पत्रकारिता म्हणजे घाईघाईतले साहित्य
- Jul 6
- 4 min read
पत्रकारितेनंतर चित्रपट निर्मितीचा अभ्यास करताना कथात्मक चित्रपटांबरोबरच अनुबोधपटांचेही अध्ययन झालं. त्यावेळी एक गोष्ट आवर्जुन लक्षात आली ती म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित असणारा अनुबोधपट वास्तवाचं एक प्रतिभावान प्रतिनिधित्व असतो. अरेच्च्या! हे तर पत्रकारिता करताना आपण करत होतो आणि इतर अनेकांनीही केलेलं पाहत होतो. पत्रकारांना बातम्या लिहिण्यासाठी, वेळेची पूर्तता करण्यासाठी घाई करावी लागते. बातम्यांसाठी लेखन प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत असल्याने चालू घडामोडींचे त्वरीत वृत्तांकन करण्याची आवश्यकता असते. मात्र तरीही साहित्यिक लेखनाची कला आणि कौशल्य अवगत करून आपल्या वाचकांपर्यंत माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. चर्चेचा भाग म्हणून, साहित्य आणि पत्रकारिता यांच्यातील फरक करताना सांगितले जाते की साहित्य अक्षर असते. साहित्यिक निर्मितीमध्ये काही तरी कायम स्वरूपाचे असते परंतु वृत्तपत्रीय लेखन दुसऱ्या दिवशी शिळे होते. लेखकाला किंवा कवीला आपली कला पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नसते. तो एक कलाकार असतो आणि तो घाईघाईत काम करू शकत नाही. त्याच्या भावना शांततेत आठवल्या जातात. त्याच्या अगदी उलट पत्रकार आहे. त्याच्यासाठी घड्याळाच्या काट्याबरोबर धावणे महत्त्वाचे असते. शिवाय पत्रकारिता आणि साहित्यातील फरक मुख्यतः लक्ष्यित वाचकांच्या स्वरूपामुळे आहे. आपण ज्याप्रमाणे बातम्या वाचतो त्याचप्रमाणे कविता किंवा कथा, कादंबरी वाचत नाही.
.jpg)


