कष्ट, संस्कार आणि आध्यात्माचा दीप म्हणजेच ह.भ.प. चेतन महाराज माथेफोड शास्त्री
- Apr 11
- 2 min read
महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक तेजस्वी दीप उजळले पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचा प्रवास हा केवळ यशाचा नसून संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा जिवंत आदर्श ठरतो. ह.भ.प. चेतन महाराज माथेफोड शास्त्री यांचे जीवन हे याच तेजस्वी परंपरेचे आधुनिक उदाहरण आहे.
अत्यंत कठीण आणि गरिबीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे गेले. साधनांची कमतरता होती पण स्वप्नांची उंची मात्र आकाशाएवढी होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी देवाची आळंदी येथे ‘ज्ञानेश मिशन’ संस्थेत प्रवेश घेतला आणि तिथून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात झाली. कीर्तन, मृदुंग आणि प्रवचन यांचा त्यांनी मनापासून अभ्यास केला. हे शिक्षण केवळ पुस्तकी नव्हते तर जीवनाला दिशा देणारे होते.
पुढे त्यांनी आपले गुरु अर्जुन महाराज लाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील ‘श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था’ येथे शिक्षण घेतले. गुरूंच्या सहवासात त्यांनी केवळ विद्या नव्हे तर जीवनमूल्ये आत्मसात केली. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथे जाऊन संस्कृतचे सखोल शिक्षण पूर्ण केले. ही गोष्ट त्यांच्या जिद्दीची साक्ष देते.
संस्थेच्या कार्यात सक्रिय राहून त्यांनी ‘श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था’चे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याचवेळी ‘वेदांत साधना स्थळ’ या आश्रमाचे कार्यही त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळले. हा प्रवास सोपा नव्हता पण त्यांचा निश्चय अढळ होता.
काळाच्या ओघात ते आपल्या गावी परतले आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संस्कृत शिक्षक म्हणून काम करू लागले. संसाराची जबाबदारी स्वीकारत त्यांनी कुटुंबाचीही सुंदर जुळवाजुळव केली. एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा संसार फुलला पण त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं, समाजासाठी काहीतरी देण्याचं. या ध्येयातून त्यांनी आळंदी येथे आपल्या गुरुंच्या नावाने ‘अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. आज या संस्थेत महाराष्ट्रासह राज्याबाहेरील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना ते मोफत शिक्षण देतात हीच त्यांच्या कार्याची खरी उंची आहे.
आज चेतन महाराज संपूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक कीर्तनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत. त्यांच्या कीर्तनांचा प्रभाव इतका व्यापक आहे की झी टॉकीज आणि शेमरूसारख्या वाहिन्यांवर त्यांची कीर्तने प्रसारित झाली आहेत.
चेतन महाराजांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तिचा नाही तर तो प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसासाठी प्रेरणादायी आहे. गरिबी, अडचणी आणि संकटे ही त्यांच्या मार्गातील अडथळे नव्हती तर तीच त्यांच्या यशाची पायरी ठरली. आज ते जे काही आहेत, ते त्यांच्या कष्ट, गुरूभक्ती आणि समाजसेवेच्या भावनेमुळे. आपल्या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्रभर होत आहे. येणाऱ्या काळात आपल्या या गावात असाच एक आश्रम करण्याची त्यांची इच्छा आहे, जेणेकरून गावाचे नाव महाराष्ट्रभर होईल.
अशा या साध्या पण असामान्य व्यक्तिमत्त्वाला शब्दात मांडणे कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित, चेतन महाराज माथेफोड शास्त्री हे नाव म्हणजे संघर्षातून उभं राहिलेलं तेजस्वी उदाहरण आणि आध्यात्माच्या प्रकाशाने समाज उजळवणारा एक दीपस्तंभ!
- संचिन सुंबे, लोणी काळभोर
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)
.jpg)

Comments