आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री
- Jyoti Ghanshyam
- Apr 14, 2021
- 2 min read
- प्रा. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 9850270823 1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती. 1848 साली महात्मा फुल्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली. शाळेसाठी शिक्षिका मिळत नव्हती, म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना उभे केले. 1882 मध्ये हंटर आयोगापुढे म. फुल्यांचे जे भाषण झाले त्यात त्यांनी ‘‘स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे’’ असा आग्रह धरला होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षण घेणार्या नवशिक्षित तरूणांचा एक वर्ग तयार होत होता. नवरे शिक्षित आणि बायका अशिक्षित अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली होती. रविंद्रनाथ टागोरांनी ‘‘स्त्री शिक्षणाचा प्रसार केला नाही तर समाजात नवरा-बायकोमधला सुसंवाद नष्ट होऊन कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल’’ असा इशारा दिला होता. अशा काळात स्त्रियांना शिक्षण द्यायचे ते कौटुंबिक जबाबदार्या पार पाडण्यासाठी अशी समाजातल्या विचारवंतांची धारणा होती. स्त्रीशिक्षणाविषयी आंबेडकरांचा विचार वेगळा होता. मातृत्वाचा गौरव केला जात असताना या देशात स्त्रीत्वाची जी उपेक्षा होत होती ती थांबवली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. केवळ कौटुंबीक जबाबदार्या पार पाडण्यासाठी शिक्षण नको, शिक्षणाच्या माध्यमातून आत्मप्रगटीकरणाचे युग सुरू झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ दलितांचा, दलित स्त्रियांचा विचार न करता भारतातील एकूण स्त्रीजीवनाचे उन्नयन हाच बाबासाहेबांचा ध्यास होता. शिक्षणाची गंगा दलित समाजापर्यंत पोहचू लागली होती. दलित स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. अशा काळात बाबासाहेब एकूण स्त्रीजीवनाला उन्नत अवस्थेतपर्यंत नेण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भातले बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते. ‘‘जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही आणि प्राथमिक शाळांतील प्रवेशाबाबत कडक उपाययोजना केली जाणार नाही; तोपर्यंत मागासवर्गीयांच्या शिक्षणात प्रगती होणार नाही. बहिष्कृत लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्चशिक्षणाकडे लक्ष पुरवले पाहिजे. एखादी व्यक्ती बी. ए. झाल्याने समाजाचे जेवढे भले होईल तेवढे चौथी पास झाल्याने होणार नाही’’ असं बजावणार्या बाबासाहेबांनी दलित स्त्रियांना भावनिक आवाहन केले. ते म्हणत, 1) तुम्ही आमच्या आया-बहिणी आहात. आपल्या मुलांना शिक्षण द्या. 2) मुलगा किंवा भाऊ दारू पिऊन घरात आला तर त्याला घरात घेऊ नका. जेवण देऊ नका. 3) तुमच्या मुलींना शिक्षण द्या. 4) तुमची लुगडे नेसण्याची पद्धत, गळ्यात गळाभर गळसर्या आणि हातात हातभर कथलांचे किंवा चांदीचे दागिने घालण्याची पद्धत बंद करा. 5) दागिन्यांपेक्षा कपड्याला जास्त महत्त्व आहे. फाटके का असेनात, पण कपडे स्वच्छ असावेत. 6) आपल्या मुलांच्या मनातली हीनत्वाची भावना काढून टाका. 7) मुलांची लग्नं लवकर करण्याची घाई करू नका. लग्न ही जबाबदारी असते. 8) लग्नानंतर जास्त मुले निर्माण करणे हा सामाजिक अपराध आहे. 9) लग्न करणार्या प्रत्येक मुलीने नवर्याची दासी म्हणून नव्हे तर बरोबरीच्या नात्याने आणि मित्र म्हणून वागावे. 10) कोणतीही क्रांती प्रथम विचारात होते मगच ती आचारात येते. 11) अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नाने नष्ट होईल. 12) अस्पृश्यता ही गुलामगिरी व धर्म कधीही एकत्र नांदू शकत नाही.
.jpg)







Comments