top of page

हे देवाघरचे देणे!

प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय? जेव्हा खरे प्रेम होते तेव्हा इतर सर्व भावांपेक्षा समर्पणभाव मनामध्ये सर्वाधिक स्थान करून असतो. तो भाव अधून मधून, प्रभावांमुळे उठणाऱ्या क्रोध, ईर्षा, अहंकार वा द्वेषादी भावांना जिथल्या तिथे समाप्त करतो व त्वरित दयाभावास निर्माण करून नकारात्मक विचारांना मारतो. जर हे भाव दीर्घकाळ मनात तग धरत असतील तर समजावे की ते प्रेम नसून कामनेतून उत्पन्न झालेले केवळ क्षणिक आकर्षण आहे किंवा अवलंबातून निर्माण झालेले मानसिक दास्यत्व. जेव्हा समर्पित भावनेने प्रेम होते तेव्हा त्या व्यक्तीचा होकार,नकार, सामाजिक स्थान, जात धर्म, आर्थिक क्षमता इतके महत्त्वाचे वाटत नाही, जितके त्या व्यक्तीला आनंदात पाहणे, त्याच्या संकल्पपूर्तीत सहभागी होणे, त्याच्या दुःखात त्याच्यासाठी प्रार्थना करणे आणि परतफेडीची अपेक्षा न करता त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणे, हे सर्व महत्वाचे होते.

कोणत्याही घटनेच्या मागे समाजाच्या विचारशैलीचा, त्यात होणाऱ्या संवादांचा देखील अप्रत्यक्ष सहभाग असतोच. प्रेमभंग झालेल्या लोकांचे हितचिंतक म्हणवणाऱ्यांचे संवाद ऐकले तर ही गोष्ट प्रखरतेने जाणवते की, ते जखमेवर मलम लावण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचे काम करत असतात. पलीकडच्या व्यक्तिबद्दल घृणा निर्माण करणे, इर्षेने काहीतरी करण्यास उद्युक्त करणे (नकारात्मक प्रेरणा) त्याच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिविषयी द्वेष निर्माण करणे. आपण आपल्या आसपास अशा कित्येक चर्चा ऐकल्या असतील. या गोष्टी छोट्या वाटतात पण यातूनच समाजसंस्कार घडत असतात आणि कधी एका कमकुवत मनावर त्याचा विपरीत परिणाम होईल याचा आपल्याला सहसा अंदाज देखील नसतो. मग प्रेमभंगातून आत्महत्या, ऍसिड अटॅक वगैरेसारख्या घटना या पसरवलेल्या नकारात्मकतेच्या परिणामस्वरूप विकृतरुपाने बाहेर येतात. एखादी व्यक्ती आपल्याला मिळाली नाही तर त्याविषयी इतकी चिडचिड का? स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य संपवण्याइतपत, त्या व्यक्तीचा सूड घेण्याइतपतची मानसिकता अगदी शिकल्या सवरलेल्या माणसांच्या मनात सुद्धा निर्माण कशी होऊ शकते ? आपले आयुष्य हे केवळ आपले नसते ,आपण आता जसे आहोत तसे निर्माण होण्यामागे एक खूप मोठी शृंखला असते ,कित्येक जन्मांची, कित्येक कर्मांची, कित्येक प्रार्थनांची, वडिलांच्या कष्टांची, आईच्या वेदनांची, पिढ्यापिढ्यांच्या पुण्याईची, अनेक मनांच्या'एक अशी व्यक्ती या कामासाठी निर्माण व्हावी' या प्रगाढ इच्छेची, इतिहासातील सर्व महात्म्यांच्या महान त्यागांची शृंखला. आपल्यातील एकेक जण महत्वाचा आहे, एकेक व्यक्ती महत्वाची आहे, आपण महत्वाचे आहोत! प्रत्येकाच्या वाट्याने अखंड जग उभे आहे. केवळ प्रेमभंगामुळे इतरांचा काय स्वतःचा जीव घेण्याचा अधिकार देखील आपल्याला नाही. मी तर याला प्रेमभंगाऐवजी अपेक्षाभंगच म्हणेन, कारण प्रेम निर्माण करते, ते भंग होतही नाही आणि करतही नाही.

हरवून तृषांना साऱ्या विसरून स्वतःला जाणे अन खोडून देणे सारे असणे आणि ते होणे याचेच नाव रे प्रीती हे निर्मळ जीवनलेणे प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे (जगदीश खेबुडकर, ज्योती पाटील) वेळोवेळी मनात येणाऱ्या अपेक्षांना, कामनांना वेळचेवेळी आळा न घालता आल्याने अनेक विकृतींना वाव मिळतो. प्रत्येक मनुष्यात परमात्मा आहे आणि तो भक्तीचाच भुकेला आहे एकतर प्रेमाला भक्तीपर्यंत पोहोचवा नाहीतर त्याला शक्तीस्वरूप प्रेरणा म्हणून धारण करा. विश्वात प्रेमाचे गंतव्य आणि त्याच्या असण्याचा उद्देश हाच आहे. तुम्ही कोणाला आवडला नाही म्हणून त्याच्याविषयी घृणा द्वेष निर्माण करणे परमेश्वराविषयीच हे भाव निर्माण करणे नाही का? - ज्योती घनश्याम पाटील ८४३१७५४०२९ पूर्वप्रसिद्धी - दै.संचार १४ फेब्रुवारी २०२२

Recent Posts

See All
अधिक-उणे - मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page