top of page

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 

आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्यानं लोकाना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता! कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते पण त्यात जायला लोक घाबरायचे! आज मात्र आपल्या देशात सर्वप्रकारच्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध आहेत. निरनिराळ्या रोगांवरही प्रभावी उपाययोजना आहेत. मात्र एखाद्या अगदी सामान्य व्यक्तीला कर्करोग, क्षयरोग, ह्रदयविकार यासारखा अतिशय गंभीर आजार अचानक उद् भवला तर तो हवालदिल होतो. कारण अशाप्रकारच्या आजारांवरची उपचारपद्धती अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे आधुनिक सोयीसुविधा असलेल्या खासगी रूग्णालयात उपचार घेण्यापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहतो! काही सरकारी रूग्णालयात सुद्धा आधुनिक आरोग्यसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र दुर्दैवानं या रूग्णालयातील बर्याचशा यंत्रसामग्री (उदाहरणार्थ एक्स रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन मशीन इत्यादी) बंद पडलेल्या असतात आणि ही वस्तुस्थिती आहे! तरीही आपल्या समाजात काही आदर्श डाॅक्टर असेही आहेत, जे अत्यल्प दरात आरोग्यसेवा देण्यासाठी तत्पर असतात. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नगण्य आहे!   मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमात आरोग्य विषयक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. तेथे एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली.... जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization ) एका सर्वेक्षणानुसार येत्या काही वर्षात भारतीय उपखंडात तब्बल ८३ टक्के लोकाना कर्करोगाची लागण झालेली असणार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एवढ्या झपाट्याने या कर्करोगाचा भस्मासूर आपल्या देशात पसरतो आहे. हा खरोखरच अतिशय काळजी करण्याचा विषय आहे. त्यावेळी त्यांनी याचे कारण स्पष्ट करताना म्हटले, 'भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमची आजची अत्याधुनिक जीवन शैली!' हे अगदी खरं आहे आणि या बदललेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून येत आहेत.  आज आपण बघतो, आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची जीवनशैली त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार सतत बदलत असते. एवढंच कशाला सामान्य लोक सुद्धा आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे यातच धन्यता मानतात. त्यामुळे दिवसभराचे नियमित वेळापत्रक कोलमडून जाते. हे सर्व आपण आजारी पडल्यावरच आपल्या लक्षात येते. मग डाॅक्टर औषध देताना बजावून सांगतातही... औषधं वेळच्या वेळी घ्या, भरपूर पाणी प्या. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळा. सकाळी लवकर उठून फिरायला जा. योगासने, व्यायाम करा वगैरे वगैरे! मात्र आपण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. काही न खाता औषध घेणे, थोडं बरं वाटलं की परत औषध न घेणे म्हणजेच औषधाचा डोस पूर्ण न करणे, घरचे सात्विक जेवण न करता बाहेरचे अर्बटचर्बट खाणे असले प्रकार आपल्याला आजकाल घरोघरी बघायला मिळतात. अशा प्रकारामुळे परत उलटून ताप येतो! म्हणजेच काय आपणच आजाराला निमंत्रण देण्यासारखा हा प्रकार असतो. कधीकधी तर हा साधारण वाटणारा ताप डेंग्यूसारख्या एखाद्या गंभीर आजारात सुद्धा रूपांतरित होण्याचा धोका असतो. मग सुरू होते एक जीवघेणी धावपळ, आर्थिक अंदाजपत्रक कोलमडल्यामुळे त्यासाठी करावा लागणारा आटापिटा, आजारी माणसासोबतच स्वतःच्या तब्येतीची काळजी! या सर्व घाईगडबडीत होतं काय की घरातील कर्त्या माणसाला अशा प्रसंगी अतिशय खंबीर राहावं लागतं. स्वतःची मानसिक स्थिती, मनाचा तोल ढासळू न देता धैर्याने एकंदर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला सज्ज राहावं लागतं. त्यात तो कमी पडला आणि समजा त्यावेळी दुर्दैवानं मृत्यूसारखी अप्रिय घटना घडली तर घरातील हा कर्ता माणूसच मानसिक रूग्ण होऊ शकतो! त्यासाठी आपण आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहणं आज नितांत गरजेचं आहे. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अनिवार्य झालेलं आहे. त्यासाठी पुरेसा व्यायाम करणे, जेवणाच्या वेळा पाळणे, बर्गर-पिझ्झासारखे फास्ट फूड टाळणे, सकाळी लवकर उठणे, रात्री जागरण न करता वेळेवर झोपणे अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो, व्यायामासाठी जिकडेतिकडे 'जिम'चे पेव फुटलेले आहे. अशा या जिममध्ये तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊ शकता. समजा सकाळी जमलं नाही तर सायंकाळी तेथे जायचा पर्याय खुला असतो. एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे पण आपल्या शरीरासाठी व्यायाम हा नियमितपणे करायला हवा आणि तोही आरोग्याच्या दृष्टीने सकाळच्या वेळी करणे जास्त हितावह आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आजकाल जो-तो आपल्या मनाला येईल तसेच वागताना दिसतो. आता हेच बघा ना, अनेक जण सकाळी लवकर उठून फिरायला जाताना दिसतात. मात्र बहुतेक लोक मोबाईल जवळ बाळगतात. कित्येक जण तर अगदी कानाला हेडफोन लावून फिरताना दिसतात. कमीत कमी फिरायला जाताना, व्यायाम करताना तरी मोबाईलचा मोह टाळायला हवा असं वाटतं, जेणेकरून त्यावेळी एकाग्रता साधणे शक्य होऊ शकते. कारण योगासने, प्राणायाम करताना एकाग्रता साधणे खूप महत्त्वाचे असते. त्याचा आपल्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होण्यासही मदत होते.  सतत वाढणारी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या, निरनिराळ्या कारखान्यांचा धूर व दूषित पाणी तसेच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यामुळे वायुप्रदुषण व ध्वनिप्रदुषण कमालीचे वाढले आहे. त्याचप्रमाणे 'ग्लोबल वाॅर्मिंग'च्या धोक्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच! या कारणांमुळेही आज सर्वसामान्य माणसाची प्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे यात शंका नाही. म्हणूनच कधी नव्हे इतकी आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आजघडीला अतिशय गरजेचं आहे. कोणातरी तज्ज्ञानं म्हटलंच आहे..."आरोग्यदायी शरीरातच चांगलं मन वास करतं!" त्याप्रमाणे आपणही त्यादृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करूया आणि आपल्या आरोग्याबाबत सदैव जागरूक राहूया!!

आवो कदम से कदम मिलायेंगे सभी! कल की राह ना देखो, आज और अभी!!

विनोद श्रा. पंचभाई,

पुणे भ्र.क्र. ९९२३७९७७२५

Recent Posts

See All
अधिक-उणे - मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page