कोवळी सकाळ | Marathi Book Review
- 2 days ago
- 3 min read
सूर्याची पहिली कोवळी किरणे म्हणजे आर्यमा! ही आर्यमा मनाची मरगळ दूर करते. आपला उत्साह वाढवण्याबरोबरच जगण्याची नवी प्रेरणा देते. कोवळी सकाळ तजेलदार असते. त्यातून चैतन्य फुलते. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक हे त्याचेच प्रतीक आहे. श्रीराम नानल यांनी या पुस्तकातील लेखांच्या माध्यमातून माणूसपणाचा प्रकाश पेरला आहे. तो प्रकाश वाचकांच्या मनात चैतन्याचे नंदादीप चेतवणारा आहे.

या पुस्तकात त्यांनी ज्या व्यक्तिरेखा हाताळल्या आहेत, त्यातील बहुतेक सर्व माझे आदर्श आहेत. संत नामदेव, समर्थ रामदास स्वामी, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर, अण्णा भाऊ साठे, पंडित अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, दत्तोपंत ठेंगडी, देव आनंद, राजा राज कपूर, किशोर कुमार अशा उत्तुंग मनोऱ्यांचा मनोहारी परिचय त्यांनी करून दिला आहे. हे चित्रशैली शब्दचित्र रेखाटतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्यावर तीन विशेष लेख लिहिले आहेत. त्यामुळं हे सगळं लेखन म्हणजे प्रेरणेचा स्त्रोत ठरणारं झालं आहे.
मोजक्या शब्दात, नेमकेपणाने, पाल्हाळीक होऊ न देता लिहिणे हे खास कौशल्य श्रीराम नानल यांना अवगत आहे. त्यामुळे अशा महापुरूषांना पाच-सहाशे शब्दात मांडण्याचे कसब त्यांनी साधले आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखनाची ही मर्यादा असली तरी मिळालेल्या संधीचे असे सोने करणे फार कमी जणांना जमते. हे लेख वाचताना इथल्या मातीचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अर्थात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, ॲना फ्रँक अशा काही लेखामुळे हा चांगुलपण शोधण्याचा ध्यास वैश्विक झाला आहे.
या निमित्ताने मला संगणतज्ज्ञ डॉ. विजय भटकरांची आठवण झाली. त्यांनी परम संगणकाचा शोध लावला. पंतप्रधान असलेल्या राजीवजी गांधी यांनी प्रारंभी त्यांना कडाडून विरोध केला होता. सगळ्या परिस्थितीवर मात करत भटकरांना यात यश आले. ते देशाचे ‘हिरो’ झाले. मग पंतप्रधानांसह संपूर्ण देशाने त्यांना डोक्यावर उचलून घेतले. मुळातच शास्त्रज्ञ असलेल्या भटकरांना मात्र वेगळ्याच भीतीने ग्रासले. आज ज्या गोष्टीचे कौतुक होत आहे, ती काही दिवसांनी खूप सामान्य होईल, याचे स्पष्ट चित्र त्यांना दिसत होते. संगणकामुळे एका नव्या क्रांतियुगाचा उदय झाला होता पण पुढील काही वर्षात प्रत्येकाच्या टेबलवर संगणक असेल. इतकेच काय प्रत्येकाच्या हातातील मोबाईलवर संगणकाचे सर्व पर्याय असतील. मग आपल्या या परिश्रमाचे मोल काय? हा शोध, ही मेहनत शाश्वत आहे का? असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांची उदासी वाढली.
पुढे पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यात भटकरांसह शंकराचार्यांचाही समावेश होता. डॉ. भटकरांनी आपल्या मनातील अस्वस्थता शंकराचार्यांना बोलून दाखवली. क्षणाचाही विलंब न करता शंकराचार्य म्हणाले, “तुम्ही तुमचे कर्तव्य केले. देशासाठी ते मोठे योगदान आहे. त्यातून आता बाहेर पडा आणि पुढच्या संशोधन कार्याला लागा. ‘जगात शाश्वत काय?’ या तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे व्यापक जनहिताच्या दृष्टिने केलेली प्रत्येक कृती शाश्वत आहे. इथली साहित्यिक संपदा शाश्वत आहे. उदाहरणार्थ रामायण-महाभारतासारखे ग्रंथ, माउलींची ज्ञानेश्वरी, नाथांची-तुकोबांची गाथा शाश्वत आहे. पिढ्या न पिढ्या तो संस्कार मराठी माणसावर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शाश्वत आहे. तो असंख्य काळ मानवी मनाला प्रेरणा देणार आहे...”
शंकराचार्यांचे ते बोलणे ऐकून भटकरांची भीती, नैराश्य दूर पळाले आणि त्यांचे मनोबल वाढले. अजून शंभर वर्षांनी नानलही हयात नसतील आणि मीही नसेल! पण ही कलाकृती जिवंत असेल!! यात मांडलेले विचारधन प्रत्येक पिढीला नैतिक बळ देणारे असेल. आपली शौर्य आणि पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होणार नाही, आपल्या मातीत असे अनेक नररत्ने जन्माला येऊन गेलीत, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक असेल.
या पुस्तकात तुम्हाला बालकवी भेटतील, माधव ज्युलियन भेटतील, नारायण सुर्वे भेटतील. यशवंतराव चव्हाण, मधु दंडवते अशांचे अनुभव वाचता येतील. शाश्वत शेतीपासून विठ्ठलापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्यापासून श्रावणमासापर्यंत विषयाचे वैविध्य अनुभवता येईल. ‘वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी द्या,’ हे ‘चपराक’चं सूत्र श्रीराम नानल यांनी या पुस्तकात सत्यात आणलं आहे.
त्यांचं लेखन शब्दबंबाळ नाही. एखादा निरूपणकार श्रोत्यांना ज्या रसाळ शैलीत गुंतवून ठेवतो, त्याप्रमाणेच नानल यांनी मांडणी केली आहे. ओघवती भाषा, साधी-सोपी उदाहरणे, ललित अंगाने फुलवलेले प्रसंग हे त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील त्यांचे चिंतन आणि ते सोप्या शैलीत मांडण्याची हातोटी यामुळे ही ‘कोवळी सकाळ’ आल्हाददायक वाटते. त्यात रूक्षपणा नाही. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला जीवनसत्त्व देतो, त्याप्रमाणेच या पुस्तकातील हे लेख आपले मनोधैर्य उंचावतात. स्वतः वाचावे, कोणत्याही प्रसंगानिमित्त किंवा काही वेळा अकारणसुद्धा इतरांना भेट द्यावे असे हे पुस्तक आहे. कोणतंही पान उघडा आणि कुठूनही वाचायला सुरूवात करा, तुम्हाला प्रसन्नच वाटेल असे हे लेखन आहे.
अमृतमहोत्सव साजरा केलेल्या श्रीराम नानल यांचे ‘अमेरिकेच्या अंतरंगात’ हे पुस्तक गेल्याच महिन्यात ‘चपराक’तर्फे वाचकांच्या भेटीस आले आणि अवघ्या महिनाभरात त्यांचे हे दुसरे पुस्तक आपल्या समोर येत आहे. त्यांच्या सर्जनशीलतेचा अंदाज वाचकांना आहेच. संपूर्ण आयुष्य बँकेत गेल्याने त्यांचे अनुभवविश्व समृद्ध आहे. मानवी मनाचे त्यांचे आकलन जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके वयाच्या पंचाहत्तरीनंतर येत असली तरी ती दीर्घकाळ मराठी वाचकांच्या मनात घर करून राहतील. श्रीराम नानल यांच्यासारख्या ज्येष्ठांनी लेखनी हाती घेतल्यानंतर अशा सुंदर कलाकृती जन्मास येतात. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच इतर ज्येष्ठांनीही आपल्या अनुभवाचे संचित लेखनाच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी उपलब्ध करून द्यावे. हा लेखनप्रवाह अनेकांना समृद्ध करत नेईल, हे मात्र नक्की! श्रीरामजी नानल यांच्या भावी लेखनकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक, संपादक
.jpg)

Comments