सुहाना सफर और ये मौसम हंसी... | Suhana Safar Aur Ye Mausam Haseen
- Jyoti Ghanshyam
- Jun 6, 2025
- 30 min read
"वर्ष नेमकं कोणतं ते आठवत नाही, पण एका आठ मार्चला सकाळी डॉक्टर शशांक शहा यांचा फोन आला आणि त्यांनी मला चार वाजता पुण्याच्या हॉटेल ब्लू डायमंडमध्ये एका समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं. खरं म्हणजे, त्यावेळी एखादा समारंभ आहे आणि तो आपल्याला कव्हर करायचा आहे, असंच समजून मी तिथे पोहोचले; पण तिथे माझा सत्कार करण्यात आला. तो कशासाठी होता हे मला नीटसं कळलं नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी मी आयसीयूमध्ये ॲडमिट असलेल्या आणि चुकीने लिव्हर काढून टाकण्यात आलेल्या एका पेशंटची मुलाखत केली होती आणि ती आमच्या चॅनलवर दाखवण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की, त्यामुळे गरीब घरातल्या त्या मुलाला त्याच्या ट्रीटमेंटसाठी जवळपास १८ लाख रुपयांची मदत काही दिवसांतच उभी राहिली आणि त्याचं लिव्हर ट्रान्सप्लान्ट होऊन जीव वाचला. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना सर्वाधिक समाधान देणारा तो दिवस होता. आपल्या एका बातमीमुळे कोणाचा तरी जीव वाचला या बाबीचं खूप समाधान त्या दिवशी मिळालं आणि मग मी विचार करू लागले की, पत्रकार व्हावं हे स्वप्न मी खरंच कधी पाहिलं होतं का? तर मुळीच नाही! आमच्या घरात सगळे डॉक्टर्स, वडील हेडमास्तर, अशा परिस्थितीत एकतर डॉक्टर होणे किंवा शिक्षक, या दोनच पर्यायांचा मी विचार केला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात आले ती केवळ लिहिण्याची आवड असल्यामुळे.
मला आठवतं, १९८६ ला मी बारावीत होते. न्यायाधीश काका, म्हणजे प्राध्यापक चंद्रकांत न्यायाधीश हे माझ्या बाबांचे घनिष्ठ मित्र. त्यांनी मला आकाशवाणीवर त्या वेळचे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक नाथ यांची मुलाखत घेशील का, म्हणून विचारलं. बारावीत असलेल्या मला त्या गोष्टीचं खूपच अप्रूप वाटलं. मी अर्थातच ‘हो’ म्हणाले आणि ती मुलाखत घ्यायला अगदी उत्साहाने आकाशवाणी केंद्रावर नियोजित वेळी पोहोचले. मी खूप प्रश्न काढून ठेवले होते आणि मला वाटलं की आपणच ती मुलाखत घेणार आहोत; पण मी जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा लक्षात आलं की अन्य तीन जणांसोबत मी एक मुलाखतकर्ती आहे. मुलाखत घेणारे बाकी सगळे वरिष्ठ पत्रकार होते आणि मी अगदीच नवखी. त्यामुळे ती मुलाखत घेताना मला तोंड उघडायची संधी मिळाली नाही. जसजसा वेळ पुढे सरकू लागला, तशी मी अस्वस्थ होत गेले. शेवटी मध्येच घुसखोरी करत ‘‘तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे कसे वळलात?’’ असा एकमेव प्रश्न त्यांना विचारला. त्यांनी उत्तर दिलं आणि मुलाखत संपली. मला आठवतं, माझ्या त्या एका वाक्याच्या प्रश्नासाठी मला तब्बल ७५ रुपये मानधन मिळालं आणि आमच्या घरातले सगळे लोक रेडिओ लावून ते एक वाक्य ऐकण्यासाठी कान टवकारून बसले होते. बरं, त्यावेळी ते रेकॉर्ड करून ठेवणं वगैरे अशी सुविधाही नव्हती; म्हणून सगळे ऐकायला बसले आणि मला आठवतं, कधी एकदा तो प्रश्न ऐकायला मिळतो म्हणून माझी आजी-आजोबा, आई-बाबा सगळेच बसलेले होते. शेवटी एकदाचा तो प्रश्न त्यांच्या कानी पडला आणि त्यांना अतिशय आनंद झाला. मी पण हरखून गेले. रेडिओवर जणू काही माझा खूप मोठा कार्यक्रम झाला होता, अशा आनंदात होते. ती माझी पत्रकारितेतली पहिली कामगिरी! त्यानंतर मराठवाडा दैनिकात ‘हवा कॉलेजची’ हे युवकांसाठी एक पान असे. त्या पानासाठी काही विद्यार्थ्यांची निवड केली जाई आणि आठवड्यातून एकदा कॉलेजविश्वाशी संबंधित मजकूर त्या पानावर छापला जायचा. माझीही त्या पानासाठी निवड झाली आणि मग मी अति उत्साहात तिथे कॉलेज विश्वातल्या बातम्या लिहायला सुरुवात केली. त्यावेळी आपण खूप वाचतो आणि संस्कृत सुभाषित, उर्दू शेरोशायरी आपल्याला खूप पाठ आहे याची फुशारकी वाटायची आणि मग माझ्या प्रत्येक लेखात त्यांची पेरणी केलेली असायची. हे एक-दोनदा झाल्यानंतर एकदा आम्ही ऋषितुल्य पत्रकार अनंतराव भालेराव यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. ते तेव्हा मराठवाडाचे संपादक नव्हते. संपादक होते पन्नालालजी सुराणा; पण अनंतराव भालेरावांनी मला ओळख होताच एक सूचना केली. ते म्हणाले, ‘‘तू छान लिहितेस; पण यापुढे इतर कोणत्याही लेखकाचा एकही शब्द न वापरता फक्त स्वतःचे शब्द वापर!’’ आणि मग संस्कृत सुभाषितांची आणि उर्दू शेरोशायरीची माझ्या लेखात असलेली पखरण वगळून लिहिणं किती कठीण आहे हे लक्षात आलं. सोपं लिहिणं सगळ्यात अवघड असतं; पण त्या दिवसानंतर अगदी गरज असेल तरच अन्य लेखकाचे शब्द वापरायचे हा वस्तुपाठ मला मिळाला आणि तो मी कायम पाळला. आकाशवाणी आणि ‘हवा कॉलेजची’नंतर मी आधी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मग रीतसर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मी शिकले तेव्हा विद्यापीठाचे नाव ‘मराठवाडा विद्यापीठ’ होते. नामविस्तार व्हायचा होता. आधी बीजे आणि मग सलग एमजे असे दोन वर्ष पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुधाकर पवार, सुधीर गव्हाणे, सुखराम हिवराळे, सुरेश पुरी, वि. ल. धारूरकर अशी प्राध्यापक मंडळी होती. त्या विद्यापीठात दोन वर्षांत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या; पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव फारसा घेता आला नाही. म्हणजे दूरचित्रवाणी या माध्यमाचा, कारण मुळात दूरदर्शनशिवाय दुसरे कुठलेही चॅनल तेव्हा नव्हते. त्यामुळे त्या क्षेत्रात थेट काम केलेली प्राध्यापक मंडळी शिकवायलाही नव्हती. आम्ही टीव्ही पत्रकारिता शिकलो ती पूर्ण थेरेटिकल. प्रॅक्टिकलचा मुळीच संबंध आला नाही. दोन वर्षांत कॅमेरा बघायलाही मिळाला नाही.
दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव सुरू झाला तो दैनिक ‘देवगिरी तरुण भारत’मध्ये काम करताना. मला आठवतं, या दैनिकात आम्ही सगळी तरुण मंडळी होतो. त्यात मी एकटी मुलगी! अतिशय संयमी, शांत स्वभावाचे मनोहर कुलकर्णी सर हे आमचे संपादक. वृत्तसंपादक होते मुकुंद कुलकर्णी. मुकुंदरावांनी आम्हा सगळ्यांना घासूनपुसून तयार केले. काम करायचं स्वातंत्र्य; पण प्रसंगी छडी घेऊन मास्तर एखाद्याला शिकवतो, तसं मुकुंदराव आमचं रॅगिंग घेत असत. एखादी गोष्ट चुकली की मुकुंदराव चष्म्यातून बेरक्या नजरेने बघायचे आणि मग आम्हाला धडकीच भरायची! पण खूप गमतीचे दिवस होते. खूप शिकता आलं, खूप काम करता आलं. मनोहर कुलकर्णी सर मोजकं बोलत. ते अतिशय डौलदार भाषेत लिहायचे. दैनिक छोटं होतं, रुजत होतं; त्यामुळे सगळ्यांना सगळं करण्याची मुभा होती. कित्येकदा तर मी फोटोग्राफीच्या डार्करूममध्ये जाऊन फोटोही डेव्हलप केले होते. त्यावेळी डीटीपी ऑपरेटर, पेस्टर अशी सगळी गंमत असायची. तब्बल पाच वर्षे देवगिरी तरुण भारतमध्ये काम केलं. त्यानंतर पुण्यात आले आणि ‘लोकमत’ला दाखल झाले. लोकमतची आवृत्ती पुण्यात सुरू होणार होती, त्याच्या दहा-पंधरा दिवस आधीच आम्ही काही मंडळी तिथे रुजू झालो. शेखर कानेटकर हे त्यावेळी लोकमतचे वृत्तसंपादक. अतिशय शिस्तीचे शिवाय किस्से रंगवण्यात एक नंबर. त्यांची कॉपी अगदी नेटकी असे. हस्ताक्षर सुरेख. कानेटकरांनी पुण्यातल्या अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. नवनवीन बातम्या करण्याची, सदर लिहिण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर सोडताना मला झालेला त्रास विसरून मी हळूहळू पुण्यात रुळत गेले. पुण्यात कामाची संधी तर मिळालीच; पण या शहराच्या कधी आणि कशी प्रेमात पडले ते कळलंच नाही. लोकमतमध्ये शेखर कानेटकर यांच्यासोबतच अरविंद गोखले, विजय कुवळेकर, कुमार केतकर अशा दिग्गज संपादकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अर्थातच कक्षा रुंदावत गेल्या आणि लोकमतमध्ये रुळत असतानाच माझी मैत्री श्रुती वर्मा या एनडीटीव्हीच्या त्या वेळच्या प्रतिनिधीशी झाली. मी, चंद्रन आणि श्रुती जवळपास रोज भेटत असू आणि मग श्रुतीने मला टीव्हीमध्ये काम करण्याबद्दल सुचवलं. मी अर्थातच तयार नव्हते; कारण प्रिंटमध्ये मी खूप एन्जॉय करत होते. श्रुतीने म्हणाली, ‘‘एक साल कर के देख लो, अगर पसंद नही आया तो वापस प्रिंट जॉईन करो!’’ तिचा हा सल्ला मनावर ठसला. मी लगेच टीव्हीसाठी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यावेळी अगदी मोजके चॅनल्स होते आणि बहुतांश ठिकाणी माझे कोणी जुने सहकारी किंवा मित्र कामाला होते. त्यामुळे तिथे अर्ज करण्याचा प्रश्नच नव्हता. दोनच पर्याय दिसत होते: सहारा टीव्ही किंवा दूरदर्शन. त्यातही दूरदर्शनला पूर्ण वेळ रिपोर्टर न घेता स्ट्रिंगर घेण्याची पद्धत होती. म्हणून मी सहारा टीव्हीसाठी प्रयत्न सुरू केले. विनोद दुआ तेव्हा सहाराचे समूह संपादक होते. त्यांचा फोन नंबर मिळवून मी त्यांना अनेक वेळा कॉल केले. बरं, माझ्या अटीही होत्या, मला नॅशनलसाठीच काम करायचं होतं, शिवाय पुण्यातच काम करायचं. या सगळ्या अटींवर कोणी नोकरी देईल अशी शक्यता नव्हती. मी विनोद दुवांना पुण्यातून नॅशनलसाठी कुठल्या स्टोरी होऊ शकतात याचा एक मोठा फॅक्स केला. त्यानंतर त्यांनी मला आरूप घोष यांच्याशी संपर्क करायला सांगितला. त्यांनी दिल्लीला भेटायला बोलावलं. त्यांनी स्पष्ट केलं की कॅमेराही मलाच करावा लागेल. कॅमेऱ्याचं कुठलंही प्रशिक्षण झालेलं नव्हतं. ते सोडा, साधा फोटोग्राफीचा कॅमेराही मी फारसा बघितलेला किंवा हाताळलेला नव्हता. अशा परिस्थितीत मला कॅमेरा करण्याची संधी मिळाली. जेमतेम आठ दिवस दिल्लीतच प्रशिक्षण देण्यात आलं आणि मग तो मोठा कॅमेरा, ट्रायपॉड, बॅटरी, माईक असा जामानिमा घेऊन मी पुण्यात दाखल झाले. फार भारी वाटलं होतं, कारण सहाराची तेव्हा एअरलाइन्स होती. सहाराने आम्हाला मोफत विमान तिकिटांची एक पुस्तिकाच दिली होती. सहाराच्या काउंटरवर जायचं, त्यातली एक स्लिप फाडून द्यायची आणि बोर्डिंग पास घेऊन विमानात बसायचं! बरं, सहाराची विमानसेवा ही अतिशय उत्कृष्ट होती. सहारा प्रणाम म्हटलं की प्रत्येक व्यक्ती आपण कोणीतरी कुटुंबातले आहोत अशा पद्धतीने मदत करायची! पण खरी परीक्षा सुरू झाली ती जेव्हा मी काम सुरू केले तेव्हा. पहिलंच शूट लता मंगेशकर यांचं होतं, तेही ताज हॉटेल ब्लू डायमंडला. मी कॅमेरा, ट्रायपॉड, माईक असा सगळा जामानिमा घेऊन पहिला शॉट घेतला, तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू? मग काय, खूप उत्साहात अनेक शॉट घेतले. खरी गंमत आली ती बाईट घेताना, कारण मी माईक काढला आणि तो समोर ठेवायला गेले, तेव्हा लक्षात आलं माईक आणि कॅमेऱ्याला जोडणारी केबल माझ्या ऑफिसने दिलीच नव्हती. त्या केबलला काय म्हणतात हे माहीत नव्हतं. मग बाईट कसा घ्यायचा हा प्रश्न पडला. कॅमेऱ्याच्या एम्बियंस माईकवर बाईट रेकॉर्ड केला; पण त्यामध्ये आवाज व्यवस्थित येण्याऐवजी सगळा गोंगाटच रेकॉर्ड झाला होता. मी ऑफिसच्या गुलशनजींना फोन केला आणि त्यांना ‘केबल का दिली नाहीत?’ म्हणून विचारलं. ते मला म्हणाले, ‘वही एक्सएलआर बना लो ना!’ आता ही ‘एक्सएलआर’ म्हणजे काय? ती कुठे मिळेल? याचा पत्ता नव्हता. बरं, त्यावेळी गुगलवर शोधून दुकान सापडेल वगैरे भानगडी नव्हत्या. मी एका लोकल केबलवाल्या सहकाऱ्याला भेटले आणि ‘केबल कुठे मिळेल?’ असं विचारलं. तो म्हणाला, ‘‘तयार नाही मिळणार! करून घ्यावी लागेल.’’ ‘‘ठीक आहे बाबा; पण ती मिळेल कुठे?’’ मग कळलं की पासोबा विठोबाच्या मागे अशा केबल बनवून देणारे अनेक दुकानदार आहेत. मग माझी स्वारी एकदाची तिथे पोहोचली. त्यांनी एकदाची ती केबल करून दिली आणि मग तिची टेस्टिंग घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी कॅमेराच्या सेटिंगमध्ये जो बदल करायचा असतो तोही माहीत नव्हता; पण त्या सौजन्यशील माणसाने ते सगळं समजावून सांगितलं. माझ्या लक्षात आलं, आपल्यासाठी हा मार्ग सोपा नसणार. मुळात कॅमेऱ्याचं कुठलंही प्रशिक्षण नव्हतं. दिल्लीत ज्या कॅमेरामननं थोडंफार शूट करायला शिकवलं, त्यांनीही शॉट किती सेकंदाचा घ्यावा, त्याचा सिक्वेन्स कसा असावा, कंपोझिशनचे नियम काय असतात हे काही सांगितलं नाही. मग माझ्या लक्षात आलं की, हे सगळं आपल्याला स्वयंशिक्षणानेच करावं लागणार आहे. तेव्हा युट्युब नव्हतं, नाहीतर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. बातम्या लागल्या की एक शॉट किती सेकंदाचा लावला जातो हे मोजायला सुरुवात केली. एका बातमीत किती शॉट लागतात हे बघितलं आणि स्वतःची स्वतः तयारी करायला सुरुवात केली. तेव्हा मोबाईल कॅमेरा हा प्रकार नसल्यामुळे प्रत्येक बातमीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहावे लागे. आपण नसू तर बातमी चुकणार हे निश्चित! पण त्यावेळी आम्ही मोजकी मंडळी पुण्यात होतो. पुण्यात एनडीटीव्हीला इम्तियाज जलील, आजतकला पंकज, तेव्हाच्या स्टार टीव्हीला व्यंकटेश, झी ला अद्वैत मेहता आणि सहाराला मी. याशिवाय ई टीव्हीला जितेंद्र अष्टेकर अशी मोजकीच मंडळी होतो; पण आमची एकमेकांना कायम मदत असायची. इम्तियाज, पंकज आणि व्यंकटेश यांची तशी घट्ट आणि निखळ मैत्री असली, तरी ते बऱ्याचदा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी काहीतरी करत. मला आठवतं, भांडारकर इन्स्टिट्यूटवर जेव्हा संभाजी ब्रिगेडने हल्ला केला, तेव्हा आम्ही सगळेच धावत तिथे पोहोचलो होतो. त्यानंतर एकदा व्यंकटेशने पंकजला फोन करून जेम्स लेन पुण्यात आलाय आणि तो भांडारकर रोडला आहे, असे सांगितले. पंकज त्या भागात दिवसभर भटकंती करत राहिला. अर्थातच, नंतर त्याने अशीच एक वेगळी बातमी व्यंकटेशला सांगून त्यालाही तंगवले. पुण्यात राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये आम्ही सगळी पुण्याबाहेरची मंडळी होतो; पण आमची खूप घट्ट मैत्री होती. एकमेकांना मदत करायची, स्पर्धा असली तरी एक निकोप स्नेहभाव होता. एकमेकांच्या घरी आम्ही जात असू. ट्रिप्सला बरोबर जात असू. एकंदरच गंमत होती. रेडिओ, वृत्तपत्र या दोन माध्यमानंतर टीव्ही पत्रकारिता करण्यात एक वेगळी मजा तर होतीच; पण रोज नवीन आव्हानही होती. मला आठवतं, मी जॉईन झाले तेव्हा पहिल्यांदा दिल्लीच्या वरिष्ठांना विचारलं होतं की, ‘‘फीड कसे पाठवू?’’ मला त्यांनी सांगितलं, ‘‘आपलं TDA आहे’’; पण ते कुठे आहे, त्या संदर्भात कोणाला भेटायचं याबद्दलची कोणतीच माहिती त्यांच्याकडे नव्हती. म्हणजे ऑफिसमध्ये ती फाईल सापडत नव्हती. मग मी मुंबईला टॅक्सीने टेप पाठवत असे; पण त्यातून अनेक गमतीजमती निर्माण होत. मी खूप पाठपुरावा केल्यावर एकदाचं आमचं ऑफिस सोहराब हॉलमध्ये असल्याचं मला सांगण्यात आलं. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर एअर सहाराचं ऑफिस होतं. तिथे आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या ऑफिसची किल्ली होती. ती घेऊन मी एकदाची त्या ऑफिसमध्ये दाखल झाले. धूळ, दुर्गंधी, जळमटं, मरून पडलेली दोन कबुतरं अशी दुरवस्था असलेल्या त्या कार्यालयात मला अक्षरशः देव आठवले. एक बाई गाठून ती म्हणेल ते पैसे देत सगळी स्वच्छता करून घेतली आणि मग TDA कनेक्शन जोडण्याची कसरत सुरू झाली. तब्बल ४० मिनिटं दिल्लीहून आमच्या इंजिनियरने मला कनेक्शन कसे करायचे ते फोनवरून सांगितले आणि आयुष्यात कधीही इलेक्ट्रिक वायरलाही स्पर्श न केलेली मी ते युनिट जोडण्याचं काम करत होते. एकदाची सगळी जोडणी पूर्ण झाल्यानंतर मशीनवर फ्रिक्वेन्सी सेट करण्याचे दिव्य सुरू झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर एकदाचा तो प्रयोग यशस्वी झाला. पहिलं फीड पाठवलं तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. माझा स्वभाव मुळातच एखादी गोष्ट पूर्ण एन्जॉय करण्याचा असल्याने मी माझा प्रत्येक जॉब खूप एन्जॉय केला; पण अगदी मनापासून सांगते, टीव्हीची सफर अनुभवविश्व विस्तारणारी आणि खूप आनंददायी होती. तसं पाहिलं तर केवळ एक वर्षासाठी टीव्हीचा जॉब करून पुन्हा प्रिंटमध्ये जायचं हे मी ठरवलं होतं; पण या क्षेत्रात इतकी रमले की पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. मला आठवतं, पुण्यात अनेक बातम्या अगदी वेगळा अनुभव देणाऱ्या होत्या. काही खास पुणेरी मंडळी बरंच काही शिकवून जात. एकदा एक आंदोलन कव्हर करण्यासाठी बोलावण्यात आलं. जेम्स लेनच्या पुतळ्याला लाल महालासमोर हत्तीच्या पायाखाली तुडवण्यात येणार होतं. बरं, आयोजकांनी हत्तीच्या पायाखाली तुडवणार आहोत असं इतकं ठामपणे सांगितलं होतं, की आम्ही सगळ्यांनीच आपापल्या ऑफिसला फॉरवर्ड प्लानमध्ये ही बातमी लिहून पाठवली. ऑफिसनेही लवकरात लवकर ती बातमी पाठवा असं सांगितलं. अर्थातच ती बातमी मोठी होणार होती. दुसऱ्या दिवशी भल्या उत्साहात आम्ही लाल महालासमोर जाऊन सज्ज होत कधी एकदा तो हत्ती येतो आणि आम्ही ते आंदोलन कव्हर करतो यासाठी आतुर असतानाच आयोजक आले. ‘हत्ती कुठे आहे?’ आम्ही विचारलं. त्यांनी एक पुठ्ठ्याचा प्रतिकात्मक हत्ती काढला आणि जेम्स लेनच्या फोटोवर ती तुडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. हसावं की रडावं तेच कळेना. त्यानंतर मात्र आम्ही सगळेच धडा शिकलो आणि कुठल्याही आंदोलनाचे निमंत्रण आले की खरंच आंदोलन आहे का काही प्रतिकात्मक आहे असं विचारायला सुरुवात केली. आमच्या ऑफिसच्या असाइनमेंट डेस्कवरचे लोकही ही बातमी येणार म्हणून भलत्याच उत्साहात होते. ती कशी मोठी करायची हेही त्यांनी ठरवलं होतं. मी अगदी रडवेल्या आवाजात प्रतिकात्मक आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर मी कुठल्याही आंदोलनाबद्दल कळवलं, की ते विचारायचे, ‘‘तुम्हारा वो प्रतिकात्मक तो नही है...?’’ ते सोडा, अगदी अण्णा हजारेंचं उपोषण होतं तेव्हाही ऑफिसच्या सहकाऱ्यांनी विचारलं, ‘‘प्रतिकात्मक आहे का?’’ आणखी एक आंदोलनाचा किस्सा मला अगदी आठवतो. सचिन तेंडुलकरला फेरारी कार भेट मिळाली होती आणि त्यानं ‘तिचा कर माफ व्हावा’ अशी विनंती केली होती. त्यावर पतितपावन संघटनेने पुण्याच्या स्वारगेटजवळ सचिन तेंडुलकरसाठी भीक मागून आंदोलन केलं. माझा झी टीव्हीचा सहकारी आंदोलनाला अगदी वेळेवर पोहोचला. पतितपावनची सात-आठ मंडळी ते ‘भीक मांगो आंदोलन’ करत होती. ते कव्हर केलं आणि दृश्य पाठवली. मला पोहोचायला उशीर झाला. आंदोलन संपून गेलं होतं. मी त्यावेळेस पतितपावनचा कार्यकर्ता निरंजन फडकेला फोन केला. ‘‘अरे, संपलं का आंदोलन? तुम्ही असाल तर येता का थोड्यावेळ पुन्हा? मी पोहोचले!’’ असं त्याला विचारलं. निरंजन जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसह चहा प्यायला बसला होता, तो लगेच आला; पण मूळ आंदोलन संपल्यानंतर यावेळी मात्र या आंदोलनाला भलतीच गर्दी झाली आणि ५०-६० लोकांनी ते आंदोलन आमच्या कॅमेरासाठी केलं. तेव्हा अद्वैतची बातमी जाऊन लागली होती. मी माझी बातमी पाठवली आणि अद्वैतला त्याच्या ऑफिसमधून फोन आला, ‘‘आपले व्हिज्युअल बघ, सहाराचे बघ!’’ त्याला काहीच कळेना. मूळ आंदोलन त्यांनी कव्हर केलं होतं. मी ते स्टेज करायला लावलं होतं आणि त्याला जास्त गर्दी झाली होती. टीव्ही पत्रकारिता करत असताना अनेक अनुभव आले. त्यातले काही अनुभव चांगले होते तसे काही अनुभव आयुष्यभर त्रासदायक ठरतील असे होते. मला आठवतं, मी जॉईन होऊन काही दिवस झाले असतानाच एक भयंकर अपघात झाला. त्या अपघातात अनेक लोकांचे मृत्यू झाले होते. कॅमेरा करत असताना अचानक सात-आठ वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह बाहेर आला आणि माझे हात-पाय अक्षरशः लटलटू लागले. डोळ्यासमोर अंधारी आली. काय करावं ते सुचत नव्हतं; पण शांतपणे सगळे व्हिज्युअल पाठवले आणि स्टोरी पाठवली; पण त्या निरागस मुलीचा तो चेहरा कायम लक्षात राहिला. त्यानंतर मांढरदेवचा प्रसंग. तिथेही असेच अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. विशेष म्हणजे मला तिथे जायचं होतं; पण स्ट्रिंगरचा कॅमेरामन आतिश तिथे होता. त्यामुळे मांढरदेवचा अपघात घडला त्यावेळची दृश्य आमच्याकडे होती. ते कळल्यानंतर मी निघालेच होते. शिवाय स्ट्रिंगर सुजित आंबेकरसुद्धा तिथे पोहोचला होता. मांढरदेवची ती सगळी दृश्य आमच्याकडे असल्यामुळे ऑफिसकडून खूप कौतुक झालं, बहुतांश सगळ्या आंतरराष्ट्रीय चॅनल्सने सुद्धा आमचेच व्हिज्युअल्स वापरले. त्यानंतर ओबी व्हॅन आल्यावर मी जवळपास तीन दिवस अखंड लाईव्ह करत होते. अगदी ब्रश करायलाही वेळ नाही अशी स्थिती होती; पण मृत्यूचं थैमान इतकं जवळून पाहणं हा अनुभव अतिशय क्लेशदायक होता. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. मृतदेह ज्या प्रकारे वाईच्या रुग्णालयात आणले जात होते, ते बघून मन अक्षरशः विषण्ण झालं होतं. मृतांचे नातेवाईक, त्यांचे आक्रोश, कोणाचा मुलगा गेला तर कोणाचे आई-वडील! काही कुटुंबांचे पालनकर्ते गेले होते. असंच मृत्यूचं तांडव पाहिलं ते मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात. तो अनुभव तर आयुष्यभर विसरता येण्याजोगा नाही. ते ७२ तास अक्षरशः जीवघेणे होते. मला आठवतं, रात्री दीडच्या सुमाराला जेव्हा हेमंत करकरे, अशोक कामटे आणि साळगावकर या तिघांना मारलं गेलं, त्यानंतर मी मुंबईला जायला निघाले. पहाटे पाच-साडेपाचला मुंबईला पोहोचले असेन. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः चिटपाखरूही नव्हतं. मुंबईचं असं स्वरूप मी त्यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्यानंतर ज्या ठिकाणी हल्ले सुरू होते, त्या ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसच्या बाहेरून माध्यमांचं रिपोर्टिंग सुरू होतं. सगळ्यांच्या अनेक टीम्स तिथे उपस्थित होत्या. ताजच्या समोरून आमचं लाईव्ह सुरू होतं. माझं लाईव्ह संपलं आणि घरून नवऱ्याचा फोन आला. त्याच्याशी बोलण्यासाठी मी फ्रेममधून थोडी बाजूला गेले आणि मी उभी होते त्याच्या दीड फूट मागे एक ग्रेनेड येऊन पडलं. त्याचा स्फोट झाला आणि आमच्यापैकी एक कॅमेरामन जखमी झाला.
अनेकदा असे प्रसंग येतात की, त्यांना कसं तोंड द्यायचं ते कळतच नाही. असे प्रसंग माझ्याही आयुष्यात बऱ्याचदा आले. संवेदनशील माणूस आणि पत्रकार यांच्यातला एक अंतर्विरोध नेहमीच सुरू असतो. मला आठवतं, कोठेवाडी बलात्कार प्रकरण असो की आणखी अशाच स्वरूपाच्या बातम्या, ज्यामध्ये महिलांवर अत्याचार होतात, त्या कव्हर करताना खूप अंतर्विरोध सुरू असतो. काय दाखवावं, काय दाखवू नये याचं भान ठेवणं गरजेचं असतं. मला अनेक संपादकांबरोबर काम करायला मिळालं. त्यामध्ये विनोद दुआ, अरुप घोष, प्रभात डबराल, आर. के. बी., संजय ब्रागटा, पुण्यप्रसून वाजपेयी, मनोज मनू, उपेंद्र राय, रमेश अवस्थी अशी अनेक मोठी नावं. आमच्याबाबत गंमत अशी व्हायची की, दरवेळी नवीन संपादक आले की त्यांची दिशा बदलायची. काय दाखवायचं, काय नाही याबद्दल प्रत्येकाचं आपलं मत होतं. आम्ही एका संपादकासोबत रुळतो न रुळतो तोच पुन्हा नेता बदललेला असे. हे प्रयोग अनेकदा झाले. कोणी याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघेल; पण मला मात्र अनेक संपादकांकडून शिकण्याची संधी मिळाली, असंच वाटलं आणि त्यामुळे मी या प्रत्येक बदलाकडे अतिशय सकारात्मकपणे पाहिलं. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा काय दाखवावं आणि काय दाखवू नये याबद्दल एक प्रचंड अंतर्विरोध सुरू होता. खरंच, ज्या पद्धतीने हा हल्ला कव्हर केला गेला, ते योग्य होतं का? याचे उत्तर नाही असंच आहे; परंतु त्यावेळी एकंदरच परिस्थिती सगळ्यांच्याच नियंत्रणाबाहेरची होती. नेमकं काय चाललंय याबद्दल सरकार, पोलीस, गुप्तचर यंत्रणा, एनएसजी या सगळ्यांचा गोंधळ उडालेला होता. आपल्या जिगरबाज पोलिसांनी आणि एनएसजी कमांडोजनी परिस्थिती नियंत्रणात आणली. एनएसजी पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणी मार्कोस हे नौदलाचे कमांडो पोहोचले होते. त्यांची प्रेस कॉन्फरन्स कव्हर करायला मी गेले, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रास्त्रे समोर ठेवली होती आणि ‘ती दाखवू नका’ असं सांगितलं होतं. कोणी कितीही प्रयत्न केला असला, तरी ती कॅमेऱ्यामध्ये दिसत होतीच. मुळात ती मीडियासमोर मांडून ठेवण्याची गरजच नव्हती. त्या परिस्थितीत रिपोर्टिंग करत असताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी तिथे होते. अशी परिस्थिती कशी हाताळावी याबद्दलचं कुठलंही प्रशिक्षण भारतीय माध्यमांना नव्हतं. एनएसजीचे कमांडंट दत्ता यांनी ऑपरेशन संपल्याचे अधिकृतपणे सांगितल्यानंतर ताजमधून जेव्हा मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात येत होते, तेव्हा ताजचे त्यावेळचे व्यवस्थापक हात जोडून मीडियाला विनवणी करत होते की, कृपया हे मृतदेह दाखवू नका, ते आमचे पाहुणे होते. एकंदरच तो सगळा प्रसंग अतिशय विदारक होता. हे ऑपरेशन कव्हर केल्यानंतर आम्ही पुण्याला परतलो, तेव्हा मन अगदी विषण्ण झालं होतं. भीती, त्वेष, संताप, हतबलता अशा अनेक भावनांची सरमिसळ झाली होती. त्या सगळ्या आठवणी घेऊन घरी पोहोचले खरे; पण अशोक कामटे यांचे अंत्यसंस्कार आणि नंतर त्यांच्या पत्नीला जाऊन भेटून त्यांची मुलाखत करण्याचा बाका प्रसंग होता. त्या कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती, त्यातही त्यांची धीरगंभीरता या सगळ्यांमध्ये विनिता कामटे माझ्याशी बोलायला तयार झाल्या, तो प्रसंग मी आजही विसरू शकत नाही. अशावेळी परिस्थिती फार बिकट असते. हे सगळं केलं तरी नंतर कित्येक वर्षांनी २६/११ च्या हल्ल्यावर एक चित्रपट आला आणि तो चित्रपट बघत असताना मी थिएटरमध्ये ओक्साबोक्शी रडत होते; कारण तो सगळा घटनाक्रम पुन्हा डोळ्यासमोरून जात होता. कसाबने ज्या व्यक्तीला त्याच्या मुलासमोर मारलं होतं, ते दृश्य पाहिलं आणि मला हुंदका आवरला नाही. कधी कधी असं होतं की, ती घटना जेव्हा आपण साक्षी होऊन बघत असतो, तेव्हा कदाचित तिची तीव्रता जाणवत नाही, तेवढी काही वर्षानंतर पडद्यावर बघताना ती अधिक गडदपणे जाणवते. या सगळ्या बातम्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की, एखादी मोठी बातमी तुमच्या हाती लागते, तशी एक बातमी माझ्या हाती लागली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नातू प्रफुल्ल चिपळूणकर सारसबागेच्या समोर फुटपाथवर भीक मागत असल्याची माहिती मिळाली. ती अगदी जबाबदार व्यक्तीकडून मिळाली असली तरी सुद्धा तिची पूर्ण खातरजमा करून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी मी तिथे जाऊन आधी त्यांचं दोन दिवस निरीक्षण केलं. त्यांचे व्हिडिओ काढले. मग त्यांच्या ओळखीचे मित्र कोण याची माहिती घेतली. त्यांच्याकडे जाऊन ते व्हिडिओ दाखवले. अर्थातच, त्यांना ती जागा कुठली आहे ते कळू दिलं नाही. त्यांनी जेव्हा ते प्रफुल्ल चिपळूणकर असल्याचं सांगितलं, त्यानंतर सकाळी त्यांची मुलाखत केली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर हा प्रसंग कसा आला हे सविस्तर सांगितलं. सावरकरांची कन्या प्रभात यांचा मुलगा म्हणजे प्रफुल्ल चिपळूणकर. आयआयटी ग्रॅज्युएट; पण दुर्दैवाचे अनेक दशावतार त्यांच्या नशिबी आले आणि फुटपाथवर भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे सगळं शूट केल्यानंतर जेव्हा मी ऑफिसला सांगितलं, तेव्हा ऑफिस म्हणलं, ‘‘प्रतिभा, अगर ये गलत निकला तो बहुत महंगा पडेगा!’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘अगर गलत हुआ तो आज रात के ९ बजे के कॉन्फरन्स कॉल मे रिजाईन कर दूंगी.’’ ते ठीक होतं; पण चॅनलच्या रेपुटेशनचा प्रश्न होता. त्यामुळे मी अर्थातच सगळ्या बाजूने खातरजमा केल्यावरच ती बातमी ब्रेक केली. ती दिवसभर चालवली आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांना आमच्या कार्यालयात लाईव्हसाठी बसवलं. काही वेळा अशी एखादी बातमी हाती येते खरी; पण तिची सगळीकडून खातरजमा होणं फार गरजेचं असतं; अन्यथा चॅनल आणि पत्रकार म्हणून स्वतःच्या विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. मला बऱ्याचदा अशा काही बातम्या मिळाल्या, ज्या वेगळ्या होत्या. निवडणुकीच्या कव्हरेजसाठी मला अनेक ठिकाणी फिरता आलं. खास करून केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणुका कव्हर करण्याची संधी मिळाली. या सगळ्या वेळी काही बातम्या आपसूक हाती आल्या. काही मोठ्या मुलाखती करायला मिळाल्या. मी केरळात निवडणूक कव्हर करण्यासाठी गेले होते, त्यावेळी शशी थरूर हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्याचवेळी रामेश्वरमला डॉक्टर कलाम यांच्या घरी जाता आलं. अर्थात, ते तेव्हा त्यांच्या घरात नव्हते, राष्ट्रपती पदावर होते. त्यांच्या भावाची मुलाखत घेता आली; पण डॉक्टर कलाम यांची एक मुलाखत अशी मिळाली की ज्यामुळे मला स्वतःलाच खूप आनंद झाला. पुण्यात सुखोई विमानांचा एअरबेस आहे. डॉक्टर कलाम सुखोईची सफर करणार होते. ते कव्हर करण्याची संधी तर मिळालीच; पण मी कॅमेरामनला आधीच सांगितलं होतं की, काहीही झालं तरी आज आपल्याला त्यांची मुलाखत घ्यायची आहे. त्यामुळे ते खाली उतरताच कॅमेरा ट्रायपॉड वरून काढून हातात घे. डॉक्टर कलामांचं विमान खाली उतरताच त्याने कॅमेरा काढला आणि आम्ही जाऊन डॉक्टर कलाम यांची मुलाखत घेतली. ती एक्सक्लुझिव्ह मुलाखत होती. ती लाईव्ह दिल्यामुळे ऑफिस जाम खूश होतं; पण एअर फोर्सचे सगळेच अधिकारी रागावले. अशा वेळी काही जणांचा रोष पत्करावा लागतो; पण त्या-त्या वेळी बातमी मिळवणं हे फार महत्त्वाचं असतं. अर्थात, डॉक्टर कलाम यांना भेटण्याची संधी मला बऱ्याचदा लाभली. अटलजींनाही भेटता आलं आणि त्यांचीही एक छोटेखानी का होईना, पण मुलाखत घेता आली. या सगळ्या आठवणी असल्या तरी अनेकदा धमक्या येण्याचे प्रसंग येतात. मुळात भारतात बर्ड फ्लू झाला, त्यावेळी एक मोठं रॅकेट असल्याचं लक्षात आलं. तेव्हा बराच दबाव आणि धमक्या आल्या; पण मी त्याला फारशी बळी पडले नाही. टीव्ही पत्रकारिता दोन दशकं केल्यानंतर अचानक डिजिटल माध्यमासाठी काम करण्याची संधी चालून आली. हा प्रवासही मस्त आहे. रोज नवा अनुभव, नवी आव्हानं; पण एकूणच विचाराल तर ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’"
प्रतिभा चंद्रन ज्येष्ठ पत्रकार
I don't remember the exact year, but one March 8th morning, I received a call from Dr. Shashank Shah. He invited me to attend an event at Pune's Hotel Blue Diamond at 4 PM. Frankly, I went there assuming it was an event I needed to cover, but to my surprise, I was felicitated. I wasn't entirely sure why, but Dr. Shah explained that a few months prior, I had interviewed a patient who was admitted to the ICU and had his liver mistakenly removed. That interview was aired on our channel, and as a result, that poor boy's family received nearly 18 lakh rupees in aid within days for his treatment, saving his life through a liver transplant. That day was the most fulfilling in my career as a journalist. The immense satisfaction of knowing that my story saved someone's life made me reflect: had I ever truly dreamt of becoming a journalist? Absolutely not! With everyone in my family being doctors and my father a headmaster, my options were primarily limited to becoming either a doctor or a teacher. I entered journalism simply because I loved to write.
I recall it was 1986, and I was in 12th grade. Judge Kaka, that is, Professor Chandrakant Nyayadhish, a close friend of my father, asked me if I would interview Professor Nath, the then Vice-Chancellor of Marathwada University, for Akashwani (All India Radio). As a 12th grader, I was thrilled by the prospect. Of course, I said yes and arrived at the Akashwani center eagerly at the appointed time to conduct the interview. I had prepared many questions, thinking I would be the sole interviewer. However, when I arrived, I realized I was one of four interviewers, with the others being senior journalists. I was completely new to it. So, I didn't get a chance to speak much during the interview. As time passed, I grew restless. Finally, I interjected with my one and only question: "How did you turn towards the field of education?" He answered, and the interview ended.
I remember I received a payment of ₹75 for that single sentence. Everyone at home tuned into the radio, ears perked up, just to hear that one sentence. Back then, there was no facility to record things. So, we all sat there, and I remember my grandmother, grandfather, mother, and father were all waiting eagerly to hear that question. Finally, they heard it, and they were overjoyed. I was ecstatic too, as if I had presented a huge show on the radio. That was my first journalistic assignment! After that, the 'Hawa Collegechi' (College Buzz) page in the Marathwada daily was dedicated to youth. A few students were selected for this page, and college-related content was published once a week. I was also selected for that page and began writing college news with great enthusiasm. At that time, I used to boast about how much I read and how many Sanskrit subhashitas and Urdu shayari verses I knew by heart. I would then sprinkle them into every article. After this happened a couple of times, we once visited the revered journalist Anantrao Bhalerao at his home. He wasn't the editor of Marathwada then; Pannalalji Surana was. But Anantrao Bhalerao, recognizing me, gave me a piece of advice. He said, "You write well, but from now on, use only your own words, without using a single word from any other writer!" It then dawned on me how difficult it was to write without the adornment of Sanskrit subhashitas and Urdu shayari in my articles. Simple writing is the hardest, but from that day on, I learned the lesson of only using other authors' words if absolutely necessary, and I have always followed it. After Akashwani and 'Hawa Collegechi,' I completed my graduation and then formally enrolled in a journalism course. When I studied, the university's name was 'Marathwada University.' The name change was yet to happen. I pursued two years of journalism education, first BJ and then consecutive MJ. Sudhakar Pawar, Sudhir Gavhane, Sukhram Hivarale, Suresh Puri, V. L. Dharurkar were among the professors. I learned many things in those two years at the university, but I didn't get much practical work experience, especially in television, because, apart from Doordarshan, there were no other channels then. Thus, there were no professors who had worked directly in that field to teach us. We learned TV journalism entirely theoretically, with no practical connection. We didn't even get to see a camera for two years.
Starting the Practical Journey
My practical journalism experience began after two years when I started working at the daily 'Devgiri Tarun Bharat'. I remember we were all young people in that daily, and I was the only girl! Manohar Kulkarni Sir, a very composed and calm-natured person, was our editor. The news editor was Mukund Kulkarni. Mukundrao honed us all, granting us freedom to work but sometimes "ragging" us like a strict teacher with a stick. If something went wrong, Mukundrao would look at us with a keen gaze through his glasses, and we'd be terrified! But those were fun days. I learned a lot and worked hard. Manohar Kulkarni Sir spoke sparingly but wrote in a very dignified language. The newspaper was small, still establishing itself, so everyone had the freedom to do everything. Many times, I even went into the photography darkroom to develop photos. It was fun with DTP operators and paste-up artists back then. I worked at Devgiri Tarun Bharat for a full five years. After that, I moved to Pune and joined 'Lokmat'. We few individuals joined about ten to fifteen days before Lokmat's Pune edition was set to launch. Shekhar Kanetkar was the news editor at Lokmat at that time. He was extremely disciplined and excellent at narrating stories. His copy was always precise, and his handwriting beautiful. Kanetkar explained many things about Pune. I got opportunities to do new stories and write columns, and gradually, forgetting the difficulty of leaving Chhatrapati Sambhajinagar, I settled into Pune. Not only did I get work opportunities in Pune, but I also fell in love with this city without even realizing when and how. At Lokmat, I had the chance to work with veteran editors like Arvind Gokhale, Vijay Kuvalekar, and Kumar Ketkar, alongside Shekhar Kanetkar. Naturally, my horizons expanded, and while settling into Lokmat, I became friends with Shruti Verma, then a representative for NDTV. Chandran, Shruti, and I would meet almost every day, and then Shruti suggested I work in TV. Of course, I wasn't ready because I was enjoying print so much. Shruti said, "Ek saal kar ke dekh lo, agar pasand nahi aaya to wapas print join karo!" (Try it for a year, if you don't like it, rejoin print!)
The Leap to TV Journalism
Her advice stuck with me. I immediately began trying to get a job in TV. At that time, there were very few channels, and most places had old colleagues or friends working there, so applying there was out of the question. Only two options seemed viable: Sahara TV or Doordarshan. Even Doordarshan had a system of hiring stringers instead of full-time reporters. So, I started trying for Sahara TV. Vinod Dua was the group editor of Sahara then. I got his phone number and called him many times. I also had my conditions: I wanted to work for a national channel, and I wanted to work in Pune. It seemed unlikely anyone would hire me with all these demands. I sent Vinod Dua a detailed fax outlining potential national stories from Pune. After that, he told me to contact Arup Ghosh, who then invited me to meet in Delhi. They made it clear that I would have to operate the camera myself. I had no camera training. Forget that, I hadn't even really looked at or handled a simple photography camera much. In such a situation, I got the opportunity to operate a camera. I received barely eight days of training in Delhi, and then I arrived in Pune with that large camera, tripod, battery, and mic setup. It felt amazing because Sahara had its own airlines then. Sahara had given us a booklet of free flight tickets. You just had to go to the Sahara counter, tear off a slip, and get a boarding pass to board the plane! Moreover, Sahara's airline service was excellent. When you said "Sahara Pranām," every person would help you as if you were a family member! But the real test began when I started working. My very first shoot was of Lata Mangeshkar, also at the Taj Hotel Blue Diamond. When I took my first shot with the camera, tripod, and mic setup, can I even begin to describe the joy? Then, in great enthusiasm, I took many shots. The real challenge came when I had to take a byte because when I pulled out the mic and went to place it in front, I realized my office hadn't given me the cable connecting the mic to the camera. I didn't know what that cable was called. So, the question arose: how do I take a byte? I recorded the byte on the camera's ambient mic, but instead of clear audio, only noise was recorded. I called Gulshanji at the office and asked him, "Why didn't you give me the cable?" He told me, "Wahi XLR bana lo na!" (Just make an XLR!) Now, what was 'XLR'? Where would I find it? I had no idea. And back then, there was no Google to find shops. I met a local cablewala colleague and asked him, "Where can I find this cable?" He said, "You won't get it ready-made! You'll have to get it custom-made." "Okay, but where can I get it made?" Then I found out that there were many shops behind Pasoba Vithoba that made such cables. So, I finally reached there. They made the cable, and then I started testing it. At that time, I also didn't know the changes to make in the camera settings, but that courteous man explained everything. I realized that this path wouldn't be easy for me. I had no camera training whatsoever. The cameraman who taught me a little bit of shooting in Delhi also didn't tell me how many seconds a shot should be, what its sequence should be, or what the rules of composition were. Then I realized that I would have to learn all this through self-education. There was no YouTube then, otherwise, things would have been much easier. When news played, I started counting how many seconds a shot was displayed. I observed how many shots were used in a single news report and began preparing myself. Since mobile cameras weren't a thing then, I had to be present at every news location myself. It was certain that if I wasn't there, I would miss the news! But at that time, we were a handful of people in Pune: Imtiaz Jaleel for NDTV, Pankaj for Aaj Tak, Venkatesh for the then Star TV, Advait Mehta for Zee, and me for Sahara. Besides us, there was Jitendra Ashtekar for ETV, among others. But we always helped each other. Although Imtiaz, Pankaj, and Venkatesh had a close and pure friendship, they often did things to get ahead of each other. I remember when the Sambhaji Brigade attacked the Bhandarkar Institute, we all rushed there. Then once, Venkatesh called Pankaj and told him that James Laine had come to Pune and was on Bhandarkar Road. Pankaj wandered around that area all day. Of course, later he also troubled Venkatesh by telling him a different story. In Pune, we, the national channel reporters, were all from outside Pune, but we had a very close friendship. We helped each other, and despite the competition, there was a healthy camaraderie. We used to visit each other's homes and go on trips together. Overall, it was fun. After radio and print media, TV journalism had its own unique fun, but it also presented new challenges every day. I remember when I joined, I first asked my seniors in Delhi, "How do I send the feed?" They told me, "Aapla TDA aahe" (We have TDA), but they had no information about where it was or whom to meet regarding it. Meaning, the file wasn't found in the office. So, I used to send tapes to Mumbai by taxi, but that led to many interesting situations. After much persistence, I was finally told that our office was in Sohrab Hall. The Air Sahara office was on the first floor of the same building. Our third-floor office key was there. Taking that, I finally entered the office. In that dilapidated office, filled with dust, stench, cobwebs, and two dead pigeons, I literally remembered God. I found a woman, paid her whatever she asked, and got the entire place cleaned, and then the struggle to connect the TDA began. For a full 40 minutes, our engineer from Delhi told me over the phone how to make the connection, and I, who had never even touched an electric wire in my life, was connecting that unit. Once all the connections were complete, the ordeal of setting the frequency on the machine began. After many attempts, the experiment finally succeeded. When I sent the first feed, tears literally welled up in my eyes. Since my nature is to fully enjoy everything, I enjoyed every job I did, but I genuinely tell you, the journey of TV journalism was expanding my horizons and extremely joyful. Frankly, I had decided to do the TV job for only one year and then go back to print, but I became so engrossed in this field that I never looked back. I remember many news stories in Pune gave me a very different experience. Some special Puneites taught me a lot. Once, I was called to cover a protest. James Laine's statue was to be trampled under an elephant's foot in front of Lal Mahal. The organizers had stated so firmly that they would trample it under an elephant's foot, that we all sent this news to our respective offices in our forward plans. The office also told us to send the news as soon as possible. Of course, it was going to be a big story. The next day, full of enthusiasm, we arrived at Lal Mahal, ready and eager for the elephant to arrive and for us to cover the protest, when the organizers arrived. "Where is the elephant?" we asked. They pulled out a symbolic cardboard elephant and completed the trampling process on a photo of James Laine. We didn't know whether to laugh or cry. After that, we all learned a lesson and started asking, whenever we received an invitation for a protest, if it was a real protest or something symbolic.
Humorous and Heart-Wrenching Moments
The people at our office's assignment desk were also very excited for this news to come. They had even planned how to make it a big story. I, in a tearful voice, gave them the information about the symbolic protest. After that, whenever I informed them about any protest, they would ask, "Tumhara woh pratikātmaka to nahi hai...?" (It's not symbolic, is it...?) Forget that, even when Anna Hazare's fast was happening, my colleagues in the office asked, "Is it symbolic?"
I also distinctly remember another protest story. Sachin Tendulkar had received a Ferrari car as a gift, and he had requested that its tax be waived. In response, the Patit Pawan Sanghatana held a protest near Swargate in Pune, begging for Sachin Tendulkar. My Zee TV colleague arrived at the protest exactly on time. Seven or eight members of Patit Pawan were doing that "begging protest." He covered it and sent the visuals. I arrived late. The protest was already over. At that time, I called Niranjan Phadke, a Patit Pawan activist. "Hey, is the protest over? If you're around, can you come back for a bit? I've arrived!" I asked him. Niranjan was sitting at a nearby restaurant, drinking tea with friends. He came immediately, but this time, after the original protest had ended, this staged protest for our camera gathered a huge crowd of 50-60 people. Advait's news had already been aired. I sent my news, and Advait got a call from his office, "Look at your visuals, look at Sahara's!" He couldn't understand anything. They had covered the original protest. I had staged it, and it had a bigger crowd. While working in TV journalism, I had many experiences. Some of them were good, while some were painful enough to last a lifetime. I remember, a few days after I joined, there was a terrible accident. Many people died in that accident. While operating the camera, the body of a seven or eight-year-old girl suddenly came out, and my hands and feet literally started trembling. My vision blurred. I didn't know what to do, but I calmly sent all the visuals and the story. However, that innocent girl's face remained etched in my memory forever. Then came the Mandhardevi incident. There too, many people had died. The special thing was that I wanted to go there, but stringer cameraman Atish was already there. So, we had the visuals from the Mandhardevi accident. After knowing that, I had already set off. Besides, stringer Sujit Ambekar had also reached there. Because we had all the visuals from Mandhardevi, the office praised us a lot, and most international channels also used our visuals. After the OB van arrived, I was doing live coverage continuously for almost three days. It was a situation where I didn't even have time to brush my teeth, but witnessing the dance of death so closely was an extremely distressing experience. Many families were ruined. Seeing the way dead bodies were brought to the hospital in Wai, my heart was literally saddened. Relatives of the deceased, their cries, someone's son gone, someone's parents! Some families had lost their breadwinners. I witnessed a similar dance of death during the Mumbai terrorist attacks. That experience is unforgettable for a lifetime. Those 72 hours were literally deadly. I remember around 1:30 AM when Hemant Karkare, Ashok Kamte, and Salgaonkar were killed, I left for Mumbai. I must have reached Mumbai around 5-5:30 AM. At that time, there was literally not a soul on the streets of Mumbai. I had never seen Mumbai in such a state before. After that, media reporting began from outside the Taj, Oberoi, and Nariman House, where the attacks were ongoing. Many teams from various media houses were present there. Our live coverage was ongoing from in front of the Taj. My live coverage ended, and I got a call from my husband at home. To talk to him, I moved slightly out of frame, and a grenade fell about a foot and a half behind where I was standing. It exploded, and one of our cameramen was injured.
Challenges and Reflections
Many times, situations arise where you don't know how to deal with them. Such situations came up many times in my life too. There's always an internal conflict between a sensitive person and a journalist. I remember, whether it was the Kothewadi rape case or similar news stories where women are subjected to atrocities, there's a lot of internal conflict while covering them. It's important to be mindful of what to show and what not to show. I got to work with many editors, including Vinod Dua, Arup Ghosh, Prabhat Dabral, R. K. B., Sanjay Bragta, Punyaprasoon Bajpai, Manoj Manu, Upendra Rai, Ramesh Awasthi, and many other big names. The funny thing about us was that every time a new editor came, their direction would change. Everyone had their own opinion about what to show and what not to. We would barely settle in with one editor before the leadership changed again. These experiments happened many times. Someone might look at this differently, but I felt I got the opportunity to learn from many editors, and so I looked at each change very positively. When the Mumbai terrorist attack happened, there was a huge internal conflict about what to show and what not to show. Was the way the attack was covered truly appropriate? The answer is no, but at that time, the overall situation was out of everyone's control. The government, police, intelligence agencies, and NSG were all confused about what exactly was happening. Our brave police and NSG commandos brought the situation under control. Before the NSG arrived, Marcos, the naval commandos, had reached the spot. When I went to cover their press conference, they had laid out their weapons and told us not to show them. No matter how much anyone tried, they were still visible in the camera. Frankly, there was no need to display them in front of the media. While reporting in that situation, representatives from national and international media were present. Indian media had no training on how to handle such situations. After NSG Commandant Datta officially announced the operation was over, when the bodies of the killed people were being removed from the Taj, the then manager of the Taj was pleading with the media with folded hands, saying, "Please don't show these bodies, they were our guests." Overall, that entire incident was extremely harrowing. After covering this operation, when we returned to Pune, my mind was utterly dejected. A mix of fear, anger, outrage, helplessness, and many other emotions. I returned home with all those memories, but there was a difficult situation: Ashok Kamte's funeral and then going to meet his wife for an interview. Vinita Kamte was willing to talk to me amidst her family's plight and her own composure, a moment I can never forget even today. In such situations, the circumstances are very tough. Even after all this, many years later, a film about the 26/11 attack came out, and while watching it in the theater, I sobbed uncontrollably because the entire sequence of events was playing before my eyes again. When I saw the scene where Kasab killed a person in front of his child, I couldn't control my sobs. Sometimes, when we witness an event, its intensity might not be fully felt, but some years later, watching it on screen makes it feel even more profound.
Unearthing Unique Stories
In all these news stories, it often happens that you stumble upon a big piece of news, and one such story came into my hands. I received information that Swatantryaveer Savarkar's grandson, Prafull Chipulunkar, was begging on the footpath in front of Sarasbaug. Even though the information came from a responsible person, it was crucial to verify it completely. For that, I went there and first observed him for two days. I took videos of him. Then I gathered information about his known friends. I went to them and showed them the videos. Of course, I didn't let them know the location. When they confirmed he was Prafull Chipulunkar, I interviewed him the next morning. In that interview, he explained in detail how this situation came upon him. Prafull Chipulunkar is the son of Savarkar's daughter, Prabhat. An IIT graduate, but he faced many unfortunate turns of fate, leading him to beg on the footpath. After shooting all this, when I told the office, they said, "Pratibha, agar ye galat nikla to bahut mehenga padega!" (Pratibha, if this turns out to be wrong, it will be very expensive!) I told them, "Agar galat hua to aaj raat ke 9 baje ke conference call me resign kar dungi." (If it's wrong, I will resign in tonight's 9 PM conference call.) That was fine, but it was a matter of the channel's reputation. So, of course, I broke the news only after verifying it from all sides. It ran all day, and then in the evening, we had him in our office for a live segment. Sometimes, you get a big story, but it's very important to verify it thoroughly from all angles; otherwise, the credibility of the channel and the journalist themselves is at stake.
I often got unique news stories. I had the opportunity to travel to many places for election coverage, especially covering elections in Kerala, Tamil Nadu, and Karnataka. During all these times, some news naturally came into my hands. I got to do some big interviews. When I went to Kerala to cover the elections, Shashi Tharoor was contesting for the first time. I got the chance to interview him. At the same time, I was able to visit Dr. Kalam's house in Rameshwaram. Of course, he wasn't at home then; he was serving as the President. I could interview his brother. But I got one interview with Dr. Kalam that made me very happy. Pune has an airbase for Sukhoi aircraft. Dr. Kalam was going to take a flight in a Sukhoi. Not only did I get the opportunity to cover that, but I had already told the cameraman that no matter what, we had to interview him today. So, as soon as he landed, take the camera off the tripod and hold it. As soon as Dr. Kalam's plane landed, he took out the camera, and we went and interviewed Dr. Kalam. It was an exclusive interview. The office was thrilled because it was aired live, but all the Air Force officials were angry. In such situations, you have to incur the wrath of some people, but getting the news at that specific moment is very important. Of course, I had many opportunities to meet Dr. Kalam. I also got to meet Atalji and interviewed him, albeit a short one.
Despite all these memories, there are often instances of threats. When bird flu first occurred in India, it became clear there was a large racket involved. There was a lot of pressure and threats then, but I wasn't greatly affected by them. After two decades of TV journalism, an opportunity to work for digital media suddenly came my way. This journey is also great. Every day brings new experiences, new challenges; but overall, if you ask, it's 'Suhana safar aur ye mausam hasin...' (A beautiful journey and this beautiful weather...)."
Pratibha Chandran
Veteran Journalist
.jpg)







Comments