संपादकीय - शहा खरंच काही वाचतात?
- Aug 4
- 4 min read
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जंतर मंतर येथील तरूणांच्या आंदोलनानंतर अमित शहा यावर काय भाष्य करणार? याबाबत उत्सुकता होती. शहा यांनी या कार्यक्रमात काय सांगितलं? “सामान्य माणसाने गीतेतील विचार दैनंदिन आयुष्यात कसे जगावेत याचे उत्तम मार्गदर्शन गीतारहस्य या ग्रंथात आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही चूक करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. मला गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत वाचायला मिळाला होता...”

कार्यक्रमाच्या औचित्याने त्यांनी केलेली ही मांडणी योग्यच असली तरी खरेच अमित शहा यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ वाचला होता का? हा प्रश्न मात्र नक्की पडतो. ते म्हणतात त्याप्रमाणे गीतारहस्य वाचल्यानंतर कोणीही, कसलीही ‘चूक’ करणार नाही; हे स्वीकारायचे तर मग अमित शहा गृहमंत्री म्हणून विद्यार्थी आंदोलन हाताळण्यात यशस्वी ठरले का? ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा जळजळीत प्रश्न करणारे लोकमान्य टिळक जर शहांचे आदर्श असतील तर मग आपल्या न्याय हक्कासाठी सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या प्रत्येकाला का पळता भुई थोडी केली जातेय? एखाद्याने सरकारमधील काही दोष दाखवले, सरकारवर टीका केली की त्याच्याशी ज्या सूडभावनेने उट्टे काढले जातात ते टिळकांना अपेक्षित होते का? मग लोकमान्य टिळकांच्या चरित्र आणि चारित्र्यातून अमित शहा यांच्यासारखे नेते नेमके काय शिकले? शहा यांच्यासारख्या नेत्यांच्या हस्ते अतिशय सन्मानाचा असलेल्या टिळक पुरस्काराचे वितरण ही गोष्ट योग्य की अयोग्य? या वादात आम्हाला जायचे नाही! मात्र शहा यांचे टिळकांप्रतिचे आकलन किती? हा प्रश्न मात्र उपस्थित करावा वाटतो.
लोकमान्य टिळक यांच्या गीतारहस्यचा गाभा काय? ते म्हणतात, ‘कोणतेही काम हे कर्तव्य म्हणून पार पाडा. त्यात सूडाची भावना आली तर ते काम नासलेच म्हणून समजा.’ अमित शहा आणि ते ज्या सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहेत त्या सरकारचा आत्माच सूडाचा दिसतो. आजवरच्या किती तरी घटनांनी ते सिद्ध केले आहेच पण नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनातही ते प्रकर्षाने दिसून आले. “विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारासाठी गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे अमित शहा हेच जबाबदार आहेत. संसदेत येऊन यावर उत्तर देण्याऐवजी ते बंद खोलीत बसले आहेत मात्र जास्त दिवस तुम्ही तसे बसू शकणार नाही. युवक आणि जनता तुम्हाला बाहेर खेचून काढेल,” अशा शब्दात शहा यांना लक्ष्य करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली आहे. केवळ विरोधी पक्षाच्या अध्यक्षाचे मत म्हणून तिकडे दुर्लक्ष करता येणार नाही तर जनभावनाही हीच आहे.
सर्व धर्माविषयी सहिष्णुता दाखवणारी गीता प्रत्येकाने वाचायला हवी, हे तर खरेच पण ते सांगतेय कोण? ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला,’ अशी अमित शहा यांची गत झालीय का? ‘फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्मयोग अव्याहमतपणे सुरू ठेवा,’ अशी शिकवण गीता देते. ‘सगळं सोडून हिमालयात जा’ अशी शिकवण गीता देत नाही. ‘हे माझं आहे, हा अहंकार सोडा’ असं गीता सांगते. ‘स्वधर्म म्हणजे जातीचा धर्म नाही. तुमची क्षमता आणि समाजाची गरज यांचा संगम म्हणजे स्वधर्म’ असं लोकमान्य टिळक स्पष्ट करतात. प्राणाची बाजी लावत सैनिकानं देश वाचवावा, कायम अद्ययावत राहत शिक्षकानं ज्ञानार्जन करावं, वैद्यानं रुग्णावर यथायोग्य उपचार करून त्यांना जीवदान द्यावं, माध्यमांनी शहा यांच्यासारख्या नेत्यांना न घाबरता सत्य मांडावं, आपल्यावर अन्याय होत असेल तर विद्यार्थ्यांनी सरकारकडे दाद मागावी, सरकारनं त्यांच्यावर लाठीहल्ला न करता त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत हे असंच काही लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणार ना...? स्वधर्म यापेक्षा वेगळा काय असू शकतो?
ज्या गीतारहस्यच्या वाचनाचा दाखला अमित शहा देतात त्या गीतारहस्यमध्ये टिळक महाराज म्हणतात, ‘जीवनाचा उद्देश मोक्ष मिळवणे हाच असला तरी मोक्ष म्हणजे पळणे नाही. कर्म करत चित्तशुद्धी म्हणजे मोक्ष. काम करत राहा पण त्या कामाचे फळ देणे माझ्या हातात नाही. अपयश आले तर खचायचे नाही आणि यश मिळाले तर हुरळून जायचे नाही. फक्त बोलघेवडेपणा न करता चांगल्या माणसाने पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करायला हवे,’ असे सांगून टिळक गीतेचा आधार घेत एक महत्त्वाचा संदेश देतात - “स्वातंत्र्यासाठी लढणे हाही एक धर्म आहे. अन्यायाविरूद्ध उभं राहणं हेच गीतेचं कर्म आहे.”
असं जर असेल तर मग आपल्यावरील अन्यायाविरूद्ध लढणाऱ्यांना असे मोडित का काढता? विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर ही शिकवण गीतेची आहे का? जो गीतारहस्य तुम्ही तरूणांना वाचायला सांगताय तो वाचून त्याची अंमलबजावणी केली तर हे सरकार जागेवर राहील काय? एकेकाळी हेच अमिश शहा गुजरात भवनच्या दोन खोल्यातील कार्यालयात बसून पक्षाचं काम बघायचे. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात तासनतास वाट बघत बसायचे. आपले संपत चाललेले भवितव्य कसे सावरता येईल यासाठी अटोकाट प्रयत्न करायचे. त्याच शहांनी पक्षातील सर्वात मोठे पद मिळवले. ते केंद्रिय गृहमंत्री झाले. 370 चे कलम हटवण्यात पुढाकार घेतला. पक्षात स्वतःचे स्थान मजबूत केले. हे सगळं गीतारहस्यच्या वाचनातून घडले असे त्यांचे म्हणणे असेल तर आनंदच आहे पण संपूर्ण गीतारहस्य त्यांना मान्य आहे का? त्यानुसार ते खरंच वाटचाल करतात का?
कुणीतरी म्हटलंय, ‘आपला समाज कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही.’ त्यामुळं गीतारहस्य वाचूनही क्रांतिची आग पेटणार नाही, हे शहा यांच्यासारख्या नेत्यांना ज्ञात असावं म्हणून ते असे सल्ले देतात. विद्यार्थ्यांचं सोडा पण शहा यांच्यासारख्या नेत्यांनी जरी खरंच गीतारहस्य वाचलं असतं आणि ते आचरणात आणलं असतं तर आपल्या राष्ट्राची दिशा कोणती राहिली असती? सध्याच्या काळात काही सन्माननीय अपवाद वगळता राजकारण्यांचा आणि वाचनाचा खरंच काही संबंध राहिलाय का? त्यात गीतारहस्यसारखे वैचारिक ग्रंथ वाचणे, अन्य विषयावरील संशोधनपूर्व, तत्त्वज्ञानात्मक वाचन करणे, त्यावर मनन, चिंतन करणे आणि सुयोग्य कृती करणे हे चित्र कुठे दिसते? ‘वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, सरकार म्हणून आम्ही त्यासाठी प्रोत्साहन देऊ,’ असं एखादं ठेवणीतलं वाक्य उच्चारलं की समोरच्यालाही बरं वाटतं आणि माध्यमातूनही त्याची दखल घेतली जाते. त्यामुळेच शहा यांच्यासारख्या नेत्यांना अधूनमधून असं बोलावं लागतं. कोट्यवधी रूपये चहापाण्यासाठी उधळणारे सरकार त्यांच्या मंत्र्यांना सांगतं की ‘वृत्तपत्रांचा खर्च परवडत नसल्याने कार्यालयातली वृत्तपत्रे बंद करा’ आणि त्यांचे नेते अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात छाती फुगवून सांगतात की, “तरूणांनो, गीतारहस्यसारखे ग्रंथ वाचा.” ही सगळी विसंगती आपला सांस्कृतिक आणि वैचारिक फोलपणा सिद्ध करण्यास पुरेशी ठरते.
‘कमकुवत माणूस संन्यास घेतो आणि खरा वीर कर्मयोगी होतो,’ असा संदेश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. आज विविध क्षेत्रातील जे कुशल कर्मवीर आहेत ते सरकारच्या अनेक धोरणांमुळे मेटाकुटीला आलेत. अनेकांना तर आता हा देशही सुरक्षित वाटत नाही. त्याविषयी त्यांनी काही मत प्रदर्शित केले की लगेच त्यांना देशद्रोही ठरवत सांगितले जाते, ‘मग पाकिस्तानला निघून जा!’ आपल्या देशातील गैरसोयीबद्दल, आपल्या अडचणींबद्दल आपण बोलायचे नाही तर त्यासाठी विदेशातून माणसे रोजंदारीने आणायची का? व्यवस्थेच्या, सरकारच्याविरूद्ध काही बोलले की लगेच तो देशद्रोही ही मानसिकता बदलायला हवी.
आजची परिस्थिती पाहता अनेक तरूण गोंधळलेत. त्यांच्या मनात त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. या सगळ्या परिस्थितीत आपले काय होणार? या भीतीनं ते ग्रासलेत. एकटेपणाच्या भावनेतून काय करावं हे न कळल्यानं ते हतबल झालेत. शस्त्र हाती घ्यायला लावणारे अनेक जण आजूबाजूला आहेत. ‘सामने अपने ही है’ असं अर्जुनाप्रमाणे त्यांनाही वाटतंय! पण ‘अपने है तो सामने क्यों है?’ या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना मिळत नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांच्या सल्ल्यांची गरज त्यांना पडणार नाही.
घनश्याम पाटील
७०५७२९२९२
.jpg)



Comments