'शस्त्र' वापरावं जपून!
- Jyoti Ghanshyam
- Sep 22, 2020
- 2 min read
"शब्द संभलकर बोलिए, शब्द को हाथ ना पांव। एक शब्द करे भलाई , तो दुजा करे घाव ॥"क्रांतिकारक संत कबीर महाराजांच्या वरील वचनाप्रमाणे शब्द हे किती मोठं प्रभावी 'शस्त्र' आहे हे आपण सगळेच अनुभवत असतो. शब्दानं शब्द वाढत गेला की त्याचं पर्यावसान भांडणात होणं हे ठरलेलंच असतं! तसंच सहानुभूती दर्शविणारे आपुलकीचे चार शब्द देखील एखाद्या वाट चुकलेल्या 'मुसाफिराला' दिशादर्शक ठरू शकतात! शस्त्राचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर पूर्वीच्या काळी युद्धात वापरल्या जाणाऱ्या तलवारी, भाले, कट्यारी इत्यादी धारदार शस्त्रं आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याची जागा आता ए.के.- ४७, ए.के.-५६ रायफली, निरनिराळ्या प्रकारच्या रिव्हॉल्वर्स तसंच विनाशकारी शक्तिशाली बाॅम्ब या आधुनिक शस्त्रांनी घेतली असल्याचं बघण्यात येतं! याशिवाय अत्याधुनिक क्षेपणास्त्रं, विविध प्रकारच्या तोफा इत्यादी शस्त्रास्त्रांचा सुद्धा यात समावेश होतो. अगदी पौराणिक काळात सुद्धा 'ब्रह्यास्त्र' या हुकमी अस्त्राचा वापर केल्याचं आपल्या वाचनात आलं आहे. तसंच धनुर्विद्येसाठी लागणारं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण! या धनुष्यबाणाचा वापर त्याकाळात खूप मोठ्या प्रमाणात केला जायचा. रामायण किंवा महाभारत काळात धनुष्यबाण, गदा, खड्ग ( तलवार ), भाले, ढाली अशा विविध प्रकारच्या शस्त्रांचा उल्लेख आढळतो. यात योगेश्वर श्रीकृष्णाच्या हातातील बोटात विराजमान असलेल्या सुदर्शन चक्राचा येथे आवर्जून उल्लेख करावाच लागेल! महाभारत काळातील कुरूक्षेत्रावरील महायुद्ध असो किंवा रामायणकालीन राम - रावण युद्ध असो ... यात खूप मोठ्या प्रमाणात धनुर्विद्येचा तसंच गदायुध्दाचा वापर करण्यात आला. प्रसंगी 'ब्रह्यास्त्र'ही वापरण्यात आलं! त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धात बलाढ्य अमेरिकेनं जपान देशाच्या 'हिरोशिमा' आणि 'नागासाकी' या दोन शहरांवर शक्तिशाली अणुबाँब टाकून प्रचंड दहशत निर्माण केली. परिणामी दोन्ही शहरे बेचिराख होऊन खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. एका क्षणात अगदी होत्याचं नव्हतं झालं होतं! याचाच अर्थ असा की शस्त्राचा अनुचित वापर झाला तर रक्तपात किंवा जीवितहानी हे ठरलेलंच असतं! अगदी साधं उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्या स्वयंपाक घरातील किरकोळ चाकूच बघा ना... त्याचा उपयोग आपण नेहमीच भाजी अथवा फळं चिरण्यासाठी करत असतो. मात्र दुर्दैवानं एखाद्या घरात अशी घटना घडून जाते... अगदी क्षुल्लक कारणावरून या साध्या चाकूचा वापर एखाद्याला जखमी करण्यात किंवा जीवे मारण्यासाठीही केला जातो! सांगायचा मुद्दा असा की,
जगभरात मोठ्या प्रमाणात कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायासाठी वापरण्यात येणारं शस्त्र म्हणजे लेखणी! एखाद्या सार्वभौम राष्ट्राची सत्ता उलथवून टाकण्याचं जबरदस्त सामर्थ्य या लेखणीमध्ये असतं हे कितीतरी वृत्तपत्राच्या संपादकीय लेखाद्वारे सिद्ध झालं आहे. तसंच साहित्य क्षेत्रातही या लेखणीच्या माध्यमातून विविध विषयांवर साहित्य निर्मिती सुरू असते. मग ती कुणाला भावते तर कुणालातरी खुपते सुद्धा! कुणाला मार्गदर्शक तर कुणासाठी प्रेरणादायी पण ठरते! त्याचप्रमाणे आपली जीभ हेही एक प्रकारचं दुधारी 'शस्त्र'च आहे. ही जीभ जेव्हा बोलण्याचं काम करते तेव्हा मुखातून पडणारे श्लोक किंवा सुमधुर गाणी आपल्याला अतिशय श्रवणीय वाटतात. याउलट जर का याच जिभेनं आपला तोरा दाखवला तर तिच्याद्वारे होणारा शब्दांचा भडिमार कानांना असहनीय वाटणारच! मग न राहवून कुणाच्या तरी तोंडातून हे वाक्य बाहेर पडतंच ...
"तुझी जीभ आजकाल दुधारी शस्त्रासारखी चालते रे, जरा आवर घाल तिला!"
तर शस्त्र हे कुठलंही असू द्या ... त्याचा वापर जपूनच करायला हवा. नाहीतर दुर्दैवानं आपण कल्पना करू शकणार नाही अशा दुर्धर प्रसंगाला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यानंतर केवळ पश्चात्ताप करणंच हाती उरतं. दुसरं काही नाही!!
"कुछ इसी तरह से रिश्तोंको हम निभाते रहे! हर बार चोट खाकर भी ऐसेही मुस्कुराते रहे!!"
विनोद श्रा. पंचभाई
तपोवन सोसायटी, वारजे, पुणे.
भ्र.क्र. ९९२३७९७७२५
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा. Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
.jpg)







Comments