top of page

हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणें

हिंदुस्थानात इंग्रजी राज्य स्थिरावल्याचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे इथल्या जनतेचे सुरू झालेले आर्थिक शोषण. त्या काळातल्या विचारवंतांनी हे संकट ओळखले आणि त्याविषयीचे चिंतन सुरू झाले. ह्या विषयाबद्दल लोक तुरळक का होईना बोलत व लिहित असत. अर्थात हे समाजातल्या पुढारलेल्या लोकांमध्ये घडत असे; पण त्याबद्दलचे लिखाणही प्रसिद्ध होत होते. ‘इंदुप्रकाश’ ह्या त्या काळातील अव्वल नियतकालिकात या विषयावर प्रकाशित झालेले लेख एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झाले. 1876 मध्ये ही पुस्तिका इंदुप्रकाशच्या मालकांनी प्रकाशित केली. पुस्तिकेच्या प्रस्तावनेत वा पुस्तिकेत इतरत्र त्यातील लेख कुणी लिहिले ह्याचा उल्लेख नाही. प्रस्तावनेच्या अखेरीस प्रस्तावनाकारांनी आपले नावही लिहिलेले नाही पण ‘लो.हि.’ असा संक्षिप्त उल्लेख प्रस्तावनेच्या अखेरी असलेल्या स्वाक्षरीसारखा केलेला आहे. त्यावरून असे वाटते की हे लिखाण लोकहितवादींचे आहे. मुळातले लेखही त्यांचेच असतील अशीही शक्यता आहे कारण लोकहितवादींचे इंदुप्रकाशशी अतिशय जवळचे संबंध होते. ते त्यात लिखाणही करीत असत. सुरुवातीसच हिंदुस्थानची त्या काळची आर्थिक स्थिती व लोकांना आलेली विपन्नावस्था यांचे वर्णन केलेले आहे. इंग्रज सरकार हिंदुस्थानात स्थिरावल्यावर देशात रस्ते, पूल, जहाजे तयार होऊ लागली अशी सकारात्मक सुरुवात करून लेखक नंतर जे वर्णन करतो ते मुळातून वाचण्यासारखे आहे. हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा https://youtu.be/FfoQMd9U3eI?feature=shared “...शेतकरी लोक होते ते भिकारी झाले व सार्‍या इतकेही पीक होत नाही, तेंव्हा त्यांनी सावकारास काय द्यावे? कसे तरी करून सरकारचा सारा रडतकढत भरतात” हे वर्णन 1860 च्या सुमारास असलेल्या स्थितीचे आहे; पण आजच्या स्थितीलाही ते लागू होते आहे. पुढे लेखकाने शेतकर्‍याला शेतीतून होणार्‍या उत्पन्नाचा जो जमाखर्च मांडला आहे तो अतिशय प्रभावी आहे. शेतकर्‍याला शेतीतून मिळणारे उत्पन्न कसे बेभरवशाचे असते, प्रसंगी त्याला नुकसानच कसे येते हे दीडशे वर्षांपूर्वीही आकडेवारीने सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे. “केवळ लोक आकाशी शेती करितात त्यातही विशेष कसर नाही. दाणे विकून टाकावे तरी चावडी फिटत नाही. दोन पैसे, तीन पैसे रोजची मजुरी पडते. शेण आणून गोवर्‍या कराव्या. बांधावरचे गवत काढून भारे विकावे तरी पोट भरत नाही” असे शेतीचे जे वर्णन लेखक करतो ते आजही कोरडवाहू शेतीला चपखल बसते. “पोट भरण्याचे मार्ग तीन... उत्तम खेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी; परंतु तिहीतही सोय राहिली नाही” असा शेरा लेखक देतो. “ज्याला त्याला वाटते की पुढे दिवस कठीण येत चालले आहेत” असे सांगून लेखकाने आर्थिक दूरवस्थेचे जे वर्णन केलेले आहे ते आजच्या काळातील जागतिक मंदीच्या स्थितीला पुरेपूर लागू होते आहे. लेखकाने देशाच्या आयात व निर्यात व्यापाराचा आढावादेखील घेतला आहे. त्यात निर्यात व्यापारासाठी ‘रवानगी’ आणि आयात व्यापारासाठी ‘अमदानी’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. 1858 ते 1867 पर्यंतच्या काळाच्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास करून लेखकाने असे दाखवू दिले आहे की “ह्या दहा वर्षांमध्ये 109 कोटींची खूट हिंदुस्थानने खाल्ली ह्यणजे दरसाल दहा कोटी रुपयांचा तोटा आहे.” भारताच्या इंग्लंडबरोबरच्या व्यापारामध्ये असणारा असमतोल किंवा dverse balance of payment ही खरी समस्या आहे. “इंग्लंड भारताचे जे शोषण करीत आहे त्यातून भारताला दरिद्र येते आहे” हा मुद्दा लेखकाने मांडला आहे. दादाभाई नौरोजींनीही ह्याच मुद्यावर भर दिला होता व त्यातूनच पुढील काळात स्वदेशी, बहिष्कार अशी स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे मांडली गेली. “दरसाल या देशास दहा कोटींची खंडणी भरावी लागते. या देशापाशी रोकड पैसा भरण्यासाठी नाही, तर तितक्या किमतीचा माल द्यावा लागतो. ह्यणजे इतके उपयोगी द्रव्य अनेक रूपाने या देशातून जाते व त्याचा मोबदला ह्या देशास काही मिळत नाही. याप्रमाणे दादाभाई नवरोजी यांणी पत्रक करून दाखविले आहे.” “रवानगीची (निर्यातीची) किंमत रोख मिळत नाही फक्त कागदावर नोंदी होतात” असे सांगून मग उपरोधाने लेखकाने इंग्रजी राज्याचे फायदे वर्णन करून सांगितलेले आहेत. त्यात परदेशातील शत्रूंना अडवून घेरणे, देशात स्वस्थता (शांतता) राखणे, विद्यावृद्धी करणे, सती, कन्याहत्या आत्महत्या, दुर्दशेचे वैधव्य इत्यादि बंद करणे, लेखी कायदे करून मर्जी (मनमानी) बंद करणे, लिहिण्या-बोलण्याची मोकळीक देणे यासारख्या फायद्यांची यादी दिली आहे. “सर टी. माधवराव, भाऊदाजी, दादोबा पांडुरंग, दादाभाई व फरदुनजी नवरोजी अशी माणसे तयार करण्याची किंमत दर एकाची एक कोटी” असा गमतीदार हिशेबदेखील केलेला आहे. “एम.ए., बी.ए. वगैरे पदव्या मिळविणारे लोकांची किंमत दहा-दहा, वीस-वीस लक्ष नव्हे काय?” असा गमतीदार प्रश्नही लेखकाने उपस्थित केला आहे. “इंग्रजांनी भारतात रेल्वे आणली. त्यामुळे काही फायदा झाला; पण त्या कार्यासाठी भारतालाच तोशिस पडली आहे” हेदेखील लेखकाने सांगितले आहे. “आपल्या शिलकेतून हे काम झाले असते तर या देशास फार फायदा झाला असता; परंतु विलायतेतून चाळीस कोट रुपये आले त्याचे आपणास व्याज भरावे लागते” असे सांगून इंग्रज सरकारने शंभर कोट रुपये कर्ज दिले, त्याचे व्याज चार कोट रुपये आपल्याला भरावे लागते व ते विलायतेला जाते असा हिशेबही सांगितलेला आहे. “इथे काम करणार्‍या युरोपियन लोकांना मिळणारा पगार ते विलायतेला पाठवतात. यातूनही आपला पैसा बाहेर जातो”असे लेखक आकडेवारीसह सांगत आहे आणि “धन्य या देशाचे सामर्थ्य व या देशातल्या लोकांची सहनशीलता!! इतकी खंडणी भरून हे लोक अद्याप खाऊन पिऊन भाकरी चटणीवरही निर्वाह करीत आहेत” असा टोलाही द्यायला लेखक कमी करीत नाही. “येथील रयतेची व्यवस्था काय व येथील उत्पन्न कसे वाढेल याचा विचारच कोणी करीत नाही. भाड्याचा उंट त्याजवर लादता लादता नाळी पडल्या तरी कोणी मनास आणीत नाही” असे तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांचे लेखक वर्णन करतो. “बरे इंग्रज सरकारने वीस कोट प्रजेवर हुकमत मिळविली आणि पन्नास कोट रु. वसुलाचे राज्य स्थापले आणि इतके मिळविण्यास त्यास एक पैसाही खर्च पडला नाही. इंग्रज सरकाराने भारतातील व्यापार मारला, इथल्या लोकांना नोकरीत योग्य स्थान दिले नाही, इथल्या जनतेवर अवाजवी व अनावश्यक करांचे ओझे लादले आणि परिणामी त्यांचे जीवन बरबाद झाले” अशा अनेक गोष्टी लेखकाने अतिशय पोटतिडीकीने व स्पष्टपणाने लिहिलेल्या आहेत. “पूर्वीचे देवांची तृप्ती तूप, तांदूळ, फार झाले तर दोनचार बकरी दिली तर होत होती. या देवास (म्हणजे इंग्रज सरकारला) वीस कोटी रुपयांचा हविर्भाग दिला तरी प्रसन्नता नाहीच. असा हा धनलोभ हल्ली चालला आहे” या शब्दात इंग्रजांच्या धनलोभी वृत्तीचा उल्लेख लेखकाने केला आहे. “आमचे लोक कधी व्यापारात शिरले आहेत काय? नाही! कारण आमच्या लोकांचे मत असे आहे की नोकरी ह्मणजे आही शतकृत्य केले. ही केवढी चूक आहे बरे?” या 1860 च्या स्थितीत आजही फरक दिसत नाही. “इंग्रजी राज्य म्हणजे परमेश्वरी कृपा” असे मानणारा एक वर्ग जसा त्या काळात निर्माण झाला तसाच इंग्रज का आले व ते इथे का स्थिरावले, त्यासाठी आपले कोणते दोष कारणीभूत ठरले, याचा नीट विचार करून इंग्रजांच्या राज्याचे काय परिणाम झाले त्याचा विचार करणारा दुसरा वर्गही निर्माण झालेला होता. त्या वर्गाने इंग्रजी राज्यांची अपरिहार्यता स्वीकारूनदेखील इंग्रज भारताची जी लूट करीत होते त्याकडे लक्ष वेधले होते. त्या लुटीबद्दल थेट इंग्लंडच्या संसदेत आवाज उठवणार्‍या दादाभाई नौरोजी किंवा शेतकर्‍यांच्या दूरवस्थेचा विषय राज्यकर्त्यासमोर तिखटपणाने मांडणार्‍या जोतिबा फुल्यांच्याच मांदियाळीत शोभेल असे हे विश्लेषण आहे पण ते कुणी केले याचा केवळ अंदाजच करावा लागतो हेच ह्या लेखनाचे दुर्दैव म्हणावे का? (ग्रंथ संदर्भ : न्या. रानडे मोफत वाचनालय, नाशिक) प्रा. दिलीप फडके यांच्या चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'पुस्तकानुभव' या पुस्तकातून हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://shop.chaprak.com/product/pustakanubhav/

Recent Posts

See All

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page