top of page

नका, राहू द्या!

  • Mar 30
  • 2 min read

“नका सर, राहू द्या!”

दुसरीतल्या भूमीच्या तोंडून आलेला हा साधा शब्द माझ्या शिक्षक जीवनातला मोठा धडा ठरला. प्रसंग वेगवेगळे, परिस्थिती वेगळी; पण तिची भूमिका मात्र सारखीच, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणारी!

भारतीय प्रजासत्ताक दिनाची तयारी शाळेत सुरू होती. मुलींच्या लेझीम पथकाचा सराव रंगात आला होता. प्रत्येक मुलगी आपल्या हातातील लेझीम तालावर वाजवत होती. उत्साह, आनंद आणि थोडीशी स्पर्धा वातावरण अगदी भारलेले होते. त्याच वेळी भूमीच्या वाट्याला एक तुटकी लेझीम आली होती. सराव करताना ती तुटली. ती वाजवताना तिच्या चेहऱ्यावर थोडंसं संकोचाचं सावट दिसलं. मी ते लक्षात घेतलं आणि तिच्याकडील लेझीम बदलून देतो असं सांगितलं.

ती शांतपणे म्हणाली, “नका सर, राहू द्या.”

मी आग्रह केला, तर ती सहज बोलली, “सर, मग ही तुटकी दुसरीला जाईल ना? नका हो, राहू द्या.”

क्षणभर मी नि:शब्द झालो. एवढ्याशा मुलीच्या मनात स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार इतक्या सहजपणे उमललेला पाहून मन भरून आलं. तिला चांगली लेझीम हवी नव्हती असं नाही; पण तिच्या बदल्यात दुसऱ्याच्या वाट्याला तुटकी जाऊ नये, ही जाणीव तिच्या मनात मोठी होती.


काही दिवसांनी आणखी एक प्रसंग घडला. सर्व मुलांना नवीन वह्या वाटल्या जात होत्या. प्रत्येक जण उत्साहाने आपली वही घेत होता. चाचपून पाहत होता. योगायोगाने भूमीच्या वाट्याला एक थोडी पान फाटलेली वही आली. ते लक्षात येताच मी ती बाजूला काढून दुसरी देण्याच्या तयारीत होतो.

तेवढ्यात ती म्हणाली,  “ओ सर, नंतर ही वही कोणाला तरी जाईल ना? मग राहू द्या, मीच वापरून घेते.”

यावेळी मी आतून हललो. अंगात एक रोमांच उभा राहिला. अंगाला काटा आला. धाडकन लेझीमचा प्रसंग डोळ्यासमोर आला होता. यावेळीही तिच्या आवाजात कोणतीही खंत नव्हती, राग नव्हता; उलट समाधान होतं. स्वतः थोडं कमी पडलं तरी चालेल पण दुसऱ्याला कमी पडू नये ही भावना तिच्या मनात स्पष्ट होती.


या दोन प्रसंगांतून मला जाणवलं, की शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे. जीवनकौशल्यांची बीजं रुजवणं हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. भूमीमध्ये दिसलेली संवेदनशीलता म्हणजे दुसऱ्याच्या भावनांची जाणीव ठेवणं. तिच्यातील जबाबदारीची भावना म्हणजे परिस्थिती स्वीकारून सकारात्मक निर्णय घेणं. एवढ्या लहान वयात ही जाणीव निर्माण होणं म्हणजे घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणी झालेल्या मूल्यसंस्कारांची पेरणीच म्हणावी लागेल.

या दोन्ही प्रसंगांकडे पाहताना भूमीच्या वागण्यात आणखी एक महत्त्वाचा गुण प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे तिच्यातील सौजन्यशीलता. सौजन्य म्हणजे सौहार्देन जन्यते इति, म्हणजे केवळ नम्र शब्द वापरणे नव्हे; तर इतरांच्या भावनांचा आदर राखत, कुणालाही दुखावणार नाही अशा पद्धतीने वागणे. भूमीने “नका सर, राहू द्या” असे म्हणताना स्वतःची इच्छा दडपली पण त्यात कुठेही हट्ट, तक्रार किंवा नाराजी नव्हती. उलट तिच्या बोलण्यात सभ्यपणा, समजूतदारपणा आणि इतरांविषयी आदरभाव होता. सौजन्यशीलता मुलांना समाजात सुसंवाद साधायला शिकवते. ती स्पर्धेपेक्षा सहकार्याची, स्वार्थापेक्षा समतेची आणि अधिकारापेक्षा कर्तव्याची जाणीव निर्माण करते. अशा मूल्यांमुळेच व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि विश्वासार्ह बनते. भूमीसारख्या विद्यार्थिनीच्या वर्तनातून दिसणारी सौजन्यशीलता हीच खरी शाळेच्या संस्कारांची कमाई आहे.


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

आजच्या युगात ‌‘मला चांगलं मिळालं पाहिजे‌’ हा विचार सहज रुजतो पण ‌‘माझ्यामुळे दुसऱ्याला वाईट मिळू नये‌’ हा विचार रुजवणं हीच खरी शिक्षणाची कसोटी आहे. संसाधनांचा आदर, समतेची जाणीव आणि इतरांविषयी करुणा, दया हीच समाजाला उन्नत करणारी मूल्ये आहेत.

भूमीचा ‌‘नका सर राहू द्या‌’ हा शब्द मला प्रत्येक वेळी आठवतो आणि शिकवतो की शाळा म्हणजे फक्त ज्ञान देणारी संस्था नाही; ती माणुसकी घडवणारी कार्यशाळा आहे.

अशा निरागस प्रसंगांमुळेच आपल्यातला शिक्षक पालक म्हणून आपलं माणूसपण जगत असतो. चिमुकले नवा विचार नेहमीच रुजवत असतात. जरी इथे दररोज पुस्तकांबरोबरच माणुसकीचीही अक्षरं शिकवली जात असली तरी कधी कधी विद्यार्थ्यांकडूनच ती शिकायलाही मिळतात हे विशेष असतं.


- भरत पाटील

9665911657

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६


आजचे शिक्षणयात्री | Aajche Shikshanyatri
₹350.00₹262.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page