्रश्न विचारात होते तसेच सांगितलेला गृहपाठ इतक्या कौशल्यपूर्वक करत होते, त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक बराच वरचा आहे.
बुंदेलखंड विद्यापीठाने (झाशी) मला मासकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रपट विषयासाठी प्रश्नपत्रिका बनवण्यास सांगितलं. मी ती केली आणि पाठवून दिली पण गाडी तिथेच थांबली नाही. नंतर उत्तरपत्रिका तपासण्याचीही विनंती झाली पण तेवढ्यासाठी झाशीला जाणं-येणं आर्थिक गणितात बसत नव्हतं. मग त्याबरोबर तीन-दिवसीय चित्रपट रसास्वाद शिबिर आयोजित करण्याचा तोडगा विद्यापीठानं काढला. मला तो मान्य झाला. दिवसभर शिबिरात शिकवणं आणि संध्याकाळी, रात्री उशिरापर्यंत उत्तरपत्रिका तपासणं असा कार्यक्रम झाला. या मुक्कामात झाशीच्या राणीचा किल्ला पाहुन त्या मर्दानीला अभिवादन केल्याशिवाय चैन पडले नाही.
इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशनमध्ये मी अनेक वर्षे चित्रपट शिकवला. एकदा वर्गामध्ये चित्रपटगीतांतील कोरिओग्राफीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी एक लोकप्रिय गीत दाखवू लागलो. गाणं सुरु होताच सर्व विद्यार्थ्यांनी एकसुरात ते गाणं म्हणत ठेका धरला. अरेच्चा! मी संभ्रमित झालो, गाणं थांबवलं आणि ठणकावून सांगितलं की आपण चित्रपट पाहतो आहोत पण तो थिएटरमध्ये नाही तर वर्गात अभ्यासत आहोत. तेव्हा कुठं विद्यार्थी ताळ्यावर आले.
करोना काळात लॉकडाउन सुरू झाले त्यावेळी मी ‘इंदिरा’मध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन बॅचेसना शिकवत होतो. माझं सत्र संपलं आणि जाताना मला सांगण्यात आलं की पुढील दिवसापासून वरिष्ठ विद्यार्थ्यांची सत्रे करोनामुळं बंद करण्यात आली आहेत. मी घरी पोचेपर्यंत त्यांचा संदेश आला की कनिष्ठ वर्गाचीही सत्रे बंद केली आहेत आणि मग काही दिवसात सुरु झाला ऑनलाईन सत्रांचा जमाना. गुगल मीट किंवा त्या त्या संस्थांनी विकसित केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मला ही सत्रे घ्यावी लागत. याची तयारी वर्गातील सत्रांप्रमाण्ोच करावी लागत असली तरी विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकविण्याची मजा त्यात नव्हती. एकेक विद्यार्थी ऑनलाईन वर्गात हजर होत आणि मग त्यांच्याकडील आवाज बंद करून बसत. मी तासभर शिकवत असलो तरी ते ऐकत तरी होते की नाही याचा थांगपत्ता लागत नसे. लॅपटॉपसमोर बसून सत्र चालू असले तरी काही वेळा तर आपण भिंतीशी बोलतो आहोत की काय अशी शंका यायची. थोडक्यात, ऑनलाईन सत्रे घेण्याची पद्धत मला अजिबात रुचली नाही.
‘सकाळ लर्निंग सेंटर’मध्ये डिजिटल फिल्म्मेकिंगचा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करायचा ठरला. विद्यार्थीही मिळाले पण सुयोग्य शिक्षकांअभावी गाडी अडली आहे, असं माझा मित्र आणि तेथील समन्वयक श्रीराम शिंदे याने सांगितलं. मग माझा आणखीन एक मित्र प्रसाद मिरासदार याने माझ्यासहित या विषयातील तीन-चार अनुभवी शिक्षक तिथं पाचारण केले. अभ्यासक्रमाची सुरुवात माझ्यापासून होई. पहिल्या शनिवारी आणि रविवारी चित्रपट विषयाची ओळख, दृकश्राव्य माध्यमाच्या सृजनात्मक बाबी आणि इतर तांत्रिक गोष्टींचा दृश्य उदाहरणांसहीत परिचय करून दिला जाई आणि पुढील शनिवार/रविवार पटकथालेखन प्रत्यक्ष व्यवहारातील सरावासहीत शिकवला जात असे. कॉपीराइटची भानगड न ठेवलेली, माझी एक लघुकथा मी वर्गात सांगत असे आणि त्यावर दुसऱ्या दिवशी विद्यार्थी पटकथा लिहून आणत. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या लघुकथेवर काही विद्यार्थ्यांनी इतक्या छान पटकथा लिहिल्या की आपण त्यांना काही शिकवल्याचं समाधान मिळालं. या अभ्यासक्रमाच्या अखेरीस एकेक विद्यार्थीगट लघुपट बनवत आणि सकाळच्या सहयोगानं ते साम चॅनेलवर दाखवले जात.
आज संमिश्र शिक्षण शीर्षकानं ओळखला जाणारा प्रयोग मी कितीतरी आधी केला आहे. उदा. वेगवेगळ्या पात्रांची संवाद विशेषता समजण्यासाठी मी विविध भारतीवरील हवा महल नाटिकांचा अभ्यास करण्यासाठी सांगत असे किंवा एखाद्या पात्राची विचारांची आणि कृतींची झेप काय असू शकते हे समजण्यासाठी मारिओ पुझो यांची ‘द गॉडफादर’ कादंबरी वाचण्यास सांगत असे. मूळ लेखन इंग्रजीत असल्यानं, वेगवान वाचनासाठी सुप्रसिद्ध रूपांतरकार रवींद्र गुर्जर यांच्या अनुवादित मराठी पुस्तकाची शिफारस करत असे. मीही तेच केलं होतं आणि प्रत्येक बॅचला अगदी आवर्जून सांगत असे. गंमत म्हणजे एके दिवशी वर्गात चक्क रवींद्र गुर्जर एक विद्यार्थी म्हणून हजर झाले! “मला पटकथेचं तंत्र शिकायचंय,” ते म्हणाले आणि या विषय परिचयाचे दोन्ही दिवस अगदी मनापासून ऐकत राहिले. अशी प्रसिद्ध आणि माझ्यापेक्षा वयानं मोठी व्यक्ती माझा विद्यार्थी म्हणून पाहताना मी सद्गदित झालो.
विविध संस्थांमध्ये शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढं जाऊन अनेक लघुपट आणि पूर्ण लांबीचे चित्रपटही तयार केले. मला त्यांच्या या यशाचा खूप आनंद वाटत असे. इथं उलटी गंगाचं एक उदाहरण नमूद करू इच्छितो. आपण असं नेहमी पाहतो की अनेक विद्यार्थी शिक्षकांकडून प्रेरणा घेतात आणि आपली कारकीर्द घडवतात पण माझ्या बाबतीत उलटं झालं. अनेक लघु/चित्रपट करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांपासून स्फूर्ती घेऊन मी निवृत्तीनंतर पहिला लघुपट (द चेंज, 2020, संवादरहित) लिहिला आणि दिग्दर्शित केला. यानंतर मी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या भूक (मराठी, 2022) लघुपटाला देशभरातील चित्रपट महोत्सवांत एकूण 25 पारितोषिके मिळाली आणि आता पूर्णत्वास पोचलेला तम लघुपट. माझ्या चित्रपटनिर्मितीचा उल्लेख करण्याचं कारण एकच. तोपर्यंत रसास्वाद पातळीवर राहिलेल्या माझ्या ज्ञानात प्रत्यक्ष चित्रपटनिर्मितीच्या अनुभवाची भर पडून माझं शिकवणं अधिक समृद्द झालं आणि मग चित्रपट शिकवण्यात अधिक समृद्धता आली.
कुणाच्या तरी संदर्भाने हरिद्वार येथील देव संस्कृती विश्वविद्यालयातून फोनवरून विचारणा झाली की “आमच्या विद्यार्थ्यांना पटकथालेखन शिकवाल काय?”
“होय, पण तुमच्या विद्यार्थ्यांना चित्रपटाची समज आहे काय?” मी प्रतिप्रश्न केला.
प्रश्न साहजिक होता. एखादी व्यक्ती प्रतिभेच्या जोरावर कथा किंवा कादंबरी लिहू शकते परंतु पटकथा लिहायची असेल तर चित्रपट माहिती असावा लागतो. हे दृकश्राव्य माध्यम असल्याने लिहिले जाणारे दृश्य पडद्यावर कसे दिसेल ते पाहावे लागते. याशिवाय चित्रपटांसंदर्भात अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्यावर पटकथा लेखकाचे प्रावीण्य असण्ो आवश्यक आहे.
तर देव संस्कृती विश्वविद्यालयाचे विभागप्रमुख ‘नाही’ म्हणाले. मग मी त्यांना पटकथालेखन शिकण्याआधीचे माझे वरील स्पष्टीकरण समजावून सांगितले. ते त्यांना पटले आणि एकंदर सहा दिवसांची पूर्ण वेळ कार्यशाळा घेण्याचे ठरलं. त्याकरिता ते स्वतः डेहराडून विमानतळावर मला घेण्यासाठी आले. तिथून पुढे हरिद्वार तास-दीड तासांचा रस्ता आणि मग देव संस्कृती विश्वविद्यालयाचा तो निसर्गसंपन्न परिसर. असंख्य प्रकारच्या औषधी वनस्पती आणि इतर झाडं-फुलं. इथं सकाळ-संध्याकाळ रपेट मारून शक्य तितकं आरोग्यदायी राहण्याचा प्रयत्न केला. इथंही दररोज सहा तासांचं प्रशिक्षण. एकेक विषय समजावत त्याचं दृश्य उदाहरण देण्यासाठी एकेक डीव्हीडी लावत असे. या नावीन्यामुळं विद्यार्थी भारावलेले! एखादा जादूगार पोतडीतून काढून काही तरी नवीन जादू दाखवतो तसं तुम्ही एकेक डीव्हीडी काढली वाटतं, असं एकदा ते विभागप्रमुख म्हणाले. एक दोन दिवसात जरा भीड उतरली आणि अनेक विद्यार्थी रोज संध्याकाळी अतिथीगृहातील माझ्या रहिवासात येऊन बसत आणि चित्रपटांसंबंधी विविध विषयांवर प्रश्न विचारित, चर्चा करत.
एक गोष्ट नक्की असे की शिकवण्याच्या दिवशी विषयाची पूर्ण तयारी केल्याशिवाय मी वर्गात पाऊल टाकत नसे. माझे आदरणीय गुरू फिल्म इन्स्टिट्यूटमधील प्रा. सतीश बहादुर यांच्याकडून मी हा वसा घेतला आहे. लिहीलं की लक्षात राहतं या स्मरण प्रक्रियेचा मी नेहमीच सन्मान करत आलो आहे. अगदी काळ्या फळ्यावर खडूने लिहिण्ो असो की व्हाईट बोर्डवर मार्करचा उपयोग असो, आपल्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे मी तिथं लिहून मग त्यांचं विश्लेषण करत असे. नंतरच्या काळात वर्गात स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले तेव्हाही मी हेच तंत्र वापरले. एवढंच नव्हे तर माझे मुद्दे पिपिटीवर मांडू लागलो तरी विद्यार्थ्यांना ते लिहून घेण्यास उद्युक्त करत राहिलो.
सिंबायोसिसच्या लिबरल आर्टस विभागामध्ये ‘फिल्म स्टडीज’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. एका बॅचमध्ये तर शाळा (सुजय डहाके, 2011) चित्रपटातील षोडशवर्षीय नायक अंशुमन जोशीसुद्धा माझा विद्यार्थी राहिला आहे. इथं ओळीने दोन तासांचे एक सत्र. एका बॅचमधील दोन विद्यार्थिनींना एकदम दोन तास नको असत पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी त्यांना थोडा ब्रेक घेण्याची परवानगी देत असे. नंतर एके दिवशी वर्गात इतका वेळ मिळणार नाही म्हणून एका रविवारी द गॉडफादर (फ्रान्सिस फोर्ड कपोला, 1972) चे प्रदर्शन ठेवले. तीन तास कालावधीचा हा चित्रपट, मी अनेकदा पाहिला असला तरी प्रत्येक वेळी तितक्याच उत्कंठतेने पाहतो. वर्गात तासभर बूड न टिकणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींना द गॉडफादर पाहताना त्याच्या मोठ्या कालावधीचं भानही राहिलं नाही इतक्या त्या बेंचवर खिळून राहिल्या होत्या. ‘ब्रेक’ तर विसरूनच गेल्या. त्याआधी काही दिवस मी ‘बायसिकल थीव्हज’ (वित्तोरिओ डी सिका, 1948, इटली) दाखवायचं जाहीर केलं तेव्हा याच विद्यार्थिनींनी नाकं मुरडली होती. का? तर जुना आणि कृष्णधवल चित्रपट! पण चित्रपट पाहताना त्यामध्ये या मुली इतक्या गुंतल्या की ‘बायसिकल थीव्हज’ हा कृष्णधवल की रंगीत चित्रपट होता ते कळलच नाही असं कबुल केलं.
2010 या वर्षी पुण्याच्या नामांकित अशा डेक्कन कॉलेजमधील ‘अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ इंडियन स्टडीज’मध्ये एक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवायला मिळाला. इथं मराठी संस्कृती शिकण्यासाठी आलेल्या काही अमेरिकन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मराठी चित्रपटांचा परिचय करून द्यायचा होता, तोही मराठीत! उपलब्ध झालेल्या वेळेत समाविष्ट करता यावा म्हणून मी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरच्या म्हणजे 1960 नंतर निर्मिती झालेल्या मराठी चित्रपटांची निवड केली. अमेरिकन विद्यार्थ्यांना कळावं म्हणुन सावकाश मराठी बोलत मी माझं सत्र पूर्ण केलं. त्यादरम्यान सादर केलेली महत्त्वाच्या मराठी चित्रपटांतील दृश्ये आणि गाणी पाहून अमेरिकन विद्यार्थी खूश झाले. त्यांनी मराठी भाषेत प्रश्न विचारले तेव्हा मीही खूश झालो. नंतर पुढील वर्षीही असे सत्र आयोजित करण्यात आले होते.
सिंबायोसिस (विमान नगर)च्या विद्यार्थ्यांना भारतीय चित्रपटांचा टीकात्मक/चिकित्सक इतिहास शिकवताना चित्रपटसृष्टीत तांत्रिक आणि कलात्मक विकासाची कारणमीमांसा करण्याची संधी मिळाली. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्योत्तर मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांची वैशिष्ट्ये शिकवण्यापूर्वी या विषयाचा माझाही चांगला अभ्यास झाला. माझे वरिष्ठ मित्र पत्रकार आणि नंतर एमआयटीतील वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख विजय लेले यांनी त्यांच्या संस्थेतील व्याख्यानाआधी इथंच होतं पण दिसलं नाही अशा सिद्धांत कल्पनेचा विस्तार करण्याची सुचना केली. मी त्याचा अर्थ अचूकपण्ो हेरला आणि खोलवरच्या शोधकार्यातून एखाद्या पाणबुड्याप्रमाण्ो काही मोती घेऊन वर आलो. हिंदी चित्रपटांतील तीन गाण्यांची उदाहरणं देतो.
आराधना (शक्ति सामंता, 1969) चित्रपटातील रूप तेरा मस्ताना हे गाणं. असंख्य वेळा पाहिलेल्या लोकांनाही प्रस्तुत गाणं एका लाँग टेक (सलग चित्रीकरण) मध्ये चित्रीत केलेलं आहे हे लक्षात येत नाही. त्यावेळी स्टेडिकॅम, गिम्बल अशा चित्रीकरणाच्या आधुनिक सोयी उपलब्ध नसताना देखील दिग्दर्शक शक्ति सामंता यांनी ज्या कुशलतेने या गाण्याचं छायाचित्रण करवले त्यास तोड नाही. कॅमेऱ्याच्या सुरळीत हालचालींसाठी (बहुधा) क्रॅब डॉलीचा उपयोग करून पावसाळी रात्रीची प्रकाशयोजना, बाहेरचा निळसर प्रकाश, त्यातून दिसणारा पाऊस असं एकंदर मूड लायटिंग. शिवाय राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांनी अगणित वेळा तालीम करून आपल्या हालचालीत आणलेली सहजता हे सगळं छान जुळून आलं होतं. तसेच दबक्या आवाजात किशोरकुमारनं गायलेलं गाणं, त्यातील सॅक्सोफोन आणि अकॉर्डियन यांच्या जुगलबंदीतून आळवलेली, कामातूर स्त्री-पुरुष जोडीनं एकमेकांना घातलेली साद जणू! मस्तच. कल्पकता काय उंचीवर जाऊ शकते याचा एक नमुना. विशेष म्हणजे तद्दन व्यावसायिक हिंदी चित्रपटात असा असामान्य आविष्कार दिसला म्हणून जास्त कौतुक आहे.
याशिवाय आनंद (ऋषिकेश मुखर्जी, 1971) चित्रपटातील कहीं दूर जब दिन ढल जाए गीत. यामध्ये संध्याकाळची वेळ आणि नायकाच्या आयुष्याची संध्याकाळ यातील अनुरूपता दिग्दर्शकानं कशी दाखवली आहे याचं विस्तृतीकरण केलं. रस्त्यावरून चाललेली बैलगाडी, तिची पडलेली लांब सावली दाखवताना आयुष्याच्या अखेरीस नायकाला जाणवलेली उदासीनता, आठवणी यांची किती सुरेख जोड घातली आहे हृषीदांनी! किंवा अलीकडच्या फिजा (खालिद मोहम्मद, 2000) चित्रपटातील आजा माहिया गाणं. नायक-नायिका, त्यांच्या आर्थिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोळीणी, मुंबईचे डबेवाले, धोबीघाट अशा प्रतिकांच्या बरोबरच अनेक प्रसंगस्थळे. का? तर नव्या नवलाईच्या प्रेमात नायिकेला कुठं ठेवू अन् कुठं नको असं झालेलं. असं न दिसलेलं विद्यार्थ्यांना दाखवून दिलं की ते जणू मंत्रमुग्ध होत असत.

चित्रपटाची समज किंवा रसास्वाद अभ्यासक्रमामध्ये पूर्ण लांबीचा जागतिक अभिजात चित्रपट पाहून त्यावर चर्चा होणं आवश्यक असते. बहुतेक शिक्षक विद्यार्थ्यांना चित्रपट पाहायला सांगून दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करत पण मी ‘गाईडेड स्क्रिनिंग’ची माझी संकल्पना राबवली. यामध्ये मी सुरुवातीला चित्रपटाचा परिचय करून देतो. नंतर संपूर्ण चित्रपट विद्यार्थ्यांबरोबर पाहत त्यांना त्यातील महत्त्वाच्या बाबी, कलात्मकता, दिग्दर्शन, अभिनय, कॅमेरा हालचाली, संकलन आणि ध्वनीयोजनेतील कल्पकता समजावून सांगतो. यामुळं एखाद्या चित्रपटाला अभिजात का म्हणायचे, त्यातील सौंदर्यस्थळे काय आहेत याची विद्यार्थ्यांना समज मिळते. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेसला दाखवत दाखवत मी ते सगळे अभिजात चित्रपट किमान शंभरएक वेळा निरखले आहेत. त्यामुळे अशा अभिजात चित्रपटांची चौकट-न-चौकट अन् ध्वनी-न-ध्वनी मला पाठ झाल्या!
कोरियातील प्रशिक्षणानंतर इन्स्टिट्यूटमधील पटकथालेखन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोरियन दृष्टिकोन अशा शीर्षकाच्या कार्यशाळा दोन बॅचेससाठी घेतल्या. यामध्ये कोरियन चित्रपटसृष्टीची ओळख आणि तेथील चित्रकर्ते तसेच चित्रपटांची वैशिष्ट्ये विशेषतः पटकथेच्या संदर्भात सोदाहरण समजावुन सांगतली. या कार्यशाळांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणून माझाही भाव वधारला आणि त्याचा प्रत्यय वारंवार येत राहिला.
2009मध्ये एफटीआयआय, नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया आणि फिल्म फेस्टिवल डिरेक्टोरेट यांच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्ली येथे एक चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला. पाच दिवसांच्या या अभ्यासक्रमासाठी मला तीन व्याख्यानं देण्यात आली. अभ्यासक्रमाच्या उद्घाटनासाठी इतर मान्यवरांबरोबर प्रख्यात चित्रपट अभ्यासिका विजया मुळ्येसुद्धा आल्या. त्यांनी अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकावरून नजर टाकत, चंद्रशेखरच्या कोरियन चित्रपटावरील व्याख्यानाला मी आलं तर त्याला चालेल काय? असं धारधार शब्दात विचारलं. चित्रपट अभ्यासाच्या क्षेत्रात अक्का म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्यांना होय व्यतिरिक्त दुसरं उत्तर देणं शक्य नव्हतं. आम्हाला वाटलं वरवरचं विचारलं असेल पण माझ्या व्याख्यानाला अक्का खरंच आल्या, संपूर्ण वेळ बसल्या आणि जाताना म्हणाल्या, “किती वर्ष होतास कोरियात?”
“तीन महिने,” या माझ्या उत्तरावर अक्कांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक एकाच वेळी दिसलं.
2015 या वर्षी हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून संयुक्तपण्ो एक चित्रपट रसास्वाद शिबिर करण्याचा प्रस्ताव आला. त्याप्रमाणं मी या शिबिरात शिकवण्यासाठी धर्मशाळा येथे पोचलो. येथील विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट माध्यमाबद्दल कमालीची उत्सुकता आणि तितकेच अज्ञानही होते. चित्रपट व्याकरणातील साध्या साध्या संज्ञा समजावुन सांगितल्यावर त्यांची समज आणि गोडी दोन्हीही वाढली. या चार दिवसीय शिबिरासाठी प्रमुख पाहुण्ो म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांना निमंत्रित करण्यात आलं. आम्हा दोघानांही एकमेकांना भेटून आनंद झाला. एकदा त्यांचा बाघ बहादूर (हिंदी, 1989) चित्रपट इन्स्टिटूटमध्ये दाखविण्यात आला होता आणि मला तो अत्यंत भावला होता. सोप्या चित्रपट भाषेत एका लोककलावंतांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह मांडणाऱ्या बाघ बहादूरबद्दल मी साप्ताहिक सकाळमध्ये विस्तृत लेख लिहिला आणि त्यांना पाठवला होता. बुद्धदेवांनी तो लेख त्यांच्या कोलकत्यातील महाराष्ट्रीय शेजाऱ्याकडून वाचून, समजून घेतला आणि तेव्हापासून त्यांचा माझ्यावर लोभ होता. त्यांनी या शिबिरात दाखविण्यासाठी आपले तीन-चार चित्रपट आणले होते पण मी त्यांना बाघ बहादूरच दाखविण्यासाठी आग्रह धरला कारण सरळ होतं. त्यांचे इतर चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले असले तरी त्यांच्या गुंतागुंतीच्या प्रस्तुतीकरणामुळं, ते या नवख्या विद्यार्थ्यांना समजले नसते. बुद्धदेव यांच्या उपस्थितीत बाघ बहादूर दाखविण्यात आला आणि त्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या शेवटी तेथील सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते खास हिमाचली टोपी आणि चित्र देऊन माझा सत्कार करण्यात आला.
आता नेमकं वर्ष आठवत नाही पण इन्स्टिट्यूटनं एकदा समीक्षकांसाठी चित्रपट माध्यमाचं आकलन असा काही दिवसांचा अभ्यासक्रम आयोजित केला. असा अभ्यासक्रम आवश्यक होता असं मला वाटलं कारण या माध्यमाचं आकलन नसेल तर समीक्षक काय तारे तोडतात ते सगळ्यांना माहीत आहे. पुण्ो, मुंबई आणि इतर ठिकाणांहुन अनेक चित्रपट परक्षीक या अभ्यासक्रमास उपस्थित होते. चित्रपटगीते या मला दिलेल्या विषयावर व्याख्यान देताना चित्रपटगीतांची रचना, घटक, चाल, गायन आणि छायाचित्रण अशा विविध बाबी मी उदाहरणांसहित समजावून सांगितल्या.
इतक्या ठिकाणी शिकवून झालं तरी ज्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमानं मला या माध्यमाची जाण दिली त्यामध्ये एकदा तरी शिकवायचं असं माझं स्वप्न होतं आणि ते 2017 या वर्षी पूर्ण झालं. 1989 या वर्षी प्रस्तुत अभ्यासक्रमात एक विद्यार्थी म्हणून मी नेहमीच सर्वात पुढच्या रांगेत बसत असे. तेथुन व्याख्यात्यांनी शिकवायचं टेबल फार तर पाच फूट अंतरावर होतं पण हे अंतर कापायला मला 27 वर्षं लागली! या अभ्यासक्रमात मला पटकथालेखन आणि कोरियन चित्रपट अशी दोन व्याख्यानं दिली गेली. यापैकी कोरियन चित्रपटांवर प्रावीण्य असल्यानं ते व्याख्यान चांगलंच झालं पण पटकथालेखनातील संघर्षबिंदू, निराकरण, पात्ररचना, सुलभ संवादलेखन अशी वैशिष्ट्ये समजावताना ‘सरफरोश’ (जॉन मॅथ्यु माथन, 1999), ‘सरकार’ (रामगोपाल वर्मा, 2004), ‘दामिनी’ (राजकुमार संतोषी, 1993) वगैरे प्रामुख्यानं मुख्य प्रवाहातील चित्रपटांची संदर्भ-भाग दाखवल्यामुळं पटकथालेखनचे सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी चक्क टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
चित्रपटाच्या विलक्षण माध्यमाबद्दल समाजाला शहाणं करून सोडण्याचे माझे प्रयत्न दोन दशकाहून अधिक काळ अव्याहत चालू आहेत. माझं अगदी अलीकडचं सत्र मोशन मीडिया स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी झालं. यावर्षी 4 जुलैला या विद्यार्थ्यांना स्क्रिप्ट टू स्क्रीन प्रवास कसा होतो ते सांगितल्यावर त्यांनी एका आवाजात ‘थँक यू सर’ म्हणत अभिवादन केले.
-डॉ. चंद्रशेखर जोशी
98903 89715
.jpg)



Comments