top of page

निरपेक्ष संपादक, शब्दमित्र घनश्याम पाटील

'चपराक' आणि 'लाडोबा प्रकाशना'चे प्रमुख, ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त... माणसांचे आयुष्य ज्या गतीने पुढे जाते आहे ती गती वर्तमानात प्रचंड आहे. पाहता पाहता 365 दिवस कधी पूर्ण होतात हे काम करणाऱ्या माणसांच्या लक्षातही येत नाही. अशा रीतीने स्वतःला कामात झोकून घेतलेल्या माणसाच्या आयुष्यात वाढदिवसाचे महत्त्व ते काय? तर त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे फक्त सिंहावलोकनाचा दिवस असतो. त्यामुळे आजच्या दिवशी पुन्हा एकदा नवा संकल्प करायचा आणि पुढील ध्येयासाठीचा प्रवास सुरू ठेवायचा. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी या दिवसाचे महत्त्व असते. ध्येयाने प्रेरित असलेली माणसं जीवनभर नवनवीन स्वप्नं पाहत असतात. त्यांच्यासाठी पैसा हा दुय्यम भाग असतो. त्यांच्याच सुरू असलेल्या प्रत्येक कामात सातत्याने गुणवत्ता उंचावत राहणे हाच त्यांच्या ध्येयाचा प्रवास असतो. इतरांपेक्षा आपल्या कामाचे आपणच परीक्षण करणे आणि आपल्याच प्रवासाची वाट अधिक रूंदावत नेणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा नसला तरी मित्रांसाठी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी या दिवसाचे मोल अधिक असायलाच हवे. शेवटी समाजाचे घटक म्हणून आपण सातत्याने कार्यरत राहायला हवे. समाजातील जी माणसं समाजाच्या उन्नतीसाठी, शहाणपण पेरण्यासाठी, विवेकाची वाट चालावी म्हणून काम करत असतात, अशा माणसांच्या मागे उभे राहणे हे समाजातील सर्वांचेच काम आहे. ते काम घडावे, काम करणाऱ्या प्रत्येकाला या निमित्ताने ऊर्जा मिळावी यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा हे केवळ निमित्त असते.

या निमित्ताने उज्ज्वलतेच्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या, ध्येयासाठी काम करणाऱ्या माणसांना पुढील वाटचालीसाठी या निमित्ताने शुभेच्छा देता येतात. काही माणसं माणूस म्हणून मिळालेल्या जन्मात, माणूस म्हणून असलेल्या कर्तव्यासाठी जणू जन्माला आले आहेत असेच पुन्हा पुन्हा वाटत राहते. ते कर्तव्य म्हणजे केवळ स्वतःचा प्रपंच असे नाही तर 'जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती' या उक्तीप्रमाणे ती माणसं झपाटून एकाच जन्मात अनेक जन्माचे कर्तव्य पार पाडत असतात. त्याप्रमाणे हा माणूस झपाटून दिवसभर कार्यरत असतो. रात्री बाराला झोपणे आणि पुन्हा तीन-साडेतीन-चार वाजता उठणे, पुन्हा कामाला सुरूवात करणे, तीन-चार तासाच्या झोपेनंतरही दुसऱ्या दिवशी हा माणूस पुन्हा तितक्याच उत्साहाने कार्यरत राहतो. त्यांचे हे कार्यरत राहणे म्हणजे अनेकांना प्रेरणा आहे. पुस्तकांच्या पानावर अनेक कर्मवीरांची चरित्रं वाचताना झपाटून कार्यरत राहणे म्हणजे काय ? हे आपण वाचत जातो पण वर्तमानात त्या स्वरूपातील अनुभव घ्यायचा असेल तर या माणसासोबत जरा राहून पाहायला हवे. एकाचवेळी अनेक कामाची जबाबदारी पेलत, अनेकांशी संपर्क राखत, सर्व कामाची गुणवत्तेची कास धरत फक्त धावणे सुरू असते. पहाटे उठून हा माणूस पुस्तक हाती घेऊन आपल्या कामाचा आणि दिवसाचा आरंभ करत जातो. कोणाच्या तरी पुस्तकाचे संपादन सुरू असते. कोणाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे सुरू असते... कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या सदराचा मजकूर लिहिला जात असतो. एखाद्या विषयाच्या पुस्तकाचे वाचन सुरू असते. आपल्याच मासिकाचे संपादन सुरू असते. लोकांच्या दिवाळी अंकाचे काम सुरू होते तेव्हा घनश्याम पाटील यांच्या दिवाळी अंकाचे काम पूर्णत्वाला गेलेले असते. प्रत्येक काम गुणवत्तेने करायचे असेल तर त्या कामात घाई करून चालत नाही. त्यामुळे संपादनाचे काम करताना त्यांना ज्यांनी ज्यांनी अनुभवले आहे तेच गुणवत्तेचा ध्यास म्हणजे काय ते सांगू शकतील. अनेकदा लोक पुस्तके प्रकाशनासाठी देतात आणि पुस्तक लगेच होईल अशी अपेक्षा करतात मात्र पुस्तकांची निर्मिती आणि प्रक्रिया करताना करावे लागणारे काम, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ याचा विचार केला जात नाही. आपले पुस्तक दिले म्हणजे एकमेव आपलेच पुस्तक त्यांच्या हाती असेल असा अंदाज लावून तीन-चार महिन्यात पुस्तक मिळावे अशी अपेक्षा केली जाते मात्र खरोखर पुस्तक चांगले आहे, चुका कमी आहेत अशा पुस्तकांचे प्रकाशन अत्यंत कमी आणि विक्रमी वेळात पुस्तक प्रकाशित करण्याचे कामही त्यांनी केले आहे मात्र ज्या पुस्तकात वाक्यागणिक चुका असतील त्यासाठी प्रतीक्षा करण्याचा विचारही ती माणसं करत नाहीत. या माणसाने जेव्हा हाती काम घेतले आहे तेव्हा शक्यतो समाज माध्यमांशी संपर्क टाळणे पसंत करतो. त्यामुळे भ्रमणध्वनी स्वीकारण्यास ते फारशी पसंती देत नाहीत. काम सुरू असताना समाजमाध्यम अथवा संपर्क माध्यमात गुंतून गेले की, कामाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो ही त्यांची विचारधारा. अर्थात हे खरे आहे की, कोणतेही काम अधिक चांगले करायचे असेल तर त्यासाठी अधिक निवांत, एकांतपणा हवाच आहे. त्याशिवाय आपल्याला चांगले काम करता येत नाही मात्र मोबाईल स्वीकारला नाही म्हणून नाराजी दर्शवणारे लोक गुणवत्तेच्या संदर्भात मात्र बोलत नाहीत, ही त्यांची खंत. मुळात पुस्तक चांगले करताना, केवळ व्याकरणीय चुकांचा विचार करून चालत नाही तर त्याच्यातील अचूक संदर्भ अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. त्यादृष्टीने देखील संपादनाचा विचार केला जात असतो. त्यांच्या संपादनात मी हे पाहिले आहे की, एखादा उतारा कोणत्याही कथेतील, लेखातील असेल तर तो कोठून घेतला आहे हे नेमकेपणाने ते सांगतात हे विशेष. संदर्भाची यादीच त्यांना तोंडपाठ असल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे. सतत वाचनाचा तो परिणाम असावा असे वाटत असले तरी योग्यवेळी त्या संदर्भाची आठवण आणि ते सांगणे म्हणजे स्मरणशक्तीची कमाल म्हणायला हवी. जेव्हा जेव्हा या माणसाशी मुक्त संवाद घडत जातो तेव्हा तेव्हा या माणसाच्या मनात नव्या नव्या कल्पनांची बीजे घोळत असतात. नवे प्रयोग करून पाहणे जणू या माणसाच्या रक्तातच आहे. जे करायचे आहे ते अत्यंत चांगलेच करायचे, उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहायचे हा त्यांचा मुळचा स्वभाव आहे. माणसांच्या सहवासात राहायचे पण आपली तत्त्वे, विचारनिष्ठा, भूमिकेशी तडजोड करायची नाही हाही त्यांचा स्वभावविशेष म्हणायला हवा. अर्थात इतरांच्या मताचा आदर करताना आपले विचार लादणे घडणार नाही याचीही ते काळजी घेतात. आपले विचार पसंत पडले तर स्वीकारा ही त्यांची धारणा! मात्र कोणाचाही आणि कितीही विरोधी विचार असला तरी तो ऐकून घ्यायचा हेही महत्त्वाचे. आपल्याला विचार करण्याचे स्वातंत्र आहे, त्याप्रमाणे इतरांनाही विचाराचे स्वातंत्र्य आहे हे मान्य करायचे हा लोकशाहीचा विचारही अलीकडे हरवत चालला असताना, पाटील यांनी हा दुर्मीळ गुण जोपासला आहे. विचार ऐकून घेत, त्याचा हवा तर प्रतिवाद करायचा पण त्यातून कोणाचाही द्वेष करायचा नाही. जे जे म्हणून चांगलं असेल त्याचे स्वागत आणि समाजविरोधी भूमिका असेल तर त्यावर प्रहार हा त्यांचा मुळचा स्वभाव. त्यामुळे राजकीय विचारधारा काहीही असली तरी जे विचाराशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत त्यांच्यावर त्यांनी आपल्या विविध संपादकीय लेखातून सातत्याने शाब्दिक वार केले आहेत. कधीकाळी आपण मराठी पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत धारदार संपादकीय लिहिणारे संपादक अनुभवले आहेत. त्यांनी सातत्याने समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करू पाहणाऱ्यावर शाब्दिक हल्ले करत, अनेकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला आहेत. ती पंरपरा अलीकडे काहीशी हरवत चालली आहे. मुळात काही चुकीचे घडते आहे असे म्हणण्याची हिम्मतच अलीकडे माणसांनी गमावली आहे. अशा परिस्थितीत ते काम निरपेक्षतेने घनश्याम पाटील करत आहेत. त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले 'धडक-बेधडक' हे पुस्तक त्याचीच साक्ष देत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील लेखांचे वाचन केले तर त्यातील भाषा जितकी आक्रमक आहे तितकी ती निरपेक्षता दर्शवणारी आहे. भाषेचे लावण्य आहेच. त्याचबरोबर मराठी भाषेचा उपयोग करत त्यांनी नवमराठी अभ्यासकांना मराठी भाषेचे सौंदर्य दर्शवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद म्हणायला हवा. अनेकदा ही वाट चालताना लोक दुखवतात. त्याचा परिणाम म्हणजे लोकांची नाराजी जशी येते त्याप्रमाणे निंदा वाट्याला येते मात्र त्या बद्दल कोठेही ब्र न उच्चारता ते स्वीकारत पुढे चालत राहणे हे फार कमी लोकांना जमते. याचे कारण काय बरं असावं ? असा प्रश्न मनात निर्माण झाला तर त्याचे उत्तर तुकारामांच्या गाथेतील अभंगात आहे. गाथेतील तुकोबांचे अनेक अंभग त्यांचे तोंडपाठ आहेत. बोलता बोलता सहजतेने, समर्पकतेने ते तुकोबांचे प्रमाणही देतात. त्यामुळे तुकोबांच्या अभंगाप्रमाणे 'निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे तेही ते सहजतेने स्वीकारतात. त्यांची ही वाट नेहमीच अनुकरणीय वाटते. त्यांच्याशी बोलताना अनेकदा आचार्य अत्रे आणि त्यांच्या लेखनातील संदर्भ सातत्याने समोर येत असतात. अनेकांच्या आयुष्यातील किस्से त्यांच्याकडून ऐकणे हाही आनंदाचा भाग असतो. त्यांच्याकडे किस्स्यांची पोतडीच आहे असेच पुन्हा पुन्हा वाटत राहते. ते इतक्या सहजतेने ते किस्से कथन करत असतात की, जणू हे किस्से काल-परवा घडले आहेत असे वाटत राहते! मात्र अशा अनेक किस्स्यांनी आपण समृध्द होत जातो. पुण्यात अनेकदा माझे जाणे होते. गेले की, त्यांना भेटणे, गप्पा मारणे हे तसे नित्याचे झाले आहे मात्र त्यावेळी एक-दोन तास हाती असतील तर पुण्यातील एखादा साहित्यिक, विचारवंत, नाटककार, संपादक यांच्याशी भेटणे होते. अशा कोणाही माणसाला भेटायला गेलो की, ती माणसं या माणसांचे ज्या पध्दतीने स्वागत करतात, त्यावरून त्यांनी किती लोकांशी स्नेहसंबंध जोपासले आहेत हे लक्षात येईल. अशी शेकडो माणसं त्यांनी जिव्हाळ्याने जपली आहेत. त्यात राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा, साहित्य अशा अनेक क्षेत्रातील माणसांची नावे सांगता येतील. मुळात माणसं आली की, त्यांच्याशी नाते बांधणे हा त्यांचा स्वभाव आहे मात्र त्याचवेळी एखादे काम सुरू असेल तर तितक्याच निरपेक्ष भावनेने नाही म्हणून सांगता येणे देखील त्यांना शक्य आहे. याचे कारण कोणाकडूनही काहीच अपेक्षा नाहीत. अशा निखळ कर्मावर विश्वास असलेल्या किस्सेदार माणसाला वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा... -संदीप वाकचौरे शिक्षणतज्ज्ञ प्रसिद्धी - दै. नायक 8 ऑगस्ट 2025  

Recent Posts

See All
A National Crisis: The Helplessness of Farmers

If you were asked what the most important issue facing our country is, what would you say? For some, it might be the Hindu-Muslim conflict. For others, it could be caste-based reservations for OBCs, M

 
 
 
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar

It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were n

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page