संस्मरणीय लाडोबा महोत्सव!
- Jyoti Ghanshyam
- Apr 29, 2025
- 7 min read
२६ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था, संगमनेर आणि 'लाडोबा प्रकाशन', पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लाडोबा महोत्सवाचा एक भाग होता आले, ही फार मोठी उपलब्धी आहे.
आयोजक, प्रायोजक, संयोजक यांची साहित्यावर निष्ठा, प्रेम आणि भक्ती असल्यामुळे खास बालक-पालक आणि शिक्षक यांच्यासाठी असलेला महोत्सव किंवा कार्यशाळा कमालीची यशस्वी झाली हे निश्चित! विद्यार्थ्यांची उपस्थिती नि प्रतिसाद, शिक्षकांची तळमळ आणि साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले साहित्यप्रेमी तांबे कुटुंबीय, माजी आमदार श्री सुधीर तांबे, संगमनेर येथील नगराध्यक्षा तथा अध्यक्ष अ.भा.म.बालकुमार संस्था संगमनेर तसेच साहित्य चळवळीशी स्वयंस्फूर्तीने जोडले गेलेले कार्यकर्ते, आपल्या लेखणीच्या आणि शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून राज्यभर ख्यातकीर्त असलेले प्रा. संदीप वाकचौरे यांचा संमेलनाच्या यशात प्रशंसनीय, महत्त्वपूर्ण वाटा होता. तसेच श्री. संजय मालपाणी उद्योजक यांचा आयोजनातील सहभाग महत्त्वाचा जाणवत होता.

२६ एप्रिल रोजी घनश्याम पाटील यांच्या नियोजनानुसार सकाळी बरोबर साडेपाचच्या सुमारास आमचे सहा जणांचे दोन 'साहित्य रथ' पुणे येथून संगमनेरकडे मार्गस्थ झाले. चपराक परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मित्रवर्य रवींद्र कामठे हे स्वतः वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी त्यांचा 'रथ' पाठवून दिला. आमच्या साहित्यरथाचे सारथ्य करत होते, चपराक आणि लाडोबाचे प्रकाशक, घनश्याम पाटील! दुसऱ्या साहित्यरथाचे साहित्य सारथ्य करीत होते उद्योजक आणि मित्रवर्य प्रमोद येवले! आहे की नाही सुवर्णयोग! अत्यंत शांत, संयमी,अभ्यासू अशा या व्यक्तिंच्या सहवासात आमचा प्रवास सुरु झाला. सौ. शकुंतला काळे, नागेश शेवाळकर (हे दोन म्हातारे नव्हे तर महातारे), रसिका तुळजापूरकर आणि अक्षय उपळेकर हे दोन तरुण आणि या महोत्सवातच नव्हे तर संपूर्ण प्रवासात चैतन्याचा झरा निर्माण करणारे असे जोडपे... अर्थातच घनश्याम पाटील आणि त्यांच्या सुविद्य, उच्चशिक्षित, चित्रपट गीतकार पत्नी सौ. ज्योती! आमच्यासोबत हसतमुख असलेले दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे दयानंद महापुरे. कुणी काही काम सांगण्यापूर्वी त्यांची मदत करणारा असा 'दया'वान!
आमच्या हसतखेळत, चर्चांच्या फेरी झडत असताना घनश्याम यांचे विद्वत्तापूर्ण संभाषण ऐकताना आळेफाटा आला. तिथे सौ. काळेताईंच्या दिराचे 'गुरुदेव' नावाचे प्रशस्त हॉटेल आहे. ताईंच्या आग्रहास्तव आम्ही त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो आणि अगदी घरी नाष्टा करावा असा चविष्ट नाष्टा कसला जेवणच केले.
संगमनेर येथील विश्रामगृहावर पोहोचताच मित्रवर्य संदीप वाकचौरे यांनी स्वागत केले. त्यांच्यासोबत प्रसिद्ध साहित्यिक, साहित्य अकादमी बालकुमार पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड आणि ज्येष्ठ लेखक गोविंद गोडबोले ह्या दोघांची भेट झाली. थोडावेळ गप्पा रंगल्या. पुन्हा एकदा नाष्टा, चहा झाला. सकाळी दहाच्या सुमारास आम्ही सहकारमहर्षी भाऊसाहेब सं. थोरात वरिष्ठ महाविद्यालय, संगमनेर या भव्य वास्तुच्या प्रांगणात पोहोचलो. महाविद्यालयाचा भव्य आणि सुशोभित परिसर पाहून मन प्रसन्न झाले. तिथे पोहोचताच श्री. दत्तात्रेय आरोटे, प्राचार्य वाघ यांनी सन्मानपूर्वक कार्यालयात नेले. तिथे सौ. दुर्गाताई तांबे यांनी महाविद्यालयाच्या वतीने आमचा सत्कार केला. मागोमाग चहाचे कप आले. त्यावेळीच नाही तर दोन दिवस जेव्हा जेव्हा कार्यालयात जाण्याचा योग आला तेव्हा हक्काने चहा, कॉफी, लेमन टी पिण्याचा आग्रह करणारे, कुणी नकार दिलाच तर... 'असं कसं तुम्ही चहा घेतला नाही तर माझी मेहनत फुकट जाईल त्याचे काय?' किंवा 'घ्या हो, देवाचा प्रसाद आहे, घ्या.' अशी प्रेमपूर्वक गळ घालणारे सोबतच जेवणात विविध पदार्थांची गरमागरम मेजवानी देणारे श्री. तुषार गायकर आणि सुरेश शिंदे यांचे आदरातिथ्य मनाला भिडत होते. संगमनेरच्या यजमानांची 'अतिथी देव भव' ही वृत्ती नमन करणारी अशीच. सौ. दुर्गाताई तांबे ह्यांनी उद्घाटनप्रसंगी केलेले मनोगत त्यांच्या साहित्यावरील प्रेमाची नि निष्ठेची पावती देत होते. श्री. संदीप वाकचौरे ह्यांचे सूत्रसंचालन लक्षवेधक असेच!


उद्घाटनप्रसंगी नागेश शेवाळकर यांच्या 'पवनपुत्र हनुमान' आणि भरत पाटील यांनी लिहिलेल्या 'फुलताना' या संग्रहाचे थाटात प्रकाशन झाले.

लाडोबा महोत्सवातील पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील पहिले पुष्प गुंफले ते ख्यातकीर्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी! त्यांनी आपला साहित्य प्रवास रंजकतेने, प्रसंगी काव्य सादर करुन कथन केला. त्यांची कविता वाचून विदर्भातील एका बालवाचकाने स्वतःच्या पुस्तकात सांभाळून ठेवलेले मोराचे पीस पाठवले ही हृदयस्पर्शी कथा सांगितली आणि श्रोते अवाक् झाले. आव्हाड यांनी लेखन आणि वाचन या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. त्यांच्या साभिनय संवाद कौशल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गोविंद गोडबोले यांचा ऐक्याऐंशीव्या वर्षी असलेला उत्साह, तळमळ, हावभाव आणि सादरीकरण पाहून शिक्षक, पालक,विद्यार्थी आणि लेखक आश्चर्यचकित झाले. अनेक पिढ्यांना माहीत असलेली, वारंवार ऐकलेली 'ससा आणि कासव' ही गोष्ट ससा नि कासव यांच्या चार पिढ्यांमध्ये रंगलेल्या शर्यतीचे वर्णन साभिनय नि अनोख्या आवाजात सादर केले. बालकांना त्यांनी योग्य मार्गदर्शनही केले.

'चला... कविता लिहूया' ह्या सत्रात एरोनॉटिकल इंजिनिअर ही पदवी प्राप्त असलेल्या, बालकांमध्ये रमणाऱ्या, त्यांनी वाचावे, लिहावे ही तळमळ असणाऱ्या चित्रपट गीतकार, लाडोबा मासिकाच्या ऑनलाईन संपादक सौ. ज्योती घनश्याम यांनी सखोल, अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. कविता लिहिताना त्यांनी त्यातील विविध बारकावे सोदाहरण सादर केले. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे या त्यांच्या तळमळीला, आवाहनाला विद्यार्थ्यांनी तत्काळ उत्तम प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी ज्योती यांना कविताही लिहून दिल्या. तो प्रतिसाद पाहून ज्योती घनश्याम यांनी त्यांना स्वतःचा संपर्क क्रमांक दिला आणि 'तुम्ही जे काही लिहाल ते मला पाठवा. तुम्हाला केव्हाही मदत करायला मी तयार आहे' असे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केलेले मुद्दे ऐकताना एक लेखक-वाचक म्हणून मलाही अनेक गोष्टी नव्याने समजल्या.


सध्या अभिवाचन हा साहित्य किंवा वाचन प्रकार ही कला आत्मविश्वासाने पुढे नेणाऱ्या काही व्यक्ती आहेत. विशेषतः आजची तरुणाई या क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. यावरुन वाचन संस्कृती लयाला जात आहे या चर्चेला परस्पर उत्तर मिळत आहे. 'अभिवाचन कला फुलवा' हे रसिका आणि अक्षय यांचे सत्र उल्लेखनीय ठरले. त्यांनी वाचन आणि अभिवाचन यातील फरक स्पष्ट करताना प्रथम बाराखडीचे वाचन कसे करावे सोदाहरण स्पष्ट केले. मनोरंजनातून अभिवाचन हा त्यांच्या सत्राचा आत्मा होता. वेगवेगळे आवाज काढणे, हास्यलहरी फुलवणे हे सारे श्रोत्यांच्या पसंतीला उतरत होते, त्यामुळे दोघांचाही उत्साह शिगेला पोहोचला होता. या सत्राने पहिल्या दिवसाची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून सादरकर्त्यांचा उत्साह, मनोबल निश्चितच वाढले. अधूनमधून ताकाची मेजवानी सर्वांना आवडली.

पहिला दिवस संपला. दिवसभर सोबत असणाऱ्या सौ. दुर्गाताई पुन्हा कार्यालयात घेऊन गेल्या. त्यांचा आग्रह मोडता आला नाही. चहाचा आस्वाद घेत असताना सौ. तांबे यांना डॉ. तांबे यांचा भ्रमणध्वनी आला. ते येत असल्याचा निरोप त्यांनी दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले. डॉ.सुधीर तांबे साहेब येईपर्यंत संगमनेर येथील खास भेळ आमच्यापुढे आली. नाही म्हणायची संधी नव्हती... हक्काचा प्रेमळ हट्ट टाळताच आला नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे आगमन झाले. डॉ.सुधीर तांबे दिवसभर इतर कामांमध्ये व्यग्र असतानाही आपल्या शहरात आणि आपल्या संस्थेत आलेल्या पाहुण्यांची भेट घेण्याची त्यांची तळमळ मनाला भिडणारी होती. त्यांच्यासोबतच्या गप्पा म्हणजे महोत्सवातील एक चर्चासत्रच होते असे म्हणावे लागेल.
विश्रामगृहावर पोहोचताना संगमनेर येथील साहित्यिक आणि चपराक परिवारातील लेखक यांचा आग्रह मोडणे शक्यच नव्हते. तसेच उच्च पदावर काम करताना सौ. काळेताईंनी जोडलेली माणसे भेटायला येत होती. घरी येण्याचा आग्रह करत होती. प्रत्येकाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. रात्री साडेआठच्या सुमारास विश्रामगृहावर पोहोचलो. वास्तविक भूक नव्हती परंतु पुन्हा आग्रह मोडता आला नाही. जेवण करून खोलीवर परतताच खूप मस्त झोप लागली...!
२७ एप्रिल दुसरा दिवस! सात वाजता चहा तयार! साडेआठ वाजता नाष्टा- चहा होत असताना श्री. संदीप वाकचौरे ह्यांचे आगमन झाले. आम्ही महोत्सवस्थळी जात असताना काही यजमान आमची वाट पाहत होते. त्यामुळे एक-दोन घरी धावती भेट देऊन आम्ही साडेदहाच्या सुमारास महोत्सव ठिकाणी पोहोचलो. रविवार असूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
https://www.youtube.com/watch?feature=shared&v=n006PAkK8rA
उद्घाटनप्रसंगी सौ. शकुंतला काळे यांचे श्रवणीय, विद्वत्तापूर्ण भाषण ऐकायला मिळालेच होते. तोच धागा पकडून सौ. शकुंतला काळे यांनी पहिले सत्र सुरू करताना सभागृहासमोर वाचनाचे, लेखनाचे महत्त्व विशद केले. त्यांचे अनुभव सांगताना ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावले. जेमतेम पंधरा वर्ष वय असलेल्या मुलीचे लग्न ठरते, तेव्हा त्या काळातील तरुणी पतिदेवाच्या कुटुंबीयांसमोर एक अट घालते, ती मान्य असेल तरच मी लग्न करायला तयार आहे, अन्यथा नाही. कोणती होती अट? लग्नानंतर त्या मुलगी इच्छा असेल तोवर शिक्षण घेण्याची परवानगी! सासरच्या मंडळींनी ती अट मान्य केली आणि नवरी बोहल्यावर चढली परंतु खरा संघर्ष सुरू झाला. संसार सुरू झाला... खडतर प्रवास सुरू झाला. एकामागोमाग एक परीक्षा उत्तीर्ण करत, नोकरीत एक-एक पायरी चढत जाणारी ती कन्या शिक्षिका, प्राध्यापक असा प्रवास करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची अध्यक्ष होते. हा चित्तथरारक प्रवास ऐकणारे मंत्रमुग्ध झाले नसतील हे शक्यच नाही. हा प्रेरणादायी प्रसंग सांगून डॉ. शकुंतला काळे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांचेही उत्कृष्ट उद्बोधन केले.

दुसरे सत्र! लेखकांशी गप्पा या सत्रात प्रथम नागेश शेवाळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या माध्यमातून बोलते केले. विद्यार्थ्यांच्या आवडी जाणून घेताना काही विद्यार्थ्यांनी 'मोबाईल' असे उत्तर देताच त्यांनी भ्रमणध्वनीचे महत्त्व विशद करून त्याचे तोटेही सांगितले. मोबाईलचा अनावश्यक आणि अतिवापर होत असल्यामुळे 'ब्रेन रॉट' हा आजार जडत असल्याचे सांगून त्या आजाराची लक्षणे सांगून हा आजार कसा टाळावा असा प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे 'मोबाईल कमी वापरावा' असे उत्तर दिले. सोबतच त्यांनी खेळाचे महत्त्वही स्पष्ट केले.

प्रशांत केंदळे ह्या कवीने अल्पावधीतच रसिकांच्या, वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांची 'गुलमोहोराचं कुकू' ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अनेक गायकांनी त्या कवितेला आवाज दिला आहे. घनश्याम पाटील यांनी त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. घनश्याम-ज्योती यांच्या लग्नात ही कविता मंगलाष्टक म्हणून गायिली हे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रशांत यांनी कविता लेखनविषयक अनुभव सादर करताना अनेक कवितांचे धारदार आवाजात, साभिनय सादरीकरण केले. तेव्हा विद्यार्थ्यांनी नकळत साथ दिली.
संगमनेर येथील भूमीपुत्र, लेखक, पत्रकार संतोष खेडलेकर ह्यांनी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांसोबत गप्पा मारताना शुद्धलेखनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच 'व्यस्त' हा शब्द हिंदी भाषेचा असूनही आपण सररास मराठीत त्याचा वापर करतो. व्यग्र हा मराठी शब्द आपण दुर्लक्षित करतो हे निदर्शनास आणले तेव्हा शुद्धलेखनासाठी आग्रह धरणारे घनश्याम पाटील यांच्याकडे उपस्थित चपराक परिवारातील सदस्यांचे लक्ष गेले. 'व्यस्त ऐवजी व्यग्र वापरा' हा पाटलांचा कटाक्ष नि आग्रह असतो.
शशिकांत शिंदे यांची एक कविता आणि एक स्थानिक कवी अशा दोघांनी आपल्या कविता सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी मित्रवर्य संदीप वाकचौरे हे एका कार्यशाळेसाठी हैद्राबाद येथे जात असल्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या विविध सत्रांचे बहारदार सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय आरोटे यांनी केले. त्यांचा एकूण वावर आश्वासक होता.

दोन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण चाललेल्या लाडोबा महोत्सवाचा समारोप डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांच्या मनोगतातून त्यांची साहित्य विषयाची आस्था नि प्रेम जाणवले. त्यांच्या स्वतःच्या वाचनालयात हजारो पुस्तके आहेत हे समजताच त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौ. दुर्गाताई तांबे ह्या स्वतः नगराध्यक्ष असतानाही त्यांची साहित्यविषयक तळमळ तेव्हा जाणवली जेव्हा त्यांनी स्वतः संकलित केलेले 'पारंपरिक ओव्या' हे पुस्तक आम्हाला भेट दिले. 'ओवी'कार सर्व महिला ह्या संगमनेर आणि नाशिक परिसरातील आहेत. बहुतांश महिलांना अक्षरओळख नाही. एक महिला दहावी, दुसरी बारावी तर काही महिलांचे शिक्षण हे तिसरी-चौथीपर्यंत झाले आहे. त्यांच्या ओव्या ह्या स्वयंस्फूर्त आणि उद्बोधक आहेत.या महिलांना आणि त्यांच्या रचनांना समाजापुढे ठेवण्याचे पावन कार्य सौ. दुर्गाताईंच्या हातून घडले ही फार मोठी समाजसेवाच आहे. तांबे दांपत्याचा आदर्श सर्वांनी अंगीकृत करावा असाच आहे.
https://www.youtube.com/watch?v=i6sRW5FEO9s
समारोपानंतर उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन संगमनेरकरांचे आदरातिथ्य आणि साहित्य प्रेम लक्षात घेऊन जड अंतःकरणाने आम्ही निरोप घेतला. मार्गस्थ होण्यापूर्वी पुन्हा एकदा काही व्यक्तिंचा आग्रह मोडता आला नाही. धावती भेट देत आम्ही पुण्यनगरीकडे मार्गस्थ झालो. संस्मरणीय आठवणींची शिदोरी सोबत होती.

हे संमेलन माझ्या कायम लक्षात राहिल ते 'पवनपुत्र हनुमान' या पुस्तकाचे झालेले दमदार, थाटामाटात झालेले प्रकाशन! तसेच माझे शेवाळकर आडनाव समजताच गुरुवर्य राम शेवाळकर यांच्या आठवणींना मिळणारा उजाळा! ही चर्चा माझ्यासाठी नेहमीच एक आनंदोत्सव असतो.
अशारीतीने एका संस्मरणीय महोत्सवात भाग घेऊन, भरपूर अशी अवीट शिदोरी घेऊन निघालो...
००००
नागेश शेवाळकर, पुणे
९४२३१३९०७१
.jpg)






Comments