कन्फ्युजन
- Apr 5
- 5 min read
सध्या भारतातील काही लोक सोडल्यास बहुतेक जण कन्फ्युजनमध्ये आहेत. दररोज उठावे अन् पाहावे तर एक एक बातम्या समोर येतात, अरे, असे कसे घडले? असे प्रश्न पडतात आणि कन्फ्युजन अधिकच वाढत जाते.

अचानकच एका रात्री 8 वाजता समजले की, चलनातील पाचशे अन् हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्यात. हा खरंच मोठा धक्का होता. कळेच ना की आज रात्री आठ वाजेपर्यंत ज्या चलनाचा वापर आपण करत होतो, तेच चलन असे काय झाले की ते व्यवहारातून बाद करण्यात आले? सकाळी सर्वांप्रमाणे मी देखील बँकेत गेले. बँकेच्या एका ऑफिसरसमोर बसलेली असताना मी सहज म्हणाले, “मला वाटले हा तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून जनता रस्त्यावर उतरेल!” तर ती ऑफिसर म्हणाली, “बहुतेक हा निर्णय चांगला असेल म्हणूनच जनता विरोध करत नाही अन् म्हणूनच रांग लागलीय.” पुढे ह्या अततायी निर्णयाचे काय अन् कसे झाले? याचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
नंतर आली एक देश, एक कर प्रणाली! सुरुवातीला वाटले, कदाचित ही प्रणाली देखील जनहितासाठी असावी पण तरीही मनात संभ्रम होताच. तो संभ्रम दूर करण्यासाठी बरेच दिवस अनेक अर्थतज्ज्ञ, चार्टड अकाउंटंट, सी.एस. यांचे मार्गदर्शन घ्यावे लागले. पाचशे, हजार रुपये भरून त्या सत्रात भाग घेऊन तीही प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न केला. आलिया भोगाशी... शेवटी काय करणार? आपले ज्ञान अपडेट करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याचे जे परिणाम भोगावे लागले, ते आजतागायत संपलेले नाहीत. असो.
नंतर आला राम मंदिर उभारण्याचा संकल्प! न्यायालयाने दिलेली क्लीनचीट! मग बातम्या येऊ लागल्या, राम मंदिरासाठी अमक्या-अमक्या ठिकाणाहून शीळा आणली जातेय, असे असेल राम मंदिराचे स्वरूप! त्यासाठी एवढी जमीन उपलब्ध झालीय वगैरे... वगैरे! उत्सुकता वाढत गेली अन् अथक प्रयत्नानंतर राममंदिर उभारले गेले. आमचे रामलल्ला स्वगृही विराजमान झाले. सर्वत्र ‘जय श्रीराम’चे नारे गुंजू लागले. ‘रामराम’च्या ऐवजी ‘जय श्रीराम’ ही घोषणा अस्तित्वात आली. त्याचेही काही वाटले नाही. चला रामराम नाही तर जय श्रीराम तर आहेच ना? त्यातही राम आहेच ना? एवढासा तर बदल झालाय! अन् बदल हा स्वीकारण्यात काय आपत्ती असणार? एवढ्या वर्षाचे स्वप्न अस्तित्वात आले, हे काय कमी होते? आनंदच झाला.
पुढे उरी, पुलवामा, चीनची घुसखोरी, पहलगाम ही सर्व रणसंग्रामे पाहायला मिळाली. प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या विजयाने उर अभिमानाने भरून आला. देश प्रगतीपथावर आहे, याची सुखद अनुभुती अनुभवायला मिळाली. आपला देश तीन ट्रीलियन डॉलरचे ध्येय पूर्ण करणारच! चांगलीच गोष्ट होती.
आता देश विकसित होत चाललाय, देशातील बेरोजगारी संपण्याच्या मार्गावर आहे, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव मिळेल, ते संपन्न होतील, शिक्षणाचा स्तर उंचावत चाललाय. आमची युवा पिढी शिक्षित होऊन देशाची अधिक उन्नती करेल, अशी स्वप्ने आम्ही पाहू लागलो.
इकडे बाजारातील सर्वच वस्तूंचे भाव वाढू लागले. 400 चा गॅस 1150 वर येऊन पोहोचला. जीवनावश्यक वस्तूंवर जी.एस.टी लावला गेला, वीस हजाराचे सोने - दोन लाखावर येऊन पोहोचले, शिक्षण महागले, सरकारी संस्था एकामागून एक संपत गेल्या, त्या जागी खाजगीकरण सुरु झाले. चला, काहीतरी बदल होतोय म्हणून तेही स्वीकारत गेलो. मरता क्या न करता? अशी स्थिती येऊन ठेपली.
संगणक युग सुरु होतेच. आमची युवा पिढी प्रगती पथावर अग्रेसर होत चालली होती. सोशल मीडिया कार्यान्वीत होत चालला होता. व्हाट्सॲप युनिव्हर्सिटी अधिक समृद्ध होत चालली होती. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला होता. अगदी झाडू मारणारी बाई ते भाजी विकणारी मंडळी देखील फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून व्यवहार करू लागली होती. हे पाहून विकास होत चाललाय, जनतेचे राहणीमान उंचावत चाललेय, हे पाहून खरंच समाधान वाटू लागले. प्रत्येकाची जीवनाची लढाई सुरु होतीच. महागाईने उंची गाठली होती. व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीमधून ज्ञानात भर पडत चालली होती. देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या महात्म्यांनी, देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते, त्यांच्याबद्दल काही बाही लिहून येऊ लागले. काल ज्यांच्याबद्दल आदर होता, अभिमान होता, त्याच लोकांना आता आमची पिढी नावे ठेवू लागली होती. त्यांच्या चुका काढू लागली होती. त्यांना शिव्या देऊ लागली होती. गरळ ओकू लागली होती. सनातन धर्म, हिंदुत्त्व ह्यावर बोलू लागली होती. राम नामाचा जप करू लागली होती.
धर्माबद्दल अभिमान असणे, ही काही वाईट गोष्ट नव्हती पण त्याचा अतिरेक होऊ लागला. जो उठेल तो कोणाच्याही चारित्र्यावर, कर्तृत्वावर शिंतोडे उडवू लागला अन् जाणवले, अरे, हे काय होतेय? जे चाललेय ते योग्य आहे का अयोग्य? परत कन्फ्युजन होऊ लागले. जो सरकारच्या बाजूने बोलेल, तो देशभक्त, जो विरोधात बोलेल तो देशद्रोही! ही संकल्पना अस्तित्वात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरावर वाट्टेल तसे वक्तव्य होऊ लागले. रामनामाचा तर इतका अतिरेक झाला की, बिचाऱ्या त्या रामाचाच राग येऊ लागला. त्या नामाची एक आगळीच जादू जनमाणसाच्या अंगात एवढी भिनली की, आपण रामराज्यात तर जगत नाही ना? हा संभ्रम निर्माण होऊ लागला पण कल्पनेतील रामराज्याचा कुठेच अनुभव येत नव्हता. हं, रामाच्या नावाने दंगे-धोपे मात्र सुरु झाले होते. कदाचित राम देखील या गोष्टींनी चक्रावला असेल! रामराज्याच्या हव्यासापायी हे काय सुरु झाले? काहींना प्रश्न पडला होता पण असे घडू लागले मात्र होते.
इकडे आंदोलने सुरु होती. ती कित्येकदा चिरडली गेली. सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी नाईलाजाने जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले पण पुढील अनेक वर्षे त्याची अंमलबजावणी मात्र झालेली दिसून आली नाही. जनतेची मागणी, त्यांचे प्रश्न ह्याचे भिजत घोंगडे अद्यापही तसेच पडून आहे. त्यांना बासनात गुंढाळून ठेवले गेले. शेवटी कोण किती दिवस लढा देणार? जर न्यायच मिळत नसेल तर जनता एकेदिवशी कंटाळणारच ना? त्यांची सहनशक्ती अशी किती दिवस टिकून राहणार? प्रत्येकाला आपल्या पोटा-पाण्याचा प्रश्न असतोच की!
पुढे तर परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. करोनाचा प्रादुर्भाव झाला. लॉकडाउन लागले. महामारीने कळस गाठला. असंख्य जीव हकनाक गेले. काही संपूर्ण कुटुंबेच नामशेष झाली. आम्ही टाळ्या वाजविल्या, थाळ्या पिटल्या, मेणबत्या लावल्या पण काही उपयोग झाला नाही. करोनाला जेव्हा जायचे होते, तेव्हाच तो गेला.
नंतर निवडणुका लागल्या. संपूर्ण देशच निवडणुकीमय झाला. आज लोकसभा, उद्या राज्यसभा, परवा विधानसभा तर नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, ह्यांच्या निवडणुका लागत गेल्या. एक देश, एक कर ह्या प्रणालीप्रमाणे एक देश, एक सरकार असावे, असे सत्ताधीशांना वाटू लागले. त्यासाठी निवडणूक आयोग, न्यायसंस्था, मीडिया सर्व जण झाडून कामाला लागले. ई.व्ही.एम.चे प्रताप दिसू लागले. एकाच पक्षाला राक्षसी मतदान होऊ लागले. त्याला विरोध करणाऱ्यास ई.डी, सी.बी.आय. यांचा धाक दाखवून त्यांच्यामागे शुक्लकाष्ट लावण्यात आले. कित्येकांना तुरुंगात टाकण्यात आले. मतदानानंतर मतदारांची संख्या लाखोंनी वाढल्याचे घोषित होऊ लागले. त्यावर आक्षेप घेतल्यास किंवा शंका व्यक्त केल्यास अनेक नवे नियम काढून त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. निवडणुकीत झालेली मतांची चोरी हे सर्व उघडकीला आणले तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. विरोधकांचे हे अरण्यरुदनच ठरले कारण काहीही झाले तरी, कितीही जनता बोंबबली तरी त्यावर काही करायचेच नाही, अशी भूमिका घेतल्यावर मग काय करणार? पुढे पुढे तर धाक दाखवून उभ्या राहिलेल्या प्रतिपक्षाच्या उमेदवाराला पैसे देऊन माघार घ्यायला लावून आपल्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यात आले आणि देशात काही अपवाद वगळता एकाधिकारशाही अस्तित्वात आली.
तरीही विरोधी पक्ष गप्प बसत नव्हता. देशात एक ना अनेक गलिच्छ, बिभत्स्य, लाजिरवाणे प्रकार घडू लागले. त्यात आपल्या उन्मत्त नेते, प्रतिष्ठित मंडळी, प्रशासकिय अधिकारी, त्यांच्या बायका यांचा कच्चा चिट्ठा बाहेर आला. साहजिकच देशवासीयांसाठी हा आश्चर्याचा आणि कुतूहलाचा विषय बनला तर आंबटशौकीनांसाठी तो करमणुकीचा विषय बनला. व्हाट्सॲप, इंस्टाग्राम, यु ट्यूब यावर ढिगाने व्हिडीओ येऊ लागले. जनता ते पाहण्यात गर्क झाली. त्यामुळे मुख्य विषयावरुन जनतेचे लक्ष विचलित झाले अन् अल्पमती आणि अल्पस्मृती असलेली जनता मागचे सर्व प्रश्न, कांड विसरून समोर दिसेल त्या विषयावर विचार करू लागली पण त्यावर विचार, चर्चा करून जनतेचे प्रश्न सुटणार होते का? ज्याने वाईट कृत्य केले त्याला कदाचित न्यायव्यवस्था शिक्षा देईलही पण त्याने भारतवासीयांचे जीवनाशी निगडित प्रश्न सुटणार आहेत का? आम्हाफ.ला सुखी, समाधानी, वैभवशाली जीवन जगायला मिळणार आहे का?
सारेच कन्फ्युजन आहे. एखाद्या भोंदूबाबाच्या आहारी जाऊन भ्रमित होणे वेगळे आणि धर्माच्या नशेची अफूची गोळी खाऊन संभ्रमित होणे वेगळे! त्या कन्फ्युजनमधून, त्या संभ्रमित अवस्थेतून जनता कधी जागी होईल, त्या चक्रव्यूहातून आम्ही कधी बाहेर पडू? काळच सांगेल. तूर्त एक एक चक्रव्यूह भेदून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू यात. स्वतःपुरते तरी शहाणे होऊ यात. निवडणूक आयोग, न्यायसंस्था, पोलीस दल, राजकारणी यांना तरी आपण आज नमवू शकत नाही पण पैसे न घेता मतदान करून, शिक्षित असूनही भोंदूबाबा किंवा बाया ह्यांच्या भुलाव्याला न भुलून, धर्मांधता न बाळगून आपण या महागाईच्या जमान्यात निदान जिवंत राहण्याची कसरत तर करूच शकतो ना? भलेही सरकारदरबारी असलेली आपली कामे होतील ना होतील, त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय नाहीय पण दिवसरात्र मेहनत करून, नैतिकता बाळगून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार तर बनूच शकतो ना? तर लोक हो, आता कोणत्याच गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. हक्कासाठी भांडू देखील नका. समाजात काही वाईट घडले तरी त्यावर व्यक्त होऊ नका. तुमचे हे रुदन कोणीच ऐकणार नाही. ते आपल्या मस्तीत जगत आहेत. जेवढा काही उतमात करायचा आहे, तो त्यांना करू द्यात. रात्रीनंतर दिवस उजाडतो, हे शाश्वत सत्य आहे. आज ना उद्या किंवा आपल्या हयातीनंतर का होईना, तो सोनियाचा दिवस नक्कीच उजाडेल, यावर विश्वास ठेवा. फक्त तो दिवस पाहण्यासाठी, ते रामराज्य अनुभवण्यासाठी आपण नसू, हे मात्र नक्की!
-चंद्रलेखा बेलसरे
+91 9850895051
प्रसिद्धी - 'साप्ताहिक चपराक' ६ ते १२ एप्रिल २०२६
.jpg)



Comments