प्रा. मिलिंद जोशी यांना साथ देऊन साहित्यधर्म जपा!
- Feb 1
- 3 min read

“लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची व्हायला हवी. साहित्य परिषद ताब्यात घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आग्रही आहेत. जर ही संस्था ताब्यात आली तर यापुढील काळात आम्ही आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करू,” अशा आशयाचे मत भाजपच्या नेत्यांनी मांडले असल्याचे सांगितले जात आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आजवर अनेकदा राजकारणी आले आहेत, मात्र एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे मसापची लढाई लढण्याची ही पहिलीच वेळ असेल.
अभिनेते योगेश सोमण हे मसापचे उमेदवार आहेत की भाजपचे? असा प्रश्न पडावा अशा थाटात या प्रचारसभा होत आहेत. “साहित्य परिषदेतील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध असून त्यांच्याविषयी ते काहीही बोलत असतात. त्यामुळे जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरूद्ध जात आहे. हे थांबवायचे तर विद्यमान पदाधिकाऱ्यांना घरी बसवा,” असेही या महाभागातर्फे सांगण्यात येत आहे. या आवाहनानंतर भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मसापच्या मतदारांची यादी घेऊन बसले असून एकाच घरात चार-चार जणांना फोन करून भंडावून सोडत आहेत.
प्रत्येक क्षेत्रात एक सर्वशक्तीमान नेतृत्व असते. ते आपल्या कर्तबगारीने पुढे येते. ते क्षेत्र हाच त्याचा श्वास झालेला असतो, ध्यास झालेला असतो. प्रा. मिलिंद जोशी हे साहित्यातील असेच एक बहुआयामी नेतृत्व आहे. साहित्य संस्थांच्या कामकाजाबरोबरच त्यांना साहित्याची उत्तम जाण आहे. त्यांची वक्तृत्वशैली अलौकिक आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या प्रांतात त्यांनी जे योगदान दिले त्याला तोड नाही. अनेक प्रसंगात, निर्णयात त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय साहित्य क्षेत्राला वारंवार घडला आहे. आता तर पत्रकार असलेले विनोद कुलकर्णी आणि हरहुन्नरी प्रकाशक असलेल्या सुनीताराजे पवार यांचीही साथ त्यांना मिळत आहे. साहित्य परिषदेसारख्या संस्थेचे त्यांनी कसे रूपडे पालटले आहे हे मागच्या लेखात सांगितले आहेच.
“नरेंद्र मोदी सीमेवर कुठे बोंबलत फिरत असतो? कोणती गोळी कुठून येईल आणि कुठे घुसेल हे सांगता येणार नाही...” असे मत तेव्हाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले होते. त्यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह सर्वांनीच या विधानाचा कडाडून विरोध केला होता. देशाच्या पंतप्रधानाविषयी अशी भाषा करणारे सबनीस हे साहित्य परिषदेचे पदाधिकारी नाहीत, हे समजून घ्यायला हवे. कदाचित डॉ. सबनीस यांचीही ही भूमिका आता बदलली असेल. परिवर्तनावर विश्वास असलेल्यांनी माणसांचे बदलणेही समजून घ्यायला हवे.
जिथे काही लाभ असतात त्या संस्थांवर राजकारण्यांचा डोळा असणे समजून घेता येण्यासारखे आहे. म्हणूनच अनेक बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध उत्पादन संस्था, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज संस्था ताब्यात घेण्यासाठी ते त्यांची सर्व शक्ती पणाला लावतात. आता मात्र साहित्य संस्थाही गिळंकृत करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हा प्रयत्न करताना मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही गैरवापर खुलेआमपणे सुरू आहे. “विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आल्यानंतर त्यांनी त्याबाबत ताबडतोब खुलासा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका मांडावी,” अशी अपेक्षा प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली आहे.
येत्या वर्षात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ते पुण्यात होणार हेही जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रसंगी प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारख्या धडाकेबाज नेतृत्वाची खऱ्या अर्थी या संस्थेला गरज आहे. त्यांच्याविषयी ज्या कुणाचे आक्षेप आहेत ते आता जागे झाले आहेत. या निवडणुकीनंतर पुन्हा ते पुढच्या पाच वर्षांनीच उगवतील हे वेगळे सांगायला हवे...? ज्या झाडाला भरपूर फळे लगडलेली असतात त्यालाच लोक दगड मारतात हा नैसर्गिक नियम आहे. त्यामुळे मिलिंद जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे हलाहल पचवावेच लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मला नेहमीच यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे ‘कॉम्बो’ वाटतात. पवारांचे वाईट आणि द्वेषाचे गुण त्यांनी कधीच स्वीकारले नाहीत मात्र माणसे ओळखण्याचे त्यांचे कसब अचाट आहे. त्यांची यंत्रणा इतक्या सूक्ष्मपणे काम करत असते की, खऱ्याखोट्याचा निवाडा करण्यासाठी त्यांना कुणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही. प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारख्या कर्तबगार माणसाची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल, असे कसे म्हणता येईल?
कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील काही तज्ज्ञ विधानपरिषदेवर असावेत, असा लोकशाहीतील संकेत आहे. गेल्या काही काळापासून सर्वच पक्षातील नेतृत्व तो संकेत पायदळी तुडवत आहे. विधानसभेवर, विविध महामंडळावर ज्यांना संधी देता आली नाही, अशा काही नाराजांचे ‘पडके वाडे’ बांधण्यासाठी विधानपरिषदेचा वापर करण्यात येतो. प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारखा लेखणी आणि वाणीवर प्रभुत्व असणारा अभ्यासू नेता विधानपरिषदेवर गेला तर आपल्या सभागृहाचीही उंची वाढण्यास मदत होईल. साहित्य परिषदेसारख्या स्वायत्त संस्थेविषयी मायबाप सरकार कायम सौहार्दाची भूमिका घेत सर्वतोपरी सहकार्य करत असते. या संस्थेचा चेहरामोहरा बदलणारा प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारखा लेखक विधानपरिषदेवर गेला तर आजवर काहींनी ज्या घोडचुका केल्या आहेत, त्याचेही पापक्षालन झाल्यासारखे होईल. मुख्यमंत्री महोदयांनी साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीच्या विरूद्ध किंवा समोरच्या पॅनेलच्या बाजूने आहेत, असा कोणताही संकेत कधीही दिला नाही. तरीही त्यांच्या नावाचा गैरवापर होत असेल तर प्रा. जोशी यांच्या पाठिशी राहत त्यांनी आपला गुणग्राहकपणा दाखवला पाहिजे.
साहित्य परिषद हे प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपजिविकेचे साधन नाही. त्यामुळे त्यांचे तिथे असणे हे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रातील साहित्याविषयी प्रामाणिक तळमळ असणाऱ्यांची गरज आहे. साहित्य परिषदेच्या मतपत्रिका लवकरच सर्वांना टपालाने मिळतील. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन उत्कर्ष पॅनलच्या सर्व सदस्यांना भरघोस मतांनी विजयी करून साहित्यधर्म पार पाडण्याची वेळ आली आहे.
-घनश्याम पाटील
7057292092
.jpg)

Comments