top of page

कायम पहिल्या स्थानावर

  • 5 days ago
  • 4 min read


पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी हे इवलंसं गाव गुगलच्या नकाशावर येतं की नाही हे मला पाहावं लागेल पण या गावातील एका सामान्य माणसानं आपल्या कर्तृत्वाची पताका अशी डौलत ठेवलीय की आधुनिक मराठी पत्रकारितेचा इतिहास त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही. केवळ चार इयत्ता शिकलेल्या या माणसानं चार भाषेतील आठ दैनिकं सुरू करून एक नवा इतिहास लिहिला. हा इतिहास इतका देदीप्यमान आहे की येणाऱ्या अनेक पिढ्यांना तो प्रेरणा देईल. होय, ही किमया घडवलीय दै. पुण्य नगरीचे संस्थापक मुरलीधर अनंता अर्थात बाबा शिंगोटे यांनी. ‌‘बाबा‌’ या नावाने सुपरिचित असलेला हा ‌‘बाप माणूस‌’ या क्षेत्रात धडपडणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांचा आदर्श आहे.




जुन्नरहून थेट मुंबई गाठून त्यांनी उदरनिर्वाहासाठी पडतील ती कामे केली. नंतर अग्रलेखांचे बादशहा अशी ओळख असलेल्या नीलकंठ खाडिलकर यांच्या मदतीला हा बिरबल धाऊन आला. निळूभाऊंची लेखणी आणि बाबांचं वितरण म्हणजे एक चमत्कार ठरला. नवाकाळ मुंबईकरांच्या घराघरात पोहोचला. त्यानंतर कालनिर्णयच्या ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांनी एक दैनिक सुरू केलं. बाबा त्यांच्या मदतीला गेले पण हे दैनिक अल्पायुषी ठरलं. पुढे काय करायचं? हा प्रश्न बाबांच्या पुढे होता. मग त्यांनी त्यांचं वितरणाचं कौशल्य पणाला लावत मुंबई चौफेर हे सायंदैनिक सुरू केलं. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटीन शहराची भूक लक्षात घेऊन श्री अंबिका प्रिंटर्सच्या माध्यमातून त्यांनी आपला वार्ताहर, यशोभूमि, कर्नाटक मल्ला, तमिळ टाईम्स, मेट्रो बिटस, हिंदमाता आणि पुण्य नगरी अशी एकाहून एक दैनिके सुरू केली आणि ती उत्तमरित्या चालवून दाखवली. एखादं साप्ताहिक चालवणं म्हणजे हत्ती पोसण्यारखं वाटण्याच्या काळात त्यांनी ही जी किमया घडवून दाखवली ती जगाच्या पाठीवर विचार करता एकमेवाद्वितीय असेल. ‌‘अनुभव नसताची जाण, व्यर्थ पुस्तकी ज्ञान‌’ या संत वचनाप्रमाणे त्यांनी माणसांची मने वाचली आणि माध्यम क्षेत्रात अभुतपूर्व क्रांती घडवत हजारो लोकांचा पोशिंदा होण्याचे स्वप्न साकारले.


आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपलं एखादं सर्वेाच्च स्वप्न असतं. आदरणीय बाबांचा माध्यमातील हा चमत्कार बघून मला त्यांचं चरित्र प्रकाशित करावं असं प्रकाशक म्हणून मनोमन वाटायचं. त्यासाठी मी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. बाबांचं व्यक्तिमत्त्व असामान्य असूनही जगणं मात्र खूपच सामान्य असायचं. आपल्या जिपमधून सतत भ्रमंती करणे, साधे कपडे वापरणे, सततचा प्रवास करून कार्यालयात आल्यावर अंथरूण म्हणून वृत्तपत्रांचाच वापर करत तिथेच झोपणे, भजी-वडापाववर नितांत प्रेम करणे अशी त्यांची जीवनशैली असायची. अनेक सुटा-बुटातले लोक त्यांना भेटायला आल्यावर एखादा कर्मचारी समजून त्यांनाच ‌‘बाबा शिंगोटे सर कुठे आहेत?‌’ असं विचारायचे. बाबा सगळ्यांचं शांतपणे ऐकून घ्यायचे आणि एका वाक्यात तो विषय संपवायचे.


माझ्या चरित्रलेखनाच्या आग्रहानंतर त्यांनी प्रकाशक म्हणून मला एक अट घातली. ते म्हणाले, ‌‘पुस्तक जरूर करा पण त्याचं लेखन तुमच्या परिवाराचे लेखक भाऊ तोरसेकरांनी करावं अशी माझी इच्छा आहे.‌’ त्यांचा निरोप मी भाऊंना दिला. त्या दोघांची एक भेटही घडवून आणली. पुण्यनगरीच्या यशात भाऊंचा मोठा वाटा आहे, असं ते सातत्यानं सांगायचे. या दोन दिग्गजांच्या भेटीचं फलित काही हाती आलं नाही आणि माझं हे स्वप्न अजूनही पूर्णत्वाला गेलं नाही. मुंबईतील प्रत्यक्ष या दैनिकाने त्यांच्यावर एक लेखमाला चालवली होती. ‌‘त्याचे सर्व भाग तुम्ही वाचून घ्या,‌’ असंही त्यांनी सांगितलं होतं पण तेही मला उपलब्ध झाले नाहीत. अजूनही होतील अशी अपेक्षा आहे.


वाड्या-वस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्यात मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. एखाद्या एजंटकडे पाच-दहा अंकच जात असले तरी भल्या पहाटे त्याच्याकडे जाऊन त्याच्या अडीअडचणी समजून घेणे आणि अंकात नवीन काय देता येईल याचा शोध घेणारे बाबा श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देतात. शरद पवारांना जसा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघ माहीत आहे तसे बाबांना महाराष्ट्रातील गाव न गाव परिचित होते. कुठे कोणता एजंट जास्त अंक विकतो, कोणत्या भागातील कोणता विषय बातमीच्या माध्यमातून दिल्यास त्याची चर्चा होऊ शकेल याची अचूक जाण त्यांना असायची. पुण्याच्या कार्यालयात बसल्यावर जळगाव जिल्ह्यातील कोणत्या सरपंचाचा वाढदिवस आहे आणि त्याची जाहिरात अजून कशी आली नाही, याकडेही त्यांचे सूक्ष्म लक्ष असायचे. अर्थात हे करताना त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजीही कुटुंबकर्त्याप्रमाणेच घेतली. संभाजीनगर आवृत्तीचे पुण्यनगरीचे तेव्हाचे संपादक असलेले माझे सन्मित्र सुशील कुलकर्णी हे त्यांचे घर खरेदी करताना बाबांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत कशी केली हे आजही गौरवाने सांगतात. आपल्या एखाद्या आवृत्तीच्या संपादकाचे घर होणार असेल तर काही गोष्टी जाणूनबुजून कशा कानाडोळा करायच्या हे बाबाशिवाय दुसरे कोण करू शकणार...? केवळ संपादकच नाही तर या क्षेत्रातील शेवटचा घटक असलेले, घरोघरी वृत्तपत्र वाटणारी मुलेही कशी समृद्ध आयुष्य जगू शकतील याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. म्हणूनच अशी साखळी वृत्तपत्रे चालवताना खऱ्याअर्थी चांद्यापासून बांद्यापर्यंत पुण्यनगरीचा वाचक निर्माण झाला. आमच्यासारख्या अनेक लिहित्या हातांना त्यामुळे कायम बळ तर मिळालेच पण आम्हाला घडवण्यात, आम्हाला वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.


बाबा स्वभावाने जसे भोळे होते तसेच वृत्तीने अत्यंत चाणाक्षही होते. या दोन्हीचे एकेक उदाहरण द्यायचा मोह होतो. मुंबई चौफेर हे सांयदैनिक चालवताना सरकारी जाहिराती सुरू झाल्या मात्र त्यांचे दर अगदीच नगण्य होते. शिवाय बाबूशाहीमुळे मिळालेल्या जाहिरातीचे पैसेही वेळेत मिळत नसत. त्यावेळी त्यांनी काय करावं...? भाऊ तोरसेकरांना त्यांनी सांगितलं, ‌‘उद्याच्या अंकात एक पुडी सोडून द्या. ‌‘मंत्रालयात काम करणाऱ्या ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या बायकांच्या, नातेवाईकांच्या नावे दिवाळी अंक निघतात आणि अप्रत्यक्षपणे ते त्यांच्या माध्यमातून जाहिराती गोळा करतात त्यांची यादी उद्याच्या अंकात,‌’ अशी एक स्कायलाईन द्या...‌’ ही योजना अंमलात येताच त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि अडकाठी ठरणारे मस्तवाल अधिकारी सुताप्रमाणे सरळ झाले.


दुसरे त्यांच्या भोळेपणाचे उदाहरण पुण्यातील जोगेश्वरीजवळच्या पुण्यनगरी कार्यालयातले! एकदा सगळ्यासाठी गरमागरम भजीपाव मागवली. सोबत त्यांच्या आवडीच्या तळलेल्या मिरच्या होत्या. खाऊन झाल्यावर त्या बऱ्याचशा उरल्या होत्या. तेव्हाचे ऑपरेटर असलेल्या राम गंगणे यांनी त्या एका कागदात पद्धतशीर गुंडाळल्या. ते पाहून बाबा खूश झाले आणि त्यांनी शंभरची नोट काढून रामभाऊला दिली. म्हणाले, ‌‘वा रामभाऊ. या मिरच्या वाया न घालवता तुम्ही कागदात गुंडाळल्या. अन्नाची नासाडी करू नये हा संदेश महत्त्वाचा आहे. त्या रात्रीच्या जेवणासोबत खाता येतील. तुम्हाला हे शंभर रूपये भेट.‌’ रामभाऊ एकदम स्तब्धच! थोड्या वेळांनी बाजूला आल्यावर मी विचारलं, ‌‘काय झालं रामभाऊ, एवढे शांत शांत का?‌’ त्यावर त्यांनी सांगितलं, ‌‘काय सांगू पाटील साहेब, अजून एक मिनिट उशीर झाला असता ना तर या गुंडाळलेल्या मिरच्या मी डस्टबिनमध्ये टाकल्या असत्या. आज थोडक्यात वाचलो.‌’


वाचकांपर्यंत वेळेत वृत्तपत्र पोहोचणे आणि सामान्य वाचकालाच केंद्रस्थानी ठेवून अंकाची मांडणी करणे यामुळे पुण्यनगरी हे वृत्तपत्र महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचे ठरले. वृत्तपत्राचा क्रम कितवाही असला तरी शून्यातून असे विश्व निर्माण करणारे बाबा मात्र आमच्यासारख्या असंख्यांच्या मनात कायम पहिल्या स्थानावर आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो.


-घनश्याम पाटील

7057292092




Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page