top of page

संवादातलं जिवंत शिक्षण | Classroom discussion on life lessons

  • May 3
  • 3 min read

वर्गात शिकवताना कधी कधी असा क्षण येतो जेव्हा पाठ्यपुस्तक बाजूला राहते आणि आयुष्यच धडा बनून उभं राहतं. अशाच एका दिवशी मी माझ्या आयुष्यातील ‌‘धस‌’ या प्रसंगाचा उल्लेख करत होतो. आम्हनं धाकलपन या अहिराणी सदरातील माझ्या शिकवत असलेल्या प्रसंगाला अनुसरून लहानपणी शेतात कामाला गेल्यावर भर दुपारी अनवानी पायात खोलवर घुसलेलं धस, त्यातून वाहणारे रक्त आणि तरीही थांबता न येणारी कामाची घाई हे मुलांना सांगताना मन भरून येत होतं. पोरं जीवापासून ऐकत होती. यावेळी शब्दांपेक्षा त्या वेदनेची जाणीवच अधिक बोलत होती. मुलं शांत होती; पण ती केवळ ऐकत नव्हती तर त्या प्रसंगात स्वतःला कुठेतरी पाहत होती हे जाणवत होतं.


वर्गातील श्रावणीने हळूच मला थांबवत हात वर केला. ती म्हणाली, “सर, माझ्या पप्पांच्या पायात पण असंच काहीतरी घुसलं होतं. खूप दुखत होतं. आई म्हणाली होती, ‌‘आज जाऊ नका शेतात‌’ पण पप्पा म्हणाले, ‌‘कांद्याला पाणी नाही दिलं तर पीक जळेल.‌’ ते लंगडत-लंगडत शेतात गेले. त्यांना खूप जबर लागलं होतं, त्यांचा चेहरा बघवत नव्हता पण ते थांबले नाहीत.”


श्रावणीच्या डोळ्यांत काळजीही होती आणि वडिलांबद्दलचा अभिमानही होता. त्या क्षणी तिने केवळ एक घटना सांगितली नाही तर कष्ट, जबाबदारी आणि कुटुंबासाठी झगडणाऱ्या माणसाचं चित्र उभं केलं. तिचं हे समजणं आकलना पलीकडे होतं.


गप्पांच्या ओघात थोड्याच वेळात मानसीनेही तिचा अनुभव मांडला. ती म्हणाली, “सर, माझ्या पप्पांना कधी कधी खूप ताप येतो. तरी ते गाडी घेऊन सुरतला जातात. मी म्हणते, ‌‘आज जाऊ नका‌’, तर ते हसून म्हणतात, ‌‘तुम्ही शिकत राहा, बाकी मी बघतो.‌’ ते परत येतात तेव्हा खूप थकलेले असतात पण आमच्यासाठी ते कधीच नाही म्हणत नाहीत. आम्ही त्यांची वाट पाहतो.”


मानसीच्या आवाजात एक वेगळीच भावना होती. वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे निर्माण झालेली सुरक्षितता.


वर्गातील असा जिवंत संवाद हा केवळ बोलणं ऐकणं एवढ्यावर मर्यादित राहत नाही तर तो शिक्षणाच्या प्रक्रियेला अर्थपूर्ण आणि परिणामकारक बनवतो. जेव्हा मुलांना त्यांच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळते तेव्हा ते केवळ माहिती ग्रहण करत नाहीत तर त्या ज्ञानाशी भावनिक नातं जोडतात. बालमानसशास्त्रानुसार, अशी अभिव्यक्ती मुलांच्या आत्मविश्वासाला चालना देते, त्यांच्या विचारांना दिशा देते आणि शिकण्याची अंतर्गत प्रेरणा वाढवते.


संवादातून शिक्षकाला प्रत्येक मुलाच्या पार्श्वभूमीची, कुटुंबातील परिस्थितीची आणि त्यांच्या भावविश्वाची जाणीव होते. त्यामुळे अध्यापन अधिक संवेदनशील आणि वास्तवाशी जोडलेलं करता येतं. उदाहरणार्थ, श्रावणी आणि मानसी यांच्या अनुभवातून शिक्षकाला त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, पालकांचा त्याग आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना समजतात. या जाणिवेवर आधारित शिक्षण मुलांना अधिक जवळचं वाटतं.


म्हणूनच, संवाद हा शिक्षणाचा केवळ एक भाग नसून, तो शिक्षणाला जिवंतपणा देणारा आत्मा आहे. जिथे संवाद असतो, तिथे समज निर्माण होते; आणि जिथे समज निर्माण होते, तिथेच खऱ्या अर्थाने शिक्षण घडतं.


अशा प्रसंगांमधून मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान मिळत नाही तर जीवन समजून घेण्याची दृष्टी मिळते. कष्टाचं महत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबासाठी केलेला त्याग यांची मूल्यं त्यांच्या मनात नकळत रुजतात. श्रावणी आणि मानसी यांच्या अनुभवातून मुलांना हे उमगते की, अडचणी आल्या तरी कर्तव्यापासून पळ काढायचा नसतो, तसेच शिक्षण हीच पुढे जाण्याची खरी ताकद आहे.


यासोबतच अशा संवादातून अनेक जीवनकौशल्यांची जडणघडण होते. स्वतःचे विचार मांडण्याची क्षमता, इतरांच्या भावनांची जाण ठेवण्याची संवेदनशीलता, परिस्थिती समजून निर्णय घेण्याची क्षमता आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची वृत्ती ही सर्व कौशल्ये मुलांमध्ये विकसित होतात. मुलं एकमेकांचे अनुभव ऐकून सहानुभूती शिकतात आणि जीवनातील वास्तव स्वीकारण्याची मानसिक ताकद मिळवतात.


म्हणूनच असे अनुभवाधारित संवाद हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात कारण इथे केवळ विद्यार्थी घडत नाहीत तर संवेदनशील आणि जबाबदार माणूस घडत असतो. या दोन्ही वास्तव प्रसंगांनी वर्गातील वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं. इथे शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणं नव्हतं; तर जीवन समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बाल मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर अशा प्रसंगांमध्ये मुलं त्यांच्या भावविश्वातून व्यक्त होतात. त्यांना जे दिसतं, जे जाणवतं, ते ते शब्दांत मांडतात. ही अभिव्यक्ती त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देते.


मुलांच्या मनात आधीपासूनच निरीक्षणाची ताकद असते. ते आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देतात आणि त्यातून अर्थ काढतात. शिक्षक म्हणून आपण फक्त योग्य संधी निर्माण केली तर ही निरीक्षणं सहजपणे बाहेर येतात. अशा संवादातून मुलांमध्ये सहानुभूती, कृतज्ञता आणि जीवनमूल्यांची जाणीव विकसित होते.


 या अनुभवाने पुन्हा एकदा जाणवलं की, वर्ग म्हणजे चार भिंतींच्या आत घडणारी प्रक्रिया नसून, तो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला प्रवास आहे. मुलांच्या अनुभवांना ऐकून घेतलं, त्यांना व्यक्त होऊ दिलं तर शिक्षण अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनतं.


शेवटी इतकंच जाणवतं अशा संवादांतून उलगडणारे अनुभव, त्यातून रुजणारी मूल्यं आणि घडणारी कौशल्यं हीच खरी शिक्षणाची पायाभरणी असते. पुस्तकातील धडे कधीतरी विसरले जाऊ शकतात; पण मनाला स्पर्श करणारे हे अनुभव आयुष्यभर सोबत राहतात आणि मुलांना सक्षम, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवतात.



भरत पाटील

9665911657

साप्ताहिक चपराक ४ ते ९ मे २०२६


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page