top of page

जिंदगी गुलजार है

नेहमीप्रमाणे राहुल झोपेतून उठला आणि उठल्या-उठल्या त्याने आपला मोबाइल चेक केला. मोबाइल व्यवस्थित चार्ज झाला होता. राहुल ट्रोलिंगचं काम करायचा, त्यामुळे 'दोन घास कमी खाऊ, पण मोबाइल मात्र फुल चार्ज ठेवू' हे त्याचं नेहमीचं धोरण होतं. लगेच त्याने सोशल मीडियावर आज सकाळपासून काय काय घडलंय याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण आजचा दिवस खूपच वेगळा होता. अलिबागचे राऊत चढाचे मासे पकडायला गेले होते, त्यामुळे आज त्यांना सकाळी-सकाळी पत्रकार परिषद घ्यायला वेळ मिळाला नव्हता. महागुरू विपश्यनेला गेले होते, विकीचा लाडका संतोष ठाण्याच्या जंगलात भटकायला गेला होता जिथे नेटवर्क नव्हतं, त्यामुळे त्यानेही काही स्टेटमेंट केलं नव्हतं. काका-पुतण्या, चुलत भाऊ, कमळाबाई सगळे शांत होते. राहुल अस्वस्थ झाला. ट्रोलिंग नाही केली, तर आज त्याचा रोजगार बुडणार. जर रोजगार बुडाला तर खायचं काय? उपाशी झोपावं लागणार. एक तर आधीच इन्कम कमी म्हणून बायको वैतागली होती; त्यातच रविवारी साहेबांची सभा असल्याने बाळाला गार्डनला नेता आलं नाही, म्हणून तोही रुसून बसला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. तितक्यात त्याच्या घराच्या बाजूने जाणाऱ्या एका काकांचा फोन अचानक जोरजोरात वाजू लागला... “बिडी जलैले जिगर से पिया, जिगर माँ बडी आग है!” राहुलने लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून आपल्या चुरगळलेल्या शर्टच्या खिशातून एकमेव राहिलेली सिगारेट काढली आणि ती पेटवून विचार करू लागला, की जेव्हा जेव्हा कंटेंट संपतो, तेव्हा तेव्हा बॉलिवूडच आपल्या मदतीला धावून येतं. एखादा जुना सीन किंवा जुन्या डायलॉगचा, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जुन्या गाण्याचा रेफरन्स घेऊन मीम बनवूया आणि ट्रोलिंगला सुरुवात करूया. आणि मग राहुलने शोधाशोध करायला सुरुवात केली. तसा तर तो गुलजार यांचं गाणं ऐकत होता, तर त्याने विचार केला की यांच्यापासूनच सुरुवात करूया. राहुलने गुलजार यांना गुगल करायला सुरुवात केली. ५ नॅशनल आणि २२ फिल्मफेअर! इथेच खरं तर राहुलचा आत्मविश्वास हलला होता. पण 'फिल्म इंडस्ट्रीचा माणूस आहे, काही ना काहीतरी नक्की सापडेल' या विचाराने राहुलने शोधाशोध सुरू ठेवली. शोधाशोध करता करता राहुलला एक इमेज सापडली - "How to Write Like Gulzar", ज्यात एक फॉर्म्युला दिला होता:

  1. आधी शब्दांची लिस्ट बनवा, जसं की: थिरकते, सिमटते, झुलसते. मग त्याच्यापुढे “हुए” लावा.

  2. मग चेहऱ्यावरील एखादा अवयव निवडा, जसं की: नजर, ओठ, नैन, गाल (जे तुमच्या गर्लफ्रेंडचं तुम्हाला सुंदर वाटेल ते). त्याच्यापुढे “से” लावा.

  3. त्यानंतर त्याला निसर्गासोबत जोडा, जसं की: बूंद, ओस, बारिश, हवा. त्याला तुम्ही “का” जोडा.

  4. त्यापुढे बाथरूममध्ये ज्या ज्या पद्धतीने अपघात होण्याची शक्यता आहे, त्या सगळ्या शक्यता आठवून त्यातली एक निवडा, जसे की: फिसलना, गिरना, लडखडाना, उलझना, निकालना, संवरना.

  5. मग पुढच्या लाइनवर या. पुन्हा एखादं random इमोशन निवडा, जसे की: हसता, रुलाता, याद, डराता.

  6. आता एक लाइन लिहा “है मुझे तेरा वही” आणि त्याचा शेवट UFO आकाशात जे काही करू शकतं त्याने करा, म्हणजे: “दूर जाना, पास आना, रोशनी फैलाना, गुम हो जाना.”

राहुलने लगेच त्या फॉर्म्युल्यावरून दोन ओळी तयार केल्या:

“थिरकते हुए नजरों से बूंद का उलझना, याद है मुझे तेरा वही गुम हो जाना।”

राहुलला वाटलं की याच्यापुढे अजून एक-दोन कडवी हानूयात आणि बायकोला व्हॉट्सॲपला पाठवून देऊ, म्हणजे तिचा राग शांत होईल. पण राहुलला पुढे काहीच सुचत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले, पण पुढे काय? राहुल अजून शोधाशोध करू लागला. परत त्याच्या मदतीला गुलजारच आले. शेवटी त्याने 'साथिया'च्या एका गाण्याची लिंक यूट्यूबवरून कॉपी केली आणि बायकोला सेंड केली. थोड्या वेळात बायकोची ब्लू टिक आली आणि एक मेसेज आला, ‘आज जेवणात कांदा भजी करते.’ आता राहुलला त्याच्या मुलाला मॅनेज करायचं होतं. राहुल मोबाइलच्या गॅलरीमध्ये मुलाचे जुने व्हिडिओ-फोटो शोधू लागला. त्याला त्याच्या मुलाचा लहानपणीचा चड्डीतला एक व्हिडिओ सापडला. त्याने लगेच त्यावर गुलजार यांनीच लिहिलेलं 'मोगली'चं गाणं लावलं, “जंगल जंगल बात चली है, पता चला है... अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है!” आणि स्टेटसला ठेवलं. मुलाने पण लगेच खूश होऊन ‘माय पापा बेस्ट पापा’ अशी कमेंट केली. हे सगळं होता होता दिवस मावळायला आला होता. आज कोणाचीच ट्रोलिंग न करता आल्याने राहुलची कमाई काहीच झाली नव्हती, पण गुलजार यांना गुगल करता करता

'जिंदगी गुलजार है'

याचा शोध मात्र त्याला नक्कीच लागला होता. ‘उद्यापासून ट्रोलिंग बंद करून काहीतरी कामधंदा शोधायला सुरुवात करूया,’ असा विचार करत करत राहुल पुन्हा मोबाइलवर गाणी ऐकू लागला आणि गाण्याचे बोल होते, “

ओ माझी रे, अपना किनारा, नदिया की धारा है।”

- ऋषिकांत राऊत 

ऋषिकांत राऊत सिने, नाट्य लेखक, सहा. दिग्दर्शक

Recent Posts

See All
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar

It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were n

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page