विविध दर्जेदार कार्यक्रमांनी बारामती पुस्तक जत्रा संपन्न
- 21 hours ago
- 2 min read
बारामती - येथील विवेकानंद सभागृहात सामाजिक विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत 9 मे 11 मे दरम्यान अनेक साहित्यिक कार्यक्रम पार पडले. ‘चपराक’च्या पुस्तकांचे प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, मुलाखत, नाट्यवाचन कार्यशाळा, सुलेखन कार्यशाळा, व्याख्यान, कवी संमेलन, पुरस्कार सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांना बारामतीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र टकले यांनी दिली.

या जत्रेचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन शेंडे, वनिता बनकर, मंगल बोरावके, रवींद्र टकले, प्रा. नलिनी कोकाटे, कवी सदानंद करंदीकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बापूसाहेब लोखंडे, खजिनदार नवनाथ वळकुंदे, सूर्यकांत भालेराव, रवींद्र बनकर, शंकरराव भुजबळ आदी उपस्थित होते. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सदिच्छा भेट दिली.
पहिल्या दिवशी रसिका तुळजापूरकर आणि अक्षय उपळेकर यांनी वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकास यादृष्टिने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतली. यातून नाटक मुलांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्रीराम मोहिते यांनी सुलेखन कार्यशाळेद्वारे मुलांना ‘लिहावे कसे?’ याचे यथायोग्य मार्गदर्शन केले.
संजय सोनवणी यांची घनश्याम पाटील यांनी धडाकेबाज मुलाखत घेतली. त्यात धर्म, समाज, लेखन प्रेरणा, व्यावसायिक आयुष्य, लोकशाहीपुढील आव्हाने, उद्याच्या भारताच्या संकल्पना, आरक्षण, इतिहास, संशोधन, काही सुख-दुःखाचे प्रसंग अशा सर्वस्पर्शी विषयांना त्यांनी स्पर्श केला. याच कार्यक्रमात ‘लाडोबा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या डॉ. संजय जगताप लिखित कथा राष्ट्रीय मूल्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जगताप यांनी संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरूष समानता, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची ओळख त्यांच्या पुस्तकाद्वारे करून दिली आहे.
हेमचंद्र शिंदे आणि डॉ. हर्षदा शिंदे यांनी अनुक्रमे ‘दहावी-बारावीनंतर पुढे काय?’ आणि ‘वैद्यकीय शिक्षण आणि प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले.
‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील आणि ॲड. राहुल मखरे यांना उद्योजक राजेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या हस्ते ‘समाजभूषण’ पुरस्कार देण्यात आला. प्रशांत केंदळे, नितीन चंदनशिवे, हनुमंत चांदगुडे आणि दिनेश आदलिंग यांच्या कवितांची बहारदार मैफिल संपन्न झाली. अनेक विषयांवरील उत्तमोत्तम कवितांचे सादरीकरण आणि सोबत खुमासदार निवेदन यामुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगला. राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य आणि लेखक संदीप वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘मार्कांच्या मागे लागताना गुणांचा विसर पडू देऊ नका,’ असे सांगत त्यांनी मुलांना अनेक प्रेरणादायी कथा सांगितल्या.
समारोपाच्या कार्यक्रमात संगमनेर येथील ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि लेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी ‘पुन्हा क्रांतिज्योती’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. सावित्रीबाई आजच्या परिस्थितीवर जे भाष्य करतात, त्याची चित्रदर्शी चुणूक त्यांनी दाखवली. या प्रयोगाने ही जत्रा एका वेगळ्याच उंचीवर गेली. सामाजिक भान देणारे त्यांचे संवाद अतिशय प्रेरणादायी आणि रोमांचकारी होते.

.jpg)



Comments