देहाचा ‘फळा’ होऊ दे!
- 4 days ago
- 5 min read
मध्यंतरी मंत्रालयात गेलो होतो. त्यावेळी आमच्या कामाशिवाय ज्यांची स्वतःहून एकमेव भेट घेतली ती कोणत्या मंत्र्याची वा अधिकाऱ्याची नव्हती. ती होती त्यावेळचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची! खरं तर त्यांच्याकडे काही कामही नव्हतं. त्यामुळं त्यांचा अमूल्य वेळ घ्यावा की नाही, असा विचार मनात डोकावला! पण ते ज्या नेकीनं रुग्णसेवेचं काम करतात आणि जे मूळचे पत्रकार आहेत, आपल्या लेखनाचे चाहते आहेत त्या मंगेशजींना भेटावं असं वाटलं. मंत्रालयाचा प्रवेश पास घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे भेट होईल असं वाटलं नाही. म्हणून मंगेशजींना फोन करून शुभेच्छा दिल्या. आम्ही मंत्रालयाच्या गार्डन गेटला आहोत हे कळल्याबरोबर त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांना आम्हाला घ्यायला पाठवलं आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षात प्रेमानं स्वागत केलं.
मंगेश चिवटे हे मंत्री नाहीत; पण मंत्र्यापेक्षा कमीही नाहीत! शब्दशः हजारो रुग्णांना जीवदान देण्यात त्यांचा वाटा आहे. एकनाथ शिंदे एकदा कौतुकानं म्हणाले होते की, “कामाच्या कोणत्याही फाईलवर सही करण्यासाठी मी सदैव तत्पर असतो! पण मंगेश चिवटे यांच्याकडून रुग्णांची कोणतीही फाईल आली तर मध्यरात्री झोपेत सही करण्यासाठी सुद्धा मी एक स्वतंत्र पेन ठेवला आहे. त्या फाईलवर मी न वाचता, न पाहता सही करतो. माझ्या एका सहीने एखाद्याचा जीव वाचणार असेल तर त्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही!”
मंगेश चिवटे यांच्या कामावरील अढळ निष्ठेमुळे हे शक्य झाले. रोज येणाऱ्या शेकडो कॉल्सना प्रतिसाद देणे आणि प्रत्येकाला शक्य ती मदत करणे यामुळे त्यांनी त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंगेश चिवटे यांच्या कार्यतत्परतेने आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे यमराजाला अनेकदा अनेक मोहिमांवरून रित्या हाताने परत जावे लागले असेल. मंत्रालयातील आमच्या त्या भेटीत मंगेश यांनी माझ्या श्रीपाल सबनीसांवर मी लिहिलेल्या लेखांपासून अनेक विषयांना उजाळा दिला. कामाच्या धबडग्यातही हा माणूस माझ्यासारख्या एखाद्याच्या लेखनाचे इतके पैलू लक्षात ठेवतो याचे आश्चर्य वाटले. यावेळी त्यांनी तळमळीने काही सांगितलं असेल तर देहदानाविषयी! वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळण्यासाठी देहदान ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याने पत्रकार आणि प्रकाशक म्हणूनही त्याबाबत आमच्याकडून सातत्याने प्रबोधन व्हावे अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंगेश चिवटे यांनी फक्त रुग्णसेवेचा ध्यासच घेतला नाही तर ती त्यांची जीवननिष्ठा झालीय, हे त्यांच्यासोबतच्या चर्चेतून लक्षात येत होते.
प्रणित मोरे याच्या एका कॉमेडी शो मध्ये सेजल पवार नावाच्या एका डॉक्टरने काही तारे तोडले आणि देहदानाबाबतचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. लाईक, व्ह्यूज आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी ही मंडळी काहीही करतात. अशा विकृत आणि घाणेरड्या मनोवृत्तीच्या प्रणितचा हा खेळ सातत्याने सुरूच असतो, हे वारंवार दिसून आले आहे. डॉ. हिमांशू जागरा नावाच्या एका तद्दन रद्दाड माणसाने 370 रूपयाच्या बिर्याणीवरून महिलेचा कसा वापर केला हेही याच शोमध्ये हसत हसत सांगितले होते. “370 रूपयांची बिर्याणी तिला खाऊ घातलीय तर ती वसूल करायला नको का?” अशा अर्थाचे रोगट विधान त्याने केले होते. त्यापुढे जाऊन सेजल पवार या डॉक्टरने देहदानासाठी आलेल्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टच्या छोट्या आकारावरून भाष्य करत आपल्या मनातील विकृती दाखवली. सेजलला केईएम रुग्णालयातून 15 दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले असले तरी ते पुरेसे नाही. विविध लोकांना आपल्या कार्यक्रमात बोलवून त्यांच्याशी असे अश्लिल संभाषण करून प्रसिद्धी आणि पर्यायाने पैसा मिळवणाऱ्या प्रणित मोरे याच्यावरही कडक कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही हा विषय गंभीरपणे घेतला असून, कॉमेडी शोच्या नावावर असे घाणेरडे प्रकार करू नका, असा सज्जड दम भरला आहे. एकीकडे मंगेश चिवटे यांच्यासारखे आरोग्यदूत देहनानाविषयी गंभीरपणे कार्यरत असतानाच दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रात असूनही अशा संवंग प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या डॉक्टरांचे हिडीस रूप दिसून येते.
देहदान चळवळ आता आता लोकांपर्यंत पोहोचत असताना अशी अश्लाघ्य आणि अश्लिल विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. वैद्यकीय शिक्षण घेणारे पन्नास ते शंभर भावी डॉक्टर एकेका मृतदेहामुळे शिकत असतात. देहदान केल्यास आत्मा भटकत राहतो, चितेवर जाळले गेले नाही तर मोक्ष मिळत नाही, पुढच्या जन्मी अपंगत्व येते, इतकेच काय तर नेत्रदान केल्यास पुढील जन्मी माणूस आंधळा राहतो या व अशा अनेक अंधश्रद्धांमुळे आधीच अनेक जण देहदान, नेत्रदान किंवा कोणतेही अवयव दान करायला पुढे येत नाहीत.
शवचिकित्सेमुळे डॉक्टरांना अनेक गोष्टी कळतात आणि वैद्यकीय सरावाच्या वेळी त्या उपयुक्त ठरतात. जो देह मरणानंतर राखच होणार आहे तो वैद्यकीय संशोधनासाठी दिला तर त्यातून आपल्याच समाजात चांगले डॉक्टर निर्माण होणार आहेत. एका मृतदेहामुळे शंभर डॉक्टर तयार झाले तर ते पुढे हजारो रुग्णांचे प्राण वाचवणार आहेत. मृत्युनंतर जो देह आपल्या काहीच कामाचा नाही, त्यामुळे चांगले डॉक्टर तयार होण्याबरोबरच गरजूंना डोळे, त्वचा, हाडे मिळतील. जिवंतपणी आपण समजाच्या भल्यासाठी काय करतो हे माहीत नाही पण मेल्यानंतर जर आपले शरीर समाजोपयोगी ठरणार असेल तर यापेक्षा मोठे पुण्यकर्म कोणते असू शकते? म्हणूनच शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे मृतदेह मिळवण्याचे मोठे आव्हान असताना सेजल पवारसारखे विकृत डॉक्टर याचं जे हसं करतात ते अधिक चिंताजनक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, असे म्हणावे लागेल.
फक्त निरोगी माणसाचाच नाही तर प्रत्येक मृतदेह वैद्यकीय शिक्षण, संशोधन किंवा अवयव प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे कुणी कर्करोगाने गेला असेल तर कर्करोगाचा अभ्यास करण्यासाठी तो देह मोलाचा ठरतो. एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्या व्यक्तिच्या हाडांचा अभ्यास करणे सोपे जाते. ज्यांच्याकडे क्षमता नाही, घर-दार, बंगला, गाडी, शेती, सोने-नाणे असे काहीच नाही ते सुद्धा मृत्युनंतर देहदान करून अमर होऊ शकतात. जो देह मृत्युनंतर कुजणार आहे, जळणार आहे त्याच्या ऐवजी देहदान केले तर अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना हृदय, फुफ्फुसं, मेंदू प्रत्यक्ष पाहता येईल, हाताळता येईल, त्या देहाची सन्मानाने चिरफाड करताना त्यांना शरीरशास्त्राचे ज्ञान तर मिळेलच पण त्यांच्यात मानवी शरीराविषयीच्या माहितीमुळे धाडस येईल. त्या मृतदेहामुळे एखाद्याला डोळे मिळतील. एखाद्याला त्याची त्वचा उपयुक्त ठरेल. म्हणजे आपल्या मृत्युनंतरही आपले अवयव कुणाच्या तरी रूपाने आपल्या मागे राहतील. वैद्यकीय शाखेत या विद्यार्थ्यांना अनेक तज्ज्ञ शिकवत असतात पण आपला मृतदेह त्यांचा खऱ्याअर्थी गुरु बनेल. आपली कीर्ती या डॉक्टरांच्या मनात आणि त्यांनी पुढे वैद्यकीय व्यवसायात वाचवलेल्या हजारो रुग्णांत अप्रत्यक्षपणे का होईना नक्की राहील.
प्रा. वसंत दातार हे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचं वय होतं 82 वर्षे! मृत्युपूर्वी त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, “आयुष्यभर काळ्या फळ्यावर शिकवलं. आता माझा देहच ‘फळा’ होऊ दे! मेल्यावर पुन्हा डॉक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो!”
सरांचं निधन झालं. त्यांचा देह केईएम हॉस्पिटलमध्ये गेला. त्यानंतर दोन वर्षांनी डॉक्टर होऊ पाहणारी एक विद्यार्थिनी तिथं सरावासाठी गेली. तिथं टेबलवर झाकलेला एक मृतदेह तिनं उघडला आणि अक्षरशः हंबरडाच फोडला. ते तिचे आवडते प्राध्यापक होते. थोड्याच वेळात तिनं स्वतःला सावरलं. उपस्थित सहाध्यायांना सांगितलं, “हे माझे सर आहेत. जिवंतपणी तर त्यांनी मला शिकवलंच पण आजही माझे मार्गदर्शक म्हणून ते इथं आहेत.” दातार सरांचा देह खरोखर ‘फळा’ झाला होता. त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली ही शेवटची भेट संस्मरणीय ठरली होती. त्यांची ती विद्यार्थिनी अजूनही त्या तारखेला सरांच्या फोटोला हार घालून त्यांचं स्मरण करते. अजूनही त्यांचा तास संपला नाही, ते आपल्याला शिकवतच आहेत, असं तिला वाटतं.
अशीच गोष्ट पुण्याच्या नामदेवची. तो तर एक भिकारी होता. रेल्वे स्टेशनवर भीक मागणे आणि आलेला दिवस घालवणे हा त्याचा दिनक्रम! गाडीची वाट पाहणारे काही प्रवासी वृत्तपत्र विकत घ्यायचे, ते वाचायचे आणि गाडी आल्यावर फेकून द्यायचे. ती वृत्तपत्रे तो गोळा करायचा आणि वाचत बसायचा. एकदा रस्ता ओलांडताना एका भरधाव ट्रकने त्याला उडवलं. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलीस आले. पंचनामा झाला. तो जागीच गेला होता. त्याच्या सोबत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत एक पिवळा पडलेला कागद होता. तो बघितला तर देहदानाचा अर्ज! त्यावर त्याने नामदेव इतकंच नाव लिहून खाली स्वतःचा अंगठा उमठवला होता. त्याचा देह वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. तेथील प्रमुखांनी सांगितलं, “हा देह आम्हाला पाच वर्षे पुरला. याच्यावर आम्ही तीनशे डॉक्टर घडवले. हा रूढार्थाने भीकारी होता पण मनाने राजा होता. कर्णासारखं दान त्याने आमच्या पदरात टाकलं.”
देहदानाच्या अशा अनेक सत्यकथा सांगता येतील. ‘देहाचा फळा होणं’ हे मरणावर मात करण्यासारखं आहे. आपण देहदानाचा अर्ज भरला की, मृत्युनंतर नातलगांनी, जवळच्या व्यक्तिंनी फक्त एक फोन करायचा. लगेच रुग्णवाहिका येते. आपला देह ते सन्मानाने नेतात. त्यांचे संशोधन झाले, आवश्यक अवयव काढून घेतले की तो पुन्हा शिवला जातो. त्याचे अंत्यसंस्कारही केले जातात. कुटुंबियांची इच्छा असेल तर त्यांची अस्थी घरी पाठवली जाते. या प्रक्रियेत कुठेही मृतदेहाची हेळसांड होत नाही. त्या देहाशी हे ‘शिकाऊ’ डॉक्टर ‘बोलत’ असतात. त्यांच्यासाठी तो फक्त मृतदेह नसतो तर त्यांना घडवणारा सर्वेाच्च गुरु असतो. आपल्याकडे देह नाशवंत आणि आत्मा अमर आहे, असे सांगितले जाते. मग जो देह नाशवंत आहे त्याच्या मोहात का पडावे? समाजकल्याणात आपल्या देहाचा मोठा वाटा ठरणार आहे. एखादी सेजल पवार बिनडोकाप्रमाणे काहीतरी बरळते म्हणून विचारात पडू नका. आपल्या देहाचा सोनं करा. मृत्यू का कुणालाच टळलेला नाही. ते शाश्वत सत्य स्वीकारायला धाडस लागतं. देहदानाचा अर्ज भरला म्हणजे आपण लगेच मृत्युला आमंत्रण दिलं असंही नाही. त्या बापुड्याला यायचे तेव्हा येऊ द्या! त्याच्या स्वागतासाठी आपण सुसज्ज राहायला काय हरकत आहे? देणार ना तुम्हीही आपल्या पुढच्या पिढीसाठी अशी अनमोल भेट? आयुष्याचा ताळेबंद मांडताना कुणाला काय देऊ शकलो? कुणाला काय देण्यात कमी पडलो? याचा विचार न करता आपल्याकडे देण्यासारखे जे सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्यामुळे समाजाचे भले होणार आहे ते जरूर द्या आणि समाजऋणातून मोकळे व्हा!
घनश्याम पाटील
७०५७२९२०९२
साप्ताहिक चपराक १५ ते २१ जून २०२६
.jpg)



घनश्यामजी, खूप तळमळीने आणि पोटतिडकीने लेख लिहिला आहे. अभिनंदन!