top of page

आपण सारे कोरोनाग्रस्त

प्रिय सटू... ते तातू वगैरे आता जुनं झालं. किती वर्षे तीच ती जुनी नावं वापरायची? ओल्ड फॅशन्ड नाही का वाटत! आता बघ, आपल्या पिढीची नावं शिल्लक तरी आहेत का? (आता तुझं नाव सटवा पण मी त्याचा सट्यु केला!) अलीकडचं नाव तर पहा. ती माणसाची असल्यागत वाटतच नाहीत मात्र आपणाला त्याच नावानं बोलावं लागतं ना लेकरांना! परवा एकानं आपल्या लेकराचं नाव ठेवलं टॉमी. आता बोला. पूर्वी आजोबा-पणजोबाचं नाव वाढवायची. (आता हे वाढवायचं म्हणजे पुढच्या पिढीला तेच नाव ठेवायचं हे तुला माहीत आहेच) पण आता पूर्वजांची नावं ठेवण्याची फॅशन ओल्ड झाली असं बोल्ड मायबाप सांगू लागले. मग आता अशी नावं ठेवतात लेकरांची. आता त्या टॉमीला पण हाक मारायची तर काय म्हणायचं हेच मला कळत नाही. आपण त्या लेकराला टामी म्हणून हाक मारतोय आणि ते निष्पाप बालक आपल्यासमोर शेपटी हलवत येतंय असं चित्र माझ्या डोळ्यापुढं तरळतंय. असो. तुला हे पत्र म्हणजे लेटर लिहिण्याचं कारण जरा वेगळं आहे. पत्र पाहून तुला आश्चर्य वगैरे वाटेल. वाटू दे जरा कारण हल्ली आपल्याला कशाचंच आश्चर्य वाटेल असं काही राहिलं नाही. व्हाट्सऍप आणि तत्सम विद्यापीठांनी एवढे शोध लावलेत की आता आपल्याला कशाचंच नवल वाटत नाही. शिवाय तुम्ही आज कोणतीही नवीन गोष्ट करा ते आपल्याकडं फार वर्षांपूर्वी होतं असं दाखवणारी काही स्वायत्त विद्यापीठं समाज माध्यमांवर तयारच असतात. त्यामुळं नवी नवलाई कशाचीच राहिली नाही. जत्रेत वर्षाला एकदा मिळणारी शेवपापडी कोपर्‍यावरच्या स्वीट मार्ट मध्ये जाता-येता काचेतून डोळा मारत असेल तर त्या जत्रेतल्या शेवचं कुणाला अप्रुप वाटेल? तुझ्याकडं असं कोणाचं पत्र आलं नसेल. डाकीया वगैरे नावाचा प्रकार असतो हे तुझ्या नातवांना तर माहीतही नसेल. ‘‘डाकिया म्हणजे डाकू का?’’ असा प्रश्न नातवानं जर विचारला तर आश्चर्य वाटून घेऊ नको. गंमत सांगू का? हल्लीची पिढी कशाचा अर्थ काय काढेल हे सांगता येत नाही. डॉक्युमेंट या शब्दाचा अर्थ डाकूकडे असलेली कागदपत्रं असा एका बालकानं लावला. त्या बालकाच्या बुद्धीचं कौतुक करण्याऐवजी आपल्या मंद बुद्धीची कीव मला प्रथमच आली. (अशी कीव सर्वप्रथम बायकोला, नंतर साहेबांना, त्यानंतर लेकरांना अन् शेजार्‍या पाजार्‍यांना पण आली.) समोरच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍या वहिनींना मात्र असं कधी वाटलंच नाही. वरच्या कंसामधल्या माझी कीव करणार्‍यांची त्यांना कीव येते. त्यांच्यामते एवढा नाकासमोर चालणारा माणूस जगात शोधूनही सापडायचा नाही आणि म्हणून त्या मला अधूनमधून बोलावून (फक्त चहा पाजून) धीर देतात. नाकासमोर चालणारा असं त्यांनी म्हटलं की पुन्हा पुन्हा नाकाला हात लावून नाक जागेवर असल्याची खात्री मी करून घेतो. त्यांचा चावट नवरा मात्र ‘वहिनींच्या हाताची चवच वेगळी’ असं म्हणत पूर्ण अपार्टमेंटमध्ये हुंदडत असतो. जाऊ दे! आपल्याला काय करायचं त्याचं! तर मूळ मुद्याला येतो. आता हे मुद्दा आणि मुद्दल म्हटलं की मला खळखळून हसू येतं कारण मराठीतला ‘मुद्दा’ आणि गणितातलं ‘मुद्दल’ यातला फरक तुला कधी कळलाच नाही. तरीपण दहावीच्या परीक्षेत तुझ्या बापाने (आय मीन प.पू.पिताश्रींनी) परीक्षेत पूर्ण सेटिंग लावून तुला मेरीटमध्ये आणून बारावीच्या परीक्षेतही तोच कित्ता गिरवीत तुझ्या उच्चशिक्षणाचा महामार्ग करून दिला आणि आम्ही मात्र सात्विक बापाची लेकरं खर्डेघाशी करीत बसलो एक तारखेची वाट पाहत! पण आता मात्र मला माझा बापच ग्रेट वाटतोय! कारण या कोरोनानं तुला आणि मला एकाच पातळीवर आणलंय. पतसंस्था, जीपीएफ, खाजगी बँका, मित्रपरिवार अशा सर्व ठिकाणी तोंड वेंगाडून बांधलेलं माझं छोटंसं घर आणि तुझा पंचतारांकित फ्लॅट या दोघांनाही एकाच लेवलवर आणलं या विषाणूनं! आता त्या फ्लॅटचे द्वार सुद्धा तू सोडू शकत नाहीस. आम्ही घराच्या किमान बाहेर तरी उभारू शकतो. सरकार नामक मायबापानं लॉकडाऊन बंद केलं तरी आपली इच्छाशक्ती एवढी ‘डाऊन’ झाली की बस्स! तू राहत असलेल्या 33 व्या मजल्याच्या उंचीएवढंच जमिनीत डाऊन गेलो तरी ही इच्छाशक्ती सापडेल का नाही अशी शंका आहे. मात्र अशाही काळात सातत्यानं चांगल्या ‘रेसिपी’ची फर्माईश करणारे नवरे आणि त्या पुरवणार्‍या बायका पाहिल्यावर वेटलॉसचा बिझनेस करणार्‍यांना पुढच्या काळात चांगले दिवस येणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही किंतु नाही. ते दिवे विझवायचं आणि लावायचं हे तर आपल्याला काही कळलं नाही बुवा! तुम्ही यापूर्वीच एवढे ‘दिवे’ लावलेत की आता नका लावू, मी पाहून घेते असं काहीतरी बायको पुटपुटल्यासारखं वाटलं. (तुम्हाला वयाच्या मानानं होत नाही असं म्हणायचं असावं अशी मी समजूत करून घेतली.) तुझ्या घरी कोण कोण दिवे लावले? या दिवे लावण्यावरून झालेल्या व्हाट्सऍप, फेसबुकवर एवढा उच्छाद मांडलाय की या दोन्हींची ‘दिवे’लागण होते की काय? अशी शंका माझ्या मनाला चाटून जात आहे. समस्त बायका किचनमध्ये गुंतल्या असल्यामुळं पुरुषांना अधिक खाऊन ‘अधिक’ मास असल्याचा अनुभव येतो आहे म्हणे! या अधिक खाण्यातूनच या समाजमाध्यमीय विद्यापीठातील वाद-विवाद अधिकच वाढले असावेत असा माझा तरी तर्क आहे. (अर्थात माझ्या तर्काला विचारतो कोण? हे आपल्या दोघातच राहू दे!) ज्यांच्या नवर्‍यांनी किचन ताब्यात घेतला त्या बायकांनी सुद्धा या चर्चेत चांगलेच हात धुऊन घेतले. (वारंवार हात धुण्यापेक्षा इथं हात धुऊन घेणं चांगलं असं समोरच्या फ्लॅटमधील (मला नाकासमोर म्हणणार्‍या) वहिनी आमच्या सौ.ला डिवचण्यासाठी म्हणाल्या. ‘‘ही सटवी नेहमीच मध्ये येते’’ म्हणत बायकोनं त्याचवेळी भिंतीवरील पालीला झटकलं तेव्हा घाबरून गेलेल्या त्या दोन पायाच्या सटवीनं पुन्हा आमच्या घरात पाऊल टाकलं नाही. तर हे दिवे लावून कोणाचं काय होणार यापेक्षा वादावादीचं काय होणार? हा प्रश्न मला आता पडला आहे. ‘‘आता घराबाहेर पडायचं नाही’’ असं बायकोनं बजावून सांगितल्यावर ‘‘बाहेर जाऊन येऊ का थोडं?’’ असं म्हणण्यात जी मजा असते ती संन्याशी (पक्षी : कुंवारे लोग : मी कुणाचं नाव घेतलं नाही) लोकाना काय कळणार? त्याचा अनुभव मी घेत आहे. म्हणजे ‘‘मी बाहेर वगैरे जात नाही. फक्त थोडे पाय मोकळे करून येऊ का?’’ एवढंच बायकोला म्हणायचं. मग घरात सुरू होतं रामायण आणि महाभारत एकाच वेळी! एरव्ही ‘‘थोडं घराबाहेर पडा’’ म्हणून भांडणारी ती हीच का बायको? असा प्रश्न सतावतो आहे. आता हे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ चालू करून मोठी पंचाईत झाली आहे. त्यावेळी रामायण-महाभारत पाहताना आपली लेकरं शांत बसायची. हाताची घडी तोंडावर बोट ठेवून अत्यंत भाविकपणे पहायची. आता ही नातवंडांची पिढी काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. म्हणून मग मी हे रामायण-महाभारत सुरू झालं की पुस्तकात तोंड घालून बसतो अगदी डाव्या विचारवंतासारखा! आमच्या शेजारच्या काकू म्हणाल्या, ‘‘अरे बाबा कोन चालू केलं रामायण-महाभारत त्याचं कल्याण होवो.’’ मी म्हणालो ‘‘त्याचं कल्याण होईल पण आमच्या बुद्धीचा रतन खत्री होईल त्याचं काय?’’ आता तुला खरं सांगतो. एक महिन्यापासून कोरोनाशिवाय काहीच नाही. ती एक जाहिरात होती बघ! आपल्या तरुणपणी! ड्रिंक करोना, ईट करोना, स्लीप करोना! असं सगळं झालंय. टीव्ही लावला तर तेच. बातम्यांमध्ये तर स्कोर बोर्ड असतो जणू काही क्रिकेटची मॅच चालू आहे! कुणाला फोन केला तर बोलण्याआधीच कोरोनाचा मारा! तरी आता बरं ते फोनवरचं खोकलणं बरं झालंय. त्या खोकलण्यामुळं आमच्या म्हातारीनं (पक्षी : बायकोनं) मला दवाखान्यात ओढूनच नेलं. ‘‘कधी पण फोन लावला की तुम्ही खोकलताय’’ हा तिचा आरोप तिच्यासह दवाखान्यात जाऊन आल्यावरच बंद झाला. फोनवरचं सरकारी खोकलणं तोवर थांबलं होतं! कुणाला फोन केला तर तेच. म्हटलं त्यापेक्षा पत्र लिहु या, ख्यालीखुशाली विचारू या. या पत्रात कोरोनाबद्दलचं अक्षरही येऊ नये असा माझा प्रयत्न होता पण पहा अर्ध पत्र त्यानंच भरलंय. जणू काही आपण ‘कोरोनाग्रस्त’ झालोय असंच सध्या आपलं जीवन झालंय. विषाणु कुठं असेल तो असेल पण आपण मात्र कोरोनाग्रस्त झालोय एवढं मात्र खरं!

अय्या, कोणाचं पत्र आलंय? म्हणून तोंडाचा चंबू करून सगळे मिळून एकदाच वाचू नका! सोशल डिस्टन्स पाळा! नाहीतर विषाणूचा प्रसार म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल व्हायचा. पत्राचं उत्तर देऊच नको! त्यातून एखादा व्हायरस यायचा

तुझाच,

कोरोनात्रस्त

(धनंजय गुडसूरकर हे लेखन व साहित्य चळवळीतील आघाडीचं नाव आहे. श्रममहर्षी बाबा आमटे यांच्या जीवन कार्यावर त्यांचा अभ्यास आहे.)

Recent Posts

See All
अधिक-उणे - मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page