top of page

पुस्तकच समदं राहतं का?

  • 18 hours ago
  • 2 min read

दुपारची वेळ असल्यानं चौथीच्या वर्गात मराठी कविता शिकवित होतो. कवितेच्या अनुषंगाने काही अभ्यासपूरक बाबी सांगत असतानाच ईश्वरी अचानक म्हणाली, “सर, पुस्तकच समदं राहतं का?”

क्षणभर वर्गात शांतता पसरली. तिच्या आवाजात प्रश्नापेक्षा अधिक काही तरी होतं हे जाणवत होतं. मनात साचलेली खंत, गोंधळ आणि एक कोवळं अस्वस्थपण. ती बोलत होती, “सर,पुस्तकासारखं थोडंच जगता येतं...!”

तिच्या बोलण्याचा कल, वय पाहता माझ्यासाठी हे समजून घेणं गरजेचं वाटलं, की नेमकं कारण काय असेल..? नंतर बोलता बोलता कळलं की तिच्या आजींनी तिला अभ्यासावरून रागावलं होतं. खेळायला जाऊ दिलं नव्हतं. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला अभ्यासच सगळं असतं का? माझ्या भावनांचं काय? माझ्या खेळण्याचं, हसण्याचं, मनासारखं काही करण्याचं महत्त्व नाही का?

हा प्रश्न छोटा होता; पण त्यातून बालमनाची नाजूक जडणघडण डोकावून दिसत होती. बालमानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या मते, या वयातील मुले तर्कशुद्ध विचार करू लागतात; पण भावनांची पकड अजूनही घट्ट असते. त्यांना योग्य-अयोग्य कळतं; मात्र त्याच वेळी त्यांना प्रेम, समजून घेणं आणि स्वीकृती यांची तीव्र गरज असते. ईश्वरीचा प्रश्न हा अभ्यासाविरुद्ध नव्हता; तो भावनांच्या मान्यतेसाठी होता, हे कळालं होतं.

आपण अनेकदा शिक्षणाचा अर्थ केवळ पुस्तकांपुरता मर्यादित ठेवतो. धडे, गुण, परीक्षा, गृहपाठ याच भोवती शिक्षण फिरतं! पण शिक्षणतत्त्वज्ञ जॉन ड्युई म्हणतात, “Education is not preparation for life; education is life itself.” शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला. त्यात अनुभव आहेत, संवाद आहे, खेळ आहे, अपयश आहे, पुन्हा उभं राहणं आहे.

ईश्वरीला आजींनी रागावलं त्यामागे प्रेमच होतं; पण ते प्रेम तिच्यापर्यंत कठोरतेच्या रूपात पोहोचलं. बालमानसशास्त्र सांगतं की सततची ओरड मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करते. मुलं गप्प होतात, प्रश्न विचारणं कमी करतात किंवा कधी बंडखोर होतात. उलट समजून घेतलेली शिस्त त्यांना जबाबदार बनवते. मानसशास्त्रज्ञ डॅनिअल गोलमन यांनी ‌‘भावनिक बुद्धिमत्ता‌’ ही संकल्पना मांडली. भावनिक जाणीव आणि भावनांचं व्यवस्थापन शिकलेलं मूल आयुष्यात अधिक सक्षम ठरतं. त्या दिवशी ईश्वरीचा प्रश्न ऐकून घेतला गेला, तिच्याशी शांतपणे संवाद साधला गेला हा तिच्या भावनिक विकासाचा महत्त्वाचा क्षण होता. तिने स्वतःच्या भावनांसोबत आजीलाही समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला होता.


तिला समजावून देतांना सांगितलं, “अभ्यास महत्त्वाचा आहे कारण तो आपल्याला ज्ञान देतो; पण खेळही महत्त्वाचा आहे कारण तो आनंद देतो. वेळेचं नियोजन केलं तर दोन्ही शक्य आहे.”


वर्गातील इतर मुलंही या चर्चेत सामील झाली. कुणी म्हणालं, “माझी आईही आधी अभ्यास म्हणते.” कुणी म्हणालं, “मी आधी गृहपाठ करून मग खेळतो.” त्या दिवशी धड्यापेक्षा मोठा धडा शिकला गेला संवादाचा.


शाळा हे ठिकाण केवळ फळा, खडू आणि पुस्तकं इतक्यानेच भरलेले नसते. शाळा मन मोकळं करण्याची जागा असायला हवी. घरात न बोलता आलेले प्रश्न, इथे शब्द शोधता येतात पोरांना. शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसतो; तो भावनांचा दुवा असतो घर आणि मुलांच्या मनामधला.


ईश्वरीचा “पुस्तकच समदं राहतं का?” हा प्रश्न मनात घुमतो. तो प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाला विचारतो, आपण मुलांच्या अभ्यासाला महत्त्व देतो; पण त्यांच्या भावनांनाही तेवढंच स्थान देतो का? हा प्रश्न येतोच. या संवादामुळे ईश्वरीसह सर्व वर्गातील मुलांना चर्चेत सहभागी होता आले. तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.


मुलांना शाळा म्हणूनच आवडते मनापासून कारण इथे त्यांना समजून घेतलं जातं. इथे प्रश्न विचारायला मोकळीक असते.  इथे मुलांचं हसू जपलं जातं. इथे पुस्तकाबरोबर मनही वाचलं जातं. पुस्तक ज्ञान देतं; पण समजून घेणं, आत्मविश्वास देतं आणि आत्मविश्वासानेच खरं शिक्षण फुलतं!


(मज आवडते मनापासूनी शाळा)

- भरत विठ्ठल पाटील 

+91 96659 11657

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २३ ते २९ मार्च २०२६


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page