शैवयोगिनी लल्लेश्वरी!
- Jyoti Ghanshyam
- Nov 17, 2020
- 6 min read
- संजय सोनवणी, पुणे
9860991205
साहित्य चपराक, दिवाळी विशेषांक 2020
हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क - 7057292092काश्मीर अप्रतिम, निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्त्वज्ञानांचे, साहित्यनिर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षिण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्त्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरिया, अफगाणिस्तान, चायनीज तुर्क्मेनीस्तान, तुर्कस्तान या विशाल भुप्रदेशात गेलेला बौद्ध धर्म ही काश्मीरचीच वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती. शैव आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचा संगम करुन बनवला गेलेला हा बौद्ध धर्म जगाने स्वीकारला. येथेच हजारो संस्कृत, पाली, प्राकृत ग्रंथांचे तिबेटी-चिनीसहित अनेक भाषांत रुपांतरे झाली. ह्यु-एन-त्संग ते हिचेओ असे चिनी, कोरियन प्रवासी ज्ञानप्राप्तीसाठी काश्मीरला भेट देत राहिले. त्याच वेळेस काश्मीर खोर्यात अडकुन न राहता काश्मिरी धर्मप्रचारकांनी विशिष्ट बौद्ध धर्म चीनमध्ये नेला. संघभूती, गौतमसंघ व कुमारजीव हे काश्मिरी बौद्ध प्रचारक चौथ्या शतकातच चीनमधे गेले. कुमारजीवाच्या प्रतिभेने चीनचा राजा एवढा प्रभावित झाला होता की त्याने कुमारजीवाचे चक्क अपहरण केले आणि चीनमध्येच ठेवत शंभराच्या वर बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद करुन घेतला. कर्कोटक वंशाच्या प्रतापादित्याच्या काळात रत्नचिंता या काश्मिरी भिक्षुने चीनला भेट दिली होती. (सन 693) त्याने चीनमध्ये मठही स्थापन केला आणि सात संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद केला. गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बृहत्कथेची संस्कृत रुपांतरे झाली तीही काश्मीरमध्येच. एका अर्थाने काश्मीर हे ज्ञान, साहित्य आणि धर्म-तत्त्वज्ञान निर्मितीचे अनेक शतके केंद्र राहिलेले आहे. उपखंडाच्या बुद्धिवादी, गूढवादी आणि सौंदर्यवादी मानसिकतेला काश्मीरने फार मोठा हातभार लावलेला आहे.
काश्मीरला ललितादित्य (आठवे शतक), दिद्दा राणी (दहावे शतक) आणि पंधराव्या शतकातील झैन-उल-अबिदिनसारख्या महान सम्राटांचीही परंपरा आहे. ललितादित्याने अर्धा भारत तर आपल्या नियंत्रणाखाली आणलाच पण अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बाल्टीस्तान, गिलगिट ते लडाखही आपल्या नियंत्रणाखाली आणला. तत्कालीन रेशीम मार्गांवर त्यानेच नियंत्रण ठेवले व काश्मीरला एक अर्थसत्ताही बनवले. झैन-उल-अबिदिनचा काळ अत्यंत शांततामय व धार्मिक सलोख्याचा म्हणून ओळखला तर जातोच पण मधल्या काळातुन हातातुन सुटलेले लडाखही त्याने पुन्हा जिंकून घेतले व काश्मीरला जोडले.
काश्मीरची संतकवी परंपराही तशीच प्राचीन आहे. चौदाव्या शतकातील शिवयोगिनी लल्लेश्वरी (लल्लदेद) ते शेख नुरुद्दिन उर्फ नंद ऋषी या संत कवींनी काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात फार मोलाचा वाटा उचलला आहे. किंबहुना काश्मीरच्याच समन्वयशाली परंपरेचा विराट उद्गार त्यांच्या काव्य-गीतांवर पडलेला आहे. आज काश्मीरमधील जी स्थिती आहे त्या स्थितीचे जे भारतीय समाजाचे आकलन वा त्यांच्यावर ज्या माहितेचा प्रभाव आहे त्यांचा आज कदाचित या माहितीवर विश्वास बसणार नाही पण गतकाळात काश्मिरी आणि भारतीयही डोकावले तर एक बाब लक्षात येईल ती म्हणजे शांततेचे आणि समन्वयाचे तत्त्वज्ञान देण्याची व आचरणात आणण्याची क्षमता काश्मिरी आजही बाळगुन आहेत. त्यासाठी इतिहासही माहीत असण्याची गरज आहे आणि तशाच समाज-सांस्कृतिक विचारांना घेत त्यांच्याजवळ गेले पाहिजे.
लल्लेश्वरीचा जन्म अंदाजे 1320 चा. तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील संतकवयित्री मुक्ताबाईंनी समाधी घेऊन 23-24 वर्षे झाली असतील. लल्लेश्वरीला हिंदू व मुस्लिम समुदायांत सारखाच सन्मान आजतागायत मिळत आला आहे. लल्लेश्वरीला मुस्लिम लल्ल ‘अरिफा’ म्हणतात. लल्लेश्वरी शैव आणि सुफी तत्त्वज्ञानाचा सुरेख मिलाफ घडवून आणते असे मत अनेक विद्वान तिच्याबद्दल व्यक्त करीत असतात. अर्थात आता या ऐक्याला सुरुंग लावणारी लल्लेश्वरी केवळ शैव तत्त्वज्ञ ते लल्लेश्वरी केवळ सुफी तत्त्वज्ञान मांडणारी अशी लल्लेश्वरीची सांप्रदायिक मांडणी करु लागले आहेत. असे होण्याचे मुख्य कारण लल्लेश्वरीच्या काव्याचा (ज्यांना ‘वाक’ असे म्हटले जाते) काश्मीरींवर असलेला अमिट प्रभाव. संत कबीरांप्रमाणेच लल्लेश्वरीवर दोन्ही समाजांनी मालकी दाखवण्याचा हा केवीलवाना प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. लल्लेश्वरीला आपले वाक लिहिताना अथवा गाताना जाणीवपूर्वक शैव किंवा सुफी विचार घेतलेले दिसत नसून जे काही आलेले आहे ते सरळ तिच्या हृदयातून आले आहे. ते तिचे संस्कार, चिंतन आणि स्वत:च्या अंत:करणातून उत्स्फुर्तपणे उमटलेले उद्गार आहेत. कोणते वाक अथवा विधान कोणत्या तत्त्वपरंपरेला जवळचे आहे हे शोधत तिच्यावर आपल्या कोणत्याही तत्त्वधारेचे आरोपन करणे ही आपल्या देशातील अनेक विद्वानांची प्रवृत्ती असली तरी हा या महान संत-कवयित्रीवर अन्याय करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात शैव विचारधाराच समतावादी असल्याने सुफींनीही शैवांकडून काही घेतले तर सुफींकडून गूढवाद शैवांनी स्वीकारला असे फार तर म्हणता येईल! पण ही देवाण-घेवाण जाणीवपूर्वक समन्वयवादी म्हणून नव्हे तर काश्मिरी जनमाणस मुळातच या विचारांना साजेशा असल्याने असे समन्वयात्मक वातावरण आपसूक बनले असे म्हणता येईल.
लल्लदेद (माता लल्ल) जेव्हा जन्माला आली तेव्हा काश्मीर एका वेगळ्याच राजकीय आणि वैचारिक घुसळणीतुन जात होता. इस्लामी सत्ता स्थापन झाली असली तेथील इस्लामप्रवेश हा सर्वस्वी वेगळ्या कारणाने घडला. खरे तर तोही इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. थोडक्यात तो असा -
ल्हाचन गुलाबु रिंचेन हा मुळात लडाखी राजपुत्र. तो बौद्ध धर्मिय होता. रिंचेनने आपल्या काकाविरुद्ध बंड केले पण ते फसल्याने त्याने काश्मीरमध्ये आश्रय घेतला. त्यावेळेस सुहदेव हा राजा काश्मीरमध्ये राज्य करत होता. राजा सुहदेवाने जसे रिंचेनला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले तसेच स्वात खोर्यातील शाह मीर यालाही मंत्रीपदावर बसवले. त्याच काळात झुल्चु या मंगोल आक्रमकाने काश्मीरवर धाड घातली. सुहदेवाला पळून तिबेटमध्ये आश्रय घ्यावा लागला. मोगल निघुन गेल्यावर आपल्या राजाला परत आणण्याऐवजी रामचंद्र या सुहदेवाच्या अमात्याने गादी बळकावली. त्याने रिंचेनला प्रशासक म्हणून नेमले. पुढे रामचंद्राची सत्ता बंड करुन रिंचेनने उधळली आणि स्वत:च गादीवर बसला.
काश्मीरची प्रजा बव्हंशी हिंदू होती. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माने एक आगळी तात्त्विक उंची गाठली असली व लोकही त्या धर्माचा सन्मान करीत असले तरी अभिनव गुप्तामुळे मुळची शैव विचारधारा प्रबळ होती. प्रजेचा जो धर्म तोच आपणही स्वीकारला तर आपले राजकीय अस्तित्त्व प्रबळ होईल हे त्याने हेरले. हिंदू धर्मात प्रवेश घ्यायचा म्हणून त्याने देवास्वामी या शैव गुरुंची भेट घेतली. देवास्वामीने काश्मिरी पंडितांशी विचारविमर्श पण वैदिक धर्माच्या प्रभावाखाली आलेल्या बहुतेक पंडितांचे मत पडले की भिन्नवंशीय आणि भिन्नधर्मिय रिंचेनला हिंदू धर्मात प्रवेश देऊ नये. रामास्वामीने रिंचेनला धर्मात घ्यायचे नाकारले. खुद्द राजाला धर्मांतराची परवानगी नाकारली म्हटल्यावर रिंचेन संतप्त झाला.
तेव्हा मध्यपूर्वेतुन आलेल्या सुफी पंथानेही काश्मीरमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती. बुलबुलशहा हा थोर सुफी संत काश्मीरमध्ये प्रसिद्ध होता. रिंचेनने त्याची भेट घेतली आणि इस्लाममध्ये प्रवेश केला. धर्मांतरानंतर रिंचेनचे नाव सुलतान सद्रुद्दीन शाह असे ठेवण्यात आले. त्याच्या बरोबरच त्याच्या मेव्हण्यासह दहा हजार लोकानी इस्लाम स्वीकारला. एका बुद्ध मंदिराच्या जागेवरच त्याने बुद मस्जिद (बुद्ध मशिद) बांधली. अशा रीतिने काश्मीरमध्ये इस्लाम आला व पहिली मस्जिदही उभारली गेली.
अर्थात सुफी परंपरा आणि भारतात अन्यत्र पसरलेल्या इस्लामी परंपरेत खूप अंतर आहे. सुफी परंपरा ही गूढवादी, आत्मवादी आणि इस्लामची अनेक मूलतत्त्वे नाकारणारी परंपरा आहे. हीच सुफी परंपरा अन्यत्रही, विशेषत: महाराष्ट्र आणि दक्षिणेत पसरली. त्यामुळे समन्वयवादी प्रयत्न हिंदू व सुफी संतांनी एकत्रीतपणे करुन भारतीय संस्कृतीचा आत्मा हरवु दिला नाही. अर्थात रिंचेनची सत्ता केवळ तीन वर्षे टिकली. त्याच्याविरुद्धही बंड झाले आणि त्याला ठार मारण्यात आले. सन 1320 ते 1323 एवढीच त्याची राजवट. लल्लेश्वरीचे जन्मवर्ष खरे असेल तर तिचा जन्म झाला तेव्हा रिंचेन सत्तेत आला होता. (काहींच्या मते तिचे जन्मवर्ष सन 1335 आहे.) काश्मीरची राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली होती. कट-कारस्थाने आणि बंडांना उत आला होता. पूर्वी शैव आणि बौद्ध या प्रबळ विचारधारात आता सुफी इस्लामचाही समावेश झाला होता. पुढे नुरुद्दिन नुराणी, ज्याला हिंदू ‘नंदऋषी’ असे आदराने म्हणतात, त्याने सुफी गूढवाद आणि शैव तत्त्वांचा मिलाफ करुन नवाच विचार मांडायला सुरुवात केली.
या सामाजिक व राजकीय वातावरणाचा लल्लेश्वरीवर बालपणापासुन परिणाम झाला असणे सहज शक्य आहे. प्रत्येकावर असा प्रभाव पडत असला तरी त्या प्रभावाच्या कक्षा व दिशाही वेगवेगळ्या असतात. लल्लेश्वरी शैव वातावरणात वाढली तसेच सुफी प्रभावाचाही तिच्यावर परिणाम होत तिची स्वतंत्र द़ृष्टी विकसित होत गेली असे म्हणता येईल. काश्मीरमध्ये मुळात वैदिक प्रभाव वाढण्याआधी स्त्री स्वातंत्र्य पुरुषाइतकेच होते. काश्मीरला लोक मुळात सती-पार्वतीची भुमी मानतात कारण काश्मीरच्या जागेवर प्राचीन काळी ‘सतीसार’ नावाचे सरोवर होते आणि तेच कोरडे झाल्यानंतर तेथे मानवी वस्ती होऊ लागली अशी श्रद्धा आहे.
शिवाय नंतरच्या काळातील कवी आपले विचार/भावना/समज जुन्या कवीच्या किंवा लेखकाच्या लोकप्रियतेचा उपयोग करण्यासाठी अथवा ते विचार त्याचेच असा भास निर्माण करण्यासाठी घुसवून देत असतात. आपल्याकडे व्यास, कात्यायन, चाणक्य अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव ते तुकारामांसारख्या संतांनाही या अर्धप्रतिभेच्या घुसखोर लेखकांनी आपल्या रचना त्यांच्या नावावर खपवून असेच छळले आहे. त्यामुळे मूळ लेखकाचीच प्रतिमा आपण अकारण धुमिल करत आहोत याचे भान या लेखकांच्या लक्षात आलेले नसते किंवा त्या कृतीमागे अन्य काही कुटील हेतू असतो. असे असल्याने गतकाळातील साहित्याची चिकित्सा अधिक काटेकोरपणे करावी लागणार आणि मूळचे नेमके काय आहे हे ठरवावे लागणार हे निश्चितच आहे. महाराष्ट्रात अनेक संतसाहित्यात प्रक्षिप्त अभंगांची घालघुसड झाली असल्याचे लक्षात आल्यावर चिकित्सक शुद्ध आवृत्या प्रसिद्ध करण्याची गरज भासली. इतिहासाचेही आकलन त्यामुळे बदलण्यास मदत झाली. लल्लेश्वरीही याला अपवाद राहिली नाही. अनेक विद्वानांनी लल्लेश्वरीचेच असे मूळ काव्य तत्कालीन भाषा, शैली, प्रतिमा इत्यादीवरुन निश्चित करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. शिवाय लल्लेश्वरीच्या असंख्य कविता 1975 पर्यंत तरी काश्मीर खोर्यातील लोकानी मुखोद्गत पद्धतीने जतन केलेल्या होत्या. त्यात कालौघात शब्दबदल होणेही शक्य होते. त्यात घालघुसड होणेही शक्य होते. त्यामुळे विद्वानांना लल्लेश्वरीच्या मूळ रचना, तिची शैली आणि मूळ भाषा शोधत संपादन करणे आवश्यक बनले होते. सर मार्क आरेल स्टीन यांना शारदा लिपीत लिहिलेल्या केवळ पंधरा कविता एका त्रुटीत हस्तलिखितात मिळाल्या होत्या. दुसरे एक हस्तलिखित सापडले त्यात लल्लेश्वरीच्या 49 रचना होत्या. 1920 साली ग्रियर्सनने लल्लेश्वरीच्या त्याला लिखित स्वरुपात झालेल्या रचनांचा अनुवाद प्रसिद्ध केला. त्या छापील स्वरुपात उपलब्ध नव्हत्या. त्या जमा करणे, मुखोद्गत ठेवताना नकळत होणारे बदल टिपने हेही एक मोठे आव्हान होते. लल्लेश्वरीच्या नावावर असलेल्या 228 कवनांपैकी केवळ 138 कवने लल्लेश्वरीची आहेत असे जयलाल कौल यांनी ठरवले होते. त्यात अजूनही अन्य स्त्रोतांतुन उपलब्ध झालेल्या आणि अस्सल ठरवण्यात आलेल्या कवनांचा समावेश होऊन 1975 मध्ये पहिल्यांदाच लल्लेश्वरी छापील माध्यमात अवतरली.
असे असले तरी तिला सुफी अथवा शैव गोटात ओढण्याचे प्रयत्न होतात. याचे कारण तिच्या काश्मिरी हृदयावर शतकानुशतके राज्य करण्याच्या अलौकीक शक्तीमुळे हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पाहिले तर लल्लेश्वरी शिवभक्त होती. शिवयोगिनी होती पण तिने निवडलेला आध्यात्माचा मार्ग हा स्वतंत्र ओता. तिची अभिव्यक्ती सुफीवादासारखी गूढ असली तरी तत्त्वज्ञान स्वतंत्र होते. काश्मिरी मनांना धर्म वेगळे असले तरी भावनिक व सांस्कृतिकदृष्ट्या बांधुन ठेवण्याचे तिने अनमोल कार्य केले. अर्थात आपण असे काही कार्य करत आहोत याचे भान त्या उन्मुक्त योगिनीला असेल असे नाही. ती सहृदय आध्यात्मिक अंत:करणाने आपली अभिव्यक्ती करत गेली. अजरामर झाली. आज काश्मीरला समजावुन घ्यायचे असेल आणि काश्मिरींनाही समजवायचे असेल तर लल्लेश्वरीने प्रदीप्त केलेला शुद्ध अंत:करणाचा दीप आपल्या हाती असायला हवा! आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा. Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.
.jpg)







Comments