top of page

मी एक चहा सम्राट!

सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून आपल्याला कोणत्या ना कोणत्या विशेष दिनाची माहिती मिळत असते. त्या दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचे झाड शुभेच्छांनी लगडून बहरून येते. दरवर्षी आपण चहादिन साजरा करतो. दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे एकमेकांना घरी बोलावून किंवा चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये बोलावून चहायुक्त शुभेच्छा देता आल्या नाहीत. तरीही, फेसबुक, व्हॉट्सॲपवर वाफाळलेल्या चहाचे कपसोबतचे छायाचित्र पाठवून एकमेकांना शुभेच्छा देऊन चहाचा आस्वाद घेतला. यावर्षी लॉकडाऊन नसल्याने आमच्या शेजाऱ्याने आम्हाला सपत्नीक चहाचे आमंत्रण देऊन चहादिन साजरा केला, त्याची ही धम्माल गोष्ट!

जागतिक चहा दिनाच्या दिवशी आमच्या शेजाऱ्याने आम्हाला आग्रहाने चहाला बोलावले. आम्ही दोघे बरोबर चार वाजता त्यांच्याकडे गेलो. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. काही वेळात वहिनींनी एका तबकात चहाचे कप आणून आमच्यासमोर असलेल्या टी पॉयवर ठेवले. यजमानाने हाताच्या इशाऱ्याने आम्हाला चहा घेण्याचे सुचवले. तसे पाहिले तर मी पट्टीचा चहा पिणारा म्हणून ओळखला जातो. महाविद्यालयात असताना मित्रांसोबत शर्यत लावून एकामागोमाग एक पंचवीस कप चहा मी कितीतरी वेळा रिचवला असेल. त्यामुळे मित्रांनी मला 'चहासम्राट' ही पदवी अकरा कप चहा मला एकट्याला पाजवून बहाल केली आहे.

शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. दहा सहकारी शिक्षक होते, पण माझ्यासारखा चहाबाज दुसरा कुणी नव्हता. गावात हॉटेल नव्हते, त्यामुळे माझा जीव चहाविना तळमळू लागला. कुणी अधिकारी आले तर शाळेतील मुली घरून चहा करून आणायच्या, पण माझे मन भरत नव्हते. मग मी एक शक्कल लढवली. स्वतःच्या खर्चाने स्टोव्ह, कपबश्या, चहा गाळणी, पातेले इत्यादी चहा सामग्री विकत आणली आणि आमच्या शाळेत चहायण सुरू झाले.

मला चहा एकदम कडक हवा. जिथे कुणाला नॉर्मल कपाला एक चमचा पत्ती लागत असेल, तिथे मला तीन चमचे पत्ती लागते. पाहुण्यांकडे, परिचित, मित्रांकडे गेलो की, मी आधी 'मला कडक चहा लागतो, पत्तीही जास्त लागते,' असे सांगून मोकळा होतो.

हॉटेलमध्ये साधारण एकदा वापरलेली पत्ती पुन्हा वापरतात, पण मी मात्र 'डबल पैसे घ्या, परंतु पत्ती बदला' असे सांगून पत्ती बदलायला लावतो. सर्वसाधारणपणे चहा घेतला की झोप येत नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे, परंतु मला रात्री ९:५५ वाजता चहा दिला तरी मी दहा वाजता घुरक्या ठोकतो. काही कारणास्तव रात्री नेहमीच्या वेळी झोप लागली नाही तर मी फार तर पंधरा-वीस मिनिटे झोपेची आराधना करतो. झोप येण्याची चिन्हे दिसत नाहीत, हे पाहून मी अनेक वेळा रात्री चक्क बारा वाजता चहा करून प्यायलो आहे. कहर म्हणजे, प्रत्येक वेळी चहा घेताच मला ढाराढूर झोप लागली. अर्थात, तसे करताना भांड्याला भांडे लागून श्रीमतीची झोप मोडली, हे सांगायला नको.

सासुरवाडीतील गंमत

एकदा तर गंमत झाली. नवीन लग्न झाले आणि काही दिवसांत मी सपत्नीक सासरी गेलो. रात्री मला झोपच येत नव्हती. बारा वाजत होते. मी शेजारी पाहिले, बायकोचे सप्तसूर मला जणू चिडवत होते. वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की, माझ्या सातजन्माच्या सोबतीणीला घोरण्याची सवय आहे. आता काय करावे, ह्याचा विचार करत असताना मला आठवले की, बायको घोरते म्हणून मी तिला नेहमी चिडवत असताना ती म्हणाली, "अहो, मलाच काय पण आमच्याकडे न घोरणारी व्यक्ती औषधालाही सापडणार नाही." त्यावर मी म्हणालो, "याचा अर्थ तुझ्या माहेरी घोरणे हा वारसा आहे तर..." ती म्हणाली, "तसे म्हणा हवे तर..."

हा संवाद आठवताच मला काहीतरी सुचले आणि मी तटकन उठलो. खोलीबाहेर आलो. पाहतो तर काय, सर्वत्र अंधार होता. एकूणएक लाईट बंद करून सारे आपापल्या खोलीत झोपले होते. विशेष म्हणजे वेगवेगळे आवाज परिसरात दुमदुमत होते. मी त्या आवाजांचे रहस्य जाणले. मांजराच्या पावलाने स्वयंपाकघर गाठले. तिथे अंधार असला तरीही देवाजवळ तेवत असलेल्या दिव्याचा मंद मंद प्रकाश पसरला होता. मी मनात म्हटले, 'माझ्या चहाची देवालाच काळजी...'

मी अडखळत गॅसच्या ओट्याकडे निघालो असताना रस्त्यात मध्येच कशाला तरी अडखळून थेट गॅसच्या ओट्याला जाऊन थडकलो. दोन्ही हात ओट्यावर ठेवलेल्या पातेल्यावर आदळले. मोठा आवाज झाला. त्या आवाजाने घोरणारी मंडळी जागी झाली. पातेल्यातील भाजी सरळ माझ्या चेहऱ्यावर पडली. सारेजण हातात पडेल ती वस्तू घेऊन स्वयंपाकघरात आले. मग काय विचारता राव, आठ दिवस सुजलेल्या चेहऱ्याने सासुरवाडीचा पाहुणचार घेत पडून होतो...

https://shop.chaprak.com/product/maanacha-paan/

'पत्नीतुल्य' चहा

चहाचा रंग, चहाचा गंध यावरून मी चहाची चव सांगू शकतो. त्यामुळे शेजारच्या वहिनींनी समोर ठेवलेल्या कपातील चहाची प्रकृती मी तत्काळ ओळखली, तरीही आम्ही ताबडतोब कप उचलून तोंडाला लावले. दुसऱ्याच क्षणी माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले. तितक्यात यजमान म्हणाले, "हा आमचा पत्नीतुल्य चहा. कोणत्याही 'तुल्य' चहाच्या तुलनेत हिने केलेला चहा नेहमी छानच असतो. एकदा पिला ना हिच्या हातचा चहा तर दिवसभर दुसरीकडे कुठे चहा पिण्याची इच्छाच होत नाही." यजमानाचे ते वाक्य ऐकून माझ्या ओठावर आलेले, परंतु आत दाबलेले शब्द असे होते: (तुम्ही आमच्या श्रीमतीच्या हातचा चहा प्यालाच नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या बायकोच्या हातचा चहा इतका प्रिय वाटतोय. खरेतर माझ्या बायकोच्या हातच्या चहापुढे हा चहा म्हणजे...)

"खरे आहे. असा चहा मी आजवर कधीच प्यालो नाही," मी म्हणालो. तसे तिथे असलेल्या चार डोळ्यात अंगार फुलले. वहिनींनी जळजळीत नजरेने यजमानांकडे पाहिले. जणू म्हणत होत्या, 'बघा. याला म्हणतात चहाचा पारखी. नाही तर तुम्ही म्हणजे... गाढवाला गुळाची...'

आमच्या सौभाग्यवतीच्या नजरेत फुललेला इंगोळ मला विचारत होता, 'असे आहे का? दिवसातून दहा कप चहा ढोसता आणि एक घोट चहा गिळला नाही तर माझ्यासमोर हिची स्तुती करता? चला तर घरी. मग पाजते तुम्हाला चहा.' बायकोच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपण काय बोलून बसलो, ह्याची मला जाणीव झाली आणि शरीरात कापरे भरले. कसाबसा चहा घशाखाली उतरवून मी गृहमंत्र्याच्या पाठोपाठ एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे घरी निघालो.

चहाची मिमांसा

एकूणएक व्यवहाराच्या किल्ल्या बायकोच्याच हाती होत्या. घराच्या कुलुपाच्या किल्ल्याही तीच सांभाळत असे. रागारागाने तिने कुलूप काढले. आत शिरल्याबरोबर किल्लीसह कुलूप सोफ्यावर फेकले आणि दाणकन स्वतःचे शरीरही सोफ्यावर आपटले. मी कापत म्हणालो, "अग... अग.. ऐक तर. माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता ग. खरे सांगू का, त्या चहाचा पहिला घोट घेतला आणि मला तुझ्या हातचा अमृतमय चहा आठवला..."

"मग हे तिथे का नाही बोललात की, माझ्या बायकोचा चहा यापेक्षा हजारपटीने चांगला होतो म्हणून? का तिथे मूग गिळून बसलात? दातखिळी का बसली?"

"अग, तसे सांगण्याची अतितीव्र इच्छा होती, परंतु ते बरे दिसले नसते. त्यांनी एवढ्या आग्रहाने चहाला बोलावले आणि आपण त्या चहाला नावे ठेवली असती तर त्या वहिनीला राग आला असता..."

"व्वा! व्वा! म्हणे वहिनीला राग आला असता? त्या ढमणगुळणी चहाची स्तुती करताना बायकोला काय वाटेल, तिला वाईट वाटेल, हा विचार का नाही आला?"

"अग, खरेच ग, मी तिची स्तुती मनापासून..."

"मला मूर्ख समजता? तुम्ही सरळसरळ तिच्या फडतूस चहाची स्तुती करताना 'असा चहा आजवर प्यायलो नाही' अशी मुक्ताफळे उधळलीत, याचा अर्थ मला समजत नाही? मी बेअक्कल आहे? तुमची लहर आली की, चहाचा कप पुढे धरणारी मी... आणि ते काही नाही. आता मी यापुढे चहा करणार नाही. एक तर आपला आपण चहा करून प्या नाहीतर आणा तिच्याकडून काय तो 'पत्नीतुल्य' चहा! ऐकलत ना, ते गृहस्थ तशा चहाची कशी तोंड फाटेस्तोवर स्तुती करत होते ते! आणि तुम्ही? केलीय का कधी मी केलेल्या चहाची स्तुती?" असे म्हणत तिने डोळ्याला पदर लावला. काहीतरी करावेच लागणार, नाही तर 'त्या' चहाचा उतारा म्हणून हवा असलेला चहा मिळणार नाही. या उद्देशाने मी म्हणालो,

"कोण म्हणाले तू मूर्ख, बेअक्कल आहे म्हणून? फक्त तू समजून घेत नाहीस. त्या वाक्याचा गर्भित अर्थ म्हणजे दुसऱ्या... नकारात्मक अर्थाचा तू विचारच केला नाहीस..."

"दुसरा... नकारात्मक अर्थ तो कसा?" हुंदक्याच्या सोबत आलेले शब्द.

"असा चहा मी आजवर कधीच प्यालो नाही... याचा अर्थ तू चांगला, उत्कृष्ट चहा असा घेतलास ना?" मी विचारले.

"मग दुसरा कोणता अर्थ असू शकतो हो? मला काय..."

"थांब. थांब. स्वतःला आणखी कोणते विशेषण चिकटवून घेऊ नकोस. असा चहा याचा अर्थ इतका बेचव, आळणी चहा मी आजवर कधीच प्यालो नाही, असा होत नाही का? त्यांनी चहा दिला. तिच्या नवऱ्याने चहाची स्तुती केली असताना मी 'खूप घाण आहे हो चहा' असे म्हणू का? नाण्याला दोन बाजू असतात, परंतु साऱ्यांचे लक्ष समोर पडलेल्या बाजूकडे जाते. जी बाजू जमिनीला कवेत घेते, तिच्याकडे कुणी लक्ष देत नाही, कारण ती पराजयाची निशाणी असते. सारे तिकडे दुर्लक्ष करतात. जसे की..."

"मी दुर्लक्ष केले. खरेच तुम्ही की नाही खूप हुशार आहात हो. कुणाला शालीतून कसा चहा म्हणजे शालीतून कसे जोडे मारावेत..."

"ते शालीचे राहू देत, त्या 'पत्नी तुल्य' चहाने तोंडाची चव गेली आहे. तोंड कसे आंबटडग पडले आहे. तर जरा..."

"आणते हो आणते. तुमच्यासाठी खास माझ्या हातचा चहा आणते. बसा. आलेच..." असे म्हणत बायको लगबगीने स्वयंपाकघरात गेली आणि मी स्वतःचीच पाठ थोपटून घेत सोफ्यावर बसलो...

स्वयंपाकघरात जाताना बायको काहीतरी पुटपुटत असल्याचे मला जाणवले. ती नक्कीच म्हणाली असणार, 'काय कडू वाण माझ्या पदरी पडलय बाप्पा...'

नागेश शेवाळकर, पुणे (९४२३१३९०७१)

Recent Posts

See All
A National Crisis: The Helplessness of Farmers

If you were asked what the most important issue facing our country is, what would you say? For some, it might be the Hindu-Muslim conflict. For others, it could be caste-based reservations for OBCs, M

 
 
 
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar

It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were n

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page